सल भाग =2

Katha eka purushachya manat sachlelya apekshanchi

गाडी धावत होती, तसे राजेशचे विचारही धावत होते. आपल्या सोबत गीता आहे याचेही भान त्याला राहिले नव्हते. 

"अहो, एक बोलू का?" अचानक गीताच्या आवाजाने राजेशची तंद्री भंगली.

"हा. बोल." 

"माफ करा. पण जरा स्पष्टच बोलते. आई आणि तुमच्यात काही बिनसलं आहे का? गेले महिनाभर पाहते आहे मी. म्हणजे तुम्ही खूप दबकून वागता - बोलता आईंशी म्हणून आपलं मला वाटलं. आई आणि मुलाचं नातं खूप छान असतं. जसं माझ्या आईचं आणि भावाचं आहे तसं!" गीता थोडी भीत भीतच बोलली.

"नाही गं. तसं काहीच नाही. आपलं लग्न किती घाई- गडबडीत झालं. त्याचा थोडा ताण आला होता सगळ्यांना आणि कामाची गडबड तू पाहतेसच ना! बाकी काही नाही." राजेश गीताला म्हणाला.

खरंतर राजेशला गीताशी खूप काही बोलायचं होतं. आपलं मन मोकळं करायचं होतं. क्षणभर त्याला वाटलं, गाडी थांबवावी आणि गीताच्या मांडीवर डोकं ठेऊन अश्रूंना मोकळी वाट करून द्यावी आणि लहानपणापासून उरात साठवलेलं दुःख दूर फेकून द्यावं. पण राजेश मूकपणे गाडी चालवत राहिला.

काही वेळातच दोघेही गीताच्या माहेरी पोहोचले. जावई पहिल्यांदाच घरी आले, म्हणून खूप सारा गोतावळा जमला होता गीताच्या घरी. तिथल्या मानपानाने, आदराने राजेश मनातून खूप सुखावला. 

दुसऱ्या दिवशी निघताना राजेशचा पाय जड झाला. आज पहिल्यांदाच गीतापासून तो आठ दिवस दूर राहणार होता. गेले महिनाभर त्याच्या आजूबाजूला असणारी, सतत मागे पुढे करणारी गीता आता आठ दिवस आपल्या डोळ्यासमोर नसेल.. हा दुरावा राजेशला सहन होणारा नव्हता. पण नाईलाज होता. 
राजेश सर्वांचा निरोप घेऊन बाहेर पडला. त्याला निरोप देताना गीताच्या डोळ्यात पाणी आलं. ते कोणाला दिसू नये म्हणून ती पट्कन आत निघून गेली आणि राजेशची गाडी दूरवर जाईपर्यंत खिडकीत उभी राहून पाहत राहिली. 

"प्रेमाची दुसरी बाजू म्हणजे विरह आणि तो केवळ आठ दिवसांचाच बरं. वन्स, माहेरी आपल्या माणसात आहात ना, मग? पुसा बघू डोळ्यातलं पाणी. हे आठ दिवस कसे पट्कन उडून जातील बघा. पुन्हा सासरी गेलात म्हणजे आमची आठवणही यायची नाही तुम्हाला." गीताची वहिनी तिला चिडवत म्हणाली. 
"चल..काहीतरीच तुझं! मी रडत नाही काही. ते आपलं डोळ्यात गेलं काहीतरी." गीता उसनं हसू आणत म्हणाली.

इकडे राजेश गीताच्या आठवणीत रमला. निघताना तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून तो कासावीस झाला होता. क्षणभर त्याला वाटलं,  पुन्हा मागे जावं, आणि गीताला सोबत घेऊन यावं. पण नकोच. तिकडे आबा वाट पाहत असतील आपली आणि आई..? लताबाईंचा चेहरा डोळ्यापुढे उभा राहताच त्याने गाडीचा वेग वाढवला.

__________________________

"आई मी येऊ का मामाकडे? सुट्टीत सगळी मुलं जातात ना मामाच्या गावी. तसा मी पण येईन." लहानगा राजेश आईकडे हट्ट करत होता. पण लताबाई राजेशचे बोलणे ऐकूनही न ऐकल्यासारखे करत आपलं सामान बांधत होत्या. हे पाहून राजेश रडायचा बेतात आला. 
तशा लताबाई म्हणाल्या, "इतका हट्ट करायला ते काही तुझं सख्ख आजोळ नाही, माझं माहेर आहे ते. मी तुझी सख्खी आई नाही, सावत्र आई आहे. हे असले हट्ट माझ्यापुढे अजिबात नकोत." 

तेव्हा पहिल्यांदाच राजेशने सावत्र हा शब्द ऐकला. तसा तो आपला हट्ट विसरून आबांकडे धावत गेला आणि म्हणाला, "आबा सावत्र म्हणजे काय हो?"
हे ऐकून आबा खोलीत आले आणि लताबाईंना म्हणाले "मी हे काय ऐकतो आहे? तुम्हाला बजावलं होतं ना, सावत्र हा शब्द देखील राजेशच्या कानावर पडता कामा नये म्हणून?" 

"ते चुकून तोंडून निघून गेलं." आबांचा राग पाहून लताबाई सावरून घेत म्हणाल्या. तरीही त्यांना आबांची बोलणी खावी लागली.  

नंतर गडी माणसांसमोर अपमान झाला म्हणून लताबाईंनी सारा राग राजेशवर काढला. "पुन्हा हट्ट करशील तर याद राख आणि तुझ्या आबांना यातलं काही कळता कामा नये." असे म्हणत लताबाईंनी राजेशला चांगलेच बडवून काढले. त्या दिवसापासून राजेशच्या मनात आईबद्दल भीती बसली. 

लताबाई केवळ आबांसमोर राजेशसोबत छान वागत. पण ते घरात नसले की त्याला काहीबाही बोलायला कमी करत नसत. 
हळूहळू राजेशला लताबाईंच्या या वागण्यातला फरक कळत गेला. 'आई, आबा समोर असले की छान वागते. नंतर मात्र अंतर राखून वागते.' मात्र जेव्हा आबा जवळ असायचे तेव्हा राजेश आनंदी असायचा.

अशा कितीतरी आठवणी राजेशच्या मनात साठल्या होत्या. 

"आबा, माझ्या मित्राची आई त्याला जेवण भरवते. शाळेत पोहोचवायला येते, त्याचा अभ्यास घेते, खाऊ करून देते, छान गोष्टी सांगते. दिवाळीत उटणे -साबण लावून ऊन पाण्याने आंघोळ घालते. पण आई माझ्यासाठी यातलं काहीच करत नाही." 
शेतावरल्या बांधावर उभा राहून राजेश आपल्या आबांना सांगत होता. 
"अरे आईला वेळ नसतो तेवढा. तू पाहतोस ना? आपला पसारा केवढा आहे ते. तो सांभाळावा लागतो. पण मी सांगेन तिला. तुझ्यासाठी सारं काही करायला." आबा म्हणाले.

"पण आजी म्हणते, ती माझी खरी आई नाही. मग माझी खरी आई कोण होती आबा?" 

त्या दिवशी राजेशला आपल्या आईचा फोटो पाहायला मिळाला. त्याने तो स्वतः जवळ ठेऊन घेतला.

राजेश जसा मोठा होऊ लागला. तसा लताबाईंनी त्याला बोर्डींगच्या शाळेत घालण्याचा हट्ट धरला. पण आबांनी याला विरोध केला. 'एकुलता एक मुलगा आपल्या जवळ असावा,' असे त्यांना वाटत होते. 

यानंतर आबांनी राजेशला आपला व्यवसाय, शेतीबाबतची सारी माहिती द्यायला सुरूवात केली. आपला अभ्यास सांभाळून राजेशने हे सारं समजून घेतलं आणि आबांना मदत करायला सुरुवात केली. 
हे पाहून लताबाईंनी आबांच्या मागे टूमण लावलं. "इतकी सारी इस्टेट एकट्या राजेशला सांभाळता येणार नाही. थोडी माझ्या नावे करा, थोडी माझ्या माहेरी भावाला देऊ." 
हे ऐकून आबा संतापले. "जे माझं आहे ते माझ्या मुलालाच मिळणार. बाकी कोणाचाही हक्क नाही त्यावर." त्यानंतर लताबाईंनी राजेशसोबत बोलणे कमी केले, तर राजेशने स्वतःला कामात पूर्णपणे झोकून दिले. 
___________________

विचारात राजेश घरी कधी येऊन पोहोचला त्याला कळलेच नाही. राजेश घरात आला तशा लताबाई गडबडीने उठून बाहेर आल्या. 
"अरे तुझे आबा अजून आलेच नाहीत रे. कालची रात्र गेली, आजचा निम्मा दिवस गेला. काहीच समजायला मार्ग नाही. दोन गडी गेले आहेत बातमी काढायला, तेही नाही आले अजून. लताबाईंच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. फार अस्वस्थ झाल्या होत्या त्या.

क्रमशः

🎭 Series Post

View all