सल (कथा)

Respect people when they are with you.

माझ्या मनाचा ठाव वेधुन घेतात ती. नसलेल्या चिंतेचा सारा शीण अगदी अलगदपणे नाहीसा करतात. मला माहीत नाही ती केव्हापासून माझ्यासोबत आहेत, पण हे मात्र नक्की, मला कळायला लागलंय तेव्हापासून एक वेगळीच अनामिक ओढ लागते मनाला, आजकाल जरा जास्तच. त्यांना पाहिलं की काहुर उठतं मनात. ती सतत नजरेसमोर असावित असं वाटतं. काय नातं असेल माझं आणि त्या फुलांचं?

नोकरी करून जगलेल्या एका सामान्य माणसाचं हे घर . परवा दुपारी नुसताच गादीवर पहुडलो होतो. विचारांच्या गोतावळ्याची वेताळासारखी पाठराखण सुरुच होती. त्यात नवल ते काय? आयुष्याच्या वाटेवर एकाकीपणाची उणीव नको होती म्हणून विचारांची साथ धरली मग त्यांनी कधीच साथ न सोडण्याची शपथ मनी धरली. अचानक कानांना काहीशी सौम्य हालचाल जाणवली. उठून तसाच धावत खिडकीजवळ गेलो. ती मुलगी माझ्या आवडत्या फुलांना तोडून एका दगडाला वाहत होती. माझ्याच दारातल्या फुलांना माझ्या नकळत केलेला स्पर्श मला काही पटला नाही. त्यातही माझी आवडती फुलं. जरा रागानेच निघालो खोलीबाहेर. माझ्या आवडत्या फुलांना आजवर मी देखील स्पर्श केला नाही. विचार मनात आला अन जागीच स्तब्ध झालो. बसलो त्या जागेवर अन मन काही वर्ष मागे गेलं.

ती संध्याकाळ होती मनाला वेड लावेल अशी. मी कामाचा डोंगर पोखरुन आडवाटेने का होईना जरा उशीराच घरी परतलो. दारावर टकटक केली. दार उघडलंच नाही. "हिला घरात बसून काही करायला नको? कामाचा शीण जरा जास्तच झालेला. जोरात एक थाप मारली दारावर अन ती धावत पळत खाली आली. मुलांना झोपावताना तिला देखील अचानक डोळा लागला होता. कष्टाचा डोंगर उपसनाऱ्या तिला देखील विश्रांतीची गरज होतीच. मी काहीच न बोलता खोलीत जाऊन आवराआवर केली अन जेवणाच्या टेबलावर आलो. ताट वाढलेलं होतं भूक जाणवत होती आणि ताटात आवडीचे पदार्थ. मन अगदी तृप्त होईपर्यंत जेवलो. लग्नाचा वाढदिवस होता म्हणून तिने सगळं आवडीचं जेवण बनवलं होतं. पण मी वेडा साधा जेवलीस का गं? एवढं विचारु शकलो नाही.

दमून भागून येणारा मी आई येणार म्हणून तिच्या येण्याआधी तिच्या सोईच्या सामानांची रीघ लावायचो. माझ्या आईला भावापेक्षा जास्त माझ्याच कडे रहायला आवडायचं. इथे मुबलक सुखसुविधा होत्या. हाताखाली एक कामाचं माणूस. आईच्या हाताखाली भावाकडे असतानाही एक माणूस असायचाच. पण माझ्या घरच्या लक्ष्मीने आईला दिलेला मायेचा ओलावा तिला इथे धरून ठेवायचा. आईसाठी तिने जागलेल्या रात्री आईला भावुक करायच्या. आईला आरामाची गरज नव्हती तिला प्रेमाची ओढ होती जी तिने भरून काढली. नेहमीच तिच्या प्रेमासमोर हतबल मी तिला सर्वकाही देत राहिलो. कधी एका  शब्दानेही बोललो नाही. मी तिला कधीच काहीच का बोललो नाही?

माझ्या कामाचा शीण मी नेहमीच तिच्यावर काढला. तिने मात्र नेहमीच स्वतःच्या सुखाचा आवंढा गिळला. प्रत्येक दिवसाअखेर

निरपेक्ष असणारी ती मनातल्या अपेक्षांना कधीच मारू शकली नाही. तिने खूप काही केलं माझ्यासाठी. त्या अपेक्षांच्या होळीत जळून खाक झालेली तिची स्वप्न तिने कधीच जगासमोर मांडली नाहीत. तिने लावलेली सदाफुली. मनाला वेड लावतेय माझ्या. ती निघून गेली एका सदाफुलीसारखीच.निर्मळ हास्य ओठांवर ठेऊन. पण तिच्यासाठी कधीच नसणारा मी तिच्या नसण्याची सल मनात घेऊन अजूनही वावरतोय ह्या जगात. सुटकेच्या आशेत.