सखी सहेली भाग -६ अंतिम.

स्त्रियांचे जीवनातील मैत्रीचे महत्वाचे स्थान.
सखी सहेली भाग -६ अंतिम.
©® Sush.

जलद कथा मालिका.

जयाचा रडवेला आवाज रुपालीने ओळखला होता.

" काय ग जया बोल ना. गप्प का झालीस.अग आपल्यात कसला ग संकोच.वयात येताना झालेली आपली मैत्री.आता ह्या वयात आपण भेटतोय.यात काहीतरी तथ्य असणारच ना.देवाला सगळ्यांची काळजी आहे.\" आयुष्याच्या कोणत्याही वळणावर माणूस कधी एकटा पडू नये,म्हणूनच तर देवाने मैत्रीचे नाते निर्माण केले असेल ना."

जया बस मधून उतरनार एवढ्यात जयाच्या नवऱ्याचा फोन आला.....
जया काही बोलायच्या आत तोच म्हणाला," जये,घरी येताना गिरणीतून पिठाचा डबा आणयाचे विसरलो आहे मी. तु तिथूनच येणार ना,मग येताना तुच घेऊन ये ..."

" काय सांगू रूपा, माझ्या डोक्यात आता इतकी सनक गेली आहे ना,असे वाटतेय की,असल्या उलट्या काळजाच्या लोकांमध्ये जाण्यापेक्षा परत फिरावे अन् दूर कुठेतरी निघून जावे. कसं ग समजून घेत नाहीत हे लोक..?"

जयाने रुपालीला तिच्या नवऱ्याचा आलेला फोन ,आणि तो काय म्हणत होता ते सांगितले .

" थांब जया,घाबरु नकोस.आजपर्यंत आपण एकटीच्या हिमतीवर संसाराचे युद्ध लढवले ना.मग आता असे संयम , सहनशीलतेच हत्यार टाकून पळणे शोभत नाही आपल्याला.आजवर जे केले नाही,ते ही करायचे आता.तू एक काम कर.परत कॉल कर घरी.आणि सांग तुझी परिस्थिती .आणि हे ही सांग की, तू गिरणी पर्यंत आलेली नाहीये,बस स्टॉप वर उतरण्याच्या आत घ्यायला या. तुला घेऊन जाता जाता डबाही घेऊन जाऊ.असे बोल आणि नाही ऐकलं तर तशीच डॉक्टरकडे जा. मेडिसीन घेऊन घरी जा.आणि आराम कर थोडा.आणि तरीही घरून काही त्रास झाला तर परत मला कॉल कर .मग बघू पुढे काय होतंय ते."

रुपाली सुध्दा अशा परिस्थितीतून गेल्या मुळे तिला असा अनुभव आलेला होताच.स्त्रियांना या त्यांच्या शारीरिक आणि मानसिक त्रासामध्ये फक्त आणि फक्त आपुलकीच्या दोन शब्दांची गरज असते.याची तिला जाणीव होती.आणि आपुलकीचे ,जाणिवेचे शब्द जयाला ऐकायला मिळाल्याने जयामधे एक छान ऊर्जा निर्माण झाली होती.

कधीही उलट प्रतिउत्तर नवऱ्याला न देणारी जया,धीराने,हिम्मत एकवटून नवऱ्याला बोलली होती.

. तिकडे जयाच्या नवऱ्याला तिला होत असणाऱ्या त्रासाची कल्पना होतीच.आणि गेल्या महिनाभरात तिच्या मैत्रिणींच्या भेटीमुळे तिच्यात कधी नव्हे ते नवं चैतन्य आल्याचे त्याला समजून आलेले होते.जयाने नक्की मैत्रिणीला फोन केला असणार,याची त्याला खात्री झाली होती.आणि मग त्यानेही हुशारीने आणि चलाखीने स्वतः ला बदलल्याचे दाखवले.आणि...

" तू थांब तिथेच,मी येतोय गाडी घेऊन .गिरणीतून डबा घेऊ.आणि रात्रीसाठी जेवणाला काहीतरी पार्सलच घेऊन येऊ.म्हणजे घरी आल्यावर तूला आराम करता येईल." असं म्हणाला.

जयाने रुपालीला हे सर्व सांगितले आणि दोघी मैत्रिणी मनातल्या मनात सुखावल्या.....!

मैत्री म्हणजे काय...जिथे मन मोकळेपणाने ,वाटेल तितके बोलता येते...!
आणि न बोलताही मनामनातील आर्त साद ऐकू येते.....!!

परिस्थिती सोबत मनस्थिती ओळखते ती मैत्री.....!
आणि दाटून आलेल्या भावनांना आत्मविश्वासाची वाट दाखवते ती सुध्दा मैत्रीचं....!!

व.पू. काळे म्हणतात ना...
" एक सच्चा मित्र परिसा सारखा असेल तर ,आयुष्याचे ही सोनं होतं"
©® Sush.

स्त्रियांच्या जीवनात मैत्रीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.स्त्रियांच्या जीवनामध्ये येणाऱ्या बालपण,तारुण्य,वैवाहिक जीवन,आणि प्रौढावस्था या महत्वाच्या चार टप्प्यांमधून जाताना, मैत्रीसुध्दा एक महत्वाचा घटक असते.
आजही स्त्रियांना त्यांच्या मर्यादेत राहूनच मैत्री निभवावी लागते. सदर कथेतून विशेष करून स्त्रीयांची मैत्री आणि त्यांच्या जीवनातील मैत्रीचे स्थान आणि महत्व उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.

* वाचकांचा अभिप्राय हेच लेखकांचे प्रोत्साहन.*

🎭 Series Post

View all