सख्या तू पैलतिरी भाग एकवीसावा

एका मुलीची कथा आहे.


सख्या तू पैलतिरी भाग एकविसावा

मागील भागावरून पुढे

हर्षा साधना कडे गेली. हर्षाला बघताच साधनाने तिला घट्ट मिठी मारली.

"अभिनंदन ताई." हर्षा म्हणाली.

"खूप छान वाटलं तू आलीस."

"अरे हर्षा आलीस का!" हर्षाला बघताच मंगलाताई म्हणाल्या.

"हो काकू."

"ये कधीची वाट बघतेय साधना तुझी."

"हो साॅरी मला यायला थोडा उशीर झाला."

"असू दे ग आज सुट्टी नं तुला उशीरा उठली असशील."

"हो.आईकडे आलेत नं."

"माहेर यालाच म्हणतात."

"खरच माहेरी जे करतो ते सासरी करू शकत नाही असं नाही पण…"हर्षा मध्येच बोलायचं थांबली.

"अगं सासरी असताना सूनेची भूमिका डोक्यात असते. माहेरी गेलं की लेकीची भूमिका असते. त्यामुळे हा फरक पडतो." मंगलाताई म्हणाल्या.

"खरय तुमचं काकू. मलासुद्धा असंच वाटतं. साधनाताई काय खावंसं वाटतंय? तुम्हाला आवडतात म्हणून काजू कतली आणली आहे .बाळाला हवी नं"

"वा !का नको मामींनी आणली आहे मग बाळ नक्कीचं खाणार.दे लवकर."

"घ्या."

हर्षा पर्समधून काजूकतलीचा डबा काढते.

"मी हलवाई कडून सरळ इकडेच आले.."

"हं.मस्त आहे काजू कतली."

"काकू काय खातेस तू?" परागने विचारलं

"अरे हर्षामामींनी साधनाकाकूसाठी आणलय." नित्या वहिनी परागला म्हणाल्या.

"अहो वहिनी हर्षानी जरी बाळासाठी खाऊ आणलय तरी पराग हा दादा आहे नं बाळाचा. त्याला नाही दिली काजू कतली तर बाळ ओरडेल. घे रे पराग."

"नको काकू तूच खा."

"अरे मी एकटी खाणार का एवढी! घे."

शेवटी आईकडे बघत पराग समोर सरकला.आईने खा म्हटल्यावर लगेच काजू कतली परागच्या तोंडात गेलीसुद्धा.

"साधनाताई नाव कुठे नोंदवलं?"

"नित्या वहिनीची जिथे डिलीव्हरी झाली तिथेच. त्या डाॅक्टर नित्या वहिनीची बहीणच आहे."

"होका मग छान झालं."

"हर्षा तुला आलू पराठे खूप आवडतात असं मागे विपूल बोलला होता म्हणून आज केले." मंगलाताई म्हणाल्या.

हर्षाचा चेहरा एकदम पडला.

"साॅरी हर्षा मला तुला दुखवायचं नव्हतं."मंगलाताई म्हणाल्या.

नित्या वहिनी तिच्या बाजूला बसून तिच्या पाठीवर त्यांनी हात फिरवला.एक हुंदका हर्षाच्या तोंडून बाहेर पडला पण लगेच तिने स्वतःला सावरलं

"ठीक आहे वहिनी. मला अजून विपूलची येते आठवण."

"अगं तुला विपूल ची आठवण येणारच शेवटी तू बायको आहेस त्याची आणि खूप कमी दिवस तुमचा संसार झाला.पण तू एवढ्या मोठ्या धक्क्यातून बाहेर आलीस हे आमच्यासाठी महत्वाचं आहे." नित्या वहिनी हर्षाचा हात हातात घेऊन म्हणाल्या

"याला कारण माझी आजी." हर्षा म्हणाली.

"ती कशी काय?" साधनाने विचारलं.

"माझी आजी आज नव्वदीची आहे. माझे आजोबा गेले तेव्हा ती फक्त वीस वर्षांची होती आणि तिच्या पदरात तीन लहान मुलं होती.

मी विपूलच्या दु:खातून बाहेर येत नव्हते तेव्हा आजींनी तिची आपबिती मला सांगितली आणि माझे डोळे उघडले."

"तुझ्या आजीला त्याकाळात बरंच सोसावं लागलं असेल!"

"हो मला ती म्हणाली मी विधवा झाले त्यावेळी तुझ्यापेक्षा लहान होते, शिक्षण नव्हतं, पदरात तीन मूलं होती. मला फार काळ नव-याचं दु:ख करायला सवड नव्हती. तुला नोकरी आहे, पदरी मूल नाही मग का दु:खाच्या दरीत स्वतः ला ढकलतेस? बाहेर ये."

"केवढी पुढारलेली विचारसरणी आहे तुझ्या आजीची." मंगलताई कौतुकाने म्हणाल्या

"माझ्या आजीला तिच्या सासूसास-यांनी खूप आधार दिला. ती म्हणते त्यांनी आईवडील होऊनच मला सांभाळलं."

हर्षाच्या हातावर हात ठेवून साधना तिला म्हणाली

"हर्षा तू एकटी नाहीस. आम्ही सगळे आहोत तुझ्याबरोबर."

"हो हर्षा आम्ही आहोत तुझ्याबरोबर. झालंते विसरून जा. कठीण आहे विसरणं पण प्रयत्न कर. तुला जेव्हा वाटेल तेव्हा आमच्याकडे येत जा." मंगलाताई म्हणाल्या

"हो काकू.त्यादिवशी गणपतीला तुमच्याकडे आले होते तेव्हा मला खूप पाॅझेटिव्ह वाटलं तुमच्या कडचं हसणं खेळतं वातावरण मला खूप आवडलं.तेव्हाच मी ठरवलं की आपण नव्याने आयुष्याला सुरुवात करायची. जे झालं ते आपल्या हातात नव्हतं मग त्यावर फार विचार कशाला करायचा."


,"अगदी बरोबर बोललीस.."नित्या वहिनी म्हणाल्या.


"हर्षा माझी आई तुला काहीही म्हणाली तरी त्याकडे तू लक्ष देऊ नको. तिला कुठे सूख,आनंद नांदलेला बघवत नाही." साधना हर्षाला म्हणाली.


मंगलाताई आणि नित्या वहिनी चकीत होऊन एकमेकींकडे बघू लागल्या तेव्हाच साधनाचा त्यांच्याकडे लक्ष गेलं तशी ती म्हणाली

"आई मी खरंच बोलते आहे.आज इतकी वर्ष मी वेगळी का राहिली. आईनेच काही उलटं सुटलं माझ्या डोक्यात भरवून ठेवलं होतं.बाबा मला कितीदा तरी सांगायचे पण मी कधीच त्यांचं ऐकलं नाही भरतने त्यादिवशी मला शेवटलं ऑप्शन दिलं नसतं तर मी इकडे राह्यला आले नसते. आता वाटतंय आठ वर्ष मी सुखाचे क्षण घालवले. आधीच इकडे आले असते तर हे बाळ पण लवकर आलं असतं."

बोलताना साधनाच्या डोळ्यातून घळघळ पाणी वाहू लागलं. नित्या वहिनींनी तिला जवळ घेतलं. पाठीवरून हात फिरवत म्हणाल्या

"साधना \"देर आहे दुरुस्त आये\" असं म्हणतात. आलीस हे किती छान झालं आता आपल्या घरात आनंदच आहे. आता मागचे आठ वर्ष विसरून पूर्ण लक्ष आता बाळाकडे द्यायचं."

"हो वहिनी."

कितीतरी वेळ साधना नित्यावहिनीच्या कुशीत होती.

हर्षाच्या डोळ्यातून हे दृष्य बघून पाणी येऊ लागलं.

हर्षाच्या पाठीवरहात ठेऊन म़गलाताईंनी हळूच थोपटला तसं हर्षाला गहिवरून आलं.
किती तरी वेळ दोघी तश्याच बसल्या होत्या. शेवटी नित्या वहिनी गमतीने म्हणाल्या

"चला साधनाच्या बाळाला भूक लागली असेल आलू पराठा खायचा नं?"

त्यांच्या या बोलण्यावर परागने विचारलं

"आई बाळ तर साधना काकूंच्या पोटात आहे मग तो कसा खाईल? "

त्याच्या या प्रश्नावर सगळे हसले. वातावरण जरा हलकं फुलकं झालं. ते बघून नित्या वहिनींना बरं वाटलं.

हर्षाला साधना कडे खूप छान वाटलं. याही वेळी ती खूप पाॅझेटिव्ह एनर्जी घेऊन निघाली.

***

हर्षाला खूप दिवसांनी इतक्या आनंदात बघीतलं म्हणून वासंती, श्रीकांत आणि आजींना बरं वाटलं.

हर्षा जेवताना सुद्धा खूप बडबड करत होती. परागच्या गमती जमती सांगत होती. तिच्या आनंदात घरचे सगळे सामील झाले होते.

रात्री झोपताना हर्षाने काव्याला मेसेज केला.

"आज मी साधनाताईंकडे गेले होते.खूप छान वाटलं."हर्षा

"अरे वा! अचानक ठरलं का तुझं साधनाताईं कडे जायचं काल काही बोलली नाहीस." काव्या

"काल मी ऑफीस मधून घरी गेल्यावर बाबा म्हणाले तू माहेरी जाऊन ये दोन दिवस."हर्षा

"तुझ्या सासूबाई काही म्हणाल्या नाही"काव्या

"नाही.त्या काहीच बोलल्या नाही. मीपण फार विचारलं नाही. आज सकाळी इकडे आले. मग संध्याकाळी साधनाताईंकडे गेले होते. सोमवारी ऑफीसमधून घरी जाईन."हर्षा

"साधनाताई कडचे सगळे लोक छान आहेत त्यामुळे तुला त्यांच्याकडे अवघडल्यासारखं वाटत नसेल." काव्या

"हो ग. मी इथे सासरी अवघडल्यासारखी असते.साधना ताईंच्या घरून खूप पाॅझेटिव्ह एनर्जी घेऊन निघाले."हर्षा

"तुझं आणि साधना ताईंचं नातं आता जुळत आलंय.मला खूप छान वाटतंय." काव्या

"अगं साधनाताई स्वतः मला म्हणाल्या की माझ्या आईला खूष करण्यासाठी तू धडपड करू नकोस. तिच्याशी कितीही चांगलं लागलं तरी ती कधीच समाधानी नसते." हर्षा

"काय सांगते !साधनाताई असं म्हणाल्या?"
काव्या

"हो मीच काय त्यांच्या सासूबाई आणि जावेला पण आश्चर्य वाटलं." हर्षा

" अगं वाटणारच. कोणी एकदम आपल्या आईविषयी बोलत नाही." काव्या

"होनं. पण मी आज खूप खूष आहे. साधनाताईंकडे जायला मला आता फार आटापिटा करावा लागणार नाही.सासूबाईंना खूप कारणं सांगावी लागणार नाहीत." हर्षा

"हं. मग झोपणार आहेस की नाही?की या आनंदात जागी राहणार आहेस?" काव्यानी हसत विचारलं.

" नाही ग बाई जागणे कसली. झोपणार आहे. चल ठेवते. शुभ रात्री" हर्षा

"शुभ रात्री" काव्या

हर्षा फोन बंद करून झोपेच्या अधीन व्हायचा प्रयत्न करू लागते.

***
हर्षा साधनाच्या घरून निघाल्यावर साधनाच्या घरी बराचवेळ तिच्याबद्दलच बोलणं चालू होतं.

"हर्षा किती गुणी मुलगी आहे आणि तिच्या आयुष्यात हे काय घडलं.किती लहान वयात वैधव्याचा ठपका बसला."मंगलताई गहिवरून बोलल्या.

"हो खरय तुम्ही म्हणता ते. ती आपल्या घरी आली आणि एकदम घरात कीलबिल सुरू झाली." नित्या वहिनी म्हणाल्या.

"माझ्या आईने हर्षाबद्दल खूप वेडंवाकडं सांगून माझं मन कुशीत केलं होतं. तिच्याबद्दलच नाही तर तुमच्या विषयी म्हणजे आई तुमच्या आणि नित्यावहिनी विषयी पण वेडंवाकडं सांगीतलं म्हणून मी अशी वागले." साधना रडवेल्या स्वरात म्हणाली.

"असू दे आता जुन्या गोष्टी. आता तुला कळलाय नं आमच्या सगळ्यांचा स्वभाव." मंगलाताई म्हणाल्या

"हो" साधना उत्तरली.

"मग आता नव्याने आयुष्याची सुरुवात कर.तुमच्या दोघांची ओळख सागणारं कुणीतरी आता या जगात येणार आहे नं."
मंगलताईंनी साधनाला प्रेमानी समजावलं.

"हो"साधनाला सासूबाईंचं प्रेम बघून गहिवरून आलं.

" मग आता कटू आठवणी आठवून त्रास करून घ्यायचा नाही." पुन्हा मंगलताईंनी साधनाला बजावलं.

" साधना आता या अवस्थेत फार निगेटिव्ह विचार करायचा नाही.कळलं!" नित्या वहिनी म्हणाल्या.

"हो.आता नाही मी काही विचार करणार. बाळाची तब्येत माझ्यासाठी महत्वाची आहे." साधना हसुन मंगलताई आणि नित्या वहिनींना म्हणाली.

"काकू मी अजून एक काजू कतली घेऊ?"

"हो घे नं" साधना म्हणाली.

साधना आज हर्षाली भेट झाल्यामुळे खूष होती.आपल्या पोटावर हात फिरवत साधना म्हणाली
"बाळा आपली हर्षा मामी आली होती बर का!" आणि स्वतःशीच हसली.

___________________________
क्रमशः पुढे काय झालं ते वाचा पुढील

🎭 Series Post

View all