सख्या तू पैलतिरी भाग चौतीस

एका मुलीची कथा आहे.
सख्या तू पैलतिरी भाग चौतीस
मागील भागावरून पुढे…

दुसऱ्या दिवशी सकाळी विपुलने हर्षाला उठवलं

"\"गुड मॉर्निंग हर्षु राणी सकाळ झाली उठा."

हर्षा दचकून जागी झाली आणि विपुलला समोर पाहून मस्त स्माईल तिच्या चेहर्‍यावर आलं. तीउठून बसली. हर्षाने विचारलं.

"विपूल तू कसा काय इतक्या लवकर उठलास? तुला तर नेहमी उठावावं लागायचं?" हर्षा

यावर विपुल हसायला लागला आणि म्हणाला

"अगं बाई मी आता कुठे जिवंत आहे? मला दिवस-रात्र सगळं सारखंच असतं. मला झोप वगैरे नाहीये. मी माणूस नाही."

हर्षाला काहीच समजेना.तिने विचारलं

" तू मला दिसतोस, माझ्याशी बोलतोस,माझ्याशी बोलतो तरी तू थकत नाहीस? तुला झोप येत नाही?


यावर विपुल तिला म्हणतो

"अगं मला शरीरच नाही. मग मी काम करेन कसा? माणसां सारखा मी काम करत नाही म्हणून मी थकत नाही. म्हणून मला झोप येत नाही. पण तू माझ्यात गुंतून पडली आहेस म्हणून मी तुला दिसतो म्हणून मी तुझ्याशी बोलतोय."

यावर हर्ष त्याला म्हणाली

"विपूल जर आई-बाबा किंवा माझी मैत्रीण काव्या यांना तुला भेटायचं असेल, तुझ्याशी बोलायचं असेल तर तू बोलू शकशील?" हर्षा


यावर विपुल म्हणतो

"हे बघ त्यांना जर मला मनापासून भेटावसं वाटलं तरच मी भेटू शकतो. तू आईला मात्र काही सांगू नको."

" का? विपुल त्यांचं खूप जास्त दुःखी आहेत तुझ्या जाण्याने. त्यांना किती आनंद होईल जर तू त्यांना दिसलास तर !"


"अग बाई पण तुला आईचा स्वभाव माहिती आहे ना! उगीच चार चौघात ती बोलत बसेल आणि नको त्या भानगडी होतील. त्यापेक्षा अजिबात काही सांगू नकोस आईला."

" नाही सांगणार मग बाबांना पण नको सांगू?"

"नाही. हर्षा नवीन घरात लवकरात लवकर जाण्याचा प्रयत्न कर."

हर्षा म्हणते

"मी तेच बघते आहे. लवकरात लवकर जायचं."

त्यावर विपूल तिला म्हणतो

"हे बघ उद्याच बाबांशी बोल. त्या घराची वास्तुशांत लवकर ठरव. मला त्या घरात यायचं आहे. त्या घरात तू आली आलीस ना की मी कितीही वेळ तुझ्याशी बोलू शकतो."


हर्षा "ठीक आहे. बोलते बाबांशी."असं म्हणून ऑफिसला जायची तयारी करायला लागते.

***

ऑफिसची तयारी करून हर्षा समोरच्या खोलीत येते आणि दिनकरला हाक मारते

"बाबा जरा पाच मिनिटे वेळ आहे का? मला तुमच्याशी बोलायचं आहे."

तेव्हा दिनकर म्हणतो

"बोल ना गं काय काम आहे? आज तुला बरं वाटतंय ना?"

"हो बाबा. आज एकदम छान वाटतं आहे. मला काल खूप मस्त झोप लागली."

" अरे वा! छान झालं की. काय काम आहे तुला?"

हर्ष विचारते "बाबा आपल्या नवीन घराचा वास्तू कधी करायचा? जितक्या लवकर होईल तेवढे मला हवाय."

"एवढी घाई का झाली?"

" तुमचं बोलणं मला पटलं. मला आता त्या नवीन घरात लवकर जायला हवं."

हर्षाला काय म्हणायचं ते दिनकरला कळतं आणि तो म्हणतो


"हर्षा काळजी करू नकोस. मी उद्याच आपल्या नेहमीच्या गुरुजींना फोन करून वास्तूच्या तारखा विचारतो."

हर्षा त्याला म्हणते "

"बाबा मला खूप माणसांना काही बोलायचं नाहीये. आपले नातेवाईक म्हणजे आपण आणि साधना ताईं कडचे, माझ्या माहेरचे, आणि ऑफिसचे काही. एवढेच आपल्याला बोलवायचं आहे. शक्यतो रविवार बघितला तर दुपारी सगळ्यांना बोलता येईल."

यावर दिनकर म्हणतो

"ठीक आहे काही काळजी करू नकोस."

हर्षा म्हणते.

"बाबा गुरुजींना वास्तूपूजेचं सगळं सामान आणायला सांगा. त्याचा जो खर्च येईल तो आपण देऊ. तुम्ही आता सगळी धावपळ करू नका. मी देईन सगळा खर्च."

यावर दिनकर तिला म्हणतो

"अगं तू माझ्या मुलीसारखीच आहेस ना मग तो खर्च मी करायला काय हरकत आहे?"


हर्षा हो म्हणून ऑफिसला जायला निघते.

***

ऑफिसला पोहोचल्या पोहोचल्या हर्षा काव्याला कालच्या गोष्टीची माहिती देते. तिला सांगते

"मी डोळे मिटले त्या बरोबर विपूल माझ्यासमोर प्रकट झाला आणि मग मी त्याच्याशी खूप बोलले. त्याला आता नवीन घरात जायची इच्छा आहे म्हणून मी वास्तूचं लवकरात लवकर बघा म्हणून बाबांना सांगितलेलं आहे."

हा हर्षाचा मेसेज वाचल्याबरोबर काव्या हर्षाच्या डेस्कपर्यंत येते आणि म्हणते

"मी तुला म्हटलं होतं नं तू त्याच्याशी बोलली तर तुला कळेल तो खरच विपुल आहे की नाही! तुझी कोणीतरी मस्करी करत आहे का? तू धीटपणा केल्यामुळे बघ आता विपुलशी तुझं छान बोलणं झालं की नाही ?आता तू काळजी करू नकोस. त्या नवीन घरात गेलीस की तुला एकटे वाटणार नाही. कारण विपुल सतत तुझ्यासमोर असेल."

मग हर्षा म्हणते

"मी विपुल ला विचारलं की तू माझ्या मैत्रिणीला आई-बाबांना भेटशील का? तर तो म्हणाला की ज्यांना मला मनापासून भेटावसं वाटत असेल त्यांनाच मी भेटेन असं म्हणाला. तू भेटशील का
काव्या विपुलला?"

हे हर्षाने विचारलं त्या बरोबर काव्या जरा थोडा वेळ दचकली मग भांबावली. काय उत्तर द्यावं तिला कळेना. ती म्हणाली

"हर्षा विचार करते ग. असं जिवंत नसलेल्या माणसाला समोर भेटायचं म्हणजे मला कसंतरीच वाटतंय."

त्यावर हर्ष हसायला लागली व म्हणाली

" अगं तू ओळखतेस नं विपूलला?"हर्षा

"अगं हो ओळखते,मी त्याच्याशी बोलले पण तो जीवंत होता तेव्हा." काव्या

" अगं तो जीवंत नसला तरी तो पूर्वीसारखाच दिसतो. सिनेमात असतो तसा सापळा नाही दिसत." एवढं बोलून हसायला लागली.

"हर्षा आत्ता तू माझी टर ऊडवते आहेस. परवापर्यंत तूच घाबरलेली होतीस.रडूबाई होऊन कोण म्हणतं होतं मला एक काव्या माझ्या घरी ये नं राह्यला."

काव्याने हा डायलाॅग इतक्या नाटकी ढंगाने म्हटला की नंतर त्या दोघींना हसू आवरेना.

"हर्षा मी विचार करून सांगते की विपूलला भेटायचं की नाही."

" बरं. काव्या एवढं टेन्शन घेऊ नकोस."

हर्षा म्हणाली. दोघींचा लंचटाईम संपलेला होता. त्या दोघी आपल्या आपल्या डेस्कवर परतल्या.

***

रात्रीची जेवणं आटपून हर्षा झोपायला आपल्या खोलीत चालली होती. परवा पर्यंत आपल्या खोलीत जाताना हर्षला भीती वाटत होती. तशी भीती आज नव्हती वाटत. आज तिला विपुलला भेटायची घाई झाली होती. त्याच्यात तिचा खरच खूप जीव गुंतला होता. हर्षा आपल्या खोलीत आली आणि दरवाजा लावल्यानंतर म्हणाली

"विपुल कुठेस तू ?"

त्यावर ताबडतोब विपूल तिच्या समोर हजर झाला.

"काय मॅडम आज खोलीत शिरताच माझी आठवण केली?"

"विपूल तू मला चिडवू नकोस. दोन दिवस मी खूप घाबरले होते. त्याच्यामुळे मी खोलीतून घाबरून पळून गेले."


यावर विपुल हसला. नंतर हर्षा त्याला म्हणाली

"मी आज काव्याला विचारलं की तुला भेटायचे आहे का विपूलला? तर ती एकदम गांगरून गेली. म्हणाली अग कोणी समोर दिसत नाही आणि मी कसं काय त्याच्याशी बोलणार?तर मी तिला म्हटलं अगं विपुल समोर दिसेल तुला. जसा मला दिसतो. काव्य आणखीनच घाबरली म्हणाली सॉरी तुला भीती वाटत नाही पण मला भीती वाटते ग. मला जरा विचार करू दे." हर्षा म्हणाली

यावर विपुल म्हणाला

"हर्षा तिच्यावर जबरदस्ती करू नको. मी तुझा नवरा असून सुद्धा तू किती घाबरली होतीस! मग ती कशी ग एकदम तयार होईल? असू दे आज तू बोललीस बाबांशी आपल्या नवीन घराच्या वास्तूशांतीज्ञ बद्दल हे मी ऐकलं. आता सगळं व्यवस्थित झालं की लवकरात लवकर त्या घरात शिफ्ट हो." विपूल

" हो." हर्षा

" हर्षा तुला जसं हवं तसं ते घर सजव." विपूल.

"मी फक्त माझ्या आवडीनें नाही तर तुझ्या आवडीने पण आपलं घर सजवीन."

"तू हवं तसं सजव. तुला घर सजवताना मला बघायचं आहे."

" विपूल तू माझ्यासाठी खूप समजूतदार लाईफ पार्टनर आहे."

" आहे?"

" हो.आहे. तू शरीराने नाहीस.पण माझ्या मनात आयुष्यभर राहशील म्हणून आहे."

" हर्षा मला तू इतकं गुंतवून ठेऊ नकोस."

"विपूल ही माझी खरी भावना आहे. माझा नाईलाज आहे." हर्षा

" मी सांगू तू काय करायला हवं?"

" काय?"

"तुझ्या आयुष्यात मी नसल्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी तू आपले छंद जोपास. माझ्यापासून थोडं लांब जाण्याचा प्रयत्न कर."

" विपूल तू हे कसं सांगू ‌शकतोस? तू शरीराने माझ्याजवळ नाहीस पण आता तर रहा नं माझ्याजवळ?"

" हर्षा किती वर्ष? किती वर्ष मी अश्या अधांतरी अवस्थेत राहू?"

" मी जीवंत असेपर्यंत."

"काय?" विपूल किंचाळून बोलला. हर्षा म्हणाली.

" हळू. विपूल ओरडू नको. बाहेर आवाज जाईल."

" जसा मी कोणालाही दिसत नाही तसंच माझा आवाज पण कोणालाही ऐकू येत नाही. तू माझ्यात गुंतली आहेस म्हणून तुला माझा आवाज ऐकू येतो."

"आई ,बाबा ,आणि साधना यांचे जीव पण तुझ्यात गुंतले आहेत. त्यांना तू का दिसत नाही? त्यांना तुझा आवाज का ऐकू येत नाही.?"

"हर्षा तुझं माझ्यात गुंतणं आणि इतरांचं माझ्यात गुंतणं यात फरक आहे. लक्षात घे. तू माझी बायको आहेस. इतरांनी नाईलाजाने का होईना आपलं रोजचं जीवन जगायला सुरुवात केली आहे. तू कितीतरी महिने जगापासून फारकत घेतल्या सारखं जगत होतीस यामुळे मला पुढचा प्रवास शक्य झाला नाही. म्हणून मला यावं लागलं."

" मला काहीच बोलायचं नाही.जा तू."

हर्षा पलंगावर तोंडावर ऊषी ठेऊन झोपली.विपूल हताश झाला.त्याच्या लक्षात आलं की जेव्हा हर्षा नवीन घरात जाईल तेव्हा ती एकटी सापडेल तेव्हा सतत तिला हे पटवून दिलं पाहिजे.
______________________________
क्रमशः सख्या तू पैलतिरी
लेखिका मीनाक्षी वैद्य.

🎭 Series Post

View all