कथा- समाधानी

this is story about a little girl and how she is satisfy in her life

                                                              कथा

                                                          समाधानी

कोकणातल्या एका टुमदार गावातली हि गोष्ट . एका दीप्ती नावाच्या मुलीची .

      दीप्ती एका दोन खोल्यांच्या घरात आई वडिलांसोबत राहत होती . घराच्या आजूबाजूला छान आंबा , पेरू, चिकू , सुपारी  अशी वृक्ष होती .  एकदा का शाळा झाली कि खेळ आणि नुसता खेळ या व्यतिरिक्त काही काम नसायचं . तरी दीप्ती तिला जमेल तशी तिच्या आई ला मदत करत असे . आजूबाजूला तिच्याच वयाचे थोडे मोठे थोडे बरिच लहान मुलं होती . त्यामुळे  पत्ते , आट्यपाट्या , खपरी , लंगडी, पकडा  पकडी , खो खो , कबड्डी,खांब खांब खाम्बोळी असे आणि अनेक खेळ चालू असायचे . याशिवाय सायकल रेस , वडाच्या  पारंब्यांना झोके घेणे , लगोरी असेही खेळ असायचे . दीप्ती ला सर्व च खेळ आवडायचे . खरं तर खेळ खेळणे हेच तिला आवडायचे , हरली  कि थोडी नाराज होयची आणि मग हा नको दुसरा खेळ खेळायला पळायची . या सगळ्यात भूख लागली कि घराची वाट धरायची .काय केलेले असेल ते खायचं हात धुतला कि फ्रॉक ला पुसता पुसता परत पळायची खेळायला . अहो तिची वाटच बघत बसलेले असायचं कोणीतरी .

    दीप्ती ची मैत्रीण जवळच राहायची .झोपायच्या आधी दीप्ती मैत्रिणीच्या  घरी जाऊन तिला हाक मारायची आणि मग झोपायला यायचं असा  तिचा नित्यक्रम असे . कधी आई बरोबर ,कधी बहिणी बरोबर , कधी शेजारच्या काकूबरोबर , कधी कधी तर एकटीच पण  राऊंड मारायला जायचीच .

    दीप्ती च्या मैत्रिणीच्या घरा जवळ एक देऊळ होते .त्या देवळा बाहेर बसायला एक चौथरा होता . त्या चौथऱ्यावर कोणी कोणी गप्पा मारत बसायचे . येता जाता  सर्व गावात काय घडतंय याची माहिती मिळायची .  दीप्तीच्या वर्ग मैत्रीणी सुद्धा त्यांच्या आई वडिलांबरोबर  फिरायला यायच्या . मग दीप्ती तिथे बसलेली असायचीच . तेव्हा तिला मैत्रीण म्हणायची अग ते गणित सोडवलंस का ? मला नाही येत आहे . तेव्हा दीप्ती ला कळायचं कि आपला होमवर्क राहिलाय मग घरात धूम ठोकायची आणि अभ्यासाला बसायची ? जर वडिलांचा मूड चांगला असला तर ठीक नाहीतर एक रट्टा तर पाठीत मिळालाच  समजा .

    अशी हि दीप्ती एकदम अल्लड , मस्तीखोर , अभ्यासाची आवड होती पण अभ्यास करायला तिला सवड नसायची . कधी या मैत्रिणीकडे , कधी त्या मैत्रिणीकडे भटकत बसायची . आणि जाईल तिथली होऊन जायची . गप्पा तर विचारूच नका . बोलक्या स्वभावामुळे सर्वांची लाडकी होती . मैत्रीणींचा तर तिच्या वर इतका जीव होता कि सांगूच नका सर्वांना तीच बेंच पार्टनर म्हणून हवी असायची .

    वर्गात तिची जागा ठरलेली असायची . वर्षाच्या सुरुवातीला ती एकदा तिची जागा फिक्स करून घ्यायची आणि रोज तिथे च बसायची . शाळेत तर  सर्व शिक्षकांची  लाडकी होती . तिला कोणी काही चुकले तर शिक्षा पण नाही करायचे . तशी होती आज्ञा धारक , नियम पाळायचे आणि कोणाला मोडून पण द्यायचे नाहीत . काहींना

   ती उद्धट  वाटायची , काहींना भांडखोर सुद्धा वाटायची . पण भांडण करायला तिचे मुद्दे तिच्या पुरते बरोबर असायचे . कोणावर अन्याय करायचा नाही आणि अन्याय सहन करायचा नाही हा तिचा स्वभाव .

      मुलगा मुलगी असा भेद केलेला तिला अजिबात आवडायचा नाही. मुलीच्या जातीन असे वागू नये असे कोणी म्हटलं तर तिच्या तळ  पायाची  आग मस्तकात जायची .तिच्या बरोबर च्या मुली भातुकली , नवरा नवरी चे लग्न असले खेळ खेळायच्या पण या मॅडम गल्लीतल्या मुलांबरोबर  क्रिकेट खेळायच्या , चोर पोलीस असे खेळ खेळायची . तिच्या बरोबर च्या मुलांन बरोबर रनींग , सायकलींग , अशा रेस लावायच्या आणि ढोपरं फोडून घ्यायची . रक्त यायला लागली कि घरी न जाता डायरेक्ट डॉक्टरांकडे जायची आणि मलमपट्टी करून घरी यायची . घरी आल्यावर आईला कळले कि आई आधी एक धपाटा द्यायची आणि मग जखम किती खोल आहे ते बघायची .

      दीप्ती च्या अंगात एक कार्यकर्ता लपलेला होता . कमी तिथे आम्ही . कोणाच्या घरी लग्न,मुंज , पूजा असा काही कार्यक्रम असला  कि हि त्यांच्या घरातल्या सारखी तिथे कामं तर करायचीच पण हक्कानं जेवायला पण बसायची . कोणाच्या घरी कोणाचे मिस्टर गावाला गेले असले कि रात्री सोबत म्हणून  दिप्तीला  आमंत्रण द्यायचे . कोणाच बाळ रडतेय तर हिच्याकडे आलं कि त्यांचा बाळ शांत व्हायचं . त्यामुळे जेवढी अवखळ होती ना तेवढीच ती कामाची पण होती . आणि त्यामुळेच सर्वांची लाडकी पण होती .

     तिची ना कोणाशी स्पर्धा होती , ना कोणा  पेक्षा जास्त मार्क मिळवायचे होते , ना सुंदर दिसायचे होते , ना पुढे जायचे होते , ना मागे यायचे होते . म्हणतात ना अपनी  मस्ती में मस्त तशीच होती . जे आहे ते आपलं आहे आणि त्यात ती १००% समाधानी होती . कोणी स्वतः हुन देत जरी असेल तरी ती ते घेत नव्हती . घ्यायचीच नाही.

    मनापासून ती समाधानी होती . गरिबीची लाज नाही , श्रीमंतीची आस नाही हे कॉम्बिनेशन फार रेअर असते लहानपणा  पासून मित्र मैत्रिणी हाच तिचा खजिना होता . माणसं  जोडायची आणि नाती जपायची ह्यात एक नंबर होती .

    तिच्या वर्गात एक मैत्रीण होती स्मिता . स्वभावाने थोडी बॉसी होती पण दीप्ती ने एकदा मैत्री केली कि सर्व गुण आणि अवगुणां सकट ती  स्वीकारायची  . प्रत्येकाची स्वभाव वैशिष्ठ वेगवेगळी असतात आणि त्याच्या स्वभावाने त्याने वागावे हे समोरच्याने  स्वीकारले  म्हणजे मतभेद होत नाहीत .

    स्मिता शी खेळता खेळता  तिची चांगली मैत्री झाली . कधी स्मिता तिच्या घरी खेळायला यायची  कधी दीप्ती स्मिताच्या घरी खेळायला जाऊ लागली. एकदा स्मिताने दिप्तीला घरी खेळायला बोलावले . स्मिता छान टुमदार अशा बंगल्यात राहायची. तिची स्वतःची एक रुम होती तर दीप्ती च पूर्ण घरच एका खोलीचं होत . सांगायचा मुद्दा गरिबी त्यांच्या मैत्री च्या आड आली नव्हती .

    स्मिताच्या आई वडिलांना दीप्ती ओळखीची होती .येता जाता तिला पहिली होती . पण तोंड ओळख वेगळी आणि माहिती वेगळी . स्मिताच्या आजीला मात्र  दीप्ती च त्यांच्या घरी येणं फारसे आवडले नव्हते . हि पोर घरातली वस्तू चोरले की काय असे तिला वाटायचं . ती आली कि आजी स्मिता च्या रुम मध्ये येऊन बसायची . तिची दीप्ती वर बारीक नजर असायची . स्मिताच्या रूम मध्ये खूप  छान वस्तू असायच्या , दोन तीन कंपास , वेगवेगळ्या शेप चे खोड रबर ,स्केच पेन ची पाकीट , छान गोष्टींची पुस्तके , असा एक वेगळाच खजिना असायचा .

    दीप्ती ला एखादी गोष्ट आवडली तर ती स्मिता ला विचारायची  " स्मिता हे कसं  वापरायचं ग ? हे कसं  चालत गं ? "पाहून झालं कि ती तेथेच ठेवून द्यायची .  स्मिता पण तिला जीव लावायची .

    आजीला मात्र या पोरीचं येणं आवडायचं नाही . तिने स्मिता ला तसं  बोलून पण दाखवलं पण स्मिता ला माहित होतं  आपली मैत्रीण काही चोर नाही . त्यामुळे ती एकवेळ आजीशी भांडायची पण मैत्रिणीला घरी येण्या पासून रोकल नाही .

शेवटी आजीने दीप्ती ची परीक्षा घ्यायची ठरवली . आजीने काय केले स्मिता च्या रूम मध्ये १०० रुपयांची नोट मुद्दामुन खाली टाकली . जशी दीप्ती आली तशी तिने काही तरी कारणाने स्मिता ला रूम  च्या बाहेर बोलावली .

     आता स्मिताच्या रूममध्ये दीप्ती एकटीच होती आणि ती तिथे खेळत होती आणि तिच्या रूमच्या  कपाटा जवळ  १०० रुपयांची नोट पडलेली . आज तिची सत्व परीक्षा होती . दीप्ती साठी शंभर रुपये म्हणजे खूप पैसे होते . दीप्ती ला कदाचित ते पैसे उचलायचा मोह पण होऊ शकतो . शेवटी ती पण लहान होती . मुलांना  अचानक पैसे दिसल्यावर कदाचित  चॉकलेट खावं असेही वाटू शकते . काहीही होऊ शकत . दीप्ती शम्भर रुपयांची नोट बघितल्यावर कशी आणि काय वागेल याच काहीच अंदाज नाही .

     दीप्ती तिथेच स्मिताचं  एक पुस्तक वाचत बसली होती .तिचं त्या १०० रुपयांकडे लक्ष पण नव्हते . तेवढयात अचानक तिला ती शंभर रुपयाची नोट दिसली . विथ इन फ्रकॅशन ऑफ सेकंद दीप्ती स्मिताच्या रूम च्या बाहेर आली आणि तिच्या आजीकडे धावत गेली आणि म्हणाली

   " आजी  हे बघा , स्मिताच्या  रूम मध्ये पैसे पडले होते . "

   आजीच्या हातात शंभर रुपयाची नोट  देऊन पुन्हा स्मिता च्या रूम  मध्ये पळाली पण .

   आजीच्या डोळ्यात पण पाणी आले . उगाच गरीबाच्या मुलीवर संशय घेतला . आजीने खूष होऊन तिला बक्षीस म्हणून १० रुपये द्यायला गेली .

तर दीप्ती म्हणाली “आजी मला पैसे नको  तुमचं प्रेम द्या मला माहितेय मी तुम्हाला आवडत नाही ते . “

स्मिताच्या आजीने तिच्या डोक्यावरून  मायेने हात फिरवला आणि सुक्या मेव्याचा लाडू खायला दिला . हाच लाडू ती स्मिता ला रोज खायला द्यायची पण दीप्ती ला कधीच देत नव्हती . दीप्ती ने बोल बोलता आजीने दिलेला सुक्या मेव्याचा लाडू फस्त केला . तोंडावरून हात फिरवला आणि पुन्हा खेळायला पळाली .

 दीप्ती खरी समाधानी . तिला एक सेकण्ड सुद्धा असे वाटले नाही कि ती  १०० रुपयांची नोट स्वतः कडे ठेवावी.

स्मिताच्या आजी सारखे बरेच लोक आपली  परीक्षा घेत असतात. आपल्याला वाटतं कि आत्ता आपल्याला कोणी पाहत नाहीये पण देवाचा cctv   २४ तास  चालू असतो . जेव्हा आपल्याला कोणी पाहत नाही तेव्हा सुद्धा आपण प्रामाणिक वागलो तरच आपण समाधानी असतो !!!

© शीतल महामुनी माने.