सखी गं.. माझी होशील का ? अंतिम भाग..

सायली आणि प्रतिक मधील मैत्रीची प्रेम कहाणी.

विषय - सांग कधी कळणार तुला ?

मनिषा नरेंद्र परब.

कथा - सखी गं... माझी होशील का ..?


.... भाग -4...अंतिम भाग 



बराच वेळ सायली आणि प्रतिक रस्त्यातून चालत असतात. मध्येच प्रतिक गाणं गुणगुणतो, " सांग कधी कळणार तुला, भाव माझ्या मनातला..? "


सायली त्याचं गाणं ऐकून, " छान गातोस रे ? तुला जुनी गाणी आवडतात का ? "


प्रतिक, " हो, त्या गाण्यांचा अर्थ सुद्धा मनाला पटण्यासारखा असतो. आता ह्या गाण्यात सुद्धा अर्थ आहे बघ ना . "


सायली, " हो पण मी इतकी जुनी गाणी ऐकत नाही. पण ह्या मी नक्की ऐकेन !"


प्रतिक, " बघ ना अर्थ आहे गाण्यात पण तुला तो कळत नाही आहे ? " तिला तो टोमण्याने बोलतो.


सायलीला त्याचं बोलणं कळत नाही, " तु नेहमी कोड्यात का बोलतोस ? "


प्रतिक, " काही वेळेस कोड्यात बोलणं सुद्धा गरजेचं असतं !" तो सायलीकडे पाहत बोलतो..


तो तिला रिक्षात बसवून घरी येतो, आई त्याची वाट पाहत असते. आज मुलगा त्याच्या मनातलं बोलणार म्हणून तिच्या तोंडावर एक वेगळीच ख़ुशी असते.


प्रतिक येतो तो चेहऱ्यावरून खूप थकलेला दिसतो, " आई गं !" आणि तो सोफ्यावर टेकून बसतो.


आई त्याला पाणी आणून देते, " घे पाणी पी !"


प्रतिक पाणी पितो, आणि डोळे बंद करून शांत बसलेला असतो.


आई, " काही टेन्शनमध्ये आहेस का ? " आई त्याला हळूच विचारते.


प्रतिक, " नाही, पण मी बोलायचा प्रयत्न केला. पण तिला काहीच कळत नाही. " ती नाराज होऊन बोलतो.


आई, " तु कोड्यात बोललास तरं तिला कसं कळणार ?"


प्रतिक, " पण इतक्या वर्षांची मैत्री, त्यात निर्माण झालेलं एक वेगळचं नातं. मग तिला का कळत नाही ? "


आई, " वेगळं नातं म्हणजे प्रत्येक वेळी प्रेम हे आहे असं नसतं बाळा. आणि तुला वाटतं पण तिला असं वाटतं का ? " आई त्याला समजावत बोलते.


प्रतिक, "पण माझ्या मनात प्रेम आहे, तिला सुद्धा कळत असेल ना ?"


आई, " नाही रे बाळा ! असं गरजेचं नसतं काही. आणि तुला जाणवलं तरी का ? तिच्या मनात असं काही असेल असे ? "


आईच बोलणं ऐकून तो विचारात पडतो, " नाही, कधी तिने असं बोलून दाखवलं नाही !"


आई, " तरी सुद्धा तु तिला एकदा स्पष्ट विचार, आणि काय तो निर्णय घे. जर तु तुझ्या गैरसमजुतीत राहशील तरं नंतर तुलाच त्रास होईल. "

आई त्याला खूप समजावते.


प्रतिकचं आईच्या बोलण्याने चेहरा उतरतो.पण शेवटी जे सत्य असतं तेच आई त्याला सांगते.


रात्र होते, प्रतिक बराच वेळ जागा असतो. तो मोबाईल वर गाणं लावून शांतपणे ऐकत असतो.

" सांग कधी कळणार तुला... भाव माझ्या मनातला... " आणि त्याच्या डोळयांतून पाणी येत.


सकाळ होते, नेहमी सारखं सायली प्रतिकला भेटते. पण आज सायली खुश असते, " यार प्रतिक, तुला एक चांगली बातमी द्यायची आहे. "


प्रतिक, " चला म्हणजे हिला कळालं माझ्यामनातलं ?" तो खूश होतो." खरचं काय ? "


सायली त्याचा हात हातात पकडुन, " माझं लग्न ठरलंय!" तिच्या चेहऱ्यावर खूप आनंद असतो.


प्रतिक, " खरचं ? "


सायली, " हो... "


तेवढ्यात बस येते, आज बस ला खूप गर्दी असते. सायली बस मध्ये चढते, पण प्रतिक मुद्दाम खाली राहतो...

प्रचंड गर्दीतून सायली प्रतिकला शोधत राहते..


"सांग कधी कळणार तुला...

भाव माझ्या मनातला.."


..... समाप्त....

🎭 Series Post

View all