समाधान शोधताना

स्वतः बद्दल थोडक्यात मांडणं आणि आयुष्यात आपण स्वतः कसे आहोत हे समजून घेणं...
आत्मचरित्र म्हणजे वाटतं तितका सोपा प्रकार नाही आहे. आपण एखाद्याच्या आयुष्यावर नक्की लिहू शकतो , पण स्वतः बद्दल कसं व्यक्त व्हावं ? स्वतः ला जाणून घेणं म्हणजे हेच खूप मोठं दिव्य आहे ! आयुष्यात अनेक गोष्टी घडून गेल्या असतात त्याचं थोडक्यात मांडणं आणि शाब्दिक रूपात व्यक्त होणं हेच ते... पण आपल्या आयुष्यातील अनेक अशा गोष्टी असतात त्या बिनधास्तपणे मोकळ्या करायच्या, अर्थात कडू- गोड आठवणीही त्या जोडल्या गेल्या आहेत पण त्याच भावना या चरित्रात व्यक्त करणं. आयुष्य खरंच खूप सुंदर आहे. त्याला जपणं आणि ते जगणं हे आपल्या हातात असतं. त्यात "मी" पणा असतो आणि तो सतत स्वतःची जाणीव करून देत असतो. माझं आयुष्य, त्यात काय घडलं किंवा कसं घडलं, अनेक संघर्ष आणि घडलेल्या घटना यांचा संदर्भ यात लागतो. आयुष्यात खूप अडी-अडचणी येतात आणि अनेक अनुभवही येतात ज्यात तो व्यक्ती स्वतः ला घडवत असतो. स्वतः च्या अनुभवावरून आणि घडलेल्या सत्य घटनांची तिचं स्वतः बद्दल शब्दांत मांडणी....

मी प्रणाली कृष्णा शिंदे, अशीच छोट्याशा शहरात राहणारी. घरात आई-बाबा, लहान भाऊ आणि मी असं चौकोनी सुखी कुटुंब. मला लहान भाऊ म्हणजे मी मोठी असं असलं तरी माझ्या घरात ही गोष्ट उलटी आहे मात्र त्याच्या समोर मात्र मी लहानच आहे. लहानपणापासून लाडात जेवढं वाढवलं तेवढंच आई बाबांचा धाकही होता. मी त्यांना आजही घाबरून आहे. बाबा आणि आई कधी कोणत्या गोष्टीला नाही बोलले नाही. माझा जन्म लालबाग परळला झाला लहान असताना मी तिथेच परळला होती किमान दोन-अडीच वर्ष तरी, ती वर्ष खूप मोलाचीही होती बरं का.. मी, आई-बाबा, काकी-काका, आजी-आजोबा आणि सगळ्यात खास व्यक्ती तो म्हणजे सिद्धू माझ्या काकांचा मुलगा माझ्यापेक्षा एक महिन्यांनी मोठा. लहानपणीचे आमच्या दोघांचे खूप अतरंगी किस्से आजही खूप रंगून रंगून सांगितले जातात. माझ्या आईचा लाडका तो नुसता कधी ऐकायचा नाही आणि काकीही कुंदा आहे आणि तो म्हणून निवांत आणि माझा निवांतपणा म्हणजे सिद्धू... माझी ढाल तलवार सगळं काही तोच. दिवस सुरू व्हायचा तो त्याच्यापासून आणि त्याच्याभोवतीच संपायचा. आमचा नित्य नियमाचं एक काम होतं ते म्हणजे सकाळी उठून सगळ्यांची दार वाजवायची त्यावरून सगळी गल्लीतीली समजून जायचे आले पनू आणि सिद्धू दार वाजवून उगवायला खूपच मस्तीखोर होतो. दुसऱ्यांची कळ करून मी घरी पळून यायची पण तो मला ओरडा पडू नये म्हणून समोरच्याला धुऊन मैदानात पळून जायचा. घरात कधी यावरून भांडायलाही यायचं नाही किंवा काही बोलायलाही यायचं नाही कारण सगळी आमचीच माणसं आहेत म्हणजे आम्ही दोघेही जास्तच मस्तीखोर आणि उनाड झाले होतो. आम्हा दोघांच्या गंमती-जमती अशा खूप आहेत पण आमची खास गोष्ट एक होती आणि ती आमच्या पासून दुरावली होती एक वर्ष ती म्हणजे तो आयुष्यातला खूप अमुल्य दिवस रक्षाबंधनचा दिवस. माझी आणि त्याची पहिली राखी आणि तो हक्कही त्याचा होता. माझी राखी बांधत नाही तो पर्यंत तरी ना कोणाला राखी बांधायचे ना कोणाकडून तो बांधून घ्यायचा. दहावीचं वर्ष होतं तेव्हा मला त्याला राखी बांधायला जायला जमणार नव्हतं कारण दुसऱ्या दिवशी माझा हिंदीचा पेपर होता. आई बोलली नाही जायचं कारण पेपर आहे एक वर्ष नको ते एवढं जीवाला लागलं बोलणं की मी तिथेच रडणं चालू केलं आणि तोही घरातून बाहेर पडला काकीने मग घरी फोन करून सांगितलं कारण सिद्धू ही घरात यायला तयार नव्हता ना कोणाची राखी बांधून घेत होता. त्यादिवशी त्याचं स्थान आणि त्याचा आदर माझ्या मनात अजूनही वाढला. प्रेम, जिव्हाळा आणि आपला माणूस ती व्यक्ती कशी जपायची आणि त्यांना कसा जीव लावायचा हे मी त्याच्याकडून नेहमी शिकत आली. "नियतीचे चक्रही कधी कधी क्रुर होऊन जातं आयुष्यातली तिचं व्यक्ती का हिरावून नेते जी खूप जवळीची असते..." त्यानंतर खूप महिने मी डिस्टर्ब होती. त्याचं स्वप्न नेहमी होतं की आम्ही सगळे एकत्र असायला हवं होतं. आजही तो माझ्या आठवणीत आहेत. प्रत्येकवेळी तो सोबत आहे अशी जाणीव होतं असते.

त्यानंतर मी पुर्वरत झाले आणि कॉलेज सुरू झालं अभ्यासात मन रमवून घेतलं. त्यात घरची परिस्थितीही बिकट झाली होती. अचानक बाबांची नोकरी गेली आणि घरचं वातावरण खूप शांत झालं होतं‌. तरी आईने काही ना काही करून आमचं शिक्षण पूर्ण केलं. तेव्हाची परिस्थितीने खूप शिकवलं आणि मग मी सुद्धा बारावी नंतर कामावर रूजू झाले. अनेक नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या आणि संयमी होतं गेले. खडतर प्रवास आयुष्यात येतो आणि त्यातून आपण काहीतरी शिकत असतो असंच माझं आणि माझ्या भावाचं झालं होतं. तोही शिक्षण करून शिफ्ट करायचा तेव्हा मला त्याचा अभिमानही वाटला. पदवीचे शिक्षण पूर्ण करता करता अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. आयुष्यात कधी एकटीने प्रवास न करणारी मी तेव्हा तेही शिकली. तेव्हा एक प्रसंग असा होता की माझा मामा मला प्रवासासाठी फर्स्ट क्लासचा पास काढून प्रवास करायला सांगत होता पण बाबांनी त्यासाठी नकार दिला आणि बोलले तिला शिकायला हवं सगळं किती दिवस आणि... त्याचं कारण हेच की मी तेव्हा स्वतः ला खूप बांधून ठेवायचे ना व्यक्त व्हायचे आणि नेहमी भितीने घाबरून जायचे. पदवीधर झाले आणि एका वर्षाने नव्या नोकरीवर रूजू झाले. तिथे मनही रमलं. त्याकाळातच अख्या जगात लॉकडाऊन लागलं आणि सगळेच घरी राहिले पण यामुळे माझा एक फायदा झाला तो मी लेखणीला खूप जवळ केलं. त्यात वाचन तर नेहमीच असायचं मग विचार केला की आपण पण एखादी चारोळी टाकावी आणि ती घाबरत टाकली सुद्धा त्यावरुन मला रिस्पॉन्स सुद्धा आला की तु लिखाण करत जा आणि मग मी हळूच हळू त्यातून व्यक्त होतं गेले. प्रतिलिपीवर हा लेखनाचा प्लॅटफॉर्म सापडल्यावर अनेक लेखकांशी ओळख झाली त्यांनीही लिहिण्यास प्रोत्साहन दिले. त्यांच्या माध्यमातून ग्रुपबद्दल समजले आणि अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या तसेच साहित्याबाबतीतचे वेगवेगळे सेशन सुद्धा अटेंड केले. यातून माझ्यासाठी अनेक मार्ग खुले झाले तसेच माझे लेख, कविता आणि माझी मतं मी दिलखुलास मांडायला लागले. हळू हळू स्वतः ला वेगळ्याच टर्निंगला घडवत गेले. एक आत्मविश्वास निर्माण झाला की हो, मी सुद्धा हे करू शकते. तरी कधी तरी भितीही वाटून येते की जर या गोष्टी वर परिणाम झाला तर पण मग तेव्हा इतर साहित्यिक लेखकांची मत सुद्धा माझ्यासाठी दिलासादायक असतात.

"आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्या आयुष्यात वेगवेगळे किरदार आपल्या अवती भवती फिरत असतात. कथेमध्ये जी पात्र दाखवून आपण जशी कथा रंगवत असतो तसंच आपलं आयुष्य अनेक गोष्टींतून रंगलेलं असतं. त्या व्यक्तींचं आपल्या आयुष्यात येणं हे एक निमित्त असतं त्यांना कसं हताळावं, त्यांना कसं जपावं आणि ते कितपत योग्य असावं हे आपल्या हातात असतं. प्रत्येकाकडून आपण काही ना काही शिकत असतो आणि स्वतःला घडवतं असतो. आपल्या प्रत्येक कृतीतून ते दाखवतं असतो."

"कधी कधी आयुष्यात असा एक टर्निंग पॉईंट येतो जे स्वतः ला घडवण्याचा एक तरी संधी नक्कीच देऊन जातो." माझ्याही आयुष्यात ही एक अशी संधी आली आणि मनापासून मी ती मान्य केली. आता ती म्हणजे कसं आहे ना.. शाळा सुटली आणि मग बालपण कुठेतरी हरवलं आता आपण या वयात किती ते आठवतो पण आपल्या आयुष्यात ते परत दिवस कुठे येणार ना ? म्हणून लहान मुलांच्या सानिध्यात राहण्याची माझी व्यवस्था आणि खरं तर कंप्युटर समोर बसूनही खूप कंटाळलेली त्यात सातत्याने डोकेदुखी आणि ती भयंकर प्रमाणात वाढत गेली. आयुष्यातील ही संधी खरंच समाधानकारक मिळाली आहे. लहान मुलांसोबत दिवस कसा निघून जाते याचा अंदाजही कळून येतं नाही कधी तरी मी स्वतः वैतागून जाते पण परत तेच त्यांचं खळखळून हसणं आणि तो मस्तीखोर दंगा यात मग परत मन रमून जातं. आयुष्याचा आता मुख्य टप्पा चालू झाला आहे आणि त्यातून अजून बरंच काही शिकायचं आहे खूप गोष्टी अनुभवाच्या आहेत.

"अनुभवातून माणूस घडत असतो, कल्पनेच्या दुनियेत जगत असला तरी तो परिस्थितीतून शिकत असतो. त्याचं व्यक्त होणं हे गरजेचं जरी असलं तरी त्याने त्याला संयमित राहण्यास शिकायला हवं. आयुष्यात स्वतः वर आत्मविश्वास स्वतः असणं खूप गरजेचं असतं तो कधी डगमगला नाही पाहिजे." आनंद शोधता आला पाहिजे !


© प्रणाली कृष्णा शिंदे.