सखी सहेली भाग -५

स्त्रियांचे जीवनातील मैत्रीचे महत्वाचे स्थान.


सखी सहेली भाग -५
©® Sush.

जलद कथा मालिका .

" कशी आहेस तू...कुठे असतेस...कुठे राहतेस....सासरची सगळी चौकशी.... मुलाबाळांची आणि नवऱ्याची चौकशी.....आता सध्या काय करतेस...."
या असल्या सगळ्या फॉर्मल गप्पा मारून झाल्या आणि जया आता वर्किंग वूमन आहे.आणि रुपाली हाऊस वाईफ आहे.हे एकमेकींना समजले.
एक एक करून नेटवर का होईना पण सगळ्या भेटल्या...!

काय तो आनंद वर्णावा...?
शब्दात व्यक्त करता येणार नाही,अशा त्या भावना....!

ग्रीष्मात उन्हाळ्याच्या तडाख्याने शुष्क झालेल्या धरणीवर पहिला पाऊस पडल्यावर ओलसर मातीतून येणारा मातीचा मन मोहून टाकणारा सुगंध....!

धरणी सोबतच पहिल्या पावसाची सर येऊन,टवटवीत झाल्यासारखी झाडे झुडपे.....!

अगदी तशीच परिस्थिती झाली होती मैत्रिणींची....आणि त्यांच्या मनांची...!!!

जया वर्किंग वूमन असल्याने ,तिचे रूटीन तिच्या नऊ ते पाच या वेळेप्रमाणे फिक्स ठरलेले होते.आणि रुपालीचे सगळे दिवसभराचे शेडुल तिच्या दोन शाळकरी मुलांच्या आणि नवऱ्याच्या कामाप्रमाणे ठरलेले होते.

पण आता ह्या सगळ्या गोष्टींमुळे काही फरक दोघींना पडणार नव्हता.कारण फोन आणि नेटवर्क चोवीस तास त्यांच्या जवळ उपलब्ध होते.

मग जयाचा दिवस ऑनलाईन सुरू व्हायचं ,सकाळीच सातच्या दरम्यान.जायची गुड मॉर्निंग पोस्ट आलेली असायची.रुपाली त्यावेळी मुलांच्या शाळेच्या तयारीत बिझी असायची.त्यातूनही रिप्लाय पोस्ट टाकायचीच.

काय भारी वाटायचं मनाला.अगदी भूतकाळात गेल्यासारखे.जसे रोज सकाळी शाळेत आणि कॉलेजला भेटायचे ना तसेच.

घरापासून ऑफिसचा पल्ला लांबचा असल्याने ,सकाळी साडे आठच्या दरम्यान जया घरातून निघायची . बस मधून ऑफिसवर पोहचे पर्यंत तासाभरात जया आणि रुपलीचा फोन कॉल चालू असायचा.दुपारी परत ," जेवलीस का." मेसेज सोबत जया आणि रुपालीचे जेवण व्हायचे.ऑफिस सुटल्यावर परत ऑफिस ते घरा पर्यंत बस मधून फोन वर गप्पा चालायच्या.जया आणि रुपालीच्या किती बोलू आणि किती नको असे व्हायचे.कारण मधल्या वीस बावीस वर्षांच्या गप्पा होत्या ना त्या.
रात्री सगळ्याची जेवणे झाली आणि उद्याची तयारी आणि किचन आटोपून झाले की , बेड वर पडल्या पडल्या परत दोघी ऑनलाईन असायच्या.

जया ,रुपाली,सोनाली,भेटल्या नंतर त्यांच्या वागण्यात,बोलण्यात,स्वभावात एक छान तजेला आल्यासारखे घरातल्यांनाही दिसत होते.

नक्कीच काहीतरी जिव्हाळ्याचे ऋणानुबंध असतात मैत्रीच्या नात्यात ,त्याशिवाय इतक्या वर्षांनी भेट होणे अशक्य....!!

सासर,संसार,ऑफिस,दगदग, धावपळ यात रखडून गेलेल्या रणरागिणीच त्या.मैत्रिणी भेटल्यामुळे उल्हासित झाल्या होत्या.

घरातले, कामातले,बाहेरचे,आरोग्याचे ,काहीही झाले तरी ,मन मोकळे पणाने सांगण्यासाठी ,बोलण्यासाठी त्यांच्या जवळ त्यांच्या जिवाभावाच्या मैत्रिणी होत्या.

आयुष्यभर सगळे करून सुध्दा अवहेलना,गृहीत धरणे,चालढकल करणे ,सासरकडून सहन करावा लागणारा छळवाद,त्यामुळे नवऱ्याशी होणारे मनमुटाव,ह्या सगळ्या भावनिक ,मानसिक आणि जाणिवेच्या गोष्टी सांगण्यासाठी त्यांच्या कडे हक्काचे ऐकणारे कान त्यांना मिळाले होते.

आस्थेने,आपुलकीने कोणीतरी विचारणारे आहे,हा विश्वास या मैत्रिणीना आश्वस्त करणारा होता.

" हॅलो जयडे,कॉल नाही केलास कुठे होतीस.?"

" अग रूपा,काल खूपच त्रास व्हायला लागला म्हणून गेले डॉक्टरकडे .इतके दिवस सहन केले तसेच पण न राहून काल शेवटी गेले काल."

" का ग,काय झाले?"

" अग,तेच आपले नेहमीचे .आयुष्यभराचे रडगाणे ग. पाळीचा खुप ञास होत होता. ब्लिडींग थांबत नव्हते.कामाची सुट्टी मिळेना आणि अशक्तपणा जाणवतोय ग."

" हो जया.मला तर डॉक्टर म्हणाल्या की,इथून पुढे तुम्हाला हा त्रास सहन करावाच लागणार. तो निसर्ग नियम आहे. मेनोपोज मधून सगळ्यांना जावेच लागते."

" अग पण रूपा,या सगळ्यातून घरातील कोणालाही काही घेणे देणे नसल्यासारखे वागतात,तेव्हा...
अग माझा नवरा तर म्हणतोय ,जगात तू काय एकटी आहेस का सहन करणारी.माझ्या आईनेही सगळे सहन केलेच ना..... खरं सांगू रूपा , काय करू तेच समजत नाही मला ....?"

" काही करू शकत नाही आपण जया.फक्त सहन करायचे आणि सहन करणेच आपल्या हातात आहे.......!!"
©® Sush.

( संसार,नोकरी आणि आरोग्य .या द्विधा मनस्थितीला सामोरे जाण्यासाठी रुपाली जयाला काय आणि कशी मदत करते.पाहूया पुढच्या भाग -६ अंतिम मध्ये.)

🎭 Series Post

View all