सख्या तू पैलतिरी भाग चाळीस अंतिम भाग ( अकल्पनीय कलाटणी)

एका मुलीची कथा


सख्या तू पैलतिरी भाग चाळीस अंतिम भाग
(अकल्पनीय कलाटणी )
मागील भागावरून पुढे…


संध्याच्या प्रश्नाला काय उत्तर द्यावं कोणालाच कळलं नाही. शेवटी दिनकरने बाजू सावरून घेतली.

"अगं हर्षा चे आईबाबा हर्षाला भेटायला आले. आज रवीवारी म्हणून. भरत आपल्या घराच्या बाजूला आला होता म्हणून आला. तुझ्या डोक्यात संशयाचा किडा आलाच असेल?"

" नाही येणार का? सगळे इथे जमलेत आणि मला साधना कडे पाठवलं" संध्या रागातच बोलली.

"मी तुला पाठवलं का साधनाकडे? तिनेच बोलावलं नं? सारखा उलटा विचार करायचा स्वभाव जरा बदल." दिनकर

सगळे गप्प होते. दिनकरने संध्याला संशय येऊ नये म्हणून तिच्यावरच तिचा प्रश्न ऊलटवला.

हर्षा गप्पच होती. हर्षाकडे रागाने बघत संध्या आत गेली.

***

"श्रीकांत राव ऊद्या आपण बंधन विवाह संस्थेत जाऊ. यावर आत्ता चर्चा नको करायला." दिनकर ने संध्या गेली त्या दिशेने बघत म्हटलं.

"चालेल." श्रीकांत असं म्हणून उठला वासंती पण उठली हर्षा त्यांना दारापर्यंत सोडायला गेली.

" बाबा मीपण निघतो." भरतने दिनकरला आणि हळूच त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या विपूलला म्हटलं.दिनकरने होकारार्थी मान डोलावली.

सगळे गेल्यानंतर विपूल हळूहळू दिसेनासा झाला. दिनकर आपल्याच विचारात होता तेवढ्यात त्याच्या कानावर संध्याचा आवाज आला.

" तुम्ही मला मूर्ख समजू नका.सगळी मंडळी जमून कसली खलबतं चालली होती?"

" संध्या योगायोगाने सगळी एकाच वेळी आपल्या घरी आली त्यात संशय घेण्यासारखं काय आहे? भरत कितीदा तरी आपल्या एरीयात आला की येतो नं! तसा तो आला.खूप दिवस झाले हर्षाची
भेट नाही म्हणून तिचे आईबाबा आले. हे तिघही एकाचवेळी आले हा माझा दोष आहे का?" दिनकर

संध्याला पटणार नाही हे माहिती असल्याने दिनकर ने जास्तच ठासून सांगीतलं.

" तुम्ही सांगा तुम्हाला जे सांगायचं ते कारण. पण मला पटलेलं नाही. हे सगळे एकाच वेळी अचानक आले आणि साधनानेही काही कारण नसताना आजच मला फोन करून बोलवलं हाही योगच म्हणायचा का?"

"तुला जे समजायचे ते समज कारण तुला कितीही खरं सांगीतलं तरी ते पटतच नाही. "

" खरं कारण मला पटतं. तुम्ही खोटं कारण द्याल तर ते मला कसं पटेल.मला तुमची सवय माहिती नाही का? आता तर ही मुलगी आली आहे घरात तिच्यासाठी तुम्ही वाट्टेल ते खोटं बोलाल."

संध्याच्या या बोलण्यावर दिनकर कपाळावर हात मारून बसला.आपलं डोकं हलवत म्हणाला

"देवा हिचं काहीतरी कर.हिच्या स्वभावात चांगला बदल कर."

" काही देवाला प्रार्थना करायची गरज नाही.माझा स्वभाव चांगलाच आहे.तुम्ही खोटं बोलता त्याची मला चीड आहे."

" प्रत्येक गोष्टीत तुला नकार घंटा वाजवायची सवय असल्याने तुझ्याशी नाईलाजाने खोटं बोलावं लागतं."

" बघा म्हणजे आज खोटं बोललात तुम्ही"

न राहवून दिनकर आवाज चढवून म्हणाला

"आम्ही सगळ्यांनी मिळून हर्षाचं दुसरं लग्न करायचं ठरवलं आहे. सगळ्यांचीच अशी इच्छा आहे. तुझी कुचकट मतं यावर ऐकायची नव्हती म्हणून मुद्दाम तुला साधना कडे पाठवलं. झालं समाधान खरं कारण ऐकून." दिनकर उद्वेगाने म्हणाला.

हर्षा दोघांचं हे संभाषण ऐकत होती. तिचे डोळे सतत पाणी गाळत होते. तेवढ्यात विपूल तिला म्हणाला

"हर्षा रडू नको. आई तुझ्याशी कितीही विचीत्र वागू दे बाबा तुला असं अधांतरी सोडणार नाहीत.
याची मला खात्री आहे." विपूल

" हे मला कळतंय विपूल. मला सतत हा प्रश्न भेडसावतो की आईंना मी का आवडत नाही? मी काय केलं म्हणजे त्या खूष होतील." हर्षा

" आता त्यांचा फार विचार करू नकोस. तुझ्या नव्या आयुष्यावर माझ्या आईच्या विचीत्र वागण्याचा परीणाम होऊ देऊ नकोस. शांत रहा." विपूल.

हर्षा आपल्याच खोलीत होती.तिथे दिनकर येऊन म्हणाला

" हर्षा रडू नको बेटा.तुला तुझ्या सासूचा स्वभाव कळला आहे. त्यावर फार ‌विचार करू नकोस.ऊद्या आपण तुझं नाव विवाह संस्थेत नोंदवू." दिनकर

"हो" हर्षाचा स्वर जरा हिरमुसला होता.

***

दुसरा दिवस उजाडला.सकाळपासून संध्याचं तोंड वाकडच होतं. दिनकरने तिच्याकडे लक्ष दिलं नाही.हर्षाला थोडं जाणवलं.

साधारण अकराच्या सुमारास हर्षा आणि दिनकर बंधन विवाह संस्थेत जायला निघाले तसा एक सणसणीत आसूड संध्याने हर्षाच्या मनावर यायलाच

"माझ्या मुलाला गिळून बसली अवदसा पण नखरे बघा किती माझ्या मुलाला जाऊन वर्षही झालं नाही तर चालली स्वतःच्या कपाळावर मुंडावळ्या बांधायला."

हर्षाला जबरदस्त हुंदका फुटला.ती रडतच खूर्चीत आदळली.

"संध्या तोंड बंद कर. तुला नाहीतरी हर्षा आवडतच नाही. मग तिनं लग्न करायचं ठरवलं तर तुला आनंदच व्हायला हवा. नंतर हर्षा इथे राहणार नाही आणि तुझं तोंडही वाकड़ं होणार नाही. हर्षा चल डोळे पूस." दिनकर म्हणाला
संध्या ने नाक मुरडले.

हर्षाने डोळे पुसले आणि दिनकर बरोबर घराबाहेर पडली.

***

बंधन विवाह संस्थेजवळ सगळे भेटले.

विवाह संस्थेत हर्षाचं रीतसर नावं नोंदवलं गेल. तिची सध्याची स्थिती विधवा हेही नमूद केलं गेलं. विवाह संस्थेच्या फाॅर्ममध्ये सगळी माहिती भरताना श्रीकांतचा हात थरथरत होता. हर्षा चे डोळे पाण्याने डबडबले होते.वासंतीने हळूवारपणे हर्षाच्या हातावर थोपटलं. मोठ्या मुश्किलीने हर्षा ने आवंढा गिळला.

फाॅर्ममध्ये सगळं व्यवस्थित भरल्यानंतर संस्थेतून सांगण्यात आलं की तुमच्या मुलीशी मिळतं जुळतं स्थळ असेल तर लगेच सांगू.

सगळेजण विवाह संस्थेच्या बाहेर पडले.समोरच विपूल उभा होता.विपूल फक्त यांनाच दिसत होता.

"थॅंक्स हर्षा तू आज माझं खूप मोठं काम केलंस. मी आता पुढला प्रवास करू शकेन. तुझ्या नवीन आयुष्याची सुरुवात छान होऊ दे हिच शुभेच्छा. तू आनंदी रहीलीस तर त्यात मलाच सूख मिळणार आहे." विपूल


" विपूल मलासुद्धा तू खूप शांतपणे पुढच्या प्रवासाला गेलास तर त्यात मला आनंद होणार आहे. मी आपल्या दोघांसाठीच फक्त हा निर्णय नाही घेतला तर आपल्या दोघांना जपणारे आणि तुझ्या नंतर माझी खूप काळजी घेणा-या या सगळ्या लोकांसाठी हा निर्णय घेतला आहे
मी आनंदी दिसली तर हे लोक पण आनंदी होतील." हर्षा

"विपूल बेटा आज हर्षाचं नाव नोंदवलं आहे.जेव्हा योग येईल तेव्हा लग्नं जमेल.तू आता शांतचित्ताने पुढील मार्गक्रमणा कर." दिनकर.

" विपूल पुढल्या प्रवासात तुला कुठलाही त्रास होऊ नये हीच आमची सगळ्यांची ईश्वर चरणी प्रार्थना आहे. तू माझा खूप लाडका आहेस.होता म्हणणार नाही. तुझी उणीव मला आयुष्यभर भासेल.तू खूप चांगला मित्र आहेस माझा.नाही बोलणार अजून " भरत एवढं बोलून डोळे पुसू लागला.

सगळेच खूप हळवे झाले होते.

" विपूल जितके दिवस होतास तितके दिवस तू माझ्या लेकीला खूप छान सांभाळलस.या जन्मी तुमचं सहजीवन अपूर्ण राहिलं.पुढच्या जन्मी पूर्ण होवो हीच मी देवाजवळ प्रार्थना करीन." श्रीकांत

सगळ्यांनी आपले डोळे पुसले. त्याचं वेळी विपूल हळूहळू दिसेनासा झाला.

विपूल गेल्यावर हर्षाला खूप रडायला यायला लागलं तसं तिच्या आईने वासंती ने हर्षाला जवळ घेऊन थोपटलं.


माझ्या कथेच्या नायिकेचा नायक शेवटी पैलतीरावर निघून गेला. ऐलतिरावर राहिल्या त्यांच्या सुखद आठवणी सगळ्यांच्या मनात.

_____________________________

सख्या तू पैलतिरी भाग चाळीस

कथा मालिका समाप्त.
लेखिका.. मीनाक्षी वैद्य.

🎭 Series Post

View all