सैतानी तबकाचे रहस्य

सैतानी तबकाचे रहस्य
कनिष्क एक प्रथितयश  लेखक आहे. विशेषतः भय कथा आणि गूढ कथा लिहिण्यात त्याचा हात कोणी धरू शकत नाही. त्याच्या प्रत्येक पुस्तकाच्या किमान दोन ते तीन आवृत्या निघतात. येत्या काही दिवसात त्याची टी. व्ही. वर मुलाखत दाखवण्यात येणार होती; त्यामुळे कनिष्क खुप खुश होता. तो स्टुडियोमध्ये वेळेच्या अगोदरच पोहोचला. पोहोचताच रिसेप्शनवर एका मुलीने त्याच स्वागत केलं आणि फुलांचा गुच्छ दिला.

"सर, मी शर्वरी... मला खेद वाटतो सांगण्यास की तुम्हाला थोडावेळ वेट करावं लागेल कारण आमचे मुलाखतकार अजून आले नाही आहेत." ती मुलगी जरा चाचरतच म्हणाली.

"इट्स ओके मिस शर्वरी..! माझी ही दूरदर्शनवर पहिलीच मुलाखत असल्याने खूप एक्ससायटेड आहे. त्यामुळे लवकरच आलो." कनिष्क अतिशय अदबीने म्हणाला.

"अरे वा! तुमच्यासारखी भय आणि गूढ कथा लिहिणारी व्यक्तीसुद्धा एक्साईट होऊ शकते?" एक नाजूक आवाजातला प्रश्न कनिष्कच्या मागून आवाज आल्यामुळे त्याने मागे वळून बघितले.

आवाजाप्रमाणेच नाजूक आणि मोहक तरुणी त्याच्या मागे उभी होती. गुलाबी रंगाची साडी आणि स्लीव्जलेस ब्लाऊज असा तिचा पेहेराव होता. चेहेऱ्यावर हलकासा मेकअप होता.

मादक हरिणीच्या चालीत ती कनिष्क जवळ आली आणि स्वतःची ओळख करून दिली.

" नमस्कार सर, मी कांचन, सेटवर अजून तयारी होण्यासाठी वेळ आहे. तोपर्यंत आपण माझ्या केबिनमध्ये बसूयात." कांचन म्हणाली.

"नमस्कार कांचन. जसे तुम्हाला योग्य वाटेल." जणू कनिष्क तिच्या रूपावर भाळून मोहित झाला होता आणि तिच्या मागोमाग चालू लागला. तिने केबिनचा दरवाजा उघडला आणि स्वतः प्रथम न बसता सोफ्यावर कनिष्कला बसण्यास अतिशय नम्रपणे सांगितलं.

" बाय द वे मिस कांचन..! तुम्हाला असं का वाटलं की गूढ किंवा भयकथा लिहिणारी व्यक्ती एक्साईट होऊ शकत नाही. मी ही तुमच्यासारखाच एक माणूस आहे हो." हसत हसत कनिष्क म्हणाला आणि जवळच्याच एका खुर्चीवर बसला. जवळच्याच सोफ्यावर ती देखील त्याच्या समोर बसली. पण अजूनही तिच्या चेहेऱ्यावर हसू नव्हतं. काहीसं गूढ आणि हरवलेल्या नजरेने ती कनिष्ककडे बघत होती.

"काय हो? अस का बघता आहात माझ्याकडे? मी कोणी भूत किंवा जादूटोणा करणारा वाटतो आहे की काय तुम्हाला? एक साधासा लेखक आहे मी फक्त." कनिष्क मिश्किलपणे हसत म्हणाला.

तरीही कांचन चेहऱ्यावरील एक मात्रादेखील हलली नाही. ती एक टक त्याच्याकडे बघत होती. तिची नजरदेखील अजूनही गूढ, हरवलेली होती. आता मात्र कनिष्कला तिच हे वागणं आवडलं नाही. तिच्या चेहेऱ्यासमोर टिचकी वाजवत त्याने तिला भानावर आणण्याचा प्रयत्न केला. त्याच्या त्या टिचकीचा परिणाम मात्र लगेच झाला. कांचन एकदम खोल झोपेतून जागी व्हावी तशी दचकली आणि काहीश्या गोंधळलेल्या आणि आश्चर्यचकित चेहऱ्याने कनिष्ककडे बघायला लागली.

" मिस कांचन..! कुठल्या जगात अडकला आहात? मी तुमच्याशी बोलतो आहे आणि तुम्ही मात्र नजर माझ्यावार रोखून कुठल्यातरी दुसऱ्याच विचारात हरवल्या आहात. सगळ ठीक आहे ना?" कनिष्कने तिला विचारले.

" अं.. हो..! मी खर तर हरवलेच आहे आणि तरीही इथेच आहे. जाऊ दे; मी कशी आहे हे फारसं महत्वाचं नाही. पण खर सांगू का..! मला आश्चर्य वाटतं की तुमच्यासारख्या तिशीतल्या तरुण व्यक्तिने हे असं भय आणि गूढ कथांमध्ये का गुंतून राहावं? मला माहित आहे की तुम्ही इतरही साहित्य लिहिता आणि तुम्ही लिहिल्या आहेत. पण तरीही तुमची ओळख गूढ किंवा भय कथा लेखक अशीच आहे. अस का? रोमँटिक किंवा इतर असं काही लेखन जास्त करावसं नाही वाटत का तुम्हाला?" कांचनने कनिष्कला विचारलं. अजूनही ती त्याच्याकडे एकटक बघत होती.

"बऱ्याच वेगवेगळ्या कथा मी लिहिल्या आहेत हे खरं आहे. पण मला गूढ आणि भय हे दोन विषय आकर्षित करतात. अशा कथा लिहिण्यात खूप थ्रील आहे हो." कनिष्क उत्तरला.


"पण असे विषय तुम्हाला कसे सुचतात?" कांचनने विचारले.

"कसे सुचतात ते मला नाही माहित. बस सुचतात." कनिष्क म्हणाला.

पण तिच्या चेहऱ्यावर उत्तराने समाधान झालं नसल्याचं त्याला दिसलं.

"त्याचं असं आहे नं, की एखादी छोटीशी पण वेगळी घटना किंवा एखादी वेगळी वस्तू वा जागा बघितली की मला त्यातून काहीतरी गूढ असं आपोपाप दिसायला लागतं आणि मग पुढे असंच सुचत जातं. मग  लिहायला सुरवात केली ना की आपोआप कथा तयार होत जाते." कनिष्क असाच मूडमध्ये येऊन बोलायला लागला होता.

पण त्याला मध्येच थांबवत कांचनने विचारले,"आपोआप तयार होते कथा? म्हणजे नक्की काय कनिष्क?" तिचा तो कोमल आवाज थोडा कातर झाला होता.


तिच्या अशा कातर आवाजाने तो थोडा गोंधळला. पण मग त्याकडे दुर्लक्ष करून परत बोलायला लागला,"म्हणजे असं की एखादी शांत जागा किंवा एखादी जुनी वास्तू बघितली की तिथे कधीतरी काहीतरी वेगळ घडलं असेल असं माझं मन मला सांगतं. मग ते काय असेल याचा विचार मी करायला लागतो आणि कागद पेन घेऊन बसलो की आपोआप सुचायला लागतं आणि मी लिहित जातो. अनेकदा तर कथा लिहित असताना माझ्या मनात शेवट वेगळाच असतो. पण कथा पूर्ण होते तेव्हा माझ मलाच आश्चर्य वाटतं कारण शेवट मी अजून काहीतरी वेगळाच लिहिलेला असतो." अस म्हणून कनिष्क थांबला.

"आश्चर्य का वाटतं कनिष्क?" कांचनने अधिरतेने विचारले.

"मला आश्चर्य वाटतं कारण मी जो शेवट माझ्या मनात ठरवलेला असतो तो मी लिहीतच नाही. माझ्या हातात जी कथा असते तिचा शेवट काहीतरी खूप वेगळा..मी न विचार केलेला असाच असतो. जसं काही तो शेवट मी लिहिलेलाच नाही."

"अहो शेवट काहीही असला तरी कथा तर तुम्हीच लिहिता ना? कदाचित सुरवात करताना तुम्ही एक शेवट ठरवत असालही. पण मग जसजशी कथा पुढे सरकते; तुम्हाला वाटत असेल की जो शेवट ठरवला त्यापेक्षा काहीतरी वेगळं असू शकतं. म्हणून तुम्ही शेवट बदलत असाल किंवा एखाद्या कथेचा शेवट तुम्ही नंतरही बदलू शकत असाल. तुमचीच कथा आणि तरीही शेवट तुमच्या मनात नसलेला असं कसं होईल? कथेचा शेवट तुम्हाला अगोदरच माहित असेल ना?" कांचनने प्रश्नांची सरबत्ती सुरू केली पण वारा मंद झाला. तीच ते रूप पाहून घायाळ झालेला कनिष्क, तिच्या ओठांच्या मंद हालचालीमुळे कनिष्कच्या मनात वाजणाऱ्या सुमधुर संगीताच्या आवाजात ती काय बोलली काही कळलंच नाही.

कांचनने चुटकी वाजवताच कनिष्कची तंद्री भंगली. मुळात तंद्रीमध्ये असल्याने ती काय म्हणाली ते त्याला समजलं नव्हतं. पण माझं तुमच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं असं म्हणणं वाईट दिसेल असं वाटून त्याने तिच्या हो ला हो केलं. मात्र त्याच्या त्या एका \"हो\" मुळे कांचन एकदम खुश झाली.

"तुम्हाला माहित नाही कनिष्क, तुमच्या या एका \"हो\" ने मला किती मोठा दिलासा दिला आहे. कधी कधी काही शेवट अर्धवट असतात. त्यामुळे अनेक जीव अडकून राहतात नाही का? पण आता मला खात्री आहे की असं होणार नाही.  आता माझ्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर मला नक्की मिळेल. आता मी जायला मोकळी झाले. " कांचन मनापासून हसत कनिष्कला म्हणाली.

आल्यापासून पहिल्यांदा तिला हसताना बघून कनिष्क खूप प्रफुल्लित झाला. तितक्यात रिसेप्शनिस्टने जवळ येऊन त्याला आवाज देऊ लागली. समोर कोचावर बसलेली कांचन हवेत अलगद विरून गेली आणि कनिष्क इकडे तिकडे बघू लागला.

"सर , आर यू ऑल राईट ?" शर्वरीने विचारले.

"कांचन..! मिस कांचन कुठे गेल्या ? आताच तर आम्ही बोलत होतो." कनिष्क म्हणाला.

"सर काहीतरी गैरसमज होतोय. कांचन नावाची कुणीही मुलगी इथे नाही. स्टुडिओ रेडी आहे आणि मुलाखतकार आले आहेत तर मुलाखत सुरू करूयात का..?" शर्वरीने विचारले.

"नाही, सध्या मी मुलाखत देऊ शकत नाही. मला मिस कांचनला भेटायचं आहे." कनिष्क हट्ट करत म्हणाला.

तितक्यात स्टुडिओ मॅनेजर तिथे आला नि कनिष्क आणि शर्वरीचा संवाद ऐकून मधेच म्हणाला , "सर , मी सांगतो कांचनबाबत तुम्हाला." आणि त्याने शर्वरीला जाण्याचा इशारा केला.

"आपण.?" कनिष्कने विचारले.

" मी सुधीर.. ह्या स्टुडिओचा मॅनेजर. आकाशसरांनी तुमच्या आगतस्वागत आणि मुलाखतसाठी मलाच सांगितलेल पण जरा उशीर झाला मला." मॅनेजर सुधीर म्हणाला.

"मिस कांचन, त्या कुठे आहेत? मला आता त्यांच्यासोबत बोलायचं आहे. आपण मुलाखतीनंतर करू. " आणि कनिष्क कांचनला इकडे तिकडे शोधत बाहेर जाऊ लागला.

"कांचन गेल्या पाच दिवसापासून बेपत्ता आहे." मॅनेजर मोठ्याने म्हणाला.

आणि कनिष्क तिथेच थांबला.

"म्हणजे?"

"सर ती स्टुडिओमध्ये आली पण गेली नाही. " कनिष्क मागे वळाला आणि आश्चर्यकारक नजरेने बघू लागला.

"माझ्यासोबत या, मी सांगतो सगळं काही.." सुधीर म्हणाला.

दोघेही चालत शेवटच्या स्टुडिओच्या जवळ आले. आणि सुधीर सांगू लागला, "सर पाच दिवसांपूर्वीची गोष्ट आहे, टॅरो रीडर माया मॅमची मुलाखत ह्या ठिकाणी होणार होती आणि त्यानुसार संपूर्ण सेट आम्ही ह्या ठिकाणी लावला. अशावेळी लाईट कॅमेरा आणि इंटेरिअर थोडं वेगळं आणि अँटिक असावं म्हणून माया मॅमच्या सांगण्याप्रमाणे आम्ही सेट रेडी केला आणि कांचन मुलाखत घेणार म्हणून ती ह्या सगळ्या गोष्टीत अगदी जातीने लक्ष दिल होत. पण त्यादिवशी बाहेरच्या सीसीटीव्हीमध्ये ती आत येताना दिसली पण बाहेर जाताना दिसलीच नाही. आणि ती आतही नाही. हा सगळ्यात शेवटचा सेट असल्याने दुसरी एन्ट्री किंवा एक्जिट पण नाही. "

कनिष्क संपूर्ण स्टुडिओ बारकाईने न्याहाळू लागला. भला मोठा स्टुडिओ आणि त्यावर थोडं उंचावर स्टेज होता. तपकिरी रंगाचा गालीचा आणि त्यावर एक लाल सोफा आणि समोर सुंदर काळ्या काचेचा टीपॉय ठेवलेला, बाजूलाच मंद चालणारा टेबल लॅम्प आणि डाव्या बाजूला मिट्ट काळोख होता. तो त्यावर मोबाईलची टॉर्च लावून बघू लागला. हे सगळं ह्या आधीही बघितलं आहे हे जाणवलं. पण कुठे ..! ते मात्र आठवेना.

त्या काळोख्या कोपऱ्यात त्याला गालीचावर ठेवलेलं पितळी नक्षीदार तबक दिसलं आणि त्यांना काही दिवसांपूर्वी लिहिलेली सैतानी तबकची कथा आठवली. लगेचच मोबाईलवर डॉक्युमेंटमध्ये चेक करु लागले. आणि हुबेहूब वर्णनं ज्याप्रमाणे तबक आणि खोलीचं केलं अगदी तसच होत. ते अगदी डोळे फाडून त्या तबकाचा वेध घेत होते.

"हे.. हे तबक इथे कसं.?" कनिष्कने विचारले.

" हे शूटिंगसाठी भाड्याने आणलेलं. अगदी संपूर्ण सेट ; माया मॅमला हवा तसा होता. आणि त्यांनीच मिळवून दिला. त्यामुळे जास्त पैसे देऊन आणला आहे. " सुधीर म्हणाला.

"कुठे राहतात माया.?" कनिष्कने विचारले.

" सर अशी माहिती आम्हाला नाही देता येत. " सुधीर ओशाळून उत्तरला.

"सांगणार नसाल तर पोलिसांत जातो, आणि मग ते वदवतीलच तुमच्या तोंडून." कनिष्क धमकीवजा सुरात म्हणाला.

" सर प्लिज, अस नका करू. मी सांगतो पण प्लिज माझं नाव नका सांगू त्यांना. " सुधीर विनंती करत म्हणाला.

" ठीक आहे.." कनिष्क म्हणाला.

मायाच्या कारनाम्याबद्दल तो ऐकून होता त्यामुळे त्याने सुधीरकडून अड्रेस घेऊन कनिष्क घाईने निघाला. बंगल्याच्या गेटवर काळ्या रंगावर सोनेरी आणि गुलाबी अक्षरात बोर्ड पाहून काहीसा चिडलाच पण स्वतःवर कन्ट्रोल करत आत प्रवेश केला. दरवाजाची बेल वाजवणार तोच दरवाजाच्या छोट्या फटीतून पुरुषी आवाज आला की " आत ये, तुझीच वाट बघतोय ."

साडेसहा फूट उंचीचा , सावळासा आणि दाढीवाला धिप्पाड व्यक्ती आराम खुर्चीवर पायावर पाय टाकून आरामात टेकून पाईप फुंकत बसला होता आणि विक्रमी नजरेने कनिष्कला बघू लागला.

" माया सोबत काम आहे माझं, तिला जरा बोलवता का?" कनिष्कने विचारले.

" मला माहिती आहे तुला काय हवंय; पण माझ्या काही अटी आहेत आणि त्या तू मान्य केल्यास तर मी तुझं काम करेन." तो व्यक्ती म्हणाला.

"काय हवंय मला?" कनिष्कने डोळे बारीक करत विचारले.

"कांचनवर जीव जडलाय ना तुझा ? आणि तुला जाणीव झाली आहे की तबकात तिच्या व्यतिरिक्त काहीजण अडकले आहे आणि त्यांना तुला सोडवायच आहे. " तो व्यक्ती गूढ नजरेने उत्तरला.

" मला तुझ्याशी काही एक घेणं देणं नाहीये," \"माया\".. \"माया\" जोरजोरात आवाज देऊ लागला.

" तीही माझ्याकडे कैद आहे" आणि त्याच्या गडगडाटी हास्याने संपूर्ण बंगला भयग्रस्त झाला. कनिष्क मात्र अजूनही जिद्दीने समोर निडर उभा होता. पण त्याला काय करावे काहीच सुचत नव्हतं. पण आततायीपणा करून पण चालणार नव्हतं. शेवटी जीवनमरणाचा प्रश्न होता.

" काय हवंय तुला ? आणि महत्वाचे म्हणजे कोण आहेस तू ? " कनिष्कने विचारलं.

" हुशार आहेस, मुद्द्याचे बोललास. मी कोण आहे कुठून आलो हे महत्वाचं नाहीये. मी आहे हे महत्वाचे आणि मला तू हवाय तुझ्या मर्जीने. आणि ह्या भैरवकडे अगणित शक्ती आहेत. त्यासोबत तुझ्या लेखणीच्या शक्तीची जोड मिळाली तर मी राज्य करेन ह्या ब्रह्मांडावर. " भैरव अतिआत्मविश्वासाने म्हणाला.

"म्हणजे काय करावं लागेल ? " कनिष्कने विचारले.

"तुला भयकथा सुचत नाही तर सुचवल्या जातात. तू जे लिहितोस तेच घडत." भैरव म्हणाला.

"शक्यच नाही, अस कधी घडलेलं मी आजपर्यंत पाहिलं नाही." कनिष्क म्हणाला.

"पाहिलेस की, सैतानी तबक. त्यात जे तू लिहिलं तेच घडलं आणि त्याचा निकाल अजून लागला नाहीये. तबकात अडकल्यानंतर बाहेर कुणी आलंच नाही आणि ह्याची जाणीव तुला आज स्टुडिओ मध्ये झाली आहे. " तो खिखी हसत आणि पाईप जोराने फुंकून कनिष्कच्या दिशेने धुराचा लोट नाकातून सोडला.

" हो. मग माझ्याकडून नेमकं काय हवं तुला ?" कनिष्कने हाताने धुराचा लोट झाडत विचारले.

" तुझी महादेवाच्या आशीर्वादाने भेटलेली लेखणी, आजपासून तू तेच लिहिशील जे मी तुला सांगेन." भैरव म्हणाला.

"माझी लेखणी कुणाची बांधील नाही. मी माझ्या मर्जीचा मालक आहे, मी काय करावे किंवा करू नये हे महादेव ठरवेल, तुझ्यासारख्या ऐऱ्यागैऱ्याच मी का ऐकू ? " कनिष्क निर्धास्तपणे म्हणाला.

"कारण ते निष्पाप जीव , आणि त्यातील एक प्रेमळ जीव ज्यावर तुझा जीव जडलाय.." त्याच ते निर्लज्जपणे हसणं कनिष्कच्या डोक्यात जात होत.

कनिष्क चिडून त्याला मारायला धावला आणि तबकात अडकलेले असंख्य आवाज त्याला बाहेर पडण्यासाठी मदत मागू लागले.

" नो, नाही. तू मला काहीही करू शकत नाही."
आणि भैरव उपहासाने हसला.

शेवटी कनिष्कने धीराने आणि युक्तीने हा पेच सोडवायचा ठरवलं.

" तू म्हणेल तस लिहीन मी पण त्यासाठी तुला सगळ्यांना बाहेर काढावं लागेल." कनिष्क म्हणाला.

"मी कस विश्वास ठेवू की सगळे बाहेर आल्यावर तू माझं ऐकशील ?" भैरव चिडून म्हणाला.

" एक तर तुला माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल अन्यथा मी जातो. हे सगळे लोक काही माझे सगेसोयरे नाहीत." कनिष्क उत्तरला.

"पण प्रेम.." भैरव म्हणाला.

"माझं प्रेम फुलपाखरू आहे. आणि भयकथेचा सम्राट म्हणतात मला. प्रेमकथेचा नाही. तुम्ही चुकीची निवड केली." कनिष्क म्हणाला.

"तुझ्या शब्दांच्या जाळ्यात मला अडकवू बघतोय." आणि भैरव मोठ्याने हसू लागला.

"ठीक आहे. बोल पुढे काय करायचं ? " कनिष्क उत्तरला.

आणि मनोमन महादेवाला विनंती केली की मला शक्ती द्या की ह्या नराधमांच्या तावडीतून ते निष्पाप जीव मी वाचवू शकेल.

"कनिष्क, शब्द येतात तुझ्या जाळ्यात स्वतः अडकायला आणि तुझ्या लेखणीत ती ताकद आहे ज्यात नेहमी सत्याचा विजय होतो. तबकात न बघता त्याच्या कडेला एक मंत्र आहे तो म्हण ज्यातून तबकाचा काळभोर मितीत अडकलेले सगळे मनुष्य बाहेर पडतील आणि त्यानंतर तर तुला काय करायचंय ठाऊकच आहे." अशाप्रकारे महादेवाचे आशिष मिळाल्याने कनिष्कला एक वेगळीच ताकद मिळाली. त्याने आजूबाजूला बघितलं तर एक मोठासा सुशोभित आरसा त्याला दिसला आणि एक गूढ हास्य त्याच्या चेहऱ्यावर पसरलं. किंबहुना त्याने तबकाचा अंत निश्चित केला होता. आता फक्त भैरवचा अंत कसा करायचा ह्या विचारात तो होता.

"आपल्याला तबकात प्रवेश करायचा आहे." भैरव म्हणाला.

"पण तबक तर स्टुडिओमध्ये आहे" कनिष्क उत्तरला.

भैरवने हसतच डोळे मिटले. काही मंत्र म्हणताच तबक त्याच्यासमोर प्रकट झाले. भैरव डोळे उघडण्याआधीच कनिष्कने तबकातील अभिमंत्रित पाण्यात न बघता तो मोडी लिपीतील मंत्र अगदी न चुकता म्हणाला आणि सगळे बंदीस्त बाहेर आले.

मायाने बाहेर येताच रागाने भैरवाचा चेहरा जबरदस्तीने तबकाचा पाण्यात बुडवला आणि भैरव तिथून गायब झाला पण तबक भैरवचे असल्याने तो बाहेर येण्याचा रस्ता त्यांना नक्कीच माहीत असणार , त्यामुळे कनिष्कने घाईने सगळ्यांच्या मदतीने तो मोठा आरसा उचलून तबकावर पकडला आणि त्यावरील मंत्र उलट्या दिशेने म्हणाला. कारण त्या मंत्राचा सुलट उच्चाराचा अर्थ आणि उलट उच्चाराचा अर्थ त्याने दोन्हीही समजून घेतले होते. ज्यामुळे ते तबक स्वतःमध्ये गायब झाले आणि भैरव आता कधीही त्या काळभोर मितीतून बाहेर येण्याचे सगळे मार्ग संपूर्णपणे बंद झाले होते.

माया, कांचन, संजय, श्याम, ऋतुजा, सुशील , निलेश सगळ्यांनी मिळून त्याचे मनःपूर्वक आभार मानले. मायाने झालेल्या चुकीची सगळ्यांची क्षमा मागितली, सगळ्यांनी जीव वाचला म्हणून मोठ्या मनाने माफ केलं. कनिष्कने ही कांचनचा हात पकडून मायाचा निरोप घेतला.

सगळं काही हवेत विरून गेलं आणि कनिष्क झोपेतून जागा झाला. त्यांनी लगेचच अगदी घाईने सकाळची विधी आटोपून महादेवाचं दर्शन घेतलं आणि तिथेच बसून जो सैतानी तबक मधील जो शेवट केला होता त्यातील समाप्त काढून घडलेला सगळा आढावा त्यात लिहून महादेवास नम्रपणे अर्पण करून महादेवाचे आशीर्वाद घेऊन बाहेर पडला.

आज त्याच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा दिवस होता. आयुष्यात पहिल्यांदाच त्याची दूरदर्शनवर मुलाखत होणार होती आणि दुसरं म्हणजे त्याला त्याचे प्रेम मिळणार होतं.


धन्यवाद.