सख्या तू पैलतिरी भाग अठरावा

एका मुलीची कथा


नमस्कार वाचकहो…
माझ्या \"सख्या तू पैलतिरी\" या कथामालिकेचा प्रत्येक भाग आता दर दोन दिवसांनी प्रकाशीत होईल. वाचकांनी हा बदल लक्षात घ्यावा आणि दोन दिवसांची गॅप पडली तरी त्याच उत्साहाने कथा मालिका वाचावी ही विनंती.
धन्यवाद.
लेखिका. मीनाक्षी वैद्य.

सख्या तू पैलतिरी भाग अठरावा
मागील भागावरून पुढे

" लागला फोन" वासंती नी या काही सेकंदात दोनदा हर्षाला विचारलं असेल.

" आई जरा धीर धर."

"फोन का उचलत नाही तो?"

"अगं उचलेल.फोनपासून लांब असेल तर त्याला वेळ लागला असेल फोन घ्यायला."
हर्षा त्रासिक चेहरा करून बोलली.

"आत्ताच का एवढा वेळ लावतोय फोन उचलायला?"

" अगं त्याला कल्पना असेल का आपण आत्ताच लगेच फोन करू? का एवढी हायपर होते आहे?"

" तुला जर मुलगी झाली आणि ती जेव्हा लग्नाची होईल तेव्हा तुला कळेल?"

" अगं आधी माझ्या लग्नाच्या गोष्टी ठरू दे.माझं लग्नं होऊ दे.मग मला मुलगी झाली तर तिच्या लग्नाची वेळ येईल नं?"
" गप्प बसा दोघी सारख्या वाद घालू नका."
तेवढ्यात विपूलनी फोन उचलला

"हॅलो हर्षा बोल काय म्हणतेस?"

"अरे विपूल बाबांना तुझ्याशी बोलायचं "

"हो का मग दे न फोन बाबांना"

हर्षा श्रीकांतला फोन देते हर्षाची आई म्हणजे वासंती उत्सुकतेने बघत असते ती लगेच म्हणते
" फोन स्पीकर वर ठेवा."
" बरं." म्हणत श्रीकांत फोन स्पीकर वर ठेवतो.

" विपूल मी हर्षाचा बाबा बोलतोय."

"बोला नं काका.कालचं नाटक कसं वाटलं.?"

"मला आवडलं.प्रशांत दामले माझा आवडता नट आहे."

"अहो शिळोप्याच्या गप्पा काय मारता मूळ मुद्द्यावर या."

हे विपूलला फोनवर ऐकू जातं त्याला हसू येतं

"हो विचारतो आहे.विपूल मला असं विचारायचं आहे की तुमची आणि हर्षाची एकमेकांशी कधी ओळख झाली?"

"झाले असतील सहा महिने."

"तुम्हाला तिच्याशी लग्न करायचं आहे की नुसतंच फिरवायचं आहे सरळ विचारतो."

"अहो बाबा हे काहीतरी काय विचारता ?"

"तू गप्प बस बरोबर विचारतात आहे."

विपुल हे सगळं ऐकून हसू लागला.

"मी काय विचारतोय तुम्हाला कळलं नं."

"हो काका मला कळलं. मला हर्षाशी लग्न करायचं आहे."

"तुमच्या वडिलांशी तुम्ही बोललात का याबद्दल."

हो.बाबांची हर्षाशी ओळखपण झाली आहे.ती त्यांना सून म्हणून आवडली आहे."

"काय…अगं हर्षा हे काय म्हणतात आहे तुला त्याच्या वडिलांनी बघीतलं आहे. त्यांना तू पसंत आहे."

"काय हा काय वात्रटपणा आहे हर्षा" वासंतीने विचारलं

"हे कधी झालं? तू सांगीतलं नाहीस आम्हाला."श्रीकांत म्हणाला.

"तुम्हाला माझ्याशी वाद घालायचा असेल तर फोन बंद करा.सगळं त्याला ऐकू जातंय."

"जाऊदे ऐकायला.आम्ही मुलींचे आईबाप आहोत. ही काळजी वाटणारच."

हर्षा घाईघाईने फोन बंद करते.

"बाबा फोन चालू ठेऊन तुम्ही कसले वाद घालता?"

"तुला त्याच्या वडिलांनी बघीतले तुला पसंत केलं हे आम्हाला माहीत नाही. मग आता तरी कशाला त्याला भेटवलस सरळ लग्न करूनच यायचं होतं."
वासंती करवादून बोलली.

"अरे देवा आई किती गैरसमज करून घेते.त्याच्या वडिलांनी मला बघीतले तेव्हा आम्ही दोघं फक्त त्याच्या जीजूला भेटायला गेलो होतो.जे काल नाटकाला आले होते. जीजूंशी माझी ओळख झाली होती. त्या दिवशी त्याचे वडील अचानक आले. मग माझी त्यांच्याशी ओळख झाली. मीही सुरवातीला बुजले.पण त्याच्या बाबांनी गमतीशीर बोलून मला रिलॅक्स केलं. नंतर मला वाटलच नाही आपण पहिल्यांदा भेटतोय."

"पहिल्या भेटीत सगळेच छान वाटतात." वासंतीचं ठरलेलं वाक्य ती बोलली.

"तुम्ही त्यांच्याशी बोला बाबा."

"हो बोलणारच आहे त्यांना भेटावपण लागेल. त्यांची माहिती काढावी लागेल."

"चहा पोहे करून भेटतात तसं भेटायचं?"हर्षानी विचारलं.

"मग नाहीतर काय ते घरी आल्यावर त्यांना तसंच पाठवायचा?"

"तुम्ही दोघी आता वाद घालू नका. हर्षा पुन्हा फोन लाव विपूलला त्यांच्या वडिलांशी बोलतो मी."

"हो लावते. हर्षा विपूलला फोन लावते. विपूल फोन उचलतो.

"विपूल तुझे बाबा आहेत का घरी त्यांच्याशी माझ्या बाबांना बोलायचय."

"हो आहेत.एक मिनीटे देतो."
विपूलचे बाबा फोन घेतात.
"हॅलो.बोल हर्षा"

"बाबा तुमच्याशी माझ्या बाबांना बोलायचय."
"हो दे नं."
"घ्या बाबा." हर्षा श्रीकांतला फोन देते.

"हॅलो मी हर्षाचा बाबा बोलतोय. तुम्हाला वेळ आहे नं"

"हो मला वेळ आहे बोला."

"हर्षा म्हणतेय तुमचा मुलगा विपूल तिला आवडतो व तिला त्याच्याशी लग्न करायचं आहे."

"मला विपूल नी सांगीतलं आहे."

"तुम्ही आमच्या हर्षाला बघीतले आहे."

"हो."

"तुम्हाला हर्षा पसंत आहे असं ती म्हणाली"

"हो.तुमची हर्षा गुणी मुलगी आहे."

"बघण्याचा कार्यक्रम कधी करायचा?"

"तुम्ही ठरवा तुमच्या सोयींनी मी रिटायर्ड माणूस आहे."

"मीही रिटायर्ड आहे."

"आपल्या दोघांपेक्षा विपूल आणि हर्षाला जेव्हा सुट्टी असेल तेव्हा आपण बघण्याचा कार्यक्रम करू." दिनकर म्हणाला.

"चालेल.तसच करू."

"खरंतर दोघंही एकमेकांना छान ओळखतात. आपण मोठी मंडळींनी एकदा भेटायला हवं."

"बरोबर आहे तुमचं.हर्षा आमची एकुलती एक मुलगी आहे. आम्ही खाऊन पिऊन सुखी आहोत. तुमच्या काय अपेक्षा आहेत?"

"अहो दोघं लग्नाला तयार आहेत मग आणखी अपेक्षा कुठल्या असणार?"

"ठीक आहे या दोघांनी तारीख ठरवली की भेटू.

"नक्की. ठेऊ फोन"
"हो."

***
हर्षा आणि विपूलच्या सोयीनी शनिवारी बघण्याचा कार्यक्रम ठरला. दिनकरनी तसं घरात सांगीतलं तशी संध्या चिडली.

"विपूललनी ठरवलं स्वतःचं लग्न?"

\"काय हरकत आहे. दोघ नेहमी भेटतात त्यामुळे दोघांच्या लक्षात आलं की आपण लग्न करायला हवं."

"आहाहा असं ठरतं का लग्नं!\"
"मग कसं ठरतं?"

"मोठ्यांची काही भूमिका असते की नाही?\"

"आता आपण जाणारच आहोत नं हर्षाच्या घरी.\"

"सगळं ठरल्यावर दाखवण्यापुरतं आपलं महत्व आहे का ?\"

"अगं त्या लोकांना पण या आठवड्यातच कळलय मलातरी आधी कळलं होतं."

"काय !" संध्या ओरडते तिला धक्का बसतो.

"तुम्हाला कसं आधी कळलं?"

संध्याच्या या प्रश्नानी दिनकर गडबडला.पण आता अनवधानाने बोलूनच गेलो आहे तर सांगूनही देऊ म्हणून दिनकर म्हणाला

"काही दिवसांपूर्वी विपूलनी माझी आणि हर्षाची भेट घडवून दिली."

"ठरवून भेटवलं न?"

"नाही. हर्षा छान मुलगी आहे."

"कळलं तुम्हाला थोड्याच वेळात!"

"माणूस जेव्हा बोलतो त्यांचं वेळी कळतं त्याच्या बोलण्यावरून.जवळपास अर्धातास बोलत होतो आम्ही चौघं."

"कोण चौघं?"

"मी विपूल हर्षा आणि भरत."

"काय भरत पण होता? मग मला आणि साधनाला का सांगीतलं नाही?

"तुझा प्रत्येक गोष्टीला नकार घंटा असते म्हणून सांगीतलं नाही."

"अच्छा वाईट गोष्टीला वाईट म्हटलं की माझी नकार घंटा लागते का?

"तुला जे समजायचं ते समज. पण मला सांग तुला सांगूनही तू मोकळेपणाने हर्षाला भेटली असती का?"

" अरेवा! ज्या मुलीबद्दल काहीच माहिती नाही अश्या मुलीला मी भेटायला जाऊ?"

" तेच म्हणतोय मी.विपूल कोणत्या मुलीला भेटवतो आहे हे तिला भेटल्यावर ठरवू असं मनात आणून तू गेली असतीस का? नसती गेलीस कारण जिथे तिथे तुझा अहंकार आडवा येतो."

" लग्नं ही काय गमतीची गोष्ट आहे.त्यासाठी जर मुलगी बघायला जाणार तर विचार नको करायला? विपूलला ती मुलगी आवडते एवढं पुरेसं आहे का?"

" लग्नं विपूलला करायचं आहे.मग जी मुलगी त्याला आवडेल तिच्याशीच लग्न करून दिलं तर तो सुखी राहील नं?"

" ते मला काही माहित नाही.स्थळ योग्य पद्धतीनं आपल्यापर्यंत यायला हवं होतं."

" आता त्यांच्याकडे जाण्याचा दिवस ठरला आहे.तुला यायचं असेल तर ये.जरी नसेल यायचं तरी चालावं लागेल.त्यांच्या घरी तू काही वेडंवाकडं बोललेलं मला चालणार नाही.कळलं?"
संध्यानी नाक मुरडलं.


संध्याला सगळं टप्याटप्याने व्हायला हवं होतं
मुलीकडचे फोन करतील, फोटो पत्रीका पाठवतील, आपल्या अपेक्षा विचारतील, आमचे गुरूजी पत्रीका जुळते आहे की नाही हे सांगतील त्यानंतर आपण त्यांना हो की नाही ते कळवायचं. हे असं न होता विपूल नी सरळ लग्नं ठरवलं. तिचा मान राहिला नाही याचा तिला राग आला.
***
दिनकर नी संध्याकडे फारसं लक्ष दिलं नाही.त्याने भरतला फोन लावला.
" हॅलो. बोला बाबा "
" अरे परवा शनिवारी हर्षाच्या घरी जायचंय आपल्याला.साधनालापण घेऊन ये."
"विपूलच्या लग्नाची गाडी पुढे सरकली." हे बोलून भरत हसतो.

" विपूल तुला हर्षाच्या घरचा पत्ता पाठवेल."

" ठीक आहे.बाकी ठीक आहे नं ? आईसाहेब काय म्हणाल्या?"

" ती काय म्हणणार. त्यांच्याकडे शांत बसायचं अशी तंबी दिली आहे.बघू.काही काही माणसं आपला गुणधर्म सोडत नाही." दिनकर हसला.त्यावर भारतही हसला.

" फोन ठेवतो."
" हो."
दोघांनीही फोन ठेवले.आता परवाची मिटींग फायनल करायचीच हे दिनकरनी मनाशी ठरवलं.
—-----------------------------------------------
क्रमशः पुढे काय झालं ते वाचा पुढील भागात
सख्या तू पैलतिरी भाग अठरावा
लेखिका…मीनाक्षी वैद्य.

🎭 Series Post

View all