सख्या तू पैलतिरी भाग चौदावा

एका मुलीची कथा


सख्या तू पैलतिरी भाग चौदावा
मागील भागावरून पुढे

साधना कडे जायचं म्हणून हर्षा साडी नेसली.फार भडक नाही साधी पण डिसेंट दिसेल अशी प्युअर सिल्की साडी नेसली.

हिरव्यागार साडीला पिवळे काठ आणि पदर होता. काठा पदरावर पांढरी नाजूक फुलं होती. साडी फारच छान दिसत होती.

गळ्यात सोन्याची चेन कानात सोन्याचे टाॅप्स, एका हातात घड्याळ आणि एका हातात सोन्याचं कंगन घालून हर्षा तयार झाली.

हर्षालापण या छान तयार झाल्यामुळे आनंद वाटत होता. ती तयार होऊन बाहेरच्या खोलीत आली. दिनकरनी तिला बघताच म्हटलं,

"अरे वा! आज छान दिसतेस तू. "

"थॅंक्यू बाबा." हर्षा स्मीत हास्य करत म्हणाली.

" खूप दिवसांनी तू अशा वेगळ्या ड्रेस मध्ये दिसलीस त्यामूळे मला खूप छान ‌वाटतय. छान साडी घातली आहेस तर थोडा हसरा चेहरा ठेव. गणपती बाप्पाचं स्वागत करायचं आहे नं?"

"हो.पण विपूल गेल्यानंतर पहिल्यांदा अशी बाहेर जाते आहे.नवीन साडी घातली आहे म्हणून थोडी अवघडली आहे."

"अवघडायचं कशाला? आपण चांगल्या कार्यक्रमासाठी चाललो आहोत.गणतीच्या स्थापनेच्या दिवशी आपण साधना कडे चाललो आहोत. गणपतीचं स्वागत करायला असं छान तयार व्हायला हवं. गणपतीला पण येताना प्रसन्न वाटायला हवं. मी म्हणतो ते बरोबर नं.छान दिसतेयस."

दिनकरच्या बोलण्यानी हर्षाचं अवघडलेपण
दूर झालं. सासूचा चेहरा मात्र लांबच होता.ते बघून हर्षा पुन्हा हिरमुसली. पण तेवढ्यात तिला काव्याचे शब्द आठवले आणि हर्षानी आपल्या मनावर आलेला ताण झटकून टाकला.

दिनकर,संध्या आणि हर्षा तिघही साधना कडे जायला निघाले. संध्या ने एकवीस मोदक आणि एकवीस दुर्वांच्या जुडींचा हार घेतला.

पार्किंग लाॅटपाशी येताच दिनकर नी गाडीची किल्ली हर्षाकडे देत म्हटलं,

" हर्षा आज गाडी तू चालव."

" मी?"

" हो. तुला चारचाकी चालवता येते हे मला माहीत आहे. चालव बिनधास्त."

हर्षा बराच वेळ गाडीच्या किल्लीकडे बघत बसली.

" अगं विचार कसली करतेस चल."

"ऐ तुला नक्की येते नं गाडी चालवता? नाहीतर साधनाच्या घरी पोचण्याऐवजी देवाच्याच घरी पोहचू."

"संध्या शुभ बोल. हर्षाला व्यवस्थित गाडी चालवता येते. तेवढी खात्री मला नसती तर मी हर्षाला गाडीच्या किल्ल्या दिल्या असत्या का? तुला कुठे दिल्या मी अजून गाडीच्या किल्ल्या?"

"आली का तुमची गाडी माझ्यावर? बोलायची सोयच राहिली नाही."

यावर हसत दिनकर म्हणाला,

" अगं नकोच बोलू.चल बस गाडीत."

एवढं बोलून दिनकर गाडीत पुढच्या सीटवर बसला. ड्रायव्हिंग सीटवर हर्षा बसली हर्षानी गाडी सुरू केली तेव्हा नाईलाजाने संध्या गाडीचा मागचं दार उघडून गाडीत बसली.

एक सफाईदार वळण घेऊन हर्षानी गाडी पार्कींग लाॅटच्या बाहेर आणली. हे बघून दिनकरचा चेहरा खुलला आणि त्यांच्या तोंडून सहज निघालं,

" वा! मस्त वळण घेतलंस.गुड."

हर्षाला खूप आनंद झाला.अचानक आपला आत्मविश्वास वाढला आहे असं तिला जाणवू लागलं.
***

तिघही साधनाच्या घरी पोचले. साधनाचा फ्लॅट तळमजल्यावर असल्याने समोरच्या फाटका समोरच संस्कार भारतीची सुंदर रांगोळी काढलेली होती. खालचच घर असल्याने घराभोवती कंपाऊंड घातलेलं होतं आणि आतमध्ये फुलांची झाडं लावलेली होती. या फुललेल्या झाडांमुळे घराचा परीसर विलोभनीय दिसते होता.तिघं घरात शिरले.

" नमस्कार विलासराव" दिनकरनी भरतच्या वडलांना नमस्कार केला.

"नमस्कार. अगदी वेळेवर आलात तुम्ही. आम्ही निघतोय आहे गणपती आणायला."

" अरे वा! चला मीपण येतो." दिनकर विलासरावांना म्हणाला.

भरत,त्याचा मोठा भाऊ नितीन विलासराव आणि दिनकर सगळे गाडीने गणपतीची मूर्ती आणायला बाजारात गेले.

घरात साधनेच्या जावेनी नित्यानी छान सनई लावली. सनईमुळे वातावरणात एक प्रकारचं मांगल्य आलं.

" हर्षा आज किती छान दिसतेय." साधना म्हणाली.

"होग हर्षा आज खूप छान फ्रेश दिसतेस. तुझ्या साडीचं कलरकाॅम्बीनेशन फार आवडलं मला." नित्या म्हणाली.

दोघींचं बोलणं ऐकुन हर्षाला खूप छान वाटलं. आपला आत्मविश्वास आणखी वाढला हे हर्षाला जाणवलं.

संध्यानी फक्त नाक मुरडलं.

"नित्या ही बोरमाळ बघीतलीस मागच्या दिवाळीच्या वेळी केली."

संध्या आपल्याकडे कोणीच लक्ष देत नाही म्हणून आपली बोरमाळ नित्याला दाखवून तिचं लक्ष आपल्याकडे वेधायला बघत होती.

नित्यानी मात्र खूप उत्साह दाखवला नाही.कारण ही संध्याची नेहमीचीच सवय होती. त्यांचं लक्ष हर्षा कडे होतं. ती दु:खा तून ब-यापैकी सावरली हे बघून नित्या, साधना आणि तिची सासू मंगलाताई तिघींना बरं वाटलं.

" काकू तुम्ही ही बोरमाळ केली हे सांगीतलं मागच्या वेळेस."

नित्याचा हा थंड प्रतिसाद बघून संध्याला फार राग आला.ती चेहरा फुरगटून बसली.

" नित्या गणपतीच्या स्थापनेसाठी लागणारं सगळं सामान व्यवस्थीत आहे नं?"मंगलताई धनी मोठ्या सुनेला विचारलं.

"हो आई सगळं आहे. तुम्ही बाहेर या. एवढ्यात येतीलच ही मंडळी." नित्या मंगलताईंना म्हणाली.

"हो.आले." नॅपकीनला हात पुसत मंगलताई बाहेर आल्या.

हर्षा कडे बघून छान हसल्या.हर्षाने पटकन त्यांना खाली वाकून नमस्कार केला.

"निरामय हो. हाच आशीर्वाद देते. पुढे तुझ्या कर्तृत्वाला वाव दे."

त्यांच्या या बोलण्याने हर्षाला पुन्हा एकदा जाणवलं की आपला आत्मविश्वास वाढला आहे. इतका सकारात्मक विचार ज्या घरात असेल तिथे किती छान सगळं घडत असेल. नकळत क्षणभर हर्षानी मंगलाताईची आणि संध्याची तुलना केली त्यात मंगलाईं सरस ठरल्या. तिनी त्यांना शंभर टक्के मार्क दिले.

एवढ्यात नितीनचा मुलगा पराग धावत धावत घरात आला आणि म्हणाला,
"आई आजोबा घेऊन आले गणपती बाप्पाला."

"चला सगळे दाराशी." मंगलाताई म्हणाल्या.
सगळेजण समोरच्या दाराशी आले. नित्या हातात औक्षवणाचं तबक घेऊन आली.

नितीन हातात गणपतीची मूर्ती घेऊन दारात उभा होता. साधनाने नितीनच्या पावलावर दूधपाणी घातलं. नित्याने बाप्पाला औक्षवण केलं नंतर नित्या आणि साधना दोघी दारातून बाजूला झाल्या.

" गणपती बाप्पा मोरया." परागनी जोरात ओरडून म्हटलं.

नियतीने बाजूच्या टेबलावर अक्षतांवर गणपती बाप्पाला ठेवलं.

गुरूजी आलेलेच होते. त्यांनी यथासांग पूजा सांगीतली. नितीनने गणपती बाप्पाची स्थापना केली.
नंतर आरती झाली. मंगलताईंनी एकविसाव मोदकांचा नैवेद्य दाखवण्यास दिला.

संध्यानेही तिच्याबरोबर आणलेले उकडीचे मोदक नैवेद्यासाठी दिले. दोन्ही घरच्या मोदकांचा नैवेद्य दाखवण्यात आला.

"आई मला भूक लागली. लवकर मोदक देनां." परागने अजीजीने नित्याला म्हटलं.

" हो देते आहे.घे आणखी एक घे."
परागला दोन दोन मोदक बघून खूप आनंद झाला.
नंतर सगळ्यांची हसत खेळत जेवणं झाली.

हर्षाला साधनांचा हसतं खेळतं घर खूप आवडलं
या घरातून आपण खूप मोठी ऊर्जा घेऊन जातोय हे कळलं.इतक्या छान घरात साधनांनी राहू नये असं का सासूबाईंना वाटतं हे कोडं हर्षाला उलगडत नव्हतं.
***
साधनाताईंकडून घरी आल्यावर हर्षा मनातून खूप आनंदीत होती.
तिने आजच्या दिवसाची सगळे प्रसंग काव्याला मेसेज वरून कळवलं.

काव्याने,"अभिनंदन तुझं. तुझा आत्मविश्वास वाढला आहे असं तुला वाटतंय त्याबद्दल. आता अशीच सकारात्मक
रहा. साधनाच्या सासुबाई म्हणाल्या तसं तुझ्या कर्तृत्वाचा डंका चारी दिशांना वाजू दे हीच माझी इच्छा आहे."

हर्षाच्या आयुष्याची गाडी आता रूळावर येईल असं काव्याला वाटू लागलं. या वाटण्यानेच काव्याला पण एक नवी उभारी आली.

"बाबा किती छान आहे साधनाताई कडचे सगळेजण." हर्षा म्हणाली.

" हो खरंच फार छान मंडळी आहेत."

" मला त्यांच्या घरात खूप सकारात्मक वाटलं त्यात अजून आज गणरायाच़ं आगमन झालं त्यामुळे तर खूपच छान वाटलं. त्यांनी डेकोरेशन किती छान केलं होतं."

" दरवर्षी करतात.घरातील सगळे चांगलं महिनाभर आधी कामाला लागतात.यावर्षी काय डेकोरेशन करायचं हे ठरवतात."


हर्षानी साधनाच्या घरातील मोकळं आणि आनंदी वातावरणाचे खूप आभार मानले.

उद्यापासून ती नव्या आयुष्याला सुरुवात करायची हे मनाशी पक्कं करूनच झोपायला गेली.
—------------------------------------------
क्रमशः पुढे काय झालं ते वाचा पुढील भागात.
सख्या तू पैलतिरी भाग चौदावा.
लेखिका– मीनाक्षी वैद्य

🎭 Series Post

View all