सलाम या अनोख्या मातृत्वाला!

मातृत्वाची एक अनोखी कहाणी.

सलाम या अनोख्या मातृत्वाला!



"काँग्रॅच्यूलेशन्स! रोशू, तुझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आलीय!" किटवरच्या दोन लाल रेघा बघून मी नवऱ्याला म्हटले.


तीन दिवसापासून तो तापाने फणफणत होता. ताप आणि थोडी अंगदुखी सोडली तर इतर कोणतेच लक्षणं दिसत नव्हती. ना सर्दी, ना खोकला. तोंडाला चवसुद्धा बऱ्यापैकी होतीच. कोविडच्या दुसऱ्या लाटेत इतरांना जी लक्षणं दिसत होती ती त्याला जाणवत नव्हती.

टेस्ट करायची तर पीएचसी सेंटर वरच्या किट्स संपल्या होत्या.तरीसुद्धा त्याला कोविड झालाय यात तिळमात्र शंका नव्हती. जात्याच डॉक्टर, रोजचे नवनवे पेशन्ट त्यामुळे मला अंदाज आला होता पण अजून निदान झाले नव्हते. माझा विशूदादा तो सुद्धा डॉक्टरच! तो म्हणालाच बाकीची लक्षणं नसली तरी हा कोविड आहे हे नक्की.

दोघांनी मिळून उपचार सुरू केले. त्याचा ताप मात्र उतरत नव्हता. प्राथमिक अवस्थेत असलेल्या इतर पेशन्टला बरे करणारी मी मात्र नवऱ्याचा ताप कमी करण्यात अयशस्वी ठरले होते. तीन दिवसानंतर शेवटी टेस्ट करून कोविड सेंटरला घेऊन जाण्याचा मी निर्णय घेतला. रोशनचा विरोध होताच पण टेस्ट करणे भाग होते.


किटवरच्या त्या दोन लाल रेघा बघून डोळ्यात टचकन पाणी आले. नवरा गप्पच उभा होता. मी त्याचा हात हातात घेतला.


"काँग्रॅच्यूलेशन्स! रोशू, तुझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आलीय!" हे बोलताना डोळ्यात आलेले अश्रू लपवण्याची धडपड खरी की ओठावर मुद्दाम आणलेले हसू खरे?

त्यानंतर स्कॅन. स्कोर सहा.

"घाबरण्याचे कारण नाही. घरी आयसोलेट करून उपचार केला तरी चालेल." डॉक्टर विनोद म्हणाले तसे मी सुटकेचा निःश्वास टाकला.

विशुदादा, मी आणि डॉ. विनोद तिघांचीही ट्रीटमेंट सूरू होती. तरी ताप कमी होईना. फॅबीफ्लूच्या गोळ्यांनी आपला असर दाखवायला सुरुवात केली होती. उलट्या, कमालीचा अशक्तपणा, तोंडाची गेलेली चव आणि आता ऑक्सिजनची पातळी पंच्यांनववर येऊन पोहचली.


"काही काळजी करू नकोस.त्यांना काही होणार नाही. आजवर मी कितीतरी पेशंट बरे केलेत. ते सुद्धा लवकर बरा होतील." विशूदादा मला धीर देत होता. आपल्या आयुर्वेदिक औषधांनी त्याने कित्येकांना जीवनदान दिले होते.


माझा मात्र धीर खचत चालला होता. घरात नणंद, सासरे दोघेही पॉझिटिव्ह होते. सासूबाई त्यांच्या सेवेत गुंतलेल्या. मी नवऱ्यासाठी आई बनले. मुलांसोबत आपली रवानगी हॉलमध्ये. सासूसासरे, नणंद दुसरीकडे. नवरा वेगळ्याच रूममध्ये. लहान लेकरांना मी नीट सांभाळू शकत नव्हते. रात्र रात्रभर डोळ्याला डोळा लागत नव्हता. दिवसभरातून चार चार डोलो घेऊनही त्याचा ताप थोडयावेळाने परत शंभरच्या वर पोहचला असायचा.

रात्री दुरूनच त्याचा वरच्यावर सुरू असलेला श्वास मोजला. श्वासाची गतीसुद्धा दुपटीने वाढली होती. ऑक्सिजनची लेवल नव्वदीला पोहचलेली.


पंधरा दिवसापूर्वी मला माझ्या कोविड पॉझिटिव्ह मित्राचा कॉल आठवला. त्याची ऑक्सिजन लेवल ब्याण्णव असताना तो किती घाबरला होता. तेव्हा फोनवर बोलून बाकी पॅरामीटर्स ठीक असताना उगाच काळजी करू नकोस. सगळं ठीक होणार आहे. असे म्हणून जवळजवळ अर्धा तास मी त्याला समजावले होते. चारपाच दिवसांनी त्याने पुन्हा मला कॉल केला, स्पेशल थँक यू म्हणण्यासाठी. सगळीकडे अंधार दिसताना केवळ तुझ्याशी बोलण्याने माझ्यात पॉझिटिव्हिटी आली आता मी एकदम बरा आहे हे सांगायला.


आज मुद्दाम मला त्या फोनकॉलची आठवण झाली. दुसऱ्यांना सांगणे वेगळे आणि जेव्हा हे सगळं स्वतःच्या जीवभावाच्या व्यक्तीसोबत घडतेय तेव्हा स्वतःला पटवून देणे वेगळे असते याची तिला जाणीव झाली.


ती रात्र कशीबशी तिने काढली आणि मग पुन्हा त्याला घेऊन सेंटर गाठले. डॉक्टरांनी लगेच त्याला ऍडमिट करून घेतले. फॅबीफ्लू, रेमडीसिव्हरचे डोजेस.. दोन दिवसांनी ताप तर कमी झाला होता पण त्रास फार वाढला होता. स्कॅन केल्यावर त्यात फक्त एकच आकड्याने वाढ झाली होती. पण त्याला आता श्वास घ्यायला येत नव्हते. ऑक्सिजन मास्क शिवाय तो एक क्षणही राहू शकत नव्हता.


त्याची स्थिती पाहवत नव्हती. दवाखान्यात ऍडमिट केले म्हणजे तो बरा होईल ही आशा होती पण तसे चिन्ह दिसत नव्हते. दिवसभर मी हॉस्पिटलमध्ये. घरी सासरे आणि आणि नणंदेच्या मागे असलेली सासू. मुलांकडे पार दुर्लक्ष होत होते.


एक दिवस मग बहीणीनेच फोन केला. मुलांना तिच्याकडे पाठवण्यासाठी ती बोलत होती. माझ्याशिवाय एक दिवसही न राहणाऱ्या मुलांना विशुदादासोबत ताईकडे पाठवले. डोळ्यातून सारखे पाणी वाहत होते. एका बाजूला लहान मुले आणि दुसरीकडे आजारी नवरा. काळजावर दगड ठेऊन मी नवऱ्याला निवडले.


दुसऱ्या दिवशी तिथल्या डॉक्टरांनी आपले हात वर केले. ऑक्सिजनची पातळी पंच्यांशीपर्यंत आली होती. व्हेंटिलेटरची सोय नसल्याने त्यांनी वेळेवर दुसऱ्या शहरात रेफर करण्यासाठी सांगितले. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. असे काही होईल माझ्या मनातही नव्हते. एकटीने काय करायचे हा प्रश्न होता घरून कोणी मदतीला येणार नव्हते. नवऱ्याला कसाबसा धीर देत आपल्याला आत्ताच इथून जायचे आहे हे सांगितले. त्याचे अवसान पार गळून गेले. त्याला समोर साक्षात मृत्यू दिसत होता.


विशुदादा सोबत यायला तयार झाला पण आता त्याच्यातही कोविडची लक्षणे दिसू लागली होती. शेवटी भाच्याला सोबत घेऊन नवऱ्याला तात्काळ हलवायचे ठरवले.


"पैशांची काळजी करू नकोस. जीव महत्वाचा. लागेल ती मदत मी करेन." वडिलांचा फोन आला तसे धाय मोकालून रडावे असे वाटत होते. तरीही स्वतःला सावरले.
काही कारणामुळे वर्षभरापासून मी वडिलांशी बोलत नव्हती. आज त्यांचा स्वतःहून कॉल आला होता.

एका गाडीत दोन्ही बहिणीचे पती आणि ऍम्ब्युलन्स मध्ये भाच्यासह मी. दुसऱ्या शहरात पोहचायला लागणाऱ्या चार तासात नवऱ्याने क्षणभरही न सोडलेला माझा हात. डोळ्यात वारंवार बाहेर ओसंडू वाहणारे पाणी आणि तेवढ्याच घट्ट मनाने त्यांना आत रोखून ठेवणारी मी.

तिथल्या हॉस्पिटलमध्ये पोहचायला रात्रीचे दहा वाजले.ऍडमिट करताना तिथल्या फार्मॅलिटीज.. खूप वेळ गेला. दुसऱ्या लाटेचा तो काळ. सगळी हॉटेल्स लॉज बंद. दुकाने बंद. राहायचे कुठे हा प्रश्न होता. भाऊजींच्या मदतीने कसेबसे एका लॉजमध्ये राहण्याची सोय झाली. ते ठिकाण हॉस्पिटलपासून फार लांब होते. डोळ्याला डोळा लागत नव्हता. सारखा त्याने हातात ठेवलेला त्याचा हात आठवत होता. रडायला तर खूप येत होते पण कंट्रोल करणे आवश्यक होते. तिकडे नवऱ्याची तीच अवस्था होती. दिवस सरत होते. ताप नव्हता पण श्वास घ्यायचा त्रास तसाच होता. नाकाला मास्क लावल्याशिवाय राहणे अशक्य होते. दोन मिनिटं त्याला भेटण्यासाठी दोन दोन तास हॉस्पिटलमध्ये थांबावं लागत होतं. भेटून काय बोलावं? होईल सगळं नीट लवकरच सुट्टी होईल हे रोजचे माझे डायलॉग तर इथून केव्हा बाहेर पडणार हे बोलणारे त्याचे डोळे.

त्यातच सासरे वारले. तेव्हा तो आयसीयू मध्ये. या अवस्थेत त्याला कसे सांगणार? कसाबसा त्याचा मोबाईल हातात घेऊन कोणी त्याला कॉल केला तर त्याला कळू नये म्हणून सगळे कॉल माझ्या नंबरवर फॉरवर्ड करून ठेवले. सुधारणा होण्याचे काहीच चान्सेस दिसेनात. शेवटी O2 कॉन्संट्रेटर घेऊन परत जायचे ठरले. घरी घेऊन जाण्यात अर्थ नव्हता. सासरे गेले, दुसरे दीर पॉझिटिव्ह. नणंद त्याच अवस्थेत. सासूबाईंची परिस्थितीचा अंदाज लावू शकत नव्हते. नवऱ्याला घेऊन माहेर गाठले. दादाचे आयुर्वेदिक औषधं, माझी होमिओपॅथी.. हळूहळू चांगला रिस्पॉन्स मिळू लागला. आठ एक दिवसात मशीनीपासून त्याची सुटका झाली. आता तो बरा होऊ लागला होता. इतक्या दिवसांनी मुलांनी वडिलांना बघितले. दुरूनच. आणखी आठ दिवस जवळ येण्याची त्यांना मुभा नव्हती. सासरे वारले हे तब्बल महिन्याभराने आम्ही त्यांना सांगितले. त्यावेळेस त्यांची काय अवस्था झाली असेल??


हे सगळे आज आठवायचे कारण म्हणजे आज मातृदिन! कोविडचे हे सावट मागच्या मे महिन्यातच माझ्या कुटुंबावर आले होते. खूप मोठया नुकसानासह त्यातून आम्ही बाहेर पडलो. या काळात जवळच्या लोकांची खूप मदत झाली. क्षणभरही माझ्यापासून दूर न राहणाऱ्या माझ्या मुलांना माझ्या ताईने अगदी आईच्या मायेने सावरले. माझी आई स्वतः आजारी पण सारखी जावयाच्या तब्येतीला काही होऊ नये म्हणून जप करत होती. अंकलला काही होऊ नये म्हणून क्षितिज,माझ्या तरुण भाच्याने देवाला साकडे घातले होते. नवरा आणि मुलीचे करण्यात आपल्या मुलाकडे लक्ष देऊ शकत नाही ही सासूबाईंना सतत बोचणी लागून राहिली होती. माझा विशुदादा सोबत नसला तरी सदैव संपर्कात राहून माझ्या मनात सकारात्मक विचार निर्माण करत होता. नवऱ्याला बरे करण्यात त्याचा मोलाचा वाटा आहे. दोन दिवसांच्या वर घराबाहेर न राहणारे माझे भाऊजी रोशनला डिस्चार्ज होईपर्यंत माझ्या सोबत होते.

एक नवा जीव फक्त एक आईच तयार करू शकतो. माझा दादा, हॉस्पिटलचा स्टॉफ, माझ्या बहिणी, माझी आई, माझ्या सासूबाई, माझे भाऊजी, माझे भाचे आणि माझी मुलं..
या सगळ्यांमुळे माझ्या नवऱ्याला नवे जीवदान लाभले. सर्वांत असणाऱ्या या मातृत्वाच्या भावनेला माझा सलाम! सगळ्यांची मी कायम ऋणी आहे.

                    *समाप्त *

©®Dr.Vrunda F. (वसुंधरा..)


*फोटो.. गुगल साभार.*