Login

सख्खे शेजारी.. अंतिम भाग

कथा तीन शेजार्‍यांची
सख्खे शेजारी.. भाग ३


मागील भागात आपण पाहिले की पार्थचे फोनवरचे बोलणे प्रशांत आणि मेघनाच्या कानावर पडते. आता बघू पुढे काय होते ते.


" आई ग.. आई.." मेघनाचा आवाज ऐकून अनमोल पळत आला.

" काय ग, काय झाले?" त्याने काळजीने विचारले.

" मी पाय घसरून पडले. कशीबशी उठून पलंगावर बसले. पण मला काहीच हालचाल करता येत नाही." रडवेली होत मेघना म्हणाली.

" अशी कशी नुसती धडपडतेस? कुठे लागले का? बघू दे." अनमोल पुढे होत म्हणाला

" दिसत तरी नाही. मुका मार असावा." मेघनाने हात पटकन पाठी घेतला.

" हो.. का? मग जास्तच दुखणार. तू आराम कर. मी पिलूची तयारी करून तिला शाळेत सोडतो. की तिलाही राहू देत घरी? पण नको ती घरी राहिली तर तुला त्रास देईल." अनमोलला काही सुचत नव्हते. "चहा केला आहेस का?"

" चहाचे आधण ठेवायचे आहे." मेघना मुसमुसत म्हणाली. "रोज मी आयता चहा हातात देते. आता माझी किंमत समजेल." हे मात्र मनातल्यामनात म्हणाली.

" हो का? बरं.. तू बस.. मी आलोच." म्हणत अनमोल स्वयंपाकघरात गेला. मेघना इथे वाट बघत होती की आत्ता तो हाक मारेल.. मेघना चहासाखरेचे डबे कुठे? मग मी म्हणेन, इतके वर्ष झाली तरी मीच लागते ना?" मेघनाचे मनात मांडे खाणे सुरू होते तोच अनमोलने मस्त आलं घातलेला चहा आणून समोर ठेवला.

" घ्या.."

" हे काय?" मेघनाने आश्चर्याने आ वासला.

" याला चहा म्हणतात आणि ही बिस्किटं. खाऊन घे.. मी पटकन स्वयंपाकाची तयारी करतो." अनमोल हसत म्हणाला. मेघनाने तोंड पाडत चहाचा घोट घेतला.

" मस्तच झाला आहे चहा.." ती इच्छेविरुद्ध बोलून गेली.

" तू आराम कर. मी आलोच." अनमोल मेघनाच्या हातून चहाचा कप घेत स्वयंपाकघरात गेला.

" ठिक आहे.. चहा तर कोणीही करू शकतो. स्वयंपाक थोडीच जमणार आहे? तिथे नक्कीच माझ्यावाचून अडणार." मेघना विचार करत होती. काल रात्रीचे जागरण आणि सकाळी मिळालेला हा आराम.. बघता बघता तिचा डोळा लागून गेला.

" मॅडम, घ्या पोहे खाऊन घ्या." अनमोल मेघनाला उठवत म्हणाला.

" कुठून आणलेत?" मेघनाने पोहे बघून विचारले.

" आणायला कशाला पाहिजे? मला येतात करता." अनमोल नसलेली कॉलर टाईट करत म्हणाला. "हे बघ पिलुला सुद्धा डब्यात पोहे दिले आहेत. ती शाळेत गेली सुद्धा. तू झोपली होतीस म्हणून तिला इथे पाठवले नाही. कढी करून ठेवली आहे. डाळतांदळाच्या खिचडीला फोडणी देऊन ठेवली आहे. खायच्या आधी कुकर लाव. किंवा मावशी येतील त्यांना गॅस चालू करायला सांग. तू हलू नकोस. मी ऑफिसमध्ये डबा खाईन. रात्रीच्या जेवणाची काळजी करू नकोस. मी आल्यावर करतो काहीतरी." अनमोल बोलत होता आणि मेघनाच्या डोळ्यातल्या पाण्याची पातळी वाढू लागली होती. तिने भोकाड पसरले. ते बघून अनमोल घाबरला.

" खूप दुखतं का? डॉक्टरांकडे जाऊ यात का?" त्याने विचारले.

" तुला ना माझी काही किंमतच नाही." मेघनाने रडत सांगितले.

" म्हणजे?" गोंधळलेल्या अनमोलने विचारले.

" तू चहा केलास, पोहे केलेस, खिचडीही केलीस. ती सुद्धा छान. म्हणजे तुला माझ्या स्वयंपाकाची काही गरजच नाही. म्हणजे तुला माझी किंमत समजणारच नाही. " मेघनाने परत रडायला सुरुवात केली.

" अग पण मी स्वयंपाक केल्याने तुझी किंमत कशी कमी होणार?" डोकं खाजवत अनमोलने विचारले.

" ती प्राची बघ.. नुकतंच लग्न झालं आहे त्यांचं. तरी ती माहेरी गेली आहे तर त्या पार्थला तिची, तिच्या स्वयंपाकाची आठवण येते आहे. आणि तू? आपल्या लग्नाला एवढं वर्ष झाली तरी एकदाही म्हणाला नाहीस.." मेघनाचा रडण्याचा सूर वाढणार तोच अनमोलने तिच्या तोंडावर हात ठेवला.

" अग सोन्या, त्या पार्थला स्वयंपाक येत नसावा.. म्हणून त्याला बायकोची किंमत समजली असावी. आता मला स्वयंपाक करता येतो पण तू कधी करूच दिला नाहीस. मग यावरून तुझी किंमत ठरणार का?" अनमोल मेघनाची समजूत घालायचा प्रयत्न करू लागला.

" पण तू कधी मला रात्री फोनही केला नाहीस माहेरी गेल्यावर. " मेघना गाल फुगवत म्हणाली.

" आता अर्ध्या तासावर असलेल्या तुझ्या माहेरी तू जातेस कधी आणि येतेस कधी? मग मी फोन कुठे आणि कधी करायचा?"

" हो रे.." मेघना हसत म्हणाली.

" मग पटली ना खात्री की तू माझ्यासाठी खूप किंमती आहेस याची?" मेघनाला समजेल न समजेल असा सुस्कारा सोडत अनमोल म्हणाला. मेघना हो म्हणणार तोच तिला आठवलं.

" पण तू मला काही गिफ्टही दिलं नाहीस."

" आज येताना नक्की आणतो.. चालेल?"

" माझ्या आवडीचं हवं." मेघना दटावत म्हणाली.

" हो ग माझी राणी.. तू म्हणशील ते." मनातल्यामनात पार्थला शिव्या घालत अनमोल बाहेर पडला.


संध्याकाळी ऑफिसमधून घरी येताना सोसायटीच्या दरवाजात प्रशांत आणि अनमोल उभे होते. दोघांनीही पार्थच्या घराकडे बघितले आणि मनातल्यामनात काहीतरी पुटपुटले. दोघांचं एकमेकांकडे लक्ष गेल्यावर ते चपापले. अनमोलच्या हातातली वस्तू बघून प्रशांतने विचारले.

" वहिनींसाठी गिफ्ट का?"

" नाही.. पार्थसाठी.." अनमोल खिन्नपणे म्हणाला.

" तू सुद्धा?" प्रशांतने आश्चर्याने विचारले.

" म्हणजे?" अनमोलने विचारले. प्रशांतने आपल्या हातातल्या पिशवीतली वस्तू काढून त्याला दाखवली. दोघे उतरलेल्या चेहर्‍याने पार्थकडे गेले. त्या दोघांना बघून पार्थला आश्चर्य वाटले.

" अरे दादा तुम्ही अचानक?"

" हो.. तुला हे द्यायचे होते." दोघे एकदम बोलले.

" काय?"

प्रशांत आणि अनमोलने हातातले सीमकार्ड काढून पार्थला दिले.

" हे बघ.. या कंपनीचे म्हणणे आहे की याची रेन्ज उत्तर ध्रुवावरही येते. तू प्राचीशी बोलताना या नंबरवरून बेडवर लोळत बोलशील का?" अनमोल म्हणाला.

" आणि जर नाही आली रेंज.. तर मग हे कार्ड वापर.. यांचं म्हणणं आहे की याला हिमालयात सुद्धा रेंज आहे.. तुला जिथे हवं तिथे बस पण फक्त बेडरूमच्या खिडकीत बसून प्राचीशी गप्पा मारू नकोस." प्रशांत गयावया करत म्हणाला.

" पण का?" हे काय चालू आहे न कळून पार्थने विचारले.

" शादी को बहोत साल हुए पती का दुख तुम क्या जानो पार्थबाबू.." दोघेही एकसुरात बोलून तिथून निघाले. फायनली पार्थच्या मोबाईलला रेंज मिळाली असावी. त्याच्या रात्रीच्या खिडकीतल्या गप्पा बंद झाल्या. समाधानाने सगळेच झोपणार तोच एक दिवस अंहं एके रात्री समोरच्या बिल्डिंगमधून आवाज आला..

" संजना.. तू आत्ताच माहेरी गेली आहेस.. पण तुझ्या विरहात हा सरोज नुसता होरपळून निघतो आहे. तुझ्याशिवाय मी म्हणजे गुलाबाविना गुलाबजाम....... "


आता पुढे काय? हे त्यांनाच माहित.. आपल्याला काय त्याचं?


कथा कशी वाटली ते सांगायला विसरू नका.


सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all