समंजस संवाद

समंजस संवाद

घरात एकमेकांशी होणारे प्रेमळ बोलणे म्हणजे संवाद. रोज घरात होणाऱ्या संवादातून कळत नकळत एक संदेश मुलांपर्यंत पोहोचत असतो. परंतु आज या स्पर्धेच्या युगात प्रत्येक जण जणू यंत्राप्रमाणे धावत असतो. आई वडील दोघेही नोकरीवर. जेव्हा ते घरी येतात तेव्हा साहजिकच थकलेले असतात. अशावेळी मुलांशी होणारा संवाद कमी पडतो.


आज आपण पाहतच आहोत खेळाची मैदाने, बगिचे इथेही फारशी गर्दी दिसत नाही. पूर्वी चावडीवर माणसे एकत्र जमायची, विविध विषयांवर चर्चा व्हायची, एकमेकांमध्ये संवाद व्हायचे. स्त्रिया आपापली काम आटोपली की अंगणात बसायच्या विविध विषयावर गप्पा मारायच्या.


आज घराघरातील संवादच हरवत चाललेला आहे. परगावी राहणाऱ्या मुलाची आई वडील आतुरतेने वाट पाहतात पण जेव्हा तो गावी येतो तेव्हा  त्याचा बराचसा वेळ मोबाईल मध्ये जातो. माय लेकरांमध्ये मोकळा संवाद होतच नाही. व्हाट्सअप किंवा फेसबुक वर बराच वेळ चॅटींग करणारी मुलं आई वडिलांना थोडा वेळ देऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे.


लहान मुलांनाही आज मोबाईलचे जणू व्यसन लागलेले आहे. सुरुवातीला जेव्हा मुलं मोबाईल वापरू लागतं तेव्हा आई वडील मुलांचं तोंड भरून कौतुक करतात. पण जेव्हा हाच मोबाईल राक्षस होऊन डोक्यावरच बसतो तेव्हा मात्र पालक हादरतात. मुलांच्या परीक्षे संदर्भात जर पाहिलं तर "सर्वांगीण विकासासाठी शिक्षण "हा शिक्षणाचा मूळ उद्देश. पण तसे होत नाही.


परीक्षेच्या काळात मुलं आणि पालक या दोघांमध्ये जणू असंतोष घुमसत असतो. मग समंजस संवादाऐवजी चिडचिड, अबोला तर कधी आरडाओरड. वाद, प्रतिवाद जास्त. एक तर संवादच नाही आणि झालाच तर आरोपांच्या फैरी. मुलांनी अभ्यास करावा, त्याने परीक्षेत चांगले गुण मिळवावेत या आई-वडिलांच्या अपेक्षा रास्त आहेत. पण एखाद्या विषयात ७० ते ७५ टक्के गुण मिळविणाऱ्या मुलांनाही पालक सांगतात "तुला यावेळी पेपरमध्ये ९५ टक्के पेक्षा जास्त गुण मिळाले पाहिजे."


हा संवाद साधा वाटत असला तरी त्यामुळे मुलांच्या मनावर ताण येतो. मग काही मुलांना डोके दुखणे, चिडचिड होणे, झोप न लागणे, अभ्यास करूनही न आठवणे यासारख्या समस्या निर्माण होतात. स्वतःच्या मर्जीप्रमाणे, इच्छेनुसार काही करायला मिळालं तर मुलं खुलतात, व्यक्त होतात, स्वतःचं अवकाश स्वतः शोधतात.म्हणून पालकांनी वेळोवेळी मुलांची समंजस संवाद साधनं गरजेचं आहे.