सख्या तू पैलतिरी भाग पंधरावा

एका मुलीची कथा


सख्या तू पैलतिरी भाग भाग १५
मागील भागावरून पुढे

आज हर्षा सकाळी लवकर उठून स्वयंपाकघरात चहा करायला आली. तिचा चेहरा एकदम फ्रेश होता. दिनकरच्या ते लक्षात आलं त्याला मनातून खूप बरं वाटलं. आपल्या मुलांच्या जाण्याचं दुःख त्याला होतच पण इतक्या लहान वयात हर्षावर वैधव्य आलं याचं त्याला वाईट वाटत होतं.पण काल गणरायानी जादू केलेली दिसतेय.

"गुड मॉर्निंग हर्षा"

" गुड मॉर्निंग बाबा. चहा करतेच आहे."

" हं कर सावकाश घाई काही नाही."

दिनकरच्या लक्षात आलं आज हर्षाच्या हालचालीतपण खूप उत्साह दिसतो आहे.

" हर्षा तुला क्रिकेट मॅच आवडते का?"

" आवडते पण अगदी सुरवातीपासून बघायला आवडतं. चौकार, फटकार फक्त कळतात.बाकी काही कळत नाही." आणि हसायला लागली.

" बाकी कुठले खेळ आवडतात ?"

" मी शाळेत असताना बास्केटबॉल शिकत होते.
पण माझं निवड झाली नाही टीमसाठी मग सोडून दिलं खेळणं."

बोलता बोलता हर्षाचा चहा तयार झाला. हर्षा चहा घेऊन डायनिंग टेबल पाशी आली तिथे दिनकर पेपर वाचत होता. पेपर वाचता वाचता चहा घेणं हा त्याचा दिनक्रम होता. चहा झाला की तो फिरायला जात असे.

" चहा. " चहा आणि बिस्कीटं हर्षानी टेबलवर ठेवली तेवढ्यात संध्या आली.

" आई चहा आणून तुमच्यासाठी."

" हं"

"गुड मॉर्निंग होम मिनिस्टर" दिनकर नी मिस्कीलपणे म्हटलं.

" हं."

"आजकाय एकाक्षरी उत्तर देण्याचं व्रत आहे का?"

संध्यानी काही उत्तर दिलं नाही. हर्षानी तिचा चहा टेबलवर आणून ठेवला.

आता सासूबाईंच्या कोणत्याही बोलण्याचा आपल्यावर परीणाम होऊ द्यायचा नाही हे हर्षानी ठरविल्यामुळे ती आज खूप सहजपणे घरात वावरत होती. दिनकरच्या हे लक्षात आलं. संध्याला मात्र तिच्यात अचानक बदल कसा काय झाला हे कळत नव्हती. ती तिच्या सवयीप्रमाणे याच शोध घेत बसली.

हर्षा चहा घेऊन आपलं आवरायला खोलीत गेली.

***

ऑफीसमध्ये पोहचताच आपल्या डेस्ककडे जाता जाता हर्षा काव्याकडे बघून म्हणाली,

" गुड मॉर्निंग काव्या."

" गुड मॉर्निंग." हर्षाचा प्रफुल्लित चेहरा बघून काव्याला आनंद झाला.

दोघी आपापल्या कामाला लागल्या.

***

लंच टाईम मध्ये दोघी कॅन्टीनमध्ये नेहमीच्या ठिकाणी डबा खायला बसल्या.

" हर्षा आज एकदम फूल चार्ज दिसतेस?"

"हो. आजपासून मी नव्यानी जगायला सुरुवात करायची ठरवलं आहे. काल साधनाताई कडे गेले होते. त्यांच्याकडे खूप खेळकर वातावरण आहे. त्यांच्याकडून मला खूप ऊर्जा मिळाली. शिवाय गणपतीबाप्पांचीपण कृपा आहे की मला नव्याने आयुष्य सुरू करण्याची इच्छा झाली. आज घेऊया आपलं स्टोरी टेलींग."

" अरे वा! आज मस्त ऐकायला मिळणार. आज काय सांगणार आहेस?"

" विपूलची आणि माझ्या आईबाबांशी मी भेट घडवून दिली ते.

एक दिवस हर्षा विपूलला म्हणाली,

" विपूल तुझी आणि माझ्या आईबाबांची भेट कशी घडवायची? काही सुचतंय का?"

"अगं मघाशी माझ्या डोक्यात आलं ते तुला पटतंय का बघ. तुझ्या आईबाबांना नाटकं बघायला आवडतात का?"

" प्रचंड आवडतात."

" तुला?"
" मलासुद्धा आवडतात."

"प्रशांत दामले आणि कविता लाडचं \"एका लग्नाची दुसरी गोष्ट\" नाटक चालू आहे. आपण जर नाटकाच्या निमित्ताने भेटलो तर!"
"
कल्पना छान आहे.आजच तिकीट बुक करू.

"ऑनलाईन तिकिटं नाही काढायची.मी थिएटरवर जाऊन पाच तिकीटे काढतो. तीन तू घे. मी आणि जिजू येऊ. खुर्चीवर बसताना माझी आणि तुझ्या बाबांची सीट आजूबाजूला येईल असं बघू. ते तिकीट काढल्यावर आपल्याला कळेल."

"तू बाबांजवळ बसून काय होणार?"

" बाबांना ऐकू जाईल अश्या नाटकावरच्या छान अभ्यासू कमेंट करीन."

" तुझ्या कमेंट ऐकतील की नाटक बघतील?"

"ते नाटक बघता बघता माझ्या कमेंट ऐकतील तू लिहून घे. नाटकाच्या मध्यंतरात आपण एकमेकांना अचानक पाहिल्यासारखं करायचं. मग तू माझी ओळख करून दे. जीजूंची ओळख मी करून देईन."

" नंतर?"
" नंतर मी विषयाला सुरुवात करीन.

"म्हणजे सरळ सांगशील आपल्याला लग्न करायचंय."

"नाही ग. नाटकाच्या गप्पांमधून बोलणं सुरु झालं की आपोआप ते काही वेळानंतर मी काय शिकलो आहे, मी कुठे नोकरी करतो, माझ्या घरी कोण कोण आहे, माझे वडील काय करतात हे सगळं विचारतील."

"तू ठामपणे कसं सांगू शकतोस?"

"बघ तू नाटकाच्या दिवशी."

"समजा असं सगळं बाबा बोलले नंतर काय?"

"नंतर सगळ्या नाॅर्मल गप्पा. आपल्या दोघांमध्ये काहीतरी आहे असा त्यांना संशय येईल असं आपण वागायचं."

"ऐ काहीतरीच काय! समजा तिथेच त्यांनी सरळ विचारलं तर !"

"सांगू या खरं ते.घाबरायचं कशाला?"

"नाट्यगृहात सांगायचं?"

ते नाट्यगृहात हा विषय बोलणार नाही. तुम्ही घरी गेल्यावर ते विचारतील."

\"तसं झालं तर लगेचच सांगावं लागेल."

"सांगायचं. तू का एवढी घाबरतेस. ऐ तुझा माझ्याशी लग्न करण्याचा विचार पक्का आहे नं! की बदलला? "

"अरे काहीतरी काय बरळतोस! ताबडतोब घरी गेल्यावर विचारलं तर मी सांगू कसं हा मला प्रश्न पडला आहे."

ए"खाद्या वेळेस त्याच दिवशी नाही विचारणार. कदाचित तू घरी नसताना दोघं एकमेकांशी बोलतील मग संध्याकाळी तू घरी गेल्यावर तुझ्याशी बोलतील."

"काय जबरदस्त आत्मविश्वास आहे तुला विपूल. तू कुठला स्क्रीन प्ले लिहीतो आहेस असं नाही नं कारण हा सिनेमा नाही.आपलं खरं आयुष्य आहे."


"ए वेडाबाई मी असं काही समजत नाही.मी माझे
ठोकताळे सांगतो आहे. त्या दिवशी नाही विचारलं तरी दोन दिवसांनी विचारतील तेव्हा न घाबरता सगळं सांग. त्याशिवाय आपल्या लग्नाची गाडी कशी पुढे सरकेल?"

"हो. सांगीन सगळं. पण आधी तिकीटे आहेत बघ."

"हो आत्ताच सर्च करतो."

विपूल मोबाईल वरून चेक करतो,

"अगं आहे या शनीवारी हे नाटक. आजपासून तिकीट विक्री सुरू आहे. मी आत्ता जाऊन बघतो तिकीट मिळतात का? नाही मिळाली तर ऊद्या ऑफीस नंतर जाऊन तिकीट काढतो. तिकीटं काढली की तुला मेसेज करतो. मग तू आईबाबांना विचार."

" काय भारी प्लॅनिंग करतोस विपूल तू!"

"मग. चल आठ वाजून गेले.जाऊया."

"काल माझी स्कूटी सर्विसींग करून आली आहे.आई कालच म्हणाली बस्स झालं आता बसली जाणं.तिला काय माहिती मी बसली का जाते."

" हर्षा तुझी स्कुटी खराब झाली म्हणून आपली भेट झाली नाहीतर माहीती नाही आपण भेटलो असतो की नाही?"

" हो नं."
"हर्षा तू रिक्षांची जा.मी तिकीट काढायला पळतो."घाईघाईने विपूल नाटकाची तिकीटे काढायला गेला.
हर्षा ने येणारी एक रिक्षा थांबवली आणि घराच्या दिशेने निघाली.
***

रात्री हर्षा आणि तिचे आईबाबा जेवायला बसले होते.अवांतर गप्पा चालू होत्या.त्यात हर्षाचं लक्ष सारखं मोबाईल कडेच होतौ तेव्हाच विपूलचा मेसेज आला नाटकाची तिकीटे मिळाली आता तू आईबाबांजवळ विषय काढ.

" याहू" हर्षा आनंदानी जवळ जवळ किंचाळली.

" अगं किती झालंय एवढं किंचाळायला?" बाबांनी हर्षाला विचारलं.

" आई तुम्हा दोघांना ते प्रशांत दामले आणि कविता लाडचं नवीन नाटक बघायचं आहे नं?"

" हो.पण त्याचं काय? त्याच्यासाठी एवढ्यांदा ओरडलीस" आईच्या आवाजात आश्चर्य होतं.

" अगं ते नाटक आहे या शनीवारी आजपासून थिएटरवर तिकीट विक्री सुरू होणार आहे. मी ऑफीस नंतर जाऊन तिकीट काढून येते."

" अगं तू तर सगळं ऑनलाईन बुक करतेस. आज कशी काय जाणार थिएटरवर?" बाबांनी आश्चर्याने विचारलं.

" बाबा मी विचार केला कधीतरी लाईनीत उभं राहून बघावं. म्हणून थिएटरवर जाऊन तिकिटं बुक करणार दुसरं काही नाही." हर्षा हसतच म्हणाली.

आईबाबांनी पण त्या गोष्टीला एवढं महत्व दिलं नाही. तिघांची गप्पा मारत जेवणं झाली. हर्षा आज एका वेगळ्याच भावनेनी रोमांचित झाली.

आज झोपेतही आपल्याला नाटकाच्या दिवशीची स्वप्नं आधीच पडणार बहुदा असं हर्षाला वाटलं आणि तिला हसायला आलं.
***
आजची सकाळ हर्षा साठी खूप उत्साहवर्धक पेय बनून आली. कारण परवा नाटकाच्या दिवशी विपूलच्या बघण्याचा कार्यक्रम होणार आहे. विपूलला बघणार कोण? तर तिचे आईबाबा.या गोष्टीनीच तिला खुदकन हसू आलं जगावेगळा बघण्याचा कार्यक्रम होणार आहे.
***
"काव्या असं सेटिंग केलं नं विपूलनी माझ्या आईबाबांशी की त्यांनी सांगीतलेल्या ठोकताळ्यां प्रमाणे सगळं घडलं. विपूलनी माझ्या आईबाबांवर खूप मस्त इंप्रेशन जमवलं. म्हणून पुढल्या गोष्टी सहज शक्य झाल्या."

"विपूल खूप हुशार गडी होता."

" हो."

"काव्या आज मला खूपच सकारात्मक वाटतंय. मी ठरवलं कालच साधनाताईंकडून आल्या आल्याच की आपण आता निराशेच्या साखळ्या स्वतःभोवती बांधून घ्यायच्या नाहीत. प्रत्येक क्षण जगायचा.माझ्या करीयरचा विचार करायचा."

" गुड. मलापण तुझा हा निर्णय ऐकून खूप आनंद झाला.मी स्टोरी टेलींगचा प्रयोग तुला दु:खाच्या दरीतून बाहेर काढण्यासाठी केला आज तो यशस्वी झाला आहे. आता या स्टोरी टेलींग सारख्या गोष्टींचा टेकू म्हणून तुला आधार लागणार नाही. हर्षा आयुष्यात खूप पुढे जा. तूपण खूप हुशार आहेस. विपुलचं जाणं तुझ्या आयुष्याचा भूतकाळ कर. खूप शुभेच्छा."

काव्याच्या डोळ्यातून झरझर पाणी येऊ लागलं.हर्षाने चटकन तिला घट्ट मिठी मारली.


"काव्या तुझ्या मदतीमुळेच मी या बॅडपॅचमधून बाहेर पडू शकले. तू नसती तर मी कदाचित आयुष्यभर या दु:खाच्या सापळ्यात अडकून पडले असते. तूच मला फिनीक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा उठून उभं राह्यला बळ दिलस. खूप आभारी आहे ग तुझी."

" हर्षा मला देवत्व नको देऊ. मी तुझी जिवलग मैत्रीण असल्याने मला बघवलं नाही.खरतर मी काहीच केलं नाही. आपली घट्ट मैत्री बघून देवानेच बहूदा हे करवून घेतलं माझ्याकडून."

दोघी एकमेकींना मिठी मारून उभ्या होत्या.
—----------------------------------------------
क्रमशः पुढे काय झालं ते वाचा पुढील भागात
सख्या तू पैलतिरी भाग पंधरावा
लेखिका. मीनाक्षी वैद्य

🎭 Series Post

View all