सख्या तू पैलतिरी'भाग दुसरा

एका मुलीची कथा


सख्या तू पैलतिरी ..भाग २रा

मागील भागावरून पुढे...

"संध्या अगं विपूल जाऊन आता पंधरा दिवस झाले आता सावर स्वतःला." दिनकर संध्याला म्हणजे विपूलच्या आईला म्हणाले.

" माझा तरणाताठा मुलगा गेलाय.दु:ख नाही होणार?"

"अगं संध्या विपूल माझा पण मुलगा होता.मला नसेल दु:ख होतं." दिनकर चिडून संध्याला बोलले.

" कोणाला ठाऊक तुम्हाला दु:ख झालंय का नाही?" संध्याचं हे वाक्यं ऐकताच दिनकरचा स्वर टिपेला पोचला.

"तुम्हा बायकांनाच फक्त काळीज असतं का? बापाचं हृदय दगडाचं असतं का? आई सारखी सतत काळजी दाखवता येत नाही बापाला म्हणून स्वतःच्या मुलांच्या जाण्याचं दु:ख नसेल का त्याला? बोलताना जरा तोंड सांभाळून बोलत जा. जीभेवर जरा लगाम दे.."

दिनकरच्या बोलण्याचा संध्यावर काहीही परिणाम झाला नाही. ऊलट तिच्या जिभेचा पट्टा जास्तच चालू लागला.

"मी खरं तेच बोलते.आईला लेकाची किती काळजी असते हे तुम्ही आई व्हाल तेव्हा कळेल तुम्हाला." संध्या रागानी चेहरा फुगवून सोफ्यावर बसली होती.

"या जन्मात मी होणार आहे का आई? नाही नं. पण बाप आहे नं. बापाचं काळीज आईसारखच आपल्या मुलांसाठी तुटतं. हे तू बाप होशील तेव्हा तुला कळेल. वेळ काळ बघायची नाही आणि आपलंच घोडं पुढे दामटायचं."

रागारागाने दिनकर समोरच्या पलंगावर आडवा होऊन डोळ्यावर आडवा हात ठेवतो. त्यांच्या डोळ्यातून पाणी ओघळू लागतं.

"मी माझं घोडं पुढे दामटत नाही.खरं तेच बोलते.सत्य ऐकायला कठीण जातं." संध्या कुचकट स्वरात म्हणते.
ते ऐकून दिनकर डोळ्यावरुन हात काढून तिच्यासमोर हात जोडून म्हणतो,

" संध्या हात जोडतो तुझ्यापुढे आता फार बोलू नको. विपूल गेल्याची वेदना सहन करणं कठीण जातंय त्यात तुझ्या शब्दांचं बंम्बार्डिंग नको. त्याचा घाव सहन होत नाही." दिनकर पुन्हा डोळे मिटून घेतो.

"हो मी खरं बोलते म्हणून ते बंबार्डिंग वाटतं. देवानी खरं बोलायची वृत्ती मला दिली हाही माझाच दोष आहे."उसळून संध्या बोलते.

दिनकर काहीच बोलत नाही. त्यांच्या डोळ्यातून सतत पाण्याच्या धारा वाहत असतात. इकडे संध्यापण रडतच असते पण त्या रडण्यात विपूलच्या आठवणीपेक्षाही दिनकर वरचा राग असतो.
***
ती नको तेवढी विपूलला जपत असते.

विपुलला इतकं जपणं दिनकरराव पटत नसे. ते नेहमी म्हणायचे.
"अग संध्या विपुलता मुक्तपणे वाढू दे. त्याचे पंख कापू नको."

"त्याच्याचसाठी सगळं करतेय. काही त्यांचे पंखबिंख कापत नाही." घुश्श्यात संध्या म्हणाली.

"संध्या हे तू त्याचे नको तितके लाड करतेस. यानी तो लाडावेल. त्याला स्वावलंबी कर." हे आत्ता संध्याला आठवलं म्हणून आताही राग आला.

संध्याला नेहमीच याचा राग यायचा. तोच राग आजही तिच्या मनात धुमसत होता.दिनकरना मात्र कळत नव्हतं तिला कसं समजवावं.


" मला पहिल्यांदाच ही मुलगी आवडली नव्हती.ती विपूलला सुखी करणार नाही माहितीच होतं मला. आता बघा काय झालं? माझं लाडकं कोकरू गेलं आणि ही राहिली. त्यापेक्षा हीच…"


" संध्या...जिभेला लगाम घाल." संध्याचं पुढचं वाक्य ऐकून न घेता दिनकर ओरडले.

" संध्या तुला वेड लागलं का? काय वाट्टेल ते बरळते आहेस? विपूलच्या मरणाला संध्या कशी जबाबदार असणार आहे? देवानं तोंड दिलंय तर वाटेल ते बोलायचं? अगं ती पण विपुल सारखी कोणाचं तरी कोकरू आहे. भान ठेव याचं."

" मी भानावर आहे. तुम्ही आणि विपूल दोघंही तिच्या घोळात आले. लग्न होऊन जेमतेम चार महिनेच झाले आणि विपूल गेला. विपूलच का गेला? कारण ही पांढ-या पायाची अवदसा पडली नं त्याच्या गळ्यात." संध्या गप्प बसायचं नाव घेत नव्हती.

"लग्नाची वरात घरी आल्यावर जेव्हा विपूलला ताप आला तेव्हाच माझा जीव घाबरा झाला होता. कोमेजून गेलं होतं माझं पोरं." डोळे पुसत संध्या म्हणते.

"अगं लग्नाचा शीण आला असेल त्यानी ताप आला असेल. वडाची साल पिंपळाला कसली लावते?" दिनकर म्हणाले.

"अजीबात मी वडाची साल पिंपळाला लावत नाही. त्या दिवशी रेणू वन्स पण म्हणाल्या की वरात घरी आल्यावर नव-या मुलाला ताप येणं चांगलं नाही. या मुलीमुळेच झालं."

आता दिनकर कपाळावर हात मारतात.त्यांना बायकोचं आणि आपल्या बहिणींचं तर्कशास्त्रच कळत नाही.

" आत्ता मी रेणूकाला फोन लावून विचारतो. हा काय मूर्खपणा आहे?"

" काही गरज नाही रेणूवन्संना फोन लावायची."

" रेणू खरच म्हणाली नं तुला असं मग करतो नं तिला फोन. विचारतो. होईलच दूध का दूध,पानी का पानी."

"आता खरं खोटं करून काय होणार आहे? माझा लाडका विपूल तर गेला. " पुन्हा ढसाढसा रडू लागते. दिनकर संध्याच्या या विचीत्र वागणूकीमुळे आयुष्यभर कंटाळला होता पण काही इलाज नव्हता.

दिनकर सोफ्यावर बसून मागे डोकं टेकवून डोळे मिटून बसला.

"मला आधीच कळलं होतं हिची नजर काही चांगली नाही. आपलं घर, आपला पैसा बघून भोळ्या भाबड्या विपूलला चांगलंच घोळात घेतलं हिनं. ती राहिली बाजूला आपण आपलं पोर गमाऊन बसलो."

" संध्या तू काय मनात येईल ते बोलायचं ठरवलं आहेस का? अगं ती आपलं घर,आपला पैसा कुठून बघणार. दोघांची ओळख झाल्यावर कळलं असेल तिला विपूल कडून."

" छे: काही मुली फार म्हणजे फार धूर्त असतात.आधी मुलांची सगळी माहिती काढतात मग त्याला आपल्या जाळ्यात ओढतात."

" आता मात्र संध्या मी हात जोडले तुझ्यापुढे. त्या भिकारड्या टिव्हीवरच्या दळभद्री मालिका बघणं बंद कर. पुन्हा सांगतोय संध्या तुला स्वतःच्या जिभेला लगाम दे. अशीच तोंडाला येईल तसं बोलत राहिलीस तर पुढे अनर्थ घडेल." दिनकरचा आवाज चांगलाच चढला होता.


"तुम्हाला काही कळत नाही. जसे तुम्ही तसा तो विपूल ही भोळा सांब होता." रडायला लागते.दिनकर वैतागून म्हणाला,

"अगं भोळासांब म्हणजे मूर्ख म्हणायचंय का तुला? मनात आलं की बोलून टाकायचं हा काय वेडेपणा चालला आहे?"

" त्या मुलीचं मला तोंड बघायची इच्छा नाही." संध्या चिडून बोलली.

" एकाच घरात दोघी अशा राहणार?" दिनकरनं विचारलं.

" ती नाही आली घरी तर बरंय."

" संध्या...काय फालतूपणा करतेय.ती या घरची सून आहे."

" सून आहे नाही होती ." संध्याचा फणकारा अजून काही कमी झालेला नव्हता.

" होती …? हे बघ संध्या ती जेव्हा म्हणेल मी माहेरच राहीन तेव्हाच ती माहेरी जाईल. तिला जर दुसरं लग्नं करायचं असेल तरच ती करेल अन्यथा ती या घरची सून म्हणूनच राहील. कळलं…?" दीनकरनी ठणकावून सांगितलं.

" हं... विपूलशी लग्न करत नाही तोच त्याला गिळून बसली पुढे आपला पण नंबर लागू शकतो."

" देवा… या बाईच्या डोक्याला मी काय उपाय करू? संध्या हे वेडगळ विचार करणं थांबव. हर्षा काय क्रिमीनल आहे? पुन्हा अशी बोललीस तर तो टिव्ही मी फोडून टाकीन लक्षात ठेव."

दीनकरनी मुठी रागानी आवळून धरल्या होत्या. चिडल्यामुळे त्याच्या अंगाला थरथर सुटली होती.

संध्या आता जोरजोरात रडायला लागली तसं दिनकर तिला म्हणाला,

"तू बस रडत घरात.मी बाहेर जातो.तुझ्या सतत रडण्यानी आणि अतार्किक बोलण्यानी माझं डोकं भणभणायला लागलं आहे." रागारागाने दिनकर पायात चप्पल अडकवून बाहेर पडले. यावर संध्यानी फक्त नाक मुरडलं.

***

" आजी हे घे पाणी." हर्षा आजीला पाणी देते.

" आई मी विपूलच्या घरी फोन करू का? म्हणजे मला असं वाटतंय फोन करावा."

" हो बाळा कर. त्यांनाही बरं वाटेल. विपूलच्या जाण्यानी खूप मोठी वेदना झाली आहे त्यांना. तू फोन केलास तर त्या वेदनेवर फुंकर घातल्यासारखं होईल." सुमती म्हणाली.

"हर्षा मी कालच फोन केला होता विपूलच्या बाबांना.ते म्हणाले हर्षाला जेव्हा सासरी यावं वाटेल तेव्हा येऊ द्या.घाई करू नका. तिला थोडं सावरू द्या." श्रीकांत नी विपूलच्या बाबांशी झालेलं बोलणं हर्षा ,सुमती आणि आजींना सांगीतलं.

"समजुतदार आहेत ग तुझ्या सासरची मंडळी." सुमती बोलली.

"हर्षा आज न विसरता फोन कर बाळा सासरी."आजी हर्षाला म्हणाल्या.

" मी म्हणतेय फोन करीन पण कसं आणि काय बोलू कळत नाही मला." हर्षाच्या या वाक्यावर आजीच म्हणाल्या

" खूप वेगळं काही बोलायचं नसतं. चवकशी करायची.कसे आहात? खूप विचार करू नका. स्वत:ची तब्येत सांभाळा.मी लवकरच येईन. हर्षू बाळा काही प्रसंगात शब्दांच्या लडी लावायच्या नसतात. तुमच्या भावना समोरच्या व्यक्तीपर्यंत पोचतील असं बोलायचं. कर फोन. बोलता बोलता सुचेल तुला."

" विपूलच्या बाबांनाच करते." हर्षा म्हणाली.

"का ग? सासूबाईंना कर ना." सुमती म्हणाली तशी हर्षानी स्पष्टीकरण दिलं.

" विपूलच्या आईपेक्षा बाबांशी बोलताना मला दडपण येत नाही. मोकळेपणानी बोलता येतं."

"घरी सासुबाई बोलतात की नाही तुझ्याशी?" सुमती नी काळजीनी विचारलं.

" विशेष नाही. जेवढ्यास तेवढंच बोलणं असतं आमच्यात."

"ठीक आहे कर मग दिनकररवांना फोन." श्रीकांत म्हणाले. हर्षा फोन करायला आपल्या खोलीत गेली.
***

" हॅलो...बोल हर्षा"
विपूलच्या बाबांचा स्वर कानी पडताच तिला थोडं मोकळं वाटलं.

" बाबा आता कसे आहात तुम्ही ,आई, साधनाताई?"

" आम्ही ठीक आहोत.या दु:खातून बाहेर यायला थोडा वेळ लागेल. सगळं अचानक घडलं. तू कशी आहेस? तुला जेव्हा इकडे यायची इच्छा होईल तेव्हा ये."

" हो बाबा.लवकरच येईन. आईंशी बोलू शकते का?" हर्षानी विचारलं.

" अगं मी थोडा बाहेर आलो आहे पाय मोकळे करायला.घरी गेल्यावर सांगतो तिला."

" बरं.ठेऊ मग फोन?"हर्षाली विचारलं.

" हो ठेव."

दिनकरना हर्षाचा फोन आपण बाहेर असताना आला फार बरं वाटलं. हर्षाच्या फोनवरून पुन्हा संध्याची टकळी सुरू झाली असती. हताशपणे मान झटकत दिनकर नी फोन खिशात ठेवला आणि चालू लागले.
--------------------------------------------------------------
क्रमशः पुढे काय घडलं? हे पुढच्या भागात वाचा.
\"सख्या तू पैलतिरी\". भाग दुसरा

🎭 Series Post

View all