समर्पण-एक प्रेमकथा भाग १०

एक अनोखी प्रेमकथा
समर्पण-एक प्रेमकथा भाग १०

मागील भागाचा सारांश: केतकीच्या आईने नीरजाला आग्रहाने जेऊ घातले. घरचं जेवण करून नीरजाचं मन तृप्त झालं होतं. केतकीने आपल्या आजीशी नीरजा सोबत ओळख करून दिली. केतकीच्या आईने नीरजाला थोडे दिवस अभ्यास बाजूला ठेवून आराम करण्याचा सल्ला दिला आणि त्या एक वाक्य बोलून गेल्या की, आम्हाला हे सगळं वेळ निघून गेल्यावर समजलं. या वाक्याचा अर्थ नीरजाला समजला नव्हता.

आता बघूया पुढे….

"नीरजा, चल रुममध्ये जाऊन मस्त ताणून देऊयात." केतकी जिन्याच्या दिशेने जात म्हणाली.

"तू मला तुझ्या ताईसोबत ओळख करून देणार होतीस ना?" नीरजाने तिला मध्येच अडवले.

केतकीच्या चेहऱ्यावरील रंग उडाला होता. ती एक खोल श्वास घेऊन म्हणाली,
"तू रूममध्ये चल, मग ताईसोबत तुझी ओळख करून देते."

केतकीच्या पाठोपाठ नीरजा रूममध्ये गेली. नीरजा केतकीकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होती. केतकीने कपाट उघडले आणि त्यातून एक फ्रेम केलेला फोटो काढला आणि तो फोटो नीरजाच्या हातात देत ती म्हणाली,
"ही माझी ताई आहे."

फोटो बघून नीरजा गोंधळली होती. तिच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले होते. केतकीला नीरजाच्या मनातील प्रश्नांचा अंदाज आला होता, म्हणून ती पुढे म्हणाली,
"दोन वर्षांपूर्वी ताईने आत्महत्या केली. तिचा फोटो बघून सगळ्यांना त्रास होतो, म्हणून तो ह्या कपाटात ठेवून दिला."

"आत्महत्या पण का?" नीरजाने विचारले.

यावर केतकी म्हणाली,
"काल निकिताने तुला रूपाली ताईची जी गोष्ट सांगितली, ती रूपाली ताई हीच. फक्त निकिताने तुला तिच्या आईबद्दल किंवा कुटुंबाबद्दल जे सांगितले ते खोटे होते."

"अस करण्याची काय गरज होती? रूपाली ताईबद्दल तुही मला सांगू शकली असतीस." नीरजाला प्रश्न पडला होता.

"तुला रूपाली ताईबद्दल सगळं मी तेव्हा सांगूच शकले नसते. आजही मोठी हिंमत करून सांगते आहे. तू माझं बोलणं तितक मनावर घेतलं नसतं. तुला जेव्हा पहिल्या दिवशी बघितलं, तेव्हा मला आणि आईला आम्ही रूपाली ताईला भेटल्यासारखं वाटलं. तुझ्या स्वभावात आणि तिच्या स्वभावात खूप साम्य आहे. तुझ्या डोळ्यातील जिद्द ताईची आठवण करून देते.

ताई अभ्यासात हुशार होती, तिला अभ्यास करणेही आवडायचे. आई-बाबांना तिच्याकडून अपेक्षा वाढल्या होत्या. ताई अबोल असल्याने कधी तिने तिचं मन मोकळं केलंच नाही. आई-बाबांचा प्रत्येक शब्द ती झेलत होती. स्वतःचं अस मत तिने कधी मांडलंच नाही.

त्याचा परिणाम म्हणूनच ती तिच्याही नकळत डिप्रेशन मध्ये जात होती. डिप्रेशन मध्येच तिने स्वतःला संपवले. यासाठी आई-बाबा स्वतःला कधीच माफ करू शकत नाही.

तुला बघितलं आणि ताईच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. आम्ही दोघी विरुद्ध टोकं होतो. ती अभ्यासू आणि मी सतत टाईमपास करणारी. तिच्याकडून सगळ्यांच्या जरा जास्तच अपेक्षा होत्या. तू जशी अभ्यासावरून मला ओरडत असते, तशीच तीही मला ओरडायची.

जाण्याच्या दोन दिवस आधी ती आईला जाऊन म्हणाली होती की, तिला एक प्रकारची मरगळ आली आहे. मन कशातच लागत नाहीये. अभ्यास करावासा वाटत नाहीये. कुठेतरी दूर निघून जावं अस वाटतंय. आईने हे सगळं ऐकून दुर्लक्ष केलं. तिचं प्रॉपर म्हणणं सुद्धा आईने ऐकून घेतलं नाही.

शेतावर चक्कर मारायला चालले अस सांगून गेली होती, जाण्याच्या आधी ती मला बोलून गेली की, "केतू, अभ्यास करच पण त्याबरोबर आयुष्य जगणं सोडू नकोस. सगळ्या ऍक्टिव्हिटीज करत अभ्यास कर. आयुष्य एन्जॉय कर. मी जी चूक केली ती तू करू नकोस."

ताई नेहमीप्रमाणे बोलत असेल, म्हणून मी ऐकून न ऐकल्यासारखं केलं. शेतावर एक विहीर आहे, त्यात उडी मारून तिने जीव दिला. पाण्यात काहीतरी पडल्याचा आवाज आला, म्हणून आसपासचे मजूर धावत सुटले. ताई पडलेली आढळल्यावर त्यांनी लगेच दोर टाकून, एका मजुराने स्वतः खाली उतरून तिला वर काढले. त्यांनी लगेच तिला दवाखान्यात नेले, पण तोपर्यंत तिचा जीव गेला होता.

आम्हाला किती मोठा शॉक बसला होता, हे आमचं आम्हालाच माहीत. तिचा टेबल आवरताना त्यात मला एक चिठ्ठी आढळून आली, त्यावर अस लिहिलेलं होत की,

"आई-बाबा मला माफ करा. मी अचानक गेल्याचा तुम्हाला खूप त्रास झाला असेल. माझा रागही आला असेल, पण मला होणारा त्रास असह्य झाला होता. एखादी गोष्ट आवडत असली की, त्याने तीच करावी, ही अपेक्षा करणे चुकीचे आहे. मला अभ्यासासोबत इतर गोष्टीही कराव्या वाटायच्या, पण बाबांच्या धाकामुळे मी कधीच बोलले नाही.

शेवटचा प्रयत्न म्हणून मी आईला माझी मनस्थिती सांगायला गेले होते, पण तिने ते ऐकूनच घेतलं नाही. अभ्यास एके अभ्यास केल्याने मला मैत्रिणीही नव्हत्या की, त्यांच्याकडे मी मन मोकळं करेल. केतू आणि ऋषीला अभ्यासाची बळजबरी करू नका. त्यांना जे करायचं ते करूद्यात. तुमच्यापैकी कोणीच स्वतःला दोषी मानून घेऊ नका.

माझं आयुष्यच एवढं असेल, अशी समजूत मनाला घाला."

मला माझंच बऱ्याचदा गिल्टी वाटत की, मी तरी ताईचं बोलणं ऐकून, समजून घेतलं असतं, तर ताई एक या जगात असती." बोलताना केतकीला भरून आले होते.

नीरजाने तिला मिठी मारली. केतकीने मनसोक्त अश्रू गाळून घेतले.

"काकूंच्या बोलण्याचा मला आत्ता अर्थ उमगला." नीरजा चुटकी वाजवत म्हणाली.

"हो. जशी ताईची अवस्था झाली, तशी तुझी होऊ नये म्हणून तुझं मन डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत असते. तुला माझ्या बोलण्यामागील ही कळकळ कळतच नव्हती." केतकीने सांगितले.

"इथून पुढे लक्षात ठेवेल. तुम्ही सगळेच माझा खूप विचार करत आहात." नीरजालाही आता भरून आले होते.

केतकीने तिच्या ताईचा फोटो कपाटात ठेवून दिला.

"नीरजा, जरावेळ तुही झोप आणि मलाही झोपूदेत. तेवढाच मनाला आणि शरीराला आराम मिळेल." केतकी म्हणाली.

नीरजा झोपली होती, पण केतकीला झोप लागत नव्हती. तिच्या मनात तिच्या ताईचे विचार सुरू होते. केतकी नीरजाच्या बाबतीत हळवी का होते, याचंही कारण नीरजाला कळलं होतं.

केतकीच्या घरी असेपर्यंत नीरजाने पुस्तकांना हात लावला नाही. केतकीची आई दररोज नीरजा साठी वेगवेगळे पदार्थ खायला करत होती. गडावर जाऊन देवीच दर्शन घेऊन आले. डोंगरावर ट्रेकला गेले होते. केतकी मामाच्या गावाला नीरजाला घेऊन गेली होती.

नीरजानेही सगळंच एन्जॉय केलं होतं. सगळ्यांनी नीरजावर भरपूर प्रेम केलं होतं. नीरजा केतकीला केतू म्हणू लागली होती. केतकी व नीरजा एकमेकींच्या घट्ट मैत्रिणी झाल्या होत्या. नीरजा आता केतकीच्या घरी दर सुट्टीत जाऊ लागली होती. केतकीच्या घरच्यांनी नीरजाला कधी परके समजलेच नाही.

बारावी नंतर मिळणाऱ्या मोठया सुट्टीत नीरजा आधी काही दिवस केतकीच्या घरी गेली आणि उरलेले दिवस कल्पतरू आश्रमात गेली होती. निकाल लागला, नीरजा कॉलेजमध्ये तिसरी आली होती. केतकीला फर्स्ट क्लास मिळाला होता. सीईटीचा निकाल लागल्यावर नीरजाचा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला नंबर लागला होता, तर केतकीला कमी गुण मिळाल्याने इंजिनिअरिंगला जावे लागले.

केतकी व नीरजा वेगवेगळ्या शहरांमध्ये राहत असल्या तरी एकमेकींच्या कायम संपर्कात राहत होत्या. नीरजा केतकीच्या घरी अधूनमधून जात होतीच. केतकीची आई नीरजाला भेटायला तिच्या कॉलेजला जायची, जाताना सोबत खाण्यापिण्याचे वेगवेगळे पदार्थ घेऊन जायची.

केतकीच्या आईने नीरजाला आईची कमी भासू दिली नव्हती. नीरजाच्या आग्रहाखातर केतकीच्या आई- वडिलांनी तिचं कन्यादान केलं होतं. केतकी इंजिनिअरिंग झाल्यावर पुण्यात एका कंपनीत नोकरीला लागली होती. नातेवाईकांमधील एक स्थळ बघून केतकीचं लग्न त्याच्या सोबत लावून देण्यात आले होते.

केतकीचा नवराही इंजिनिअर होता. दोघेही जॉब करत होते. केतकी व नीरजाची झालेली घट्ट मैत्री अजूनही तशीच होती. लग्न झाल्यावर सुद्धा त्यांच्या मैत्रीत कधीच फरक पडला नाही.

केतकीला नीरजाच्या आयुष्यात घडलेल्या घोळाबद्दल कळल्यावर तिची प्रतिक्रिया काय असेल? बघूया पुढील भागात……

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all