सल्ला

A Story Of a Man Who Ingnores His Wife's Advice.


शीर्षक - सल्ला
विषय - काळ आला होता पण ...
फेरी - राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा

" नंदिनी...अग ए नंदिनी ऽऽऽ... माझ्या गाडीची किल्ली सापडत नाहीये शोधून दे ना पट्कन . ऑफिसमध्ये आज महत्त्वाची मीटिंग आहे आणि अजून मी घरीच आहे . कधी पोहोचणार मी ऑफिसला. ? "

जयदेव नंदिनीला किल्ली शोधायला सांगून स्वतःच आवरायला लागला . नंदिनीने त्याला किल्ली शोधून आणून दिली . त्याने लाडाने आणि कौतुकाने तिच्या गालावर किस केल आणि बाय बाय करत निघूनही गेला . तेवढ्यात नंदिनीच्या मनात अशुभाची पाल चुकचुकली . ती तशीच पळत बाल्कनीत आली आणि जयला म्हणजेच जयदेवला बाल्कनीत उभी राहून सांगू लागली की , "गाडी हळू चालव ."
पण , जयला जाण्याची इतकी घाई होती की त्याने तिच्या बोलण्याकडे लक्षच दिले नाही आणि तो तिला टाटा करून निघून गेला .

जय कामाला निघून गेला पण नंदिनीच्या मनाला घोर लावून गेला , पण तिला थांबता थोडीच येणार होत . तिने पटापट मुलांचे डबे भरले आणि मुलं शाळेला निघून गेली . ही परत तिच्याच विचारात हरवून गेली .

जय आणि नंदिनी दोघांचाही प्रेमविवाह होता . पण दोघेही चांगल्या घरातील असल्याने दोघांच्या लग्नाला कोणाचा विरोध झाला नाही उलट खूप थाटा माटात दोघांचे लग्न झाले .जय एका मल्टीनेशनल कंपनीत बॉस होता , तर नंदिनी एका बँकेत कामाला होती . सुखी कुटुंब असल्याने जुळी मुले झाल्यावर नंदिनीने नोकरी सोडली व ती गृहिणी झाली . तिला जयच्या आवडीनिवडी माहीत होत्या . त्याला तर गाड्यांची क्रेझच होती . म्हणून तर त्याने दोन चारचाकी ,एक स्कुटी नंदिनीसाठी , एक बाईक आणि एक बुलेट घेतली होती . त्याला गाडी चालवताना वाऱ्याशी स्पर्धा करायला आवडायचं . त्याला नशाच होती वेगाची....!

हे सगळ आठवत असतानाच नंदिनीचा फोन वाजला.
फोनवर जयचा नंबर होता . तिने लगेच फोन उचलला आणि अधिरतेने विचारू लागली
" हॅलो जय कुठे आहेस तु ? पोहोचलास का वेळेत ऑफिसमध्ये ?
गाडी हळू चालवलीस ना ? "

असे एकामागून एक प्रश्न ती विचारू लागली.पण ,समोरून अनोळखी आवाज कानावर आला .
"हॅलो मॅडम , मी इन्स्पेक्टर माने बोलतोय . तुमच्या नातेवाईकांचा अपघात झाला आहे . त्यांना आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भरती केलंय . तुम्ही तिथे या."

नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकली . तिने पटकन आपला मोबाईल पर्समध्ये ठेवला , त्यामध्ये जास्तीचे पैसे ठेवले आणि देवासमोर दिवा लावला . आपले डोळे पुसत ती रिक्षा मध्ये जाऊन बसली.

रिक्षात बसल्यावर तिने तिच्या सासर्यांना फोन लावला . आपल्या भावाला ही फोन लावला व त्यांना हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतले . ती ही आता हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती .

तिला काही कळतच नव्हते की आपण आता काय करायचे . पण तेवढ्यात तिचा भाऊ आकाश तिथे आला . तिने त्याला पाहिले . मात्र आतापर्यंत दाबून ठेवलेला अश्रूंचा बांध फुटला आणि ती जोरजोरात रडू लागली . एरवी नंदिनीने असे कोणाला रडताना पाहिले असते तर त्या स्त्रीला शिष्टाचार नाहीत असेच ती म्हणाली असती . पण आज जेव्हा तिच्यावर परिस्थितीने वाईट वेळ आणली तेव्हा तिलाही सगळे शिष्टाचार , जागा या गोष्टींचा विसर पडला होता . कारण ती परिस्थितीच तशी होती .

आकाशने तिला धीर दिला . त्याने तिला वेटींग रूममध्ये बसवले , पाणी प्यायला लावले मग तो चौकशी कक्षाकडे गेला . त्याने \" जयदेव साठे \" या नावाने तिथे ॲडमिट केलेल्या पेशंटची चौकशी केली . तिथेच त्याला इन्स्पेक्टर मानेही भेटले . त्यांनी सगळी परिस्थिती त्याच्या कानावर घातली . ते सारे काही ऐकून आकाशलाही धक्का बसला होता पण नंदिनी अजूनच खचेल म्हणून त्याने ते दाखवले नाही .

आकाश नंदिनी जवळ आला आणि तिला म्हणाला आपण जयला मोठ्या प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये घेवून जाऊ . त्याचे छोटेसे ऑपरेशन करावे लागणार आहे . तर तिथे त्याला चांगली ट्रीटमेंट मिळेल . नंदिनीने लगेच होकार दिला .

थोड्या वेळाने जयचे आई - वडील , नंदिनीचे आई - वडील हे देखील आले . तोपर्यंत आकाशने सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करून जयला दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये नेण्याची व्यवस्था केली होती . एका रुग्णवाहिकेत जय ,आकाश आणि नंदिनी तर दुसऱ्या गाडीने दोघांचे आई वडील असे मोठ्या हॉस्पिटलमध्ये आले . आता आकाशला सगळ्यांना समजाऊन सांगावे लागणार होते . मग त्याने सगळ्यांना शांत बसवून सत्य परिस्थिती सांगितली की , " जयच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली आहे . त्याच्या डोक्यात रक्तस्त्राव खूप झालेला आहे . जर लगेच ऑपरेशन झाले नाही तर जय कोमामध्ये जाऊ शकतो ."

हे ऐकल्यावर सगळ्यांच्या पाया खालची जमीनच सरकली . पण आता नंदिनी सावरली होती . ती आकाश बरोबर डॉक्टरांकडे गेली आणि त्यांना म्हणाली ,
"वाट्टेल ते करा , वाट्टेल तेवढा पैसा खर्च करा पण माझ्या जयला वाचवा ."

संध्याकाळपर्यंत जयचे ऑपरेशन झाले . डॉक्टरांनी ऑपरेशन थिएटरच्या बाहेर येऊन ऑपरेशन चांगले झाल्याचे सांगितले . तोपर्यंत जय आणि नंदिनीची मुलेही तिथे आलेली होती . ती ही एकदम घाबरुन गेली होती . आपल्या बाबाला अचानक काय झाले ? हे त्या लेकरांना कळतच नव्हते . पण दैव बलवत्तर म्हणूनच आज जय वाचला होता .

काही तासांनी जयला शुद्ध आली . त्याच्या डोळ्यासमोर त्याचे आई वडील ,बायको , मुले सगळे उभे होते . त्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते . तर याच्या डोळ्यात अपराधी पणाची भावना...!

जय हळू हळू आवाजात बोलू लागला ," तुम्ही सगळ्यांनी मला माफ करा .मी अशी चूक आता परत कधी करणार नाही .त्या काही क्षणात माझं अख्खं आयुष्य माझ्या डोळ्यासमोरून गेलं . आज जर मला काही झालं असत तर माझ्या चुकीची शिक्षा तुम्हाला आयुष्यभर भोगावी लागली असती . माझ्या पिल्लांच्या डोक्यावरचं वडिलांचं छत्र कायमच हरपल असत . मी यापुढे कधीही वेगात गाडी चालवणार नाही . आज माझा काळ आला होता पण वेळ आली नव्हती ... म्हणूनच मी तुमच्यासमोर जिवंत आहे . मला माफ कर नंदिनी , मी कायम तुझा सल्ला डावलत आलो पण आज खऱ्या अर्थाने मला तुझा ते पटल आहे .

प्रत्येक गोष्टीत संयम हा ठेवलाच पाहिजे आणि गाडी चालवताना तर जास्त संयम बाळगला पाहिजे ."

नंदिनीने त्याचे हे शब्द ऐकून मान डोलावली आणि आपल्या डोळ्यातील पाणी पुसत आपल्या दोन्ही पिल्लांना जवळ घेतले .


समाप्त


©®प्रिती महाबळेश्वरकर

जिल्हा - सांगली , सातारा .