समांतर रेषा भाग४ विषय भूतकाळात डोकावताना.जलद कथा लेखन स्पर्धा.

एक कथा


समांतर रेषा भाग४
विषय भूतकाळात डोकावताना
जलद कथा लेखन स्पर्धा
मागील भागावरून पुढे…

अनन्याला रूचीरने हळूवारपणे समजवायला सुरुवात केली.

" अनन्या तुला त्यांचं कार्य खोटं वाटत असेल पण जगात असंच चालतं. समाजासाठी झटून स्वतः कफल्लक राहणारे शेवटी हळूहळू समाजाच्या विस्मृतीत जातात.अनन्या प्रत्येक काम हे प्रत्येकालाच जमतं असं नाही. तू खूप संवेदनशील आहेस. तू या फंदात कशाला पडतेस? त्यांना त्यांचं काम करू दे. तू असं समाजकार्य करावसं अशी जबरदस्ती तुझ्या सासूबाई तुझ्यावर करतात का?"

" नाही.त्या नाही म्हणत तसं." अनन्या म्हणाली.

" मग झालं तर…! अनन्या… तू तुला ज्या गोष्टी आवडतात त्या कर. अकरावीत असतांना तू किती छान स्केचेस काढायचीस. ते काढ. चित्रांची प्रदर्शनं बघायला तुला आवडतं. ते बघ. तुझ्या घरी पैसा आहे,कामाला नोकरचाकर आहेत मग तू तुझं आयुष्य जग. घरच्यांच्या जीवनशैलीवर टीका करू नको. ते तुझ्यासारखे चित्रात रमणार आहेत का?" रूचीरनी विचारलं.

" छे… जिथे व्यवहार नाही मग ते कसे रमतील?" अनन्या हसत म्हणाली.

" अनन्या उगीच घरच्यांवर टीका करू नकोस. त्यांना व्यवहार आवडतो तरी तुझ्यावर व्यवहारी हो अशी जबरदस्ती करत नाहीत. तुझा आदर करतात. तुझ्या मनाला वाटेल तसं तू वागायला मोकळी आहेस. हे तुझं भाग्य आहे. पुष्कळांच्या घरी ही मोकळीक त्यांच्या घरच्या बायकांना नसते. म्हणून तुला सांगतो आहे. त्यांच्या जीवनशैलीवर टीका करून तू दुर्मुखलेली राहीलीस तर एक दिवस घरातले कंटाळतील. वेळीच सावध हो. तू तुझ्या आवडीनी जग त्यांना त्यांच्या आवडीचे जगू दे. जिथे तुमच्या कुटूंबाच्या प्रतीष्ठेचा प्रश्न आहे अशा वेळी त्यांच्यात मिसळून वाग. कारण तुझ्या वेगळ्या वागण्याने तुझ्या कुटुंबात कलह नको.यायला."

" रूचीर मी कोणीच नाही तुझी?" अनन्या अचानक म्हणाली.यावर क्षणभर रूचीर बावरला पण लगेच स्वतःला सावरून म्हणाला,

"अनन्या तू माझी कोणीतरी आहेस म्हणून सांगतोय. नाहीतर एवढं बोललो नसतो." रूचीर म्हणाला.

"तू नेहमीच तर्कसंगत बोलतोस. काॅलेजमध्ये असल्यापासून मला अनुभव आहे.मला पटतंय तू म्हणतोस ते." अनन्या खाली बघत म्हणाली.पण तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं.ते बघून रूचीरनी विचारलं,

" अनन्या तू रडतेस कशाला?"

" रडत नाही. तू माझा खरा मित्र आहेस म्हणून माझ्या रागाची पर्वा न करता मला योग्य तेच सांगीतलं." अनन्या नी कौतुकाची हसत रूचीरकडे बघीतलं.रूचीरपण हसला.

दोघंही ब-याच वेळा शांत बसले होते. दोघांनाही काय बोलावं सुचत नव्हतं. ब-याच वेळाने अनन्या रूचीरला म्हणाली

" रूचीर एक विचारू?\"

"अगं विचार नं. एवढी परवानगी कसली मागतेस?"रूचीर म्हणाला.

" मी थोडा वेळ तुझ्या जवळ बसू? तुझा हात हातात घेऊ?"

थोडावेळ अनन्याकडे बघून रूचीर म्हणाला,

" नाही. अनन्या आता आपल्या दोघांची आयुष्य म्हणजे दोन समांतर रेषा आहेत. दोन समांतर रेषा कधीच एकमेकांना छेदत नाही हा गणीतातला नियम आहे. पण तो आपण आपल्या आयुष्यातही पाळायला हवा. शांत हो. विचारानी वाग.आपण छान मित्र आहोत.आज या लग्नसमारंभाचं भान ठेवून वाग."

अनन्याच्या डोळ्यातून घळघळ पाणी येऊ लागलं….

_________________________________
क्रमशः समांतर रेषा भाग४
पुढे काय होईल? वाचा पुढील भागात.
© मीनाक्षी वैद्य.

🎭 Series Post

View all