Login

समंजस

Marathi katha

"हे घे, उद्या तुझा वाढदिवस आहे ना! तुझ्यासाठी गिफ्ट." मयूरने दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा मीराला आदल्या दिवशी गिफ्ट आणले होते. मीराने ते उघडून पाहिले तर त्यामध्ये ग्रे कलरची साडी होती. ती गालातच हसली आणि तिच्या कामाला लागली.

मयूर आणि मीरा यांच्या लग्नाला आठ वर्षे झाली होती. त्यांना मिहीका नावाची एक गोड मुलगी होती. मयूरने लग्नानंतर स्वतःला कामात झोकून घेतले. तो पैसा जास्त कसा मिळेल? याचा विचार करायचा. त्याने मीराला आणि मिहीकाला कोणत्याच गोष्टी कमी केल्या नाहीत. जे हवे ते सगळे तो देत होता. सगळ्या सुखवस्तू घरात होत्या, त्यामुळे कोणत्याच गोष्टीची कमतरता भासली नाही.

मयूर कितीही बिझी असला तरी तो प्रत्येक वर्षी मीराच्या वाढदिवसाच्या दिवशी तिला साडी भेट देत होता. दिवाळी किंवा इतर खरेदी मीरा एकटीच करायची. मयूरला कामातून अजिबात वेळ मिळत नव्हता. त्याचे मिटिंग्ज, सेमिनार, प्रोजेक्ट या सगळ्यातून त्याला बायको आणि मुलीसाठी कधी वेळच मिळाला नाही. तो तरी काय करणार? त्याला श्रीमंत जे व्हायचे होते.

मयूर रात्री उशीरा घरी यायचा आणि सकाळी लवकर ऑफिसला जायचा त्यामुळे मिहिकाच्या वाट्याला तो अगदी कमी येत असे. मीराने सुध्दा कधीच कोणतीच तक्रार केली नाही. ती हसतमुखाने संसाराचा भार पेलत होती. मयूर जे काही करत आहे ते आपल्या संसारासाठीच असे म्हणून ती मनाला समजावत होती.

मयूर तरी काय करणार? प्रत्येक कामाची जबाबदारी त्याला पूर्ण करावी लागत होती. लहानपणापासून हालाखीच्या परिस्थितीत वाढलेल्या मयूरने आज इतकी प्रगती केली होती. त्याने मेहनतीने हा डोलारा उभा केला होता.

मयूर कितीही कामाच्या गडबडीत असला तर मीराच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी तो आठवणीने साडी आणत होता. ते पाहूनच मीरा सुखावून जायची. सगळी नाराजी त्या दिवशी निघून जायची. ती पुन्हा नव्याने आयुष्य जगायची.

आजच्या दिवशी सुध्दा त्याने अगदी आठवणीने तिला साडी आणली होती. ती खूप आनंदात होती. ती कामात गुंग असताना मयूर तेथे आला.

"हे काय? साडी अजून इथेच आहे. तू आत ठेवली नाहीस." मयूर

"हो ठेवते. एवढ्या पोळ्या झाल्या की ठेवते." असे म्हणून मीरा तिच्या कामाला लागली.

"राहू दे थांब. मीच ठेवतो." असे म्हणून मयूर ती साडी आत कपाटात ठेवण्यासाठी गेला. मीरा मात्र आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती.

मयूर आतून आला खरा पण आता त्याच्या हातात चार ग्रे कलरच्या साड्या होत्या. ते पाहून तो बुचकळ्यात पडला.

"मीरा, अगं या एकाच कलरच्या चार साड्या ऑलरेडी तुझ्याकडे आहेत तर मला सांगायचं ना! मी दुसरी साडी आणलो असतो." मयूर

"अहो, या तुम्हीच दिलेल्या साड्या आहेत. गेल्या चार वर्षात वाढदिवसाला दिलेल्या या साड्या आहेत." मीराचे हे उत्तर ऐकून मयूर खजील झाला. गेली चार वर्षे आपण मीराला ग्रे कलरची साडी देत आहोत पण तिने कधीच काहीच तक्रार केली नाही. किती समजूतदार आहे माझी मीरा.

"मीरा, तू हे आधी का सांगितले नाहीस?" मयूर

"तुम्ही वर्षभरातून फक्त एकदाच मला आवडीने काहीतरी देत असता आणि मी त्याला नावे कशी ठेवू? जे असेल ते गोड मानून घेते." मीरा

"खरंच, तुझ्यासारखी समंजस बायको मिळाली हे माझे भाग्यच. आता मी तुला आपल्या मुलीला वेळ देण्याचा नक्की प्रयत्न करेन." मयूरच्या या बोलण्याने मीरा सुखावून गेली.

©®प्रियांका अभिनंदन पाटील.