सख्या रे ..!!! (भाग 1)

Marathi Love Story

"मुक्ता...अगं मी जरा बाजारात चाललोय, मला एखादी बॅग दे बरं पटकन..."

मुक्ता घाईने बॅग शोधायला लागते...हाताशी एक कापडी पिशवी लागते अन ती पटकन देऊन येते..

शिव ते घेऊन निघून जातो,

"आज मस्त पिठलं बनव.." सासूबाई सांगतात तशी ती किचन मध्ये येते..
किचन मध्ये आल्यावर घाईघाईत दिलेल्या पिशवीमूळे इतर सर्व पिशव्या खाली पडून आलेल्या...त्यातच तिला एक निळी पिशवी दिसली...
जशी ती पिशवी नजरेस पडली तशी तिच्या काळजातून आठवणींची एक तीव्र सनक प्रचंड वेगाने सर्रकन गेली...
वर्तमान विसरून एक नव्याच भावविश्वात ती शिरली...एक असं विश्व, जे ती खूप वर्षांपूर्वी मागे सोडून आलेली....

ती निळी पिशवी तिने उचलली, अन हाती काहीही लागणार नाही हे माहीत असून त्यात काहितरी चाचपु लागली..जितक्या तीव्रतेने ती बॅग घेतलेली तितक्याच तीव्रतेने तिला फेकूनही दिलं...

"बकवास होतं सगळं...का उगाच मी क्षुल्लक गोष्टींचा विचार करत बसते....पिठलं...लसूण सोला पटकन, बेसन पीठ कुठल्या डब्यात आहे काय माहीत...कांदा...मिरची.."

पिठल्यात आपलं मन रमवून ती भूतकाळ विसरू पाहत होती..

8 वर्ष होऊन गेले त्या गोष्टीला, पण आजही आयुष्यातील ते वळण लक्षात आहे...ते वळण नेमकं चांगलं होतं की वाईट हे आजवर तिला समजू शकलेलं नाही...

घरातलं सर्व आवरून ती झोपायला गेली, नवरा केव्हाच झोपी गेलेला...तिने हेडफोन लावले अन गाणी सुरू केली..
गाणं ऐकता ऐकता random मोड असल्याने एक नवं गाणं सुरू झालं..
"कितने हसीन आलम हो जाते, मैं और तुम गर हम हो जाते..."
आणि पुन्हा एकदा ती कळ हृदयात बोचू लागली..
"का पुन्हा पून्हा तेच? काय साध्य होणार आहे यातून?"

ती उठून आरशासमोर उभी राहते..
स्वतःला नीट न्याहाळते, आणि अचानक 8 वर्षांपूर्वी ची मुक्ता तिच्या समोर येऊन उभी राहते..
अल्लड, मुक्त, आनंदी....अन विचारते..

"काय? ओळखलं?"

मुक्ता चटकन आरशासमोरून बाजूला होते...8 वर्षांपूर्वीच्या घटनेने तिच्यात खूप मोठा बदल केला होता...तिने स्वतःकडे पाहणं सोडून दिलं होतं, स्वतःवर प्रेम करणं सोडून दिलं होतं...फक्त हात, पाय अन डोळे कशात तरी गुंतवून ठेवायचे हेच ती करत असायची...

8 वर्षांपूर्वी...

"मुक्ता... मुक्ता... मुक्ता..."
ग्राउंड मधील सर्वजण ओरडत होते.. हॉकी ची मॅच चालू होती...मुक्ता आणि नीरजा वर खूप अपेक्षा होत्या...अखेर त्यांनी मॅच खिशात घातली...अन युद्ध जिंकल्यासारखं मैदानातून बाहेर पडल्या..."

नीरजा अन मुक्ता..नशिबाने जुळवून आणलेली दोन रसायनं... एक कमालीची शिस्तप्रिय, दुसरी कमालीची अल्लड...नीरजा म्हणजे टॉम बॉय..मुलींसारखं वागणं पटायचंच नाही तिला...आणि मुक्ता.. शिस्तप्रिय, महत्वाकांक्षी... नाकासमोर चालणारी...

त्यांचं एकत्र येणं हे फार मोठया वादळाची सूचना होती...
कारण नीरजा ने मुक्ताची ओळख अर्जुनशी करून दिली होती..

क्रमशः

🎭 Series Post

View all