सल भाग =3

Katha eka purushachya manat sachlelya asha, apekshanchi.

"आई, इतकी अस्वस्थ नको होऊ. मी पाहतो काय झालंय ते. तरीही आतापर्यंत यायला हवे होते आबा. मग गीताकडे फोन करायचा नाही का? मी कालच आलो असतो." असे म्हणत राजेश गडबडीने पुन्हा बाहेर पडला.

"राजेश बाळा थांब. मी येते तुझ्यासोबत." लताबाई राजेशच्या मागोमाग निघाल्या. तसा राजेश त्यांच्याकडे पाहतच राहिला. आज पहिल्यांदाच राजेशने लताबाईंच्या तोंडून स्वतःसाठी एखादा प्रेमाचा शब्द ऐकला होता.

"नको. इथे घरी कोणीतरी हवेच. मी जाऊन येतो." असे म्हणत लताबाईंच्या उत्तराची वाट न पाहता राजेश बाहेर पडला. तो काही अंतर जातो न जातो तोच आबांची गाडी येताना दिसली. तसा त्याचा जीव भांड्यात पडला. आबांची गाडी जवळ येईपर्यंत तो तसाच थांबून राहिला.
"आबा इतका का उशीर? आम्ही वाट पाहत होतो तुमची. आई किती काळजीत आहे! चला लवकर घरी." राजेशने आबांना आपल्या गाडीत बसवले.

आबांना पाहिल्यानंतर लताबाईंना धीर आला. "अहो किती उशीर? निदान एखादा निरोप तरी धाडायचा. काल रात्री येणारे तुम्ही आज निम्मा दिवस गेला, तरी आला नाहीत. किती वाईट- साईट विचार येत होते मनात." लताबाई आपल्या डोळ्यातले पाणी पुसत म्हणाल्या. आज राजेशने पहिल्यांदाच लताबाईंना एवढे हळवे झालेले पाहिले होते.

"अहो आधी शांत व्हा. एवढी काळजी करण्यासारखे काहीच नाही. आम्ही ठीक आहोत. आम्हाला तिथून निघायला पहाट झाली. अर्ध्या वाटेत आलो, तोपर्यंत गाडीचे चाक निकामी झाले. जवळपास कुठे दुरुस्तीचे दुकानही मिळाले नाही. मग ड्रायव्हरने थोडी खटपट करून कसबसे चाक दुरुस्त केले आणि पुढल्या कुठल्याशा दुकानापाशी आलो आम्ही. तिथे बराच वेळ गेला. त्यामुळे उशीर झाला इतकेच.
बरं सुनबाईंना फक्कडसा चहा ठेवायला सांगा लवकर." आबा लताबाईंकडे पाहत म्हणाले.

"तुमच्या सुनबाई कालच माहेरी गेल्या. हे काय राजेश तुमच्यापुढेच तर येत आहे तिला सोडून. आलेच..मी टाकते चहा." लताबाई आत निघून गेल्या.

"सुनबाई अचानक माहेरी गेल्या?"- आबा.

"हो आबा. ते लग्नानंतर जाणं झालं नव्हतं, म्हणून कालच माहेरी गेली गीता. पण इथून पुढे जुनी गाडी घेऊन जाऊ नका." राजेश काळजीने म्हणाला.

"बरं, राजेश मी आता थोडी विश्रांती घेतो. रात्रीच्या जेवणानंतर मी आणलेली कागदपत्रे तू सवडीने पाहून घे. अजून खूप सारी कामे बाकी आहेत. "


रात्री जेवणे आटोपल्यावर आबा आणि लताबाई कितीतरी दिवसांनी निवांत बोलत बसले.

"काय म्हणतात नव्या सुनबाई? कामाच्या व्यापात त्यांच्याशी फारशी बोलाचाल झालीच नाही आमची."आबा.

"सुनबाई छान आहेत. अगदी महिन्याभरातच जीव लावला गीताने साऱ्यांना. सगळ्यांची काळजी घेतात. कामालाही हुशार आहे अगदी. शेवटी माझी पसंती आहे." लताबाई थाटात म्हणाल्या. बोलता -बोलता आबांना झोप लागली.
_____________________

इकडे माहेरी गीताचे लाड चालले होते. तिच्या आईला तिला कुठे ठेवू आणि कुठे नको, असे झाले होते. गीता होतीच तशी सुस्वरूप, मनमिळाऊ. जाईल तिथे साऱ्यांना आपलेसे करणारी.

तर गीताला राजेशची आठवण अस्वस्थ करत होती. 'किती साधे -भोळे आहेत हे. काहीसे अबोलच म्हणा ना. मोकळेपणाने बोलतही नाहीत धड. सतत कुठल्याशा विचारात असल्यासारखे वागतात. पण काहीतरी सलत आहे यांच्या मनात हे मात्र नक्की.'

"वन्स अहो चार दिवस सरले बरं का. आता आणखी चार दिवसच राहिले. बरं चला आवरून घ्या. आपल्याला तुमच्या सासरच्या मंडळींना भेटवस्तू आणायला जायचं आहे. आई म्हणाल्या, पोरगी एकदा सासरी गेली की पुन्हा लवकर यायची नाही. आपण मानपान पाळायला हवेतच. आजच जाऊन या."
थोडयाच वेळात गीता आपल्या वहिनी आणि भावासह खरेदीला बाहेर पडली. राजेशसाठी आणि आबांसाठी कापडं, सासुबाईंसाठी छानशी साडी आणि माहेरवाशीण म्हणून गीतासाठी साडी घेतली. मग गीताने ही आपल्या आई आणि वहिनीसाठी साड्या घेतल्या.
_________________________

राजेश आपल्या कामात व्यस्त होता. लताबाईंचे वागणे त्याला कोड्यात टाकत होते, तर गीताची आठवण त्याचे मन खात होती. ती कधी घरी येईल असे झाले होते त्याला. उरलेले चार दिवस कधी सरतात? असे वाटत होते.

चार दिवसांनी राजेश पुन्हा आपल्या सासरी गेला आणि गीताला घेऊन आला. आपल्या माहेरचा निरोप घेऊन गीता सासरी आली. तिने आणलेल्या भेटवस्तू पाहून लताबाई हरखून गेल्या.
गीताचं सतत मागे पुढे असणं, जीवापाड जपणं, समजून घेणं, आधार देणं यामुळे राजेश पुन्हा नव्याने तिच्या प्रेमात पडला.

इतकी वर्षे तो ज्या प्रेमासाठी आसुसला होता ते प्रेम गीताच्या रूपाने त्याच्या जवळ आले होते. गीता आणि राजेशचे नाते हळूहळू खुलत होते.

काही दिवसांनी आबांनी गीताच्या नावे एक जमीन खरेदी केली. त्यामुळे लताबाई नाराज झाल्या. "मी इतकी वर्ष सारं सांभाळलं. पण माझ्या नावे काहीच केलं नाही यांनी. आता सून आल्यावर मात्र तिच्या नावे जमीन खरेदी केली?"
लताबाईंनी राजेशला बोल लावले," सख्ख आणि सावत्र असा भेद करून, आबांना भरीला घालून तूच घडवून आणलेस हे."
हे सारं गीताच्या कानावर पडलं. तिला धक्काच बसला. 'लताबाई या राजेशच्या सावत्र आई?' हा नक्की काय प्रकार आहे? हे तिला उमजेना.

आता लताबाईंनी गीताचे नाव टाकले. जाणून- बुजून त्या गीताला त्रास देऊ लागल्या. हे पाहून कधी नव्हे ते राजेशने पहिल्यांदाच लताबाईंना सुनावले. "या एवढ्याश्या कारणावरून नाराज व्हायची काहीच गरज नाही आई. नाव लागलं म्हणून जमीन काही गीताची होत नाही आणि तसंही अजूनही सारं आबांच्या नावावर आहे. या इस्टेटीपैकी माझ्या नावावर काहीही नाही. हवं तर सगळं तुझ्या नावे करून घे. माझी काही हरकत असणार नाही."

हे ऐकून लताबाईंनी आबांचे कान भरले. "या काल आलेल्या मुलीसाठी तुम्ही मला अंतर देत आहात? मी आता काही एक ऐकायची नाही. माझ्या नावे या इस्टेटीपैकी काहीतरी व्हायलाच हवं." आबांनी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण लताबाई काही ऐकायलाच तयार नव्हत्या.
अखेर लताबाईंच्या हट्टापुढे नमून आबांनी आपल्या व्यवसायातला काही भाग हा लताबाईंच्या नावे केला, तेव्हा कुठे लताबाई शांत झाल्या.

क्रमशः




 

🎭 Series Post

View all