सल भाग =१

Katha eka purushachya manat sachalelya aasha, apekshanchi.

"आई मी माहेरी जायला आज निघू ना?" गीतांजली लताबाईंना म्हणजेच आपल्या सासुबाईंना विचारत स्वयंपाकघरात आली.

"हो, अगं. त्यात काय विचारायचं? लग्नानंतर पाच दिवसांनी सून माहेरी जातेच. पण तुला जायला खूपच उशीर झाला. जा आवरून घे तुझं आणि जेवण करून जा."

"हो आई. मी राजेश आले की, त्यांनाही विचारुन घेते." गीतांजली गडबडीने म्हणाली.

"अगं माहेरी जायला नवऱ्याला कशाला विचारायला हवं? मी दिली आहे ना परवानगी!" सासुबाई बळेच हसत म्हणाल्या.

"तसं नाही आई. पण..पण हे मला पोहोचवायला येतील ना? म्हणून म्हटलं." गीता दरवाज्याकडे पाहत म्हणाली.

इतक्यात राजेश दारातून आत येताना दिसला. तशी गीता बाहेर आली. तिच्या मागोमाग येत  पाण्याचा पेला राजेशला देत लताबाई म्हणाल्या, "गीतांजली माहेरी जाते आहे. तिला पोहोचवायला जा सोबत."

"बरं." राजेश लताबाईंची नजर टाळत म्हणाला.

"अहो तुम्ही आज राहाल ना तिथे? पुरा दोन तासांचा प्रवास आहे म्हणून म्हटलं." गीता अपेक्षेने आपल्या नवऱ्याकडे पाहत म्हणाली.

तसे राजेशने आपल्या आईकडे पाहिले. लताबाईंनी डोळ्यांनीच नकार दिला. तसा राजेश काहीच बोलला नाही. पण गीता मात्र या उत्तराची वाट न पाहताच आवरायला खोलीत निघून गेली म्हणून राजेशला हायसं वाटलं.

थोडयाच वेळात गीता आवरून आपली बॅग घेऊन बाहेर आली.
"अहो मी तुमचेही कपडे बॅगेत घेतले आहेत. पोहोचायला उशीर होईल आपल्याला. आज रहा आणि उद्या लवकर निघा. तशीही सुट्टीच आहे उद्या. चालेल ना आई?"

गीताचे हे बोलणे ऐकून राजेशला घाम फुटला. ' गीताने आईला न विचारताच परस्पर निर्णय घेऊन टाकला? गीताला अजून कुठे काय माहित आहे? ती आत्ता कुठे आली आहे या घरात.' राजेश आता लताबाईंकडे पाहू लागला, त्या काय उत्तर देतात म्हणून?

तशा लताबाई आपला राग आवरत म्हणाल्या,
"का नाही? आता तू ठरवलेच आहेस तर राहील  राजेश तिथे."

गीताला कळेना आपलं काय चुकलं! ती आळीपाळीने राजेश आणि सासुबाईंकडे पाहू लागली. तशा सासुबाई सावरून घेत म्हणाल्या, "अगं राहिल तो तिथेच. बरं, मी पोळ्या लाटून घेते. जेवून निघा लगेच." तशी गीताही आपल्या सासुबाईंच्या मागे स्वयंपाकघरात शिरली.

लताबाईंचा स्वभाव काहीसा हेकेखोर, 'मी म्हणेन ती पूर्व दिशा' असा होता. मात्र राजेशचे वडील आबा हे स्वभावाने थोडे कडक असल्याने लताबाईंचे आपल्या नवऱ्यापुढे फारसे चालत नसे. मग त्यांची सगळी धुसफूस राजेशला सहन करावी लागे. 'मुलाने माझे ऐकलेच पाहिजे 'असा अलिखित नियमच होता, लताबाईंचा.

खरंतर लताबाई या आबांच्या दुसऱ्या पत्नी, राजेशच्या सावत्र आई. राजेशची जन्मदात्री आई गेल्यानंतर लहानग्या राजेशसाठी आबांनी पुन्हा लग्न केलं. शिवाय दोन घरे, शेती, व्यवसाय इतकी इस्टेट होती. ती सांभाळण्यासाठी अजून एक वारस हवा आणि राजेशला आईची माया हवी म्हणून आबांनी दुसरं लग्न केलं.

आबांसमोर लताबाई राजेशसोबत नीट वागत. पण एकदा का त्यांची पाठ फिरली की, लताबाईंचे वागणे एकदम बदलून जाई. लग्नानंतर लताबाईंना मूल- बाळ झालेच नाही. त्यामुळे 'ही इतकी इस्टेट एकट्या राजेशला काय करायची? थोडी माझ्या माहेरी, भावाला द्यायला काय हरकत आहे? असे लताबाईंना वाटे. म्हणून त्यांनी या इस्टेटीवर आपले नाव लावून घेण्याचा प्रयत्न करून पहिला होता.
पण आबांना हे मान्य नव्हते. तरी लताबाईंनी आपला हट्ट सोडला नव्हता. त्या कायम राजेशला पाण्यात बघत. कधी मनात आलेच तर त्याच्याशी नीट वागत -बोलत.

लहानपणापासून आईच्या प्रेमाला पारख्या झालेल्या राजेशने लताबाईंच्या सावत्रपणात आपली आई शोधण्याचा प्रयत्न केला होता. आईच्या प्रेमासाठी तो काहीही करायला तयार होता. पण ते प्रेम अजून त्याला गवसलेच नव्हते. लहानपणी नसलेल्या आईच्या आठवणीत राजेश किती रात्र जगला होता. पण त्याने त्या आठवणी डोळ्यांच्या कडा ओलांडून कधी बाहेर पडू दिल्या नव्हत्या, स्वतःच्या मनाला समजावलं होतं. आईच्या कुशीत शिरून त्याला छान छान गोष्टी ऐकायच्या होत्या, आपल्या मित्रांच्या तक्रारी सांगायच्या होत्या, लाड करून घ्यायचे होते. पण हे सुख त्याच्या नशिबी नव्हतचं.

कामानिमित्ताने आबा फारसे घरी नसतं. त्यामुळे एरवी घरचे सगळे निर्णय लताबाईच घेत. राजेशनेही त्यांच्या प्रत्येक शब्दाचा, निर्णयाचा मान राखलाच पाहिजे अशी त्यांची भूमिका होती.
गीता आणि राजेशचे लग्न लताबाईंनीच ठरवले होते. त्यांनी राजेशला मुलगी पसंत आहे की नाही? हे देखील विचारायची तसदी घेतली नव्हती.
पण गीतांजली राजेशला न आवडण्यासारखी नव्हतीच मुळी. प्रसन्न चेहरा, बोलके डोळे, चाफेकळी नाक, वेणी घातलेले लांबसडक केस आणि बोलण्यात कोणालाही न ऐकणाऱ्या गीताला पाहता क्षणी राजेश तिच्या प्रेमात पडला. पण त्याने ते प्रेम व्यक्त केले नव्हते. कारण गीताचा स्वभाव त्याला अजून पुरता माहीत नव्हता आणि न जाणो आईच्या मनात कधी काय येईल? याची भीती वाटत होती त्याला. व्यक्त होणं जणू तो विसरूनच गेला होता.

जेवणं आटोपली आणि आपल्या सासुबाईंच्या पाया पडून गीताने त्यांचा निरोप घेतला. "आई मामांजी रात्री उशीरा यायचे आहेत. सांभाळून राहा."
"हो. अगं शेतावरली गडी माणसं, बायका येतीलच सोबतीला. नको काळजी करू आणि तुम्ही नीट जा. राजेश गाडी सावकाश चालव रे." लताबाई  म्हणाल्या.

राजेश विचारात पडला होता, आपल्या आईचे वागणे इतके कसे काय बदलले? इतकी वर्षे मी जे सहन केलं, ते गीताला सहन करायला लागू नये इतकीच त्याची इच्छा होती.

’कदाचित गीता अजून नवखी असल्याने तिच्यासोबत आई नीट वागत असेल! की आईने गीताला पसंत केले म्हणून ती छान वागते? खरचं आईचा स्वभाव बदलला आहे? की ही कुठल्या वादळापूर्वीची शांतता आहे? आईचा स्वभाव बदलला असला तर राजेशसाठी त्याहून आनंदाची दुसरी गोष्टच नव्हती. मग इतकी वर्षे मी ज्या प्रेमासाठी व्याकूळ झालो होतो, ते माझ्या नशिबी नव्हतेच का? की गीतामुळे ही सारी परिस्थिती बदलणार आहे?’ राजेशला काही कळत नव्हतं.

क्रमशः

सायली

🎭 Series Post

View all