सख्या तू पैलतिरी भाग सत्तावीस

एका मुलीची कथा आहे.


सख्या तू पैलतिरी भाग सत्तावीस.
मागील भागावरून पुढे…

हर्षा आज ऑफीसमध्ये आली पण तिचा मूड खूप खराब होता.याला कारण कालचं संध्याचं बोलणं तिच्या मनावर घाव करून गेलं. \"आपल्याला अजूनही आपली सासू आपल्या मुलाची बायको समजत नाही\" याचं तिला फार वाईट वाटलं.

काव्या हर्षा ऑफीसमध्ये आल्यापासून हर्षाला बघत होती. आज आल्याबरोबर तिने काव्याला गुडमाॅर्नींग पण केलं नाही. हर्षाचा मूड खराब असलेला दिसला. शेवटी काव्या हर्षाजवळ येत म्हणाली.

"हर्षा तब्येत ठीक नाही का?"काव्या

"ठीक आहे.\"हर्षा

"मग तुझा चेहरा कसा का? " काव्या

"हं काय सांगू तुला." हर्षा

"सांग मन मोकळं कर." काव्या

"लंचटाईममध्ये सांगीन." हर्षा

"ठीक आहे.तब्येतीचा काही त्रास नाही नं?" काव्या

"नाही " हर्षा

"ओके.लंचटाईममध्ये सांग" काव्या

एवढं बोलून काव्या आपल्या जागेवर गेली.
काव्याने लगेच आपली विचारपूस केली म्हणून हर्षाला बरं वाटलं.तिनी तिचा कम्प्युटर ऑन केला आणि कामाला लागली.

***

लंचटाईममध्ये काव्या आणि हर्षा नेहमीच्या जागी
आल्या डबा ऊघता ऊघता काव्याने विचारलं

"हर्षा काय झालं सांग ." काव्या


"माझ्या सासूबाई काल जे काही बोलल्या त्यामुळे मी खूप दुखावले आहे." हर्षा

"काय बोलल्या?" काव्या

"त्या मला विपूल ची बायको मानत नाहीत." हर्षा


"काय…!" काव्याच्या आवाज एवढा मोठ्याने आला की आजुबाजूचे सगळे तिच्याकडे बघायला लागले.

काव्याचा लक्ष जाताच ती हळू आवाजात म्हणाली

"हर्षा हा आता कुठला नवीन मुद्दा काढला तुझ्या सासूबाईंनी?" काव्या

"यावरुन आईचं आणि बाबांचं खूप झमकलं. बाबांचा खूप संताप झाला होता. आई म्हणाल्या विपूल ने जो फ्लॅट बूक केला आहे त्यावर नाॅमीनी म्हणून या मुलीच़ नाव का टाकलं.माझं नाव टाकायला हवं होतं" हर्षा

" ही मुलगी कोण?" काव्या

" अगं मी." हर्षा

"काय तू ? अगं तुला नाव आहे नं!" काव्या

"त्या कधीच मला हाक मारतच नाही पण बाबांशी बोलताना नेहमी ही मुलगी असंच म्हणतात. साधनाताई म्हणाल्या होत्या की तू इकडे राहीलेली आईला आवडत नाही." हर्षा

"का ?" काव्या

"कारण त्या मला विपूलची बायको मानतच नाही.:काल तर बाबांना म्हणाल्या हिची पत्रीका बघा म्हटलं होतं तुम्ही ऐकलं नाही. हिच्या पत्रीकेतील ग्रह खराब असतील म्हणूनच आपला विपूल गेला. आईचं हे बोलणं ऐकून बाबांनी कपाळावर हात मारला." हर्षा

"अगं हर्षा त्यांना पत्रीका बघायची होती तर आधीच बघायची."काव्या

"विपूल ने माझ्याशी प्रेमविवाह केला ते त्यांना आवडलं नाही" हर्षा

"का?" काव्या

"अगं त्यांना सगळं रितसर हवं होतं." हर्षा

"म्हणजे कसं?" काव्या

"आधी मुलीकडच्यांनी विचारायचं मुलीचा फोटो पत्रीका पाठवायची नंतर मुलीकडच्यांनी फोन करून विचारायचं. असं काहीच घडलं नाही. विपूल आणि त्याचे आईबाबा साधना ताई भरतजीजू आमच्या घरी आले होते तेव्हा बाबांनी काहीच सांगीतलं नाही पण आई म्हणाल्या तीन तोळ्यांच्या बांगड्या घाला.अगदी ठसक्यात बोलल्या." हर्षा

"कमाल आहे."काव्या


"त्या सतत वाकडच बोलतात.काल तर बाबांनी त्यांना ठाम शब्दात सांगीतलं तू हर्षाला विपूलची बायको नाही मानत. पण देवाब्राह्मणाच्या साक्षीने त्यांचं लग्न झालंय आणि कायदेशीर रित्या नोंदणी झाली आहे.त्यामुळे तुझी इच्छा घाल चुलीत." हर्षा

"काय असं म्हणाले!" काव्या

"हो मलापण आश्चर्य वाटलं." हर्षा

हा…हा…हा काव्या हसली

"तुझे सासरे खरच ग्रेट आहेत." काव्या

"मी खूप डिस्टर्ब झाले. मनात आलं की काय केलं म्हणजे या मला स्विकारतील खूप रडले ग काल मी." हर्षा

"कशाला रडते.तुझे सासरे तुझ्या पाठीशी आहेत." काव्या

"आणखी एक गम्मत सांगते. बाबा म्हणाले बिल्डर कडून आम्ही साधना कडे जाऊ. सासूबाईंनी म्हटलं हिला कशाला न्यायला हवं. बाबा म्हणाले तिचीपण साधनांनी भेट होईल.तर त्या काय म्हणाल्या तुला माहिती आहे?" हर्षा

" काय?"काव्या

"ती विधवा आहे तिची सावली पण साधनांवर पडायला नको." हर्षा

"काय…हे जरा अतीच होतंय." किव्या

" यावरून पण त्या दोघांची झमकली." हर्षा

"तुझ्या सास-यांनी चांगली सुनावली असेल तुझ्या सासूबाईंना." काव्या

"हो मग काय तर. बाबा म्हणाले ते कंटाळले आहेत आईंच्या स्वभावाला." हर्षा

"कंटाळणारच. सतत कोणी कुरकूर करत असेल तर कोणताही माणूस कंटाळेल." काव्या

"हं" हर्षा

"तुझं सगळं ऐकलं नं की मला लग्नं करावं की नाही हा प्रश्न पडतो." काव्या

"ऐ काहीतरी काय. सगळ्यांच सासवा वाईट नसतात." हर्षा

"अगं पण ते लग्न झाल्याशिवाय कसं कळेल." काव्या

"काव्या माझं ऐक. माझा अनुभव ऐकून तू काही सासू या व्यक्तीविषयी खूप वाईट प्रतिमा मनात तयार करू नकोस." हर्षा

"विपूल ने आईला समजवायला हवं होतं." काव्या

"अगं काही दिवस त्यांना आणि मला एकमेकांना समजून घ्यायला वेळ लागेल म्हणून विपूल गप्प बसला. तेव्हा विपूलच्या बाबतीत असं काही होईल असं कोणाला वाटेल." हर्षा

"खरय हर्षा. तुझ्या धीराची मी दाद देते." काव्या


"साधनाताईंशी माझी छान मैत्री झाली त्यामागेही बाबांचं होते." हर्षा

"कसे काय?" काव्या

"त्यांनी भरत जिजूंना सांगीतलं साधना ताईंना सासरी राहण्यासाठी भाग पाड.भरत जीजूंचं नाही ऐकलं तर ते घटस्फोट देतील या भीतीने त्या सासरी राह्यला गेल्या तेव्हाच जीजू म्हणाले हर्षाली बोल.तेव्हा त्यांनी मला फोन केला होता." हर्षा

" हर्षा तुझ्या सासूचं डोकं एकदा तपासायला हवं असं मला वाटतंय" काव्या

"अगं बाबा त्यांना रागाने म्हणाले की तुला मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करायला हवं" हर्षि


"हर्षा विपूल ने जो फ्लॅट बुक केलाय तो कधी मिळणार आहे ?" काव्या

"या महिन्याच्या शेवटी म्हणाला आहे कामत बिल्डर पण प्रत्यक्षात कधी मिळेल सांगता नाही येत.म्हणून बाबांचं म्हणणं आहे की आधी त्या साईटवर जाऊन आपण बघू किती टक्के फ्लॅट पूर्ण झाला आहे मगच त्याला शेवटचा हप्ता देऊ." हर्षा

"बरोबर आहे त्यांचं म्हणणं. मग तो फ्लॅट आता तुझ्या नावावर रजीस्टर करायला हवा.सासरे करू देतील नं!" काव्या

"अगं त्यांचं म्हणणं माझ्या नावावरच आता सगळ्या गोष्टी व्हायला हव्या.बाबांचं  टेन्शन नाही." हर्षा

"हर्षा फ्लॅट तुझ्या ताब्यात मिळाला की तू सरळ तिकडे राह्यला जा." काव्या

"का ?अगं असं बरं दिसत नाही." हर्षा

"तुझ्या सासूला तू त्या घरी राह्यलेली आवडत नाही मग उलट तू वेगळं राहणं जास्त चांगल." काव्या

"तू म्हणतेस ते बरोबर आहे पण माझी एकदम हिम्मत होणार नाही वेगऴ राहण्याची." हर्षा

"ती हिम्मत कर. तुला संधी आहे. ब-याच मुलींना हे सगळं कुचकट बोलणं ऐकावं लागतं कारण त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसतो." काव्या

"हं. पण मी बाबांना एकदम कसं म्हणू की माझ्या घराचं पझेशन मिळालं आहे मी आता वेगळं राहते.हट ग असं चांगलं नाही दिसत." हर्षा

"तुझे सासरे खूप समजूतदार आहेत. ते काहीही म्हणणार नाहीत.ऊलट त्यांच्या डोक्याला शांतता लाभेल. \"तुझ्या सासूची मुक्ताफळं ऐकावी लागणार नाहीत.\"त्यांच्याच भाषेत सांगीतलं तुला" काव्या

हे बोलून काव्या हसायला लागली.


"खरच ग या काही महिन्यातच मी त्यांचं बोलणं ऐकून कंटाळले बाबांनी इतकी वर्ष कसं सहन केलं असेल हाच प्रश्न पडतो मला."  हर्षा

"मी तुला वेगळं राहावंसं असं सुचवलं आहे.तू तुझ्या सास-यांबरोबर एकदा या विषयावर बोल ते काय म्हणतात बघ."काव्या

"हं. "हर्षा उत्तरली.

"काव्या इतक्यात तुला काही स्थळं आलीत का?" हर्षा

"एक आहे रोहन बापट म्हणून त्यांच्याशी चॅटवर बोलले आहे. बरा वाटला मुलगा. आता. भेटल्यावर कळेल."काव्या

"कधी भेटताय?" हर्षा

"याच शनीवारी भेटणार आहोत." काव्या


"काव्या तू काहीच बोलली नाहीस. मी आत्ता विचारलं नसतं तर बहुदा तू सांगीतलंच नसतं." हर्षा

"नाही ग. तसं नाही. मीच जरा संभ्रमीत होते." काव्या

"का संभ्रमीत आहेस? मुलगा चांगला आहे नं. मग कशाला काळजी करतेस?" हर्षा

"बघू.शनीवारी त्या मुलाशी भेटल्यावर बघू दोघंही एकमेकांबरोबर कम्फर्टेबल आहोत की नाही. फोनवर चॅट करणं वेगळं आणि प्रत्यक्षात भेटणं वेगळं." काव्या

"ठीक आहे चल.लंचटाईम संपला." हर्षा

***

सकाळी हर्षाला शांतपणे ऑफीसमध्ये जाताना बघून तिची अवस्था दिनकरच्या लक्षात आली.
इतकी गुणी मुलगी आहे हर्षा आणि किती कुचकट विचारांमध्ये संध्या गुंतली आहे. आपण सहन केलं संध्याला आयुष्यभर पण हर्षाने का या विचित्र स्वभावाच्या संध्याला सहन करावं ती सून आहे म्हणून नाही तिला फ्लॅटचं पझेशन मिळालं की तिला वेगळं राह्यला सांगायचं.


दिनकर इतका आपल्याच विचारात होता की संध्याने त्याला दोनदा चहा विचारलं ते दिनकला
ऐकूच आलं नाही.

" अहो पुन्हा चहा हवाय का? " संध्या ने जरा ओरडूनच विचारलं

" अं" तंद्रीतून बाहेर येत दिनकर ने विचारलं

" काय विचारते? जरा हळू बोल नं. किती ओरडून विचारतेस" दिनकर बोलला.

"तुम्ही तंद्रीत असता मग दहादा तुम्हाला विचारणार आहे का? मला काही काम नाही का?" संध्या

" कर तुझी कामं." दिनकर

" चहा‌ हवाय का ते सांगा." संध्या

"आण तुझा चहा आणि तो ओत माझ्या घशात."
वैतागून दिनकर बोलला.त्याला हर्षाची काळजी वाटत होती. संध्याबद्दलचा राग दिनकरच्या मनात टिपेला पोचला.

विपूल इतक्या लवकर हे जग सोडून गेला की हर्षाच्या समोर एवढं मोठं आयुष्य पडलंय.कसं जगेल ती? नाही आपण चांगला मुलगा शोधायचा आणि तिचं लग्न लावून द्यायचं. हे मनाशी पक्कं ठरवल्यावर दिनकरच्या मनाला जरा शांती मिळाली.
______________________________
क्रमशः सख्या तू पैलतिरी
लेखिका…मीनाक्षी वैद्य.

🎭 Series Post

View all