साक्षगंध ! भाग 10

सामाजिक कौटुंबिक स्त्रीविशेष कथा
रामरावांच्या नेत्रांतून आसवे गळू लागली. हृदयात भावकल्लोळ माजले. मनपटलावर रणकंदन चालू झाले. सर्वत्र हाहाकार माजला. तरीही त्यांच्या कठोर हृदयाला पाझर फुटत नव्हते. विचारांच्या खाणीतून
" क्षमा " नावाचे रत्न बाहेर पडत नव्हते.

" मला माहिती नाही. मला फक्त इतकेच माहिती आहे की ज्या प्रेमामुळे पालकांची अब्रू वेशीवर टांगली जाते त्या प्रेमापेक्षा द्वेषच बरा. प्रेमच करायचे तर आपल्या जातीत पाहून करायचे ना. " रामराव म्हणाले.

" प्रेम ठरवून करता येत नाही. " जयेश म्हणाला.

" पण ठरवून विसरता तर येते ना ? पूर्वजांनी काहीतरी विचार करूनच जातीपाती बनवल्या असतील. त्या जातीतच प्रेम , लग्न करावे. " रामरावांनी विचारले.

" आपल्या देवांनीही पळून जाऊन लग्न केलीतच की. कृष्णाने नव्हते का पळवले देवी रुक्मिणीला ? सती-महादेव , अर्जुन-सुभद्रा किती उदाहरणे द्यावी ? आज त्याच विठोबा-रखुमाईची पूजा करतोच ना आपण ?" जयेश म्हणाला.

" शब्दांचे बाण चालवू नका जयेशराव. आम्ही देव नाहीत तर माणसे आहोत. तुम्ही गुजराती. व्यापार रक्तात असते तुमच्या. पण मी साधा गावचा पाटील. हृदयावरील जखमांचे हिशोब नाही मांडता येत मला. घराच्या भिंतीवर " पाटलांची पोरगी पळून गेली आहे. " असे कोळश्याने लिहिले जाते ना तेव्हा ते फक्त भिंतीवर नाही तर मनावर कोरले जाते. ते वाचून रडत असलेले मायबाप नाही पाहिले तुम्ही जयेशराव. " रामराव रडत म्हणाले.

तेवढ्यात समोर एक पांढरी कार थांबली. त्यातून एक लहानशी मुलगी आणि एक सुंदर स्त्री उतरली. त्या स्त्रीने काळे गॉगल घातले होते. तिने चावी वॉचमनला दिली. वॉचमनने कार पार्क केली. त्या स्त्रीसोबत असलेली लहानशी चिमुरडी मुलगी धावत जयेशकडे आली.

" बेटा रूक्स , हळू. " उत्तरा म्हणाली.

" दादाजी दादाजी. " अशी हाक मारत ती मुलगी जयेशच्या मांडीवर बसली.

" ही माझी नात रुक्मिणी आणि ही माझी सून उत्तरा." जयेशने ओळख करून दिली.

" हे रडत का आहेत ?" लहानग्या रुक्मिणीने इवल्याशा भुवया वर करत विचारले.

चंदनासारखा गोरापान चेहरा , काळे व्यवस्थित विंचरलेले केस आणि मनमोहक डोळे. इंद्राने स्वर्गातून छोटीशी परी भूतलावर पाठवावी अशी गोंडस रुक्मिणी होती. ससा दिसला की कुणालाही तो उचलण्याचा मोह होतो तसाच रुक्मिणीचेही हॉस्पिटलमध्ये सर्वजण लाड करत.

" त्यांच्या डोळ्यात कचरा गेलाय. " जयेश म्हणाला.

" थांबा. " रुक्मिणी म्हणाली.

मग रुक्मिणी रामरावांच्या जवळ गेली आणि तिचे नाजूक हात रामरावांच्या गालावर ठेवून डोळ्यात हळूच फुंकर मारली. ती फुंकर डोळ्यात मारत होती पण रामरावांच्या जखमांवरही फुंकर पडत होती. रामरावांना आठवले की त्यांची मोठी बहीण रुक्मिणीताईही अशीच डोळ्यात फुंकर मारायची.

" मी तर म्हणले एखादे गुजराती नाव ठेवा. तरी यांनी मराठी देवीचेच नाव ठेवले. " उत्तरा म्हणाली.

" बेटा , माणसे मराठी-गुजराती असतात. देवीदेवता नाही. " जयेश म्हणाला.

" हो. मी सिनेमाची तिकिटे बुक केली आहेत. तुम्हाला आणि अभिमन्यूला घ्यायला आले आहे. " उत्तरा म्हणाली.

" आम्ही निघतो. " रामराव रुक्मिणीला दूर करत म्हणाले.

पाषाणहृदयी झालेल्या रामरावांनी आपल्या नातीला उराशी कवटाळले नाही. जयेश त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच बसला.

◆◆◆◆

त्या घटनेनंतर रामरावांनी दिल्ली सोडली. मराठी माणसे दिल्लीत फार टिकत नाहीत असे म्हणतात. पारितोषच्या फ्लॅटवर कृष्णा आणि मेघा राहू लागले. कृष्णा हळूहळू सर्व कारभार ऑनलाइन पाहू लागला. खूपदा त्याला शहरात जावे लागे. अमोलरावांच्यावतीने कृष्णाने खासदारकीचे काम पाहावे असा सूर पक्षात घुमू लागला. त्यामुळे कृष्णानेही दिल्ली सोडली आणि शहरात जाऊन जनतेची सेवा करू लागला. त्यांची प्रश्ने सोडवू लागला. मेघा मात्र दिल्ली सोडायला तयार नव्हती. स्वामी समर्थांवर तिची अतोनात श्रद्धा होती. दिवसभर हॉस्पिटलमध्ये राहून त्या अमोलरावांशी गप्पा मारत. स्वामींचा जप करत. पारितोष मात्र आईप्रमाणे त्यांची काळजी घेत. एकेरात्री मेघा अचानक उठल्या. घामाघूम अवस्थेत असलेल्या त्या पाणी पिण्यासाठी किचनमध्ये गेल्या. नेमक्या त्याच वेळी पारितोषही जागाच होता. हॉटस्टारवर तो " राजाश्रीशिवछत्रपती " ही अमोल कोल्हेअभिनित मालिका बघत होता. शंभुराजे मिर्झाराजेच्या छावणीत गेलेत असा सिन होता. लहानगे शंभूराजे सम्राट पृथ्वीराज चौहानावर कवने गाऊन दाखवत होते.

" पर शंभूराजे , आपके सम्राट पृथ्वीराज को तो हमारे सुलतान घोरीने अंधा किया था. " दिलेरखान हसत म्हणाला.

सर्व मुस्लिम सरदार हसू लागले. नेतोजी पालकरांनी शंभूराजे यांना इशाऱ्यानेच सबुरीचा सल्ला दिला.

" गोष्ट इथेच संपत नाही खानसाहेब. ती गुरुवारची रात्र होती. शब्दभेदी बाण चालवणारा व्यक्ती बघण्यासाठी लोकांनी दरबारात गर्दी केली होती. कुणी लाकडाचा गोळा फेकला , कुणी फळ फेकले. सम्राट पृथ्वीराजांनी बाणांनी त्याचा चुरा केला. सुलतान नकळतपणे " वाह वाह " म्हणाला आणि क्षणार्धात एक बाण त्याच्या गळ्याच्या आरपार गेला. सुलतान घोरी संपला. हिंदू राजा आंधळा झाला म्हणून त्याचा पराक्रम आंधळा होत नाही. " शंभूराजे बोट दाखवत म्हणाले.

तोशू हा सिन बघत असतानाच मेघा घाबरत किचनमध्ये आली. घाईत तिच्या हातून काचेचा ग्लास फुटला. पारितोष वळला.

" काकू , काय झाले ? खूप घाबरलेल्या वाटत आहात. " परितोषने लाईट चालू करत विचारले.

" वाईट स्वप्न पडले. काळी ऊर्जा आणि पांढरी ऊर्जा यात घनघोर युद्ध चालू होते. कुठूनतरी भारदस्त आवाज आला. जा तुझ्या पतिकडे म्हणून. " मेघा म्हणाली.

" तुम्ही पाणी प्या. उद्या मी राहतो हॉस्पिटलमध्ये. तुम्ही आराम करा. " पारितोष म्हणाला.

तेवढ्यात पारितोषला फोन आला. अमोलराव कोम्यातून बाहेर आले होते. डॉक्टरांनी लगेचच पारितोष आणि मेघाला बोलावले. ही बातमी ऐकून मेघाच्या आनंदाला पारावार उरला नाही. पारितोष आणि मेघा लगेच हॉस्पिटलमध्ये जाऊन अमोलरावांना भेटले. कृष्णाही लगेच पित्यास भेटण्यास दिल्लीकडे रवाना झाला. दुःखाचे सावट दूर झाले होते. हे सर्व स्वामींच्या कृपेने झाले म्हणून मेघाने कृष्णाचे लग्न अक्कलकोटला करायचे ठरवले.

◆◆◆

तिकडे गावात सर्व कारभार लक्ष्मीबाईंच्या हाती आला. फार शिकलेल्या नसल्या तरी नवीन गोष्टी त्या चटकन आत्मसात करत. अर्जुनरावांची भरभक्कम साथ होतीच. रामराव दिल्लीहून मुंबईत गेले. तिथे त्यांना विधानपरिषदचे तिकीट भेटले. मग प्रचार आणि साखर कारखाना यात इतके गुंतले की त्यांना गावाकडे यायला जमले नाही. गावात आल्यावर पुन्हा रुक्मिणीताईबद्दल आठवेल आणि त्रास होईल असेही वाटले. म्हणून रामरावांनी स्वतःला कामात झोकून दिले. त्याच कालावधीत लक्ष्मीबाईंनी गावाचा कायापालट करायचे ठरवले. सर्वात आधी लक्ष्मीबाईंनी शाळेला भेट दिली. गावात असलेली शाळा फार जुनी होती. छतावरून गळते पाणी पाहून लक्ष्मीबाईंना वाईट वाटले. सोबत मुख्याध्यापक आणि काही शिक्षक होते.

" सर , शाळा म्हणजे विद्येचे मंदिर. हे लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या. पैसे ग्रामपंचायत देईल. " लक्ष्मीबाई म्हणाल्या.

लगेचच त्यांनी ग्रामपंचायतीमधून शाळेच्या डागडुजीसाठी निधी उपलब्ध करून दिला. मग त्या दुसऱ्या वर्गात शिरल्या. तेथील बोर्डावर सुविचार लिहिलेला नव्हता.

" काय रे मुलांनो. सुविचार दिसत नाही बोर्डवर ?" लक्ष्मीबाईंनी विचारले.

" रोज सुविचार लिहिणारी मुलगी आज आली नाही." एक मुलगी म्हणाली.

" का ?" लक्ष्मीबाईंनी विचारले.

" तिची पाळी होती. म्हणून तिने परीक्षाही नाही दिल्या. " तीच मुलगी म्हणाली.

नंतर त्या मुलीला आपण काहीतरी चुकीचे बोललो असे वाटले की काय तिने स्वतःची जीभ चावली.

" सरपंचबाई , पुढे चला. " मुख्याध्यापक म्हणाले.

" पाळीमुळे मुली परीक्षा बुडवतात ?" लक्ष्मीबाईंना वाईट वाटले.

" सोडा ना मॅडम. मुलींचा प्रॉब्लेम. त्यांचे ते बघतील. " मुख्याध्यापक वाकडे तोंड करत म्हणाला.

" सर , पाळी येणे मुलींचा प्रॉब्लेम नसतो. ते तर निसर्गाने दिलेले नवनिर्मितीचे वरदान असते. तुम्ही शिक्षक असून असे कसे बोलू शकतात ? तिच्याजागी तुमची मुलगी असती तर ? " लक्ष्मीबाई जरा रागातच म्हणाल्या.

बाजूलाच एक महिला शिक्षिका उभी होती. या विषयावर बोलायला त्या आधी संकोचत होत्या पण नंतर लक्ष्मीबाईंनी बोलल्यामुळे त्यांनाही राहवले नाही.

" मॅडम , जर सॅनिटरी पॅड वेंडिंग मशिन आणि इंसिलेटर मशीन शाळेत आणल्या तर हा प्रश्न सुटू शकतो. " ती शिक्षिका म्हणाली.

" यावर अंमलबजावणी होईल. " लक्ष्मीबाई म्हणाल्या.

मग लक्ष्मीबाई दुसऱ्या वर्गात शिरल्या. तिथे तर एका मुलीला कान पकडून उभे राहण्याची शिक्षा झाली होती. लक्ष्मीबाई त्या गोंडस मुलीकडे बघत हसल्या.

" काय ग बाई , शिक्षा का केलीय तुला ?" लक्ष्मीबाईंनी विचारले.

" मी गप्पा मारत होते. मला अभ्यास आवडत नाही. शिक्षणामुळे काय होते ? माझी आई म्हणते नवरा चांगला , श्रीमंत असेल तर बाईचे नशीब उजडते. " ती मुलगी म्हणाली.

लक्ष्मीबाई हसल्या.

" मी गावच्या सरपंचाची बायको होते. दीडशे एकर शेती आहे मला. दागदागिने , भलामोठा वाडा. काहीच कमी नाही. तरीही मीनाक्षी मला सातवी पास म्हणून टोमणे मारते ना तेव्हा पाटलीण असल्याचा माज उतरतो. शिक बाई. नवरा लेकरे मित्रमैत्रीणी सर्वजण एक ना एक दिवशी सोडून जातात. पण शिक्षण कधीच साथ सोडत नाही. वाघिणीचे दूध असते शिक्षण. " लक्ष्मीबाई म्हणाल्या.

त्या मुलीने होकारार्थी मान हलवली.

गावात लक्ष्मीबाईंनी विकासकामांचा धडाका लावला. शाळेत संगणक आणायला लावले. रस्त्याचा , पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले.

एकेदिवशी शहरात महिला आयएएस ऑफीसरच्या ऑफिसमध्ये सर्व सरपंचांची मिटिंग होती. तिथे लक्ष्मीबाईंनी निर्भयपणे आपले मत मांडले. भ्रष्टाचारामुळे सरकारने विविध विकासयोजनेसाठी पाठवलेला निधी ग्रामपंचायतपर्यंत पोहोचतच नव्हता. हेच मत लक्ष्मीबाईंनी मांडले. महिला आयएएस ऑफिसरला लक्ष्मीबाईंच्या निर्भीड स्वभावाचे विलक्षण कौतुक वाटले. त्यांनी लक्ष्मीबाईंना घरी चहासाठी बोलावले.

@ मॅडमच्या घरी

" खरच तुम्ही आज मिटिंगमध्ये बोललात ते ऐकून धक्काच बसला. महिलांचे लोकशाहीत स्थान वाढावे म्हणून सरकारने पंचायतराजव्यवस्थेत तेहतीस टक्के आरक्षण दिले. पण काही नेते बायकांना कठपुतली बनवून स्वतःच कारभार हाकतात. तुम्हाला भाषण करताना पाहून तसे अजिबात वाटले नाही. बाकीच्या महिला सरपंचांनीही तुमचा आदर्श घ्यावा असे वाटते. " मॅडम म्हणाल्या.

" खरतर सुरुवातीला मलाही कठपुतली असल्यासारखेच वाटले. पण महादेवाच्या कृपेने आमच्या अहोंनी मला संधी आणि मोकळीक दिली. मग माझ्यात आत्मविश्वास आला. एक सांगू. लोकसभेतही महिलांना आरक्षण द्यायला हवे. प्रत्येक पक्षानेही तिकिटे वाटताना महिलांना आरक्षण द्यायला हवे. " लक्ष्मीबाई म्हणाल्या.

" खर आहे. महिला घर सांभाळतात तसेच देशही सांभाळू शकतात. " मॅडम म्हणाल्या.

" तुम्ही एवढ्या मोठ्या व्यक्ती असून मला चहा पाजवला त्यासाठी मनापासून आभार." लक्ष्मीबाईंनी आभार मानले.

" अहो आभार कसले ? उलट तुम्हीच श्रेष्ठ आहात. तुमच्याकडे डेमोक्रेटिक मॅनडेट आहे. " मॅडम म्हणाल्या.

" म्हणजे ?" लक्ष्मीबाईंनी विचारले.

" समजा एका बाईला दोन मुले आहेत. एका मुलाने लव्हमॅरेज केले आणि दुसऱ्याने आईच्या इच्छेप्रमाणे लग्न केले. मग घरात कोणत्या सुनेला सर्वात जास्त भाव असेल ?" मॅडमने विचारले.

" सासूने स्वतः पसंत केलेल्या सुनेला. " लक्ष्मीबाई चटकन म्हणाल्या.

" तसच लोकशाहीत लोकांकडून प्रत्यक्ष निवडून आलेल्यांना जास्त महत्व असते. अर्थविषयक बिल सर्वप्रथम लोकसभेत मांडले जातात. राज्यसभेत नाही. कारण लोकसभेत लोकांनी प्रत्यक्ष निवडलेले प्रतिनिधी असतात आणि राज्यसभेत अप्रत्यक्ष. " मॅडम म्हणाल्या.

लक्ष्मीबाईंना स्वतःबद्दल खूप अभिमानास्पद वाटले.

◆◆◆

तिकडे किंजल ब्रेकअपमुळे खूप नैराश्यात गेली होती. म्हणून ती मुंबईत शिफ्ट झाली. तोशूच्या आठवणी तिला खूप छळत. तिने तोशूसाठी एक कविता लिहिली.

जी तुझी होईल ना ती असेल भाग्यवान
त्या मुलीचे असेल तुझ्या हृदयात स्थान
ती घेईल तुझ्या त्या घट्ट मिठीत विसावा
तिचे कोमल हात तू तुझ्या हातात धरावा

जी तुझी होईल ना ती असेल भाग्यवान
तुझी साथी म्हणून तिलाच असेल मान
लोक तिलाच तुझ्या नावाने चिडवतील
तुझे नाव ऐकून तिचेच गाल लाजतील

जी तुझी होईल ना ती असेल भाग्यवान
तुझ्या शरीराचा फक्त तीच असेल प्राण
तिच्या काव्यांचा तूच असशील विषय
तुमच्या जोडीभवती प्रसिद्धीचे वलय

जी तुझी होईल ना ती असेल भाग्यवान
राजासंगे राजमहाली करेल ती प्रस्थान
तुझ्या राजस रुपाला असेल शोभणारी
जन्मभरी पुरेल इतके प्रेम उधळणारी

तुझे डोके मांडीवर टेकवूनी
केसांवरती हात ते फिरवुनी
चुंबनाचा वर्षाव तो करुनि
जग जिंकेल तुला जिंकुनी

तिच्या प्रेमामुळे जेव्हा तू होशील सुखी
तिचे नाव सतत येईल जेव्हा तुज मुखी
सख्या मलाही भेटेल रे खूप समाधान
जी तुझी होईल ना ती असेल खरच भाग्यवान !

~ किंजल ✍️

कविता संपताच किंजलच्या डोळ्यातून आसवे गळाली आणि कागद ओला झाला.

" तोशू , तू नशिबात नसला तरी हृदयात राहशील. "किंजल तोशूचा फोटो समोर ठेवत स्वतःशीच म्हणाली.

◆◆◆

इकडे नेहा आणि कृष्णाचे लग्न अक्कलकोटला करायचे ठरले. तोशूला बघून किंजलला त्रास होईल म्हणून कृष्णाने किंजलला आमंत्रण दिले नाही. कृष्णाची आई मेघा हिने मात्र आग्रहाने अभिमन्यूच्या पूर्ण कुटुंबाला बोलावले होते. अक्कलकोटचे सर्वात मोठे मंगल कार्यालय बुक झाले. खासदाराच्या मुलाचे आणि एका आमदाराच्या मुलीचे लग्न म्हणल्यावर गर्दीही प्रचंड होती. मीडिया , बरेचसे नेते-कलाकार मंडळीही आली होती. रामरावांनी पूर्ण गावाला निमंत्रण दिले होते. सर्वांच्याच घरी आहेर जाणार होते. तिथेच गरीब शेतकऱ्यांच्या पन्नास मुलींचे लग्नही रामराव आणि अमोलराव मिळून लावणार होते. पारितोष त्याच्या ताईच्या लग्नाची सर्व व्यवस्था स्वतःहून बघत होता.

" मला वाटले होते की खासदाराच्या मुलाचे लग्न सेव्हन स्टार हॉटेलमध्ये असेल. पण ते तर इथे खेड्यात लावले जात आहे. " मीनाक्षी सरपोतदार हिने टोमणा मारला.

" श्रीस्वामीसमर्थांच्या छायेखाली लग्न होत आहे हे सेव्हन स्टार हॉटेलमध्ये लग्न होण्यापेक्षाही चांगले आहे. नाही का ?" लक्ष्मीबाई म्हणाल्या.

कृष्णाला रामरावांशी महत्वाचे बोलायचे होते. किंजल आणि तोशूला एकत्र आणण्याचा तो शेवटचा प्रयत्न करणार होता. एका हॉलमध्ये त्याला रामराव जाताना दिसले. त्यामुळे तोही मागेमागे गेला. त्याला सोफ्यावर रामराव पाठ करून बसलेले दिसले. तो धीर एकवटत पुढे सरकला.

" सासरेबुवा , जोपर्यंत तुम्ही किंजलतोशूचे लग्न लावून देत नाही तोपर्यंत मी नेहासोबत लग्न करणार नाही. " कृष्णा म्हणाला.

तेव्हा समोर बसलेला व्यक्ती वळला. ते व्यक्ती रामराव नसून अमोलराव होते. अमोलराव रागाने लाल झाले.

" तुम्ही आम्हाला परत कोम्यात पाठवणार का लग्न मोडून ? लोकाघरची लेक नेहा तिच्या जीवनाचे वाटोळे करणार ? " अमोलराव ओरडले.

" सॉरी बाबा. आम्ही फक्त तोशू आणि किंजलला एक करण्याचा प्रयत्न करत होतो. आम्हाला मनापासून वाटते की सासरे रामरावांनीच ब्रेकअप घडवून आणले आहे. " कृष्णा म्हणाला.

" चांगले केले. पाटलांच्या घरात गुजराती सून शोभलीही नसती. " अमोलराव म्हणाले.

" तुमचे उपचार पण गुजराती डॉक्टरनेच केलेत म्हणलं. " कृष्णा म्हणाला.

तेवढ्यात अमोलरावांचा पीए धावत आला.

" साहेब , आनंदाची बातमी आहे. आदर्श सरपंचचा पुरस्कार.." पीए म्हणाला.

" कुण्या मर्दाला भेटला ?" अमोलरावांनी विचारले.

" मर्द नाही. मर्दालाही लाजवेल अशी कर्तृत्ववान स्त्री आहे. आपल्या कृष्णाबाबाची सासूबाई लक्ष्मीबाई. उद्या तुमच्या हातूनच भेटणारे पुरस्कार. " पीए आनंदाने म्हणाला.

" बघा बाबा. ज्या स्त्रीला तुम्ही गुंगी गुढीया म्हणून हिनवत होतास त्या स्त्रीला पुरस्कार भेटणारे तुमच्या हातून. आतातरी जुने विचार सोडा. स्वामींनी नवा जन्म दिलाय तसे नवे विचारही आत्मसात करा. " कृष्णा म्हणाला.

" बरोबर म्हणला तू. आजपासून खरच आम्ही माणुसकीने वागू. राजकारण कमी आणि समाजकारण जास्त करू. मी रामरावांशी बोलेल किंजलविषयी. " अमोलरावांनी कृष्णाला मिठी मारली.

इकडे नेहा तयार होत होती. तोशूने गिफ्ट केलेला ड्रेस तिने घातला. तोशू तिला पाहायला आला. नेहाच्या सर्व मैत्रीणी बाहेर गेल्या.

" ताई , सासरी गेल्यावर विसरू नको. सोबत फिरायला जायचे लक्षात आहे ना ?" तोशू हसत म्हणाला.

" हो. पण मला लग्न करण्याआधी एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. तोशू , किंजल बाबांमुळे तुला सोडून गेली. बाबांनीच तिला तसे करायला सांगितले होते. बाबांना वाटले की जर त्यांनी नकार दिला असता तर तू त्यांच्यापासून दूर झाला असता. बाबांना तुमच प्रकरण कळलं होतं. " नेहा म्हणाली.

" काय ? अरेरे. बाबांना असे कसे वाटले की नकार दिल्यावर मी दूर जाईल. पितापुत्राचे प्रेम इतके कमजोर तर नसते. असो. थँक्स ताई. तू मला सांगितले. म्हणजे किंजल निर्दोष होती आणि मी चुकीच्या व्यक्तीवर प्रेम नव्हते केले. " तोशू स्वतःचे पाणावलेले डोळे पुसत म्हणाला.

" तुला तिच्यावर विश्वास असायला हवा होता. मी बाबांना घाबरले म्हणून काही सांगू शकले नाही. " नेहा म्हणाली.

" मी तिला शेवटचे सॉरी म्हणतो. कदाचित तिला माझ्याहून चांगला कुणीतरी भेटेल. विश्वास ठेवणारा आणि गुजराती. मला मात्र खूप समाधान वाटते की माझं प्रेम खर ठरलं. " तोशू म्हणाला.

तोशू थोड्यावेळ एकांतात गेला. उरात भावनांचा कल्लोळ माजल्यावर लेखणीशिवाय पर्याय नसतो. तोशूने एक कविता लिहिली.

जो तुझा होईल तो असेल भाग्यवान
तुझ्या हृदयात केवळ त्यालाच स्थान
घेईल तो तुझ्या घट्ट मिठीत विसावा
तुझे कुंकू असेल त्याचाच तर नावा

जो तुझा होईल तो असेल भाग्यवान
तुझा नवरा म्हणुनी तया असेल मान
घालवेल तो तुझे गोड ते रुसवेफुगवे
नाव त्याचे जुळेल कायमचे तुजसवे

जो तुझा होईल तो असेल भाग्यवान
प्रेमरंगात रंगताना नसेल कसले भान
तुझ्या सुखी आयुष्याचे असेल कारण
जोडी शोभेल ती जैसी लक्ष्मीनारायण

राजकन्येचा तो असेल राजस राजकुमार
सुस्वभावी शांत देखणा आणि रुबाबदार
त्याला पाहताच जाईल तुझा सारा ताण
जो तुझा होईल तो असेल खरच भाग्यवान !

~ पारीतोष ✍️

◆◆◆

थोड्यावेळाने कृष्णा आणि नेहाने लग्नमंडपात एका रथातून प्रवेश केला. मग लग्नाच्या विधी सुरू झाल्या. कन्यादानची वेळ आली. रामराव तेव्हा उठले आणि माईक हातात घेतला. सर्वजण कुजबूज करू लागले. सर्वजण उठले.

" काय झाले रामराव ? कन्यादान म्हणजे पुण्याचे काम. उभे का राहिलात ?" अमोलरावांनी विचारले.

" मला काहीतरी बोलायचे आहे. कन्यादान पुण्यदान. पण मला हे पुण्य करण्यापूर्वी आयुष्यात केलेल्या पापांचा हिशोब मांडायचा आहे. पश्चताप करायचा आहे. मी रामराव पाटील. फार शिकलेलो नाही. राजकारणी आहे पण कधी कुणाचं वाईट केलं नाही.
माझी एक ताई होती. रुक्मिणी नाव होतं. शिकलेली डॉक्टर होती. एक गुन्हा केला तिने. नागराज मंजुळेसर म्हणतात ना हल्ली प्रेम करणेच विद्रोह झालाय. ताईनेही तोच गुन्हा केला. गुजराती मुलावर प्रेम केलं. पळून गेली. समाजाने खूप छळलं आम्हाला. माझे वडील त्या त्रासाने देवाघरी गेले. मी आयुष्यभर ताईला दोष दिला की तिच्यामुळे सर्व वाटोळे झाले. पण आम्हाला छळण्याचा अधिकार समाजाला कुणी दिला ? मुलगी पळाली हे निमित्त करून दंगली पेटवून स्वतःचे खिशे भरण्याचा हक्क तुम्हाला कुणी दिला ? शेवटी ताईचे जिवंतपणी श्राद्ध घालावे लागले. मग कुठे समाजाने स्वीकारलं. ताईने आत्महत्या केली. पण मी आत्महत्या मानत नाही. ताईला मी , तुम्ही , सर्वांनी मारलं. ही जातीव्यवस्था अजून किती जणांचा बळी घेणारे ? देश 1947 मध्ये इंग्रजांपासून स्वतंत्र झाला. पण जातीव्यवस्थेच्या नावाखाली प्रेमीयुगुलांचे रक्त सांडणाऱ्याकडून कधी स्वातंत्र्य भेटणार ? जयेशराव कुटुंबासहित वरती या." रामराव म्हणाले.

जयेश अभिमन्यू , उत्तरा आणि छोटी रुक्मिणी स्टेजवर आले.

" ताईच्या आत्म्याला तेव्हाच शांती भेटेल जेव्हा मी तिच्या कुटुंबाला स्वीकारेल. मी गावात ताईच्या नावाने हॉस्पिटल बांधणार. ते हॉस्पिटल गरिबांसाठी मोफत असेल. " रामराव म्हणाले.

रामरावांनी जयेशला मिठी मारली. अभिमन्यू आणि उत्तराने जयेशच्या इशाऱ्यावर रामराव आणि लक्ष्मीबाईंचे आशीर्वाद घेतले.

" सूनबाई , हे तुझे मामासासरे आणि मामीसासू. " जयेश म्हणाला.

" लक्ष्मी , ही आपली नात रुक्मिणी. " रामराव म्हणाले.

लक्ष्मीबाईंनी चटकन लहानग्या रुक्मिणीला कडेवर घेतले. नेहा आणि तोशूही रुक्मिणीजवळ आले.

" एक रुक्मिणी माझी आत्या होती आणि या दुसऱ्या गोड रुक्मिणीची मी आत्या असेल. " नेहा लाड करत म्हणाली.

" आणि मी काका. " तोशू अभिमन्यूला आलींगन देत म्हणाला.

" लक्ष्मी , सुरुवातीला मी सत्तेसाठी तुझा वापर केला. लोक माझे कान भरवत होते. पण अर्जुन रावांनी मला सर्व सत्य सांगितले. उद्या तुला आदर्श सरपंच पुरस्कार मिळेल. मला तुझा खरच खूप अभिमान वाटतो. " रामराव म्हणाले.

" तुमचा हात पाठिशी असेल ना तेव्हा मी जगही जिंकेल. " लक्ष्मीबाई म्हणाल्या.

" असे वाटत आहे एकता कपूरचे सिरीयल बघत आहे. " मेघा कृष्णाच्या कानात कुजबूजली.

" आपली कथा लिहिणारा सिरीयल खूप बघतो वाटत. " कृष्णा म्हणाला.

" रामराव , पाटील कुटुंब मिलाफ झाला असेल तर लग्न आटपून घेऊ. " अमोलराव म्हणाले.

" नाही. ही कथा साक्षगंधाने सुरु झाली ती साक्षगंधानेच संपेल. मी पारितोषसाठी मुलगी बघितली आहे. " रामराव म्हणाले.

" ऐका तर रामराव. " अमोलराव घाईत म्हणले.

" नाही अमोलराव. " रामराव म्हणाले.

" हे राम. " कृष्णा हळूच म्हणाला.

नेहाने रागात बघितले. तोशूने होकारार्थी मान हलवली आणि खाली मान टाकून उभा राहिला. मग स्टेजवर एक मुलगी उभी राहिली.

" मेव्हणे , चेहरा वर करून तर बघा. " कृष्णा म्हणाला.

तोशूने समोर बघितले तर समोर किंजल होती.

" मी स्वप्न तर बघत नाही ना ?" तोशू स्वतःशीच म्हणाला.

कृष्णाने त्याचा चिमटा काढला आणि तोशू जोरात ओरडला.

" काल स्वामींच्या दर्शनाला गेलो होतो. त्यांनी वाट दाखवली. " रामराव म्हणाले.

मग रामरावांनी नेहाचे कन्यादान केले. कृष्णा आणि नेहाचे लग्न संपन्न झाले. तिथेच तोशू आणि किंजलचा साक्षगंधही झाला.

" मी काय म्हणते. नाव. " मेघा म्हणाली.

" तुम्हाला पूर्ण कथेत नवरीचे नाव बदला एवढाच डायलॉग आहे का ? किंजलने नेहाचे नाव बदलू दिले नाही. स्वतःचे काय बदलेल. " अमोलराव म्हणाले.

" नाव म्हणजे उखाणा म्हणत होते. " मेघा अमोलरावांना लाथ हाणत म्हणाली.

" कवीची बायको आहेस. घे एक उखाणा. " तोशू कानात कुजबूजला.

" पाटलांच्या पारितोषसवे गुजराती किंजलचे जुळले बंध
अक्कलकोटमुक्कामी स्वामींच्या कृपाछायेत घडला साक्षगंध ! " किंजल म्हणाली.

ए पोरी, अग ए छोरी
कुठं निघालीस तुरुतुरु
अशी नको जाऊ रुसून
आता दे ना गोड हसून
मिठी मिठी बासुंदी देशील ना
पाटलीण तू माझी होशील ना...!

किंजू बेबी.. किंजू बेबी...
किंजू बेबी... अग बोल ना..!
पाटलीण तू माझी होशील ना...!


आईची लाडाची होणार तू सून
तुझ्यासाठी तोडून आणेल... ताऱ्यांसोबत मून
प्रेमाने जिंकशील तू बाबांच मन
त्यांचा नसेल राग ना तुझ्यावर कुणबुन
आता नको ना ग जाऊ सोडून
नको नकाराची लावू भुनभुन

सून सून सून किंजू बेबी सून सून सून
किंजू बेबी ... किंजू बेबी...
किंजू बेबी... अग बोलना..!
पाटलीण तू माझी होशील ना...!

तुझी हरणीची चाल न्यारी
कसला तुझा सेन्स भारी
संकटी मला तूच तर तारी
डोई ग तुझ्या घोडे स्वारी
किंजू बेबी माझी जगात भारी
स्वागत तुझं करीन वाजवून तुतारी


किंजू बेबी.. किंजू बेबी...
किंजू बेबी... अग बोलना..!
पाटलीण तू माझी होशील ना...!

वाट पाहतोय तुझी पाटलांचा वाडा
नको ना घालू तू आता रुसून राडा
ओढू संसाराचा दोघ मिळून गाडा
उजळू गाव सारा, पुढं नेऊ पाडा
लग्नाचं इलेक्शनला नको घालूस खोडा
आबांना सांगतो आजच तिकीट काडा

किंजू बेबी.. किंजू बेबी...
किंजू बेबी... अग बोलना..!
पाटलीण तू माझी होशील ना...!

पाटलीण तू माझी होशील ना...!
दिलावर राज्य तू करशील ना...!
अग बोल ना ग...!

( पहिल्या दोन कविता मी आणि शेवटचे गाणे श्रीसंध्या भगत मॅडम यांनी लिहिले आहे.
कथा श्रीस्वामी समर्थांच्या चरणी अर्पण..? )


समाप्त








🎭 Series Post

View all