समांतर रेषा भाग५ अंतीम.विषय भूतकाळात डोकावताना.जलद कथा लेखन स्पर्धा

एक कथा


समांतर रेषा भाग५
विषय भूतकाळात डोकावताना.
जलद कथा लेखन स्पर्धा
मागील भागावरून पुढे…

रूचीर अनन्याच्या डोळ्यातील पाणी बघूनही शांत होता.
त्या लग्नाच्या हाॅलमध्ये आजूबाजूला जाता येता लोक विचीत्र नजरेने अनन्या कडे बघत होते.हे बघून रूचीर अनन्याला म्हणाला,

"अनन्या रडणं थांबव.आपण लग्नाच्या हाॅलमध्ये आहोत.सगळे विचित्र नजरेने बघतात आहेत तुझ्याकडे."

आपले डोळे पुसत अनन्या रडवेल्या आवाजात म्हणाली,

" मला खरंच तुझ्या आधाराची गरज वाटतेय या क्षणी. मला माझ्या रूचीरनं इतकं छान समजून घेतलं आणि मला समजावलं म्हणून मला खूप वाटत होतं तुझ्याजवळ बसावं आणि तुझा हात हातात घ्यावा." अनन्या चे डोळे पाणी गळणं थांबवतच नव्हते.

"अनन्या आज पूलाखालून खूप पाणी वाहून गेलंय. परीस्थिती बदलली आहे. आपल्या नात्यातील अर्थ बदलला आहे.तू पूर्वी माझी होतीस आज सर्वार्थाने अभयची आहेस. काही सामाजिक बंधनं आपण दोघांनी पाळायला हवी. अजूनही आयुष्यात आपली मैत्री टिकावी असं वाटत असेल तर हे बंधन पाळायला हवं.कळतय नं तुला अनन्या?"

" हो. तू म्हणतो आहेस ते बरोबर आहे. पण यापुढे मला भेटशील? माझ्याशी बोलशील?"

" भेटण्याची भानगड ठेऊ नकोस. फोनवर केव्हाही बोलू शकतो. अनन्या तू खूप संवेदनशील आहेस. पण आता थोडी परीपक्व होऊन आपल्या मैत्रीकडे बघ. जेव्हा मला भेटल्यावर सुद्धा आपल्या मैत्रीमधील मर्यादा तुझ्या लक्षात राहतील आणि तू तशी वागशील हा आत्मविश्वास जेव्हा तुला येईल तेव्हा आपण भेटू. भावनेच्या भरात जाऊन दोघांच्याही आयुष्याची वाट लावणं योग्य नाही. कळलं नं?"

" हो.कळलं.आज तुला भेटल्यावर खूप आठवणी जाग्या झाल्या.असं वाटतंय माझ्या आयुष्यात जी उणीव मला भासत होती ती तुला भेटल्याने संपली.मी फार घाई केली का लग्न करायची?"
अनन्या रूचीरकडे बघत म्हणाली,
" अनन्या तेव्हा तुला कळलं नाही माझं प्रेम.ही तुझी किंवा माझी चूक नाही.हे नशीबाची लिहीलं होतं.आता त्यावर विचार करण्यात काही अर्थ नाही.ऊलट तू दु:खी होशील."

" मग मी काय करू? मनाची होणारी घालमेल मी नाही थांबवू शकत." एवढं बोलून अनन्या रडू लागली.आता रूचीरला समजेना काय करावं? तरी तो म्हणाला,

" अनन्या भूतकाळात रमू नकोस. जागी हो.आताची आपली मैत्री वेगळ्या स्तरावरची आहे. माझ्या बद्दलची जी भावना तुझ्या मनात आहे ती तशीच ठेव तिला कधी उघड करू नकोस.कारण आपल्यावर दोन जीव अवलंबून आहेत.त्यांचं आयुष्य खराब होईल. तुझी मुलं मोठी झालीत. त्यांच्या मनात तुझी चांगली प्रतिमा आहे तिला धक्का पोचणार नाही याची काळजी घे. माझी मुलं सुद्धा मोठी झालीत. त्यांच्या मनात मी बाबा म्हणून जसा आहे तसाच राह्यला हवा.अनन्या सावर स्वतःला."

अनन्या अश्रू भरल्या डोळ्यांनी रूचीरकडे बघत होती.

आता डोळे पूस कारण तुझा नवरा येतोय इकडे." रूचीर म्हणाला.

अनन्या नी घाईघाईने डोळे पुसले. अभय अनन्या जवळ येऊन म्हणाला.

" निघायचं आज रूचीर तुम्ही भेटल्यामुळे मला काळजी नव्हती. नाहीतर नेहमी अनन्या कुठेतरी एकटीच बसलेली असते." यावर रूचीर फक्त हसला.अनन्या काहीच बोलली नाही.

" रूचीर तुम्ही या एकदा आमच्या घरी." अभय म्हणाला.

" हो नक्की येईन." रूचीर म्हणाला.

" नाही असं नको.एखादा दिवस ठरवूनच भेटू.नाहीतर पुन्हा कुठल्यातरी फंक्शन मध्येच आपण भेटू."

असं बोलून अभय जोरानी हसला. इतक्या जोरानी हसायची अभयला सवयच होती.

" अनन्या एकमेकांचे नंबर घेतलेत का? नाहीतर मी यांना बोलवायचं ठरवीन आणि तुझ्याजवळ यांचा फोन नंबर नसायचा."

" अरे हो विसरले. रूचीर तुझा नंबर सांग " अनन्या म्हणाली.

" रूचीर बघीतलं ही अशी आपल्याच तंद्रीत असते." रूचीर हसायचं म्हणून हसला.

अभय नी रूचीरशी हस्तांदोलन केलं आणि निघाला.अनन्यानी नजरेनीच बाय केलं.

अभय आणि अनन्या त्यांच्या कारकडे गेले.

दोघांना पाठमोरी बघताना रूचीरच्या मनात चार ओळी आल्या.

"वर्षे किती लोटली प्रिये तुझ्या दर्शनाला.
दुष्काळ माझ्या पापण्यांच्या आज संपला.

झरा तुझ्या स्नेहाचा त्यात मनसोक्त डुंबलो
आज फक्त नजरेच्या भाषेत खूप बोललो.

भेटलीस वारंवार जरी; दूरी नात्यात ही आली
तू नि मी समांतर रेषा नियतीनेच अलगद रेखीली."

त्यांची कार निघून जाताच थकलेल्या पावलांनी रुचीरही त्याच्या घरट्याकडे परतला.
------------------------------------------------------------
समाप्त
लेखिका... मीनाक्षी वैद्य.


🎭 Series Post

View all