सल भाग =5

Ktha eka purushachya manat sachlelya asha, apekshanchi

आपण काय ऐकले यावर क्षणभर लताबाईंचा विश्वासच बसेना. त्यांनी कागदपत्रे पाहिली त्यावर आबांच्या सह्या होत्या. आपला पाठचा, सख्खा भाऊ असा डाव खेळेल असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं.
"हा सांगा काय प्रकार आहे दिगू? लताबाई ती कागदपत्र राजेशच्या मागोमाग घरात आलेल्या दिगू मामाच्या तोंडावर फेकत म्हणाल्या. "याची गरजच काय होती? अर्धे का होईना, सुखासुखी तुझ्या हाती होतेच ना? अरे ही सारी इस्टेट माझ्या सासरची. माहेरची असती, तर हसत हसत कधीच तुझ्या नावावर करून दिली असती मी." लताबाई रागाने थरथरत होत्या.
"उद्या आमचं घरही हिसकावून घेशील तू? मग राहायचं कुठे आम्ही?" लताबाईंनी दिगूमामाच्या फाडकन् एक मुस्काटात ठेवून दिली.

"ताई हे घर जर माझ्या नावावर झाले ना, तरी मी तुला इथून कधीच बाहेर काढणार नाही. निदान तेवढा तरी विश्वास ठेव गं माझ्यावर." आपला गाल चोळत दिगू मामा सोफ्यावर ऐसपैस बसत म्हणाला.
हे ऐकून आता मात्र लताबाईंचा धीर सुटला. 'आपण हे काय करून बसलो?' आता त्यांना पश्चाताप होऊ लागला.

रडतच त्या आबांपाशी पोहोचल्या. "अहो मला माफ करा. मी खरंच चुकले. दिगू असं काही करेल, स्वप्नातही वाटलं नव्हतं मला. ही इतकी सारी इस्टेट पाहून मला राहवलं नाही. आपल्या 'नावावर' काहीतरी असावं असं नेहमीच वाटायचं. माझ्या माहेरची परिस्थिती बेताचीच होती. त्यातच दिगू सडाफटिंग. त्याला ना कशाची काळजी ना कशाची फिकीर. म्हणून त्याची भविष्याची सोय करून द्यावी, एवढच मनात होतं माझ्या."

आबा काहीच बोलत नाहीत हे पाहून लताबाई राजेशकडे वळल्या, "मला माफ कर रे राजेश. मनात माया, प्रेम असूनही मी एक चांगली आई नाही होऊ शकले. कायम सावत्रपणाचा आडपडदा मी डोळ्यावर पांघरला. घरात गीताच्या रूपाने नवी सून आली आणि सासू म्हणून माझा मान वाढला. माझ्या पोटी मुल- बाळ नसले तरीही मी एका सुनेची 'सासू 'आहे ही भावनाच मला खूप सुखावत होती. याच भावनेने माझ्या पोटात दडलेल्या मायेला वर आणले.

मात्र जेव्हा आबांनी तिच्या नावावर जमीन घेतली तेव्हा मात्र मी इतकी वर्ष मनात दडवून ठेवलेली इच्छा उफाळून वर आली. मी अनेक वर्ष वाट पाहिली. पण माझ्या हाती काहीच न लागता नवीन आलेल्या सुनेला सर्व काही दिले जाते हे पाहून माझा अहम् दुखावला. म्हणून हे सारं. पण दिगूच्या मनात पाप आहे याची मला सुतभरही कल्पना आली असती, तर हे असे काही केलेच नसते मी. आता मला या इस्टेटीमधले काही नको."

लताबाईंचे शब्द राजेशच्या कानावर पडत होते आणि नव्हतेही. त्याने बाहेर उभ्या असलेल्या
दिगू मामाच्या हातून कागदपत्र हिसकावून घेतली आणि मामाला धक्के मारून घराबाहेर काढलं.  तसा दिगू मामा धमक्या देत तिथून निघून गेला.

________________________

"गीता माझ्या नशिबी सुख नाहीच का? आपलं लग्न झालं आणि वाटलं माझे सुखाचे दिवस आले. मला आईची माया, प्रेम, धाक, लाड अनुभवायचे होते. ते नशिबात नव्हतं. पण तुझ्यासारखी प्रेमळ बायको मिळाली, वाटलं इतकी वर्षे मी जे प्रेम शोधत होतो ते माझ्या नशिबी आलं. माझ्याकडे सगळं काही होत, घर, जमीन, शेती, आबांनी कष्टाने सुरू केलेला व्यवसाय! केवळ हे सारं मला सांभाळायचं होतं. तेही माझ्या हातून झालं नाही. या इस्टेटीच्या हव्यासापोटी गोष्टी कुठवर गेल्या." राजेशच्या डोळ्यात पाणी होतं. इतकी वर्ष मनात साठवून ठेवलेलं दुःख जणू अश्रूंद्वारे बाहेर पडत होतं.
पुरुषालाही प्रेमाची गरज असते. आधार हवा असतो, त्यालाही भावना असतात. पण आपल्या मनातल्या हळव्या भावना कोणाला दिसू नयेत म्हणून कणखरपणाचा बुरखा पांघरून तो कर्तव्य पार पाडत असतो. खरं तर स्त्रीही जात्याच भावनाप्रधान. तिची हळवी बाजू कायम समजून घेतली जाते. पण पुरुषाने भावनिक व्हायचे नाही..का? तर तो दुबळा समजला जातो.
मलाही प्रेम हवं होतं गं. सारी माणसं आजूबाजूला असूनही मी एकटा होतो. ही एकटेपणाची जाणीव मन खात राहते. आता इतक्या वर्षांनी आईला उपरती झाली. मी तिला कसं माफ करू सांग?"

"अहो, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. ती वेळच ठरवत असते आपल्या नशिबी काय येणार ते. तुम्हीच जर असे कोलमडून गेलात, तर मी पाहायचं तरी कुणाकडे? गोष्टी अशा काही घडत गेल्या की आबांनी अंथरूण धरले. आईंनी एकाच घरात राहून वेगळी चूल मांडायला सांगितली. त्या जमिनीच्या नादापायी आपला हातचा व्यवसायही घालवून बसल्या. ना मला पैसा हवा, ना जमीन जुमला. मला काहीच नको राजेश. मला  आयुष्यभर केवळ तुमची सोबत हवी आणि आबा आणि आई ही मायेची माणसं हवीत.
पण तुम्ही नका काळजी करू. एखाद्याच्या नशिबी सुख उशीरा येतं. बघा सारं काही ठीक होईल, अगदी लवकरच." गीता राजेशला धीर देत म्हणाली.

बोलता बोलता अचानक गीताला चक्कर आली आणि ती तिथेच कोसळली. राजेशला काय करावे ते सुचेना. त्याचा गोंधळ ऐकून लताबाई धावतच त्यांच्या खोलीत आल्या. त्यांनी पटकन गडी माणसांना सांगून डॉक्टरांना बोलावणे धाडले आणि त्या गीताजवळ जाऊन बसल्या.
_____________________________

"लता, राजेशला बरं वाटत नाही. मी दवाखान्यातून  गोळ्या -औषधं आणली आहेत. ती तेवढी वेळेवर द्या त्याला." असे म्हणत आबा आपल्या कामाला निघून गेले. आई औषध देईल म्हणून लहानगा राजेश वाट पाहत झोपून राहिला. पण लताबाईंना ना राजेशची आठवण झाली ना औषधांची. दुपार टळून गेल्यानंतर कधीतरी लताबाईंनी गार झालेला वरण -भात राजेश समोर आणून ठेवला नि त्या पुन्हा आपल्या कामाला निघून गेल्या.
डॉक्टर आले आणि राजेश आपल्या आठवणीतून भानावर आला.

"तसं काळजी करण्यासारखं काहीच नाही. पण इथून पुढे मात्र नीट काळजी घ्यावी लागेल." डॉक्टर गीताला तपासत म्हणाले.

"म्हणजे? मी समजलो नाही डॉक्टर." राजेश गोंधळून म्हणाला.

"अरे म्हणजे 'आनंदाची बातमी ' आहे." डॉक्टर हसत हसत म्हणाले.

हे ऐकून राजेश आणि लताबाईंचा चेहरा आनंदाने उजळला. "मला माफ कर गं पोरी. या आनंदाच्या क्षणी झालं गेलं सारं विसरून जाऊ. पण राजेश मला खरचं माफ कर रे." लताबाईंनी आनंदाने गीताला आपल्या जवळ घेतलं.
"या गीता आता तुझी काळजी घ्यायला ही तुझी सासू खमकी आहे बरं. मी आलेच. देवापुढे साखर ठेवून येते." राजेश लताबाईंचे म्हणणे ऐकून ही न ऐकल्यासारखे करत, आबांना ही बातमी सांगायला त्यांच्या खोलीत गेला.

ही आनंदाची बातमी ऐकून आबांना उत्साह वाटू लागला. त्यांची तब्येतही हळूहळू सुधारू लागली. लताबाईंनी दिगू मामाला पुन्हा कचेरी आमच्या नावावर कर म्हणून समजावले, धमकावले. तरीही तो बधत नव्हता. यासाठी राजेशची धडपड सुरूच होती. लताबाई राजेशने आपल्याला माफ करावे म्हणून सारं काही करत होत्या. पण राजेश त्यांच्यापासून कधीच दूर गेला होता.

पहिले तीन महिने गीताला खूप त्रास झाला. पण नंतर तिची तब्येत सुधारली. लताबाई आणि राजेश  तिची नीट काळजी घेत होते. तिला काय हवं नको ते पाहत होते. आता आबाही घरातल्या घरात हिंडू- फिरू लागले होते, शेतीच्या कामात लक्ष घालत होते.

क्रमशः

🎭 Series Post

View all