सख्या तू पैलतिरी भाग बावीस

एका मुलीची कथा आहे.

सख्या तू पैलतिरी भाग बावीस
मागील भागावरून पुढे…


साधनाचे दिवस घरातील सगळ्यांच्या सहवासात आनंदात जात होते.भरत खूप खूष होता. तोच काय घरातील सगळे साधनाचे लाड करत होते आणि ती आनंदी कशी राहील याची काळजी घेत होते.

साधनाचे डोहाळे कौतुकाने पुरवल्या जात होते. परागनंतर इतक्या वर्षांनी लहान बाळाची पावलं घरात दुडदुडणार आहेत म्हणून सगळेच आनंदात होते.

साधनाला पाचवा महिना संपत आला होता. हर्षा ठरल्याप्रमाणे दर शनीवारी साधनाला भेटायला जात असे. दर शनिवारी हर्षा आईकडे जाते हे काही संध्याला पटत नव्हतं. पण ती काही बोलू शकली नाही कारण दिनकरचा ठामपणा तिला यावेळी बोलू देत नव्हता. संध्याला माहितीच नव्हतं की हर्षा आईकडून साधनाला भेटायला जाते. साधनानेही सांगीतलं नव्हतं.

हर्षा कायमची माहेरी राहिली तर संध्याला हवंच होतं पण तेही ती दिनकरमुळे हर्षाला सांगू शकत नव्हती. तरी एकदा ती दिनकरलाच बोलली.

"दर शनीवारी कसली ही मुलगी आईकडे जाते. जर एवढा आईचा ओढा आहे तर रहा म्हणा माहेरीच. आहे काय आता तिचं इथे."

"हर्षाला म्हणतेस पण मग साधना तर जवळपास रोजच यायची माहेरी ते चाललं तुला. त्या हर्षाशी तुझं मागच्या जन्मीचं वैर आहे का? हर्षा इतकी साधी सरळ मुलगी आहे. तरी तिच्यात सतत काहीतरी उणीव शोधत बसते."

"मी काय मुर्ख आहे उगीचच तिला बोलायला? जे दिसतं तेच बोलते. तुम्ही तिच्या प्रेमाची पट्टी डोळ्यांवर बांधून बसलेत त्याला मी करणार! जरा ती डोळ्यावरची पट्टी काढा मग तिचं खरं रूप कळेल."

"हर्षा काय व्हिलन आहे का? काय बोलते तू कधी कधी मला कळतच नाही. तुझ्या कुचकट विचारसरणीमुळे तुझं डोकं तर गेलंच आहे कामातून पण माझ़ डोकही बधीर होत चाललं. आहे."

दिनकर कपाळावरून हात फिरवत चेहरा वाकडा करत खुर्चीवर बसला. संध्याला दिनकरच्या या कृतीमुळे काही फरक पडला नाही.

"डोक्याला हात लावण्या इतकं काही झालेलं नाही.आता विपूल नाही तर मला ती मुलगी इथे नकोच आहे. विपूलला तर गिळलं तिने आता इथे राहून आपल्याला गिळेपर्यंत वाट बघायची आहे का?"

दिनकरचा चेहरा हे सगळं ऐकल्यावर रागाने लालबुंद झाला.तो संध्या वर ओरडला पण रागा मुळे त्याचा आवाज चिरकला.

"संध्या माझी मनापासून इच्छा आहे की तुला काठीने बडवावं पण माझ्यावर तसे संस्कार नाहीत म्हणून मी गप्प आहे.मी गप्प आहे म्हणून मी तुझं काहीही ऐकून घेईन असा गैरसमज करून घेऊ नको. आपला विपूल आता नाही पण त्याची बायको म्हणून हर्षा इथेच राहिल.जर कधी तिच्या आयुष्यात कोणी दुसरा पुरूष आला आणि तिला त्याच्याशी लग्न करावसं वाटलं तर तिचं लग्न आपण लावून देऊ.आता यापुढे ती माहेरी सारखी का जाते? तिथेच कायमची का राहात नाही हे प्रश्न पुन्हा मला विचारायचे नाही.विचारलेस तर त्याचा जो परीणाम होईल तो भोगायला तयार रहा. शेवटची वाॅर्निंग देतोय तुला.कळलं?"

"तिचं पुन्हा लग्नं लावायचा प्रयत्न तुम्ही करा. मला त्यात ओढू नका. मला अजीबात ती मुलगी आवडते नाही."

" विपूल नी परस्पर लग्न ठरवलं याचा दोष त्या हर्षाला का देते.दोष द्यायचा असेल तर विपूलला दे.विनाकारण हर्षाचा काही दोष नसताना तिला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतेय."

एवढं बोलूनही दिनकरचा राग शांत झाला नव्हता पण संध्यालाही काही फरक पडला नव्हता.

***
भरत आज खूपच भावूक झाला होता. साधनाला जवळ बसवून भरत तिला म्हणाला,

"साधना तू माझं ऐकलं आणि इकडे आलीस याचा मला खूप आनंद झाला होता पण आता तो आनंद दुप्पट झाला आहे कारण आता आपलं बाळ येणार आहे. गेली आठ वर्ष मी या गोष्टीची वाट बघत होतो."

बोलताना भरता आवाज गहिवरला.

"भरत मी सुध्दा खूप खूष आहे. तेव्हा तू मला आपल्या घरी येण्याची सक्ती केली नसतीस तर कदाचित आज ही आज आनंदाची बातमी मिळाली नसती. बाबा म्हणाले "तुम्ही दोघं एकटे रहात होतात तरी आनंदात नव्हता‌ मग बाळाला तरी कसं यावं वाटेल.तू आता सगळ्यांच्या सहवासात आलीस आणि तुम्ही दोघंही मनातून आनंदी आहात म्हणून बाळाने तुमच्या आयुष्यात पदार्पण केलंय." बाबांचं म्हणणं मला पटलं."

"हो खरं बोललेत बाबा. आपण दोघी रहात होतो तरी माझ्या मनाला सतत या घरची ओढ लागलेली असायची.आईबाबांना इकडे भेटायला आलो की आपल्या घरी यावसच वाटतं नसे. आपल्यात भांडण होतं नव्हती पण बाबा म्हणतात तसा एक ताण होता."

भरतच्या आवाजात जरा निराशा होती. साधनाने ते बघीतले. तिने भरतचा हात आपल्या हातात घेऊन जरा थोपटला आणि म्हणाली

"आता नको मागचं आठवू. आता खूप छान दिवस आलेत. आपल्या घरचे माझी खूप काळजी घेतात. अक्षरशः पराग सुद्धा किती काळजी घेतो. आता मला कळतं मी माझ्या आयुष्यातील आठ वर्ष वाया घालवली. इतक्या प्रेमळ माणसांचा सहवास,त्यांचं प्रेम
मी स्वतःहून दूर लोटलं होतं. आईचं ऐकून नसत्या मानपानाच्या कुचक्या विचारात अडकून जगत होते. स्वतंत्र होते पण आपण दोघं आनंदात नव्हतो हे आता कळतंय. तुलाच थॅंक्स देते कारण तू जर कडक पाऊल उचललं नसतं तर आपण आजही वेगळेच राहिलो असतो."

"हो तू म्हणतेस ते खरय. तुझ्या बाबांनी जर मला हे करायला लावलं नसतं तर कदाचित मी असं वागलो नसतो. कारण मला असं काही करावं हे सूचलच नसतं. तुझे बाबा खूप ग्रेट आहेत.आपल्या संसारात त्यांनी कधी लुडबूड केली नाही. पण आपल्या संसारात काय कमी आहे आणि तुझ्या वागण्यात काय चुकतंय आहे हे बाबांनी बरोबर ओळखलं. म्हणून तू इकडे येण्याचं तू तुझ्या आईला बोलू नकोस हे त्यांनी तुला सांगीतलं."

"भरत माझी आई मला चुकीच्या गोष्टी सांगते आहे हे मला कधी कळलंच नाही. कारण माझा आईवर खूप विश्वास होता. कोणती आई आपल्या मुलीला चुकीच्या रस्त्यांनी जायला सांगेल. पण माझ्या आईने ते केलं. मला त्याचं वाईट वाटतंय. तुम्ही सगळे इतके चांगले असून मी तुमच्याबद्दल नेहमीच चुकीचा विचार करत राहिले."

"जाऊ‌‌ दे आता. जुनं‌ विसरून येणा-या दिवसांतला आनंद शोधूया."

भरतनी हसून साधनाचा गालगुच्चा घेतला तशी साधना लाजली.

" एवढी छान तू आजपर्यंत कधी लाजली नव्हतीस.हा क्षण माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे." भरत म्हणाला.

"मला एवढं लाजायला येईल असं तू बोलण्यासाठी आपण इतके प्रेमाने कधी जवळ आलोच नाही. गेल्या आठ वर्षांत हा इतका छोटासा आनंदाचा क्षणपण आपल्या आयुष्यात आला नाही. भरत किती छान गोष्टींना आपण मुकलोय इतक्या वर्षात हे आत्ता कळतंय." साधना म्हणाली.

"खरय आपण दोघच राहून सुद्धा इतकं प्रेमात आपण कधी आलोच नाही. कुठलीही रोकटोक नसताना आपण निखळ रोमान्स कधी अनुभवला नाही.जो आजूबाजूला चार माणसं असताना सुद्धा आज आपण अनुभवतोय. साधना मी नुसतं तू भाजी छान केलीस असं म्हटलं की तुझ्या डोळ्यातील तो आनंद ते प्रेम आपण दोघच असताना कधीच मला दिसलं नाही. कितीतरी हलके फुलके प्रेमळ क्षण आपण नाही वेचू शकलो. इतकी वर्ष वेगळं राहणं हा खरच आपला वेडेपणा होता."

" हो भरत खरच वेडेपणा होता. हा वेडेपणा माझ्याच हट्टापायी झाला. ऊशीरा का होईना आपण आपल्या प्रेमळ घरट्यात परत आलो हे खूप महत्वाचं आहे. चांगल्या माणसात आपलं बाळ सुद्धा छान पद्धतीने वाढेल. मनातून मी आजकाल इतकी आनंदी आणि प्रसन्न असते तेव्हा माझ्या लक्षात आलं की इतकी वर्ष असं आतून मनातून आनंदी असणं ही जाणीव मला कधीच झाली नाही. ही जाणीव जगण्यासाठी खूप महत्वाची आहे."
" हो. मलासुद्धा तेच वाटतंय. आता आपल्या बाळावरच घरच्यांचं लक्ष आहे. तुझ्यासाठी काय काय करायला आई आणि नित्या वहिनी धडपडत असतात.


साधनाने हसत मान डोलावली.
***
दिनकरचं नुकतच जेवण आटोपलं होतं. बडीशोप खात खात दिनकर पेपर चाळत असताना साधनाचा फोन आला.
" हॅलो.."
" बाबा घरी आहात?"
" हो."
" आई असेल नं समोर ."
" हो."

" काय हो कोणाचा फोन आहे फक्त हो… हो करताय?" संध्या ने शंकीत स्वरात विचारलं.

"अगं दिनेशचा फोन आहे."
दिनकरचं बोलणं ऐकून साधनाला कळलं आई समोरच आहे.ती दिनकरला म्हणाली

" बाबा संध्याकाळी तुम्ही फिरायला गेले की मला फोन करा.मी फोन ठेवते."

" बरं." दिनकर म्हणाला नंतर उगीचच फोन वर बोलल्या सारखं दाखवत होता.


" संध्याकाळी किती वाजता येऊ रे? नेहमीच्या ठिकाणी. बर.हं येतो.चल ठेवतो "

असं म्हणून दिनकरनी फोन बंद केला.


संध्या अजूनही दिनकरकडे शंकीत नजरेने बघत होती. कारण दिनकरच्या चेह-यावरचे भाव दिनेशशी बोलत असल्यासारखे वाटतं नव्हते. संध्याला संशय आला आहे हे दिनकरच्या लक्षात आलं पण त्याने त्याकडे दुर्लक्ष करून पेपर वाचायला घेतला.
___________________________क्रमश: पुढे काय झालं ते वाचा पुढील भागात.
सख्या तू पैलतिरी भाग बावीस
लेखिका…मीनाक्षी वैद्य

🎭 Series Post

View all