सल भाग =अंतिम

Katha eka purushachya manat sachlelya asha, apekshanchi

"आबा तुम्ही इतक्या रात्री इथे? मला बोलावलं असतं तर मी आलो असतो तुमच्या खोलीत." राजेश हातातले काम ठेवत आपल्या खोलीचे दार पूर्णपणे उघडत म्हणाला.

"मला महत्त्वाचं बोलायचं आहे राजेश, म्हणून आलो. माझं तुझ्या आईशी बोलणं झालं. तिच्या म्हणण्यानुसार दिगू आपला व्यवसाय पुन्हा आपल्याला परत करायला तयार आहे. पण माझ्या भीतीने तो आपल्याला सामोरा येत नाही. मी काय म्हणतो, आपला व्यवसाय जर सहजासहजी परत मिळत असेल तर तो घ्यायला काय हरकत आहे? मात्र याची सजा त्याला मिळणारच.
मान्य आहे लताची चूक झाली आणि त्याहूनही मोठी चूक दिगूने केली. एक आई म्हणून लताने तुला जीव लावला नसला, तरी कर्तव्यात ती कुठे चुकली नाही. शेवटी माणूस कुठे ना कुठे चुकतोच. माफ कर लताला. तिला तिची चूक कळली आहे. कधी कधी परिस्थिती माणसाला बदलायला भाग पाडते. "

"बरोबर आहे आबा. पण त्या चुकीची झळ इतरांना बसत असेल तर तो गुन्हा ठरत नाही का? या घडल्या प्रकारामुळे तुमच्या तब्येतीवर परिणाम झाला. सर्वांची मनस्थिती, घरची आर्थिक स्थिती बिघडली. खरंतर आबा आईने माझी माफी मागण्याएवढा मी काही मोठा नाही. मला आईकडून काय हवं होतं? फक्त माया, आधार, प्रेम. इतकी वर्ष नाकारलं गेल्यानंतर जर हे सारं एकदमच आपल्या समोर येत असेल तर? त्या नकाराची सवय झाली असल्याने समोरचे वास्तव लवकर स्वीकारता येत नाही.
मला ही जमीन नको, इस्टेट नको, काही नको. या साऱ्याचं तुमच्या मनात जे येईल ते तुम्ही करा.
आबा मला माहित नाही मी आईला एक आई म्हणून पुन्हा स्वीकारू शकेन की नाही! तिने दिलेल्या वेदना या सतत माझा पाठलाग करत राहतात. खरंतर काळाच्या ओघात या आठवणी पुसट व्हायला हव्या होत्या. पण त्या मनावर अशा काही कोरल्या गेल्या आहेत की, त्या पुसता येत नाहीत. आबा मला हे सारं विसरायचं असलं तरी ही सल कायम माझ्या मनात राहील.

आबा मला गीताच्या रूपाने एक प्रेमळ बायको मिळाली, जीवाभावाची सखी मिळाली आणि  आता माझी बढतीही झाली आहे..एक बाप म्हणून!

मी खूप विचार करून हा निर्णय घेतला आहे, की आपल्या शेतावरल्या घरात मी आणि गीता येत्या काही दिवसांतच राहायला जात आहोत. काही दिवसांसाठी किंवा कदाचित कायमसाठी. मला शांतता हवी आहे, स्थैर्य हवं आहे. आता कसलेही बंधन नको, जगण्यातला मोकळेपणा अनुभवायचा आहे मला. पण तुम्हाला एक मुलगा म्हणून मी कधीच अंतर देणार नाही. या इतक्या वर्षात मी कोणाकडे काहीच मागितले नाही. आता मला परवानगी द्या आबा." थोडं थांबून पुन्हा राजेश पुढे म्हणाला,
"गीताला हा निर्णय कदाचित मान्य होणार नाही. पण ती माझ्या शब्दाबाहेर जायची नाही आणि हवं तर तिथे तुम्ही येऊ शकता आमच्यासोबत. इथे तुमची काळजी घ्यायला आई आहेच. आम्हीही इथे नसलो तरी जवळच आहोत. तुम्हाला आठवतं आबा? आई मला बोर्डिंगच्या शाळेत घालण्यासाठी तुमच्या मागे लागली होती? तसचं समजा हवं तर.

आबा, स्त्रिया आपलं मन बोलून, रडून मोकळं करू शकतात. पण पुरुषांना रडायची मुभा नाही. त्याच्या डोळ्यात पाणी आलं, तर त्याची चेष्टा होते. मग त्याच्या मनातली घुसमट व्यक्त होत नाही आणि तो आतल्या आत कुढत राहतो. पुरुषाला जर समजून घेतलं तर त्याला जगण्याची नवी उर्मी येते." राजेश खिडकीतून बाहेरच्या अंधारात पाहत म्हणाला.


"राजेश, ही ईस्टेट, जमीन, हे घर हे सार तुझंच आहे. मला तुझा हा निर्णय पटलेला नाही. पण या निर्णयाचा आदर राखून मी तुला परवानगी देतो.
तू जसा हाताखाली आलास, तसे मी तुला कामात गुंतवले. जेणे करून तुझे मन या विचारात गुंतून राहू नये. खरंतर मीही या गोष्टींपासून पळ काढला. लताला वेळीच समज द्यायला हवी होती मी. पण आता होऊन गेलेल्या गोष्टी उगाळत बसण्यात अर्थ नाही. स्वतःच आयुष्य मनाप्रमाणे जगण्याचा अधिकार तुलाही आहेच. तो मी हिरावून घेऊ शकत नाही. घरट्यातून उडणाऱ्या पिल्लाला, बाप भरारी घ्यायला शिकवतो, त्याला मार्ग दाखवतो. त्याचं उडणं थांबवत नाही. काहीही असो, मी सदैव तुझ्यासोबत असेन."

आबांचे हे बोलणे ऐकून राजेश त्यांच्या मिठीत शिरला आणि खोली बाहेर उभारून त्यांचे हे बोलणे ऐकणाऱ्या लताबाई डोळ्यातून आसवं गाळण्याशिवाय दुसरे काहीच करू शकत नव्हत्या. 'राजेशला जे प्रेम दिलं नाही, ते मात्र त्याच्या बाळाला मी नक्की देईन.' असे मनोमन ठरवत लताबाई तिथून निघून गेल्या.

काही दिवसांनी दिगू मामाने सारा व्यवसाय परत राजेशकडे सोपवला, तर शिक्षा म्हणून आबांनी दिगू मामाला आपल्या घरी येण्यास कायमची बंदी घातली. राजेशनेही लताबाईंना माफ केले.

नऊ महिने पूर्ण झाले आणि गीताने एका गोंडस मुलाला जन्म दिला. पाच महिन्यानंतर गीता पुन्हा सासरी आली. वेगळं राहण्याच्या निर्णयाला गीताचा विरोध होताच. मात्र राजेशसाठी ती तयार झाली. लताबाईंनी राजेशच्या या निर्णयाला विरोध केला. मात्र राजेश आपल्या निर्णयावर ठाम होता. पुढच्या काही दिवसांतच राजेश आणि गीताने आपला संसार नव्या घरी सुरू केला, मनात आशा, आकांक्षा, नवी स्वप्न घेऊन.

समाप्त.