Login

सख्या तू पैलतिरी भाग छत्तीस ( अकल्पनीय कलाटणी)

एका मुलीची कथा


सख्या तू पैलतिरी भाग छत्तीस
मागील भागावरून पुढे…

काव्याला सकाळी उठल्यावर कालची रात्र एक स्वप्नच वाटत होतं. हर्षाने विचारलं

"काव्या काय झालं? झोप झाली नं?"हर्षा

"हर्षा कालची रात्र म्हणजे मला एक स्वप्न वाटतंय." काव्या

"का?" हर्षा

"अगं आयुष्यात मी कधी असं कोणत्या माणसाशी…नाही नाही कोणत्या तरी आत्म्याशी बोलेन अशी कल्पनाच केली नव्हती." काव्या

"मलासुद्धा कुठे वाटलं होतं की मी अशी कोणाशी म्हणजे गेलेल्या माणसाशी बोलेन. जो माझा नवराच असेल." हर्षा

"विपूलला भेटणं ही गोष्ट खूपच गुंतागुंतीची वाटतेय.यावर विश्वास कसा ठेवायचा हा मनाला प्रश्न पडतो." काव्या

"हो. पहिल्यांदा विपूलचा आवाज आला तेव्हा माझी घाबरगुंडी उडाली होती. मी मला काय वाटतंय हे व्यक्तच करू शकत नव्हते. आई बाबांना सांगायचा प्रश्नच येत नव्हता. विपूलच्या बाबांची समजूत पटेल अशी उत्तरं देता देता माझी त्रेधातिरपिट उडाली होती."

"खरच ग आता मला तुझी अवस्था कळतेय.मी तुला म्हणायचे न घाबरता बोल आणि काल माझीच घाबरगुंडी उडाली. हर्षा मला विपूलचं म्हणणं पटलंय." काव्या

" कोणतं म्हणणं?" हर्षा

" तू तुझ्या आयुष्यातून विपूल वजा कर.तरच तो मुक्त होईल." काव्या

" हे मला कळतंय आणि मला पटलं आहे पण माझ्या मनाची समजूत पटायला वेळ लागेल." हर्षा

" हे मला कळतंय विपूललापण कळतंय. विपूलचं आणि माझं एवढंच सांगणं आहे की लवकर मनाची समजूत पटव. त्यात फार काळ घालवू नको."

"हो.मला हे जमवायला हवं.काव्या लगेच दुसऱ्या लग्नाचा नाही ग विचार करू शकणार" हर्षा

"तुला जेव्हा दुसरं लग्नं करायची इच्छा होईल तेव्हा कर पण विपूलचा विचार मनातून काढ असंच म्हणीन कारण ते केल्याशिवाय तुझ्या मनात दुस-या लग्नाचे विचार येणार नाही." काव्या.

" हो तू म्हणतेस तसच करीन.आता ऑफीसमध्ये जायची तयारी करायला हवी." हर्षा

" हो.चल." काव्या

***

हर्षा आणि काव्या आपलं आवरून खोलीबाहेर आल्या. दिनकर समोरच्या खोलीत पेपर वाचत असतो. हर्षा आणि काव्याला बघून म्हणाला

" शुभ सकाळ हर्षा आणि काव्या. चहा घ्या दोघी मग निघा ऑफीसमध्ये जायला." दिनकर

" हो बाबा चहा घेऊन लगेच निघतो.काल गप्पांमध्ये एवढा वेळ गेला की आज उठायला उशीरच झाला." हर्षा

" डबा घेऊन जा दोघी." दिनकर

" बाबा डबा नको आम्ही कॅन्टीन मध्ये खाऊ." हर्षा

"हर्षा तुमच्या दोघींसाठी डबा दिलाय. सुमनताईंनी आणून ठेवला आहे इथे टेबलवर. घे." दिनकर हर्षाला टेबलवर डबा दाखवत म्हणाला.

दिनकरच्या या अगत्याने काव्या भारावून गेली. मनात म्हणाली असे सासरे हवे.

हर्षा आणि काव्या दोघी आपापल्या गाड्या घेऊन ऑफीसच्या रस्त्याने निघाल्या.त्यांना जाताना बघून संध्याने नाक मुरडले. काव्याला दिनकर ने एवढं अगत्य दाखवलं ते संध्याला फारसं आवडलं नाही.

***

विपूल एकटाच हर्षाच्या खोलीत होता.त्याला आता हर्षाच्या खोलीत राहणं वेगळच वाटू लागलं होतं. हर्षा नसेल तर त्याचं अस्तीत्व म्हणजे तो हवेत विरघळून गेलेली आकृती होता.

***

साधनाचे दिवस भरत आले होते.आता घरातील सगळ्यांचं लक्ष फक्त साधना आणि येणा-या तिच्या बाळाकडे होतं.

" साधना आता तुझी बाळंत व्हायची वेळ जवळ येत चालली आहे. जरा जपून रहा." मंगलाताई

" हो आई.मी व्यवस्थित काळजी घेते आहे. कधी कधी खूप कंटाळा येतो.काहीच करावसं वाटतं नाही. चालताना पायावर ओझं आल्यासारखं वाटतं." साधना

"अगं ते आता होणारच. नववा महिना अर्धा संपला. आता थोडे दिवस कळ काढा. चालल्याने त्रास होतो म्हणून चालायचं नाही असं करायचं नाही.आता योगापण करते आहेस.त्या सगळ्यांचा फायदा बाळंतपण व्यवस्थित व्हायला मदत होईल.


"आई आज मला दवाखान्यात जायचयं.भरत लवकर येणार आहे." साधना

"होका.आता एकदिवसा आड बोलवतात आहे नं?"

" हो. मला लवकर बाळाने या जगात पाऊल ठेवावं असं वाटतंय." साधना

" येईल.बाळाची जी तारीख देवानं ठरवली असेल त्याच तारखेला तो जीव या जगात येईल.तू काळजी करू नकोस.काळजी घे." मंगलाताई


**

हर्षा काम करत होती पण तिच्या डोक्यात सारखे विपूल आणि काव्याचं बोलणं फिरत होतं. तिलाही दोघांचं म्हणणं पटलं. नव्या संसाराची स्वप्नं बघण्याची हिम्मत अजून तिच्यात आलेली नव्हती. पण ती लवकर मनाची तयारी करणार होती.

आज नेहमीपेक्षा हर्षाच्या कामाची गती खूपच स्लो होती. काव्याचं मधून मधून हर्षा कडे लक्ष जात होतं. काव्याच्याही लक्षात आलं की कालची चर्चा हर्षाला आठवत असावी.

काव्याला विपूलची भेट म्हणजे स्वप्नच वाटतं होतं. असा प्रसंग आजपर्यंत तिच्या आयुष्यात आला नव्हता. हर्षाचा नवरा होता म्हणून काव्याने इतकी हिम्मत तरी केली. काव्याला विपूलचा समजूतदारपणा आवडला. एवढं बायकोला समजून घेणारा नवरा ज्या मुलीला लाभला त्या मुलीचं भाग्य थोर असंच म्हणायला हवा

काव्याच्या दृष्टीने हर्षा भाग्यवान आहे पण आता उपयोग नाही कारण विपूलच नाही. बिच्चारी हर्षा. काव्याला मनातून उमाळा आला.

***

साधनाच्या अचानक पोटात दुखायला लागल्यामुळे तिला दवाखान्यात घेऊन जायला भरतने गाडी काढली. साधनाला दोन दिवसांपासुन जरा अस्वस्थ वाटत होतं. बारीक कळा येत होत्या म्हणून भरत घरीच थांबलेला होता. घरूनच तो दुकानाचं काम सांभाळायचा.

साधनाला दवाखान्यात पोचेपर्यंत कळा वाढायला लागल्या होत्या. तिच्या बाजूला नित्या वहिनी तिचा हात हातात घेऊन हळूवारपणे थोपटत होत्या. मंगलताई गाडीत समोर बसल्या होत्या.

"साधना दीर्घ श्वास घे. ओरडू नको. तू थकशील. बस्स थोडसं सहन कर." नित्या वहिनी

नित्या वहिनी साधनाला सारखा धीर देत होत्या. साधनाच्या कळा वाढल्या होत्या पण रस्त्यावरची गर्दी फारच धिम्या गतीने पुढे सरकत होती. मध्ये मध्ये ट्रॅफिक सिग्नल मुळे थांबावं लागतं होतं.

या सगळ्यामुळे सगळ्यांची मनातून चिडचीड होत होती. साधनाला मात्र कळा येत असल्याने बाहेरची गर्दी,गोंधळ जाणवला नव्हता.

कसेबसे सगळे दवाखान्यात पोचले. हळूच साधनाला नित्या वहिनींनी गाडीतून उतरवले. साधनाला नित्या वहिनी आणि मंगलाताई हळूहळू दवाखान्याच्या पाय-या चढून वर घेऊन गेल्या. सिस्टरने लगेच साधनाला व्हिलचेअरवर बसवून डाॅक्टरांच्या केबिनमध्ये नेलं.

भरत एव्हाना गाडी पार्क करून दवाखान्यात शिरला.

बराच वेळ झाला होता साधनाला लेबर रूममध्ये नेऊन. भरत, नित्या वहिनी आणि मंगलाताई काय बातमी येते हे ऐकण्यासाठी आतूर झाले होते.

ब-याच वेळाने बाळाच्या रडण्याचा आवाज आला. तो आवाज ऐकून सगळ्यांच्या अंगावर रोमांच उठले.

भरतच्या डोळ्यातून आनंदाश्रू घळघळ वाहू लागले. मंगलताईंनी भरतच्या पाठीवर थोपटून भरतचं अभिनंदन केलं.


"भरत खूष आहेस नं! खूप अभिनंदन." मंगलताई

"आई एका क्षणी वाटलं होतं की मी आयुष्यात कधी बाप होऊ शकेन की नाही." भरतच्या डोळ्यातून पाण्याच्या अखंड धारा लागल्या होत्या.

"भरत हर्षाला आणि साधनाच्या आईवडिलांना कळव." मंगलताई.

"हो कळवतो." भरत

" भरत आता खूप आनंद आपल्या घरी आला आहे. त्याचं स्वागत दणक्यात करू या." नित्या वहिनी.

बाळाला अजून बाहेर आणलं नव्हतं.भरत, नित्या वहिनी आणि मंगलताई सगळे आनंदाच्या लहरींवर हिंदोळे घेत होते.
____________________________
क्रमशः सख्या तू पैलतिरी
लेखिका…मीनाक्षी वैद्य