सैर समुद्राची (Short Story For Kids In Marathi)

Story For Kids About Sea World
सैर समुद्राची

© प्रतिक्षा माजगावकर

"आईऽऽ" इशिका जोरात ओरडली.

तिच्या ओरडण्याचा आवाज तर कोणालाच गेला नव्हता. अचानक आपल्या सोबत हे काय झालं म्हणून तिने डोळे गच्च मिटून घेतले होते.

'हे मी कुठे आलीये? पाण्यात? मासे, खेकडे, कासव सगळे पोहताना दिसतायत. हे खरं आहे?' ती सगळीकडे बघत स्वतःशीच म्हणाली.

तोवर तिच्या खांद्यावर मागून कोणीतरी हात ठेवला म्हणून तिने दचकून मागे बघितलं.

"अगं घाबरु नकोस. तुला काही होणार नाही. चल माझ्या सोबत." एक लहान जलपरी तिच्या मागे होती.

तिने डोळे चोळून तिच्याकडे पुन्हा बघितलं.

"हो! हो! हे खरं आहे. तू आत्ता आमच्या जादूच्या समुद्री दुनियेत आहेस." ती जलपरी म्हणाली.

"तुझं नाव काय? आणि मी इथे पाण्यात आहे तरी मला श्वास कसा घेता येतोय? मी उघड्या डोळ्यांनी व्यवस्थित बघू शकतेय आणि बोलता पण येतंय हे कसं शक्य आहे?" इशिकाने आश्चर्याने विचारलं.

"मी निलांबरी! तू आत्ता जादूच्या समुद्रात आहेस ना म्हणून तुला श्वास घेता येतोय आणि हे असं घडतंय. चल माझ्या सोबत मी तुला भरपूर गमती दाखवते." ती म्हणाली.

इशिका सुद्धा तिच्या मागे गेली. तिथे एक मोठा राजवाडा होता. सगळीकडे माश्यांचं सैन्य होतं.

"बघ मला एक मैत्रीण भेटली तर मी तुला तुझं नावच विचारायचे विसरले. तुझं नाव काय? आणि तू जमिनीवर राहणारी म्हणजे माणूस आहेस ना? मग तू इथे कशी आलीस?" जलपरी निलांबरीने विचारलं.

निलांबरीने विचारलेल्या प्रश्नांमुळे इशिकाला ती इथे कशी आली हे आठवू लागलं आणि ती तिच्याच आठवणीत हरवली.

"ईशू! आत्ता कुठेही जायचं नाही. समुद्राला भरती आली आहे. बस गपगुमान इथे." तिची आई तिला ओरडली.

"हो! नाही जात. पिंकीकडे जाऊन येते फक्त." ती तोंड फुगवून म्हणाली आणि खोटं बोलून समुद्र किनारी आली.

शंख, शिंपले गोळा करता करता तिला एक सगळ्यात मोठा शिंपला तिथे दिसला. उत्साहात तिने तो हातात घेतला. साध्या शिंपल्यासारखा तो नव्हताच. त्याच्यावर छान जल पऱ्यांचं चित्र होतं. 'काय असेल याच्या आत?' असा विचारून तिने तो उघडला तर त्यातून एक तीव्र प्रकाश बाहेर पडला आणि ती त्यात ओढली गेली.

"ए! अगं तू कुठे हरवलीस? मी तुला काहीतरी विचारलं होतं." निलांबरी तिला हाताला धरून तिला भानावर आणत म्हणाली.

"अम्! हो! मी इशिका. मला समुद्र किनाऱ्यावर एक शिंपला दिसला तो उघडल्यावर मी इथे आले." तिने स्वतःला सावरत सांगितलं.

"बरं. तो शिंपला कोणाला कधी सापडतो माहितेय?" निलांबरी नकळत बोलून गेली.

तिच्या बोलण्याने इशिकाने फक्त तिच्याकडे गोंधळून बघितलं पण निलांबरीने तो विषय बदलला.

"बघ बोलता बोलता आपण पोहोचलो." निलांबरी म्हणाली.

इशिकाने देखील तिच्या बोलण्याकडे जास्त लक्ष दिलं नाही. तिला आपण समुद्रात चक्क एका जलपरी सोबत आहोत यावर अजूनही विश्वास बसत नव्हता. तिला हे सगळं खूप आवडत होतं आणि या दुनियेत काय काय आहे हे बघण्याची खूप उत्सुकता होती जी तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.

"इथे काय काय आहे? मला खूप मजा करायची आहे." इशिका उत्साहात म्हणाली.

"हो आता आपण मजाच करणार आहोत. ते बघ तिथे ते पाणघोडे आहेत. चल त्यांच्या पाठीवर बसून फिरू." निलांबरी म्हणाली.

दोघी मिळून पाणघोड्याची सैर करू लागल्या. समुद्री वनस्पती त्या निमित्ताने इशिका बघत होती. आपण जशी शेती करून भाज्या पिकवतो आणि खातो तसंच काहीसं हे वाटत होतं. थोड्या अंतरावर जाऊन तो पाणघोडा थांबला.

"काय झालं? आता चालत; नाही! नाही! पोहत जायचं का?" इशिकाने विचारलं.

"नाही. ते बघ समोर कासव दादा आहे ना त्याच्या पाठीवर जाऊन बसायचं. तो आपल्याला एका अश्या जागी घेऊन जाईल जिथे तुला अजून जास्त मजा येईल." निलांबरी म्हणाली.

दोघी उतरून कासवाच्या पाठीवर बसल्या आणि त्यांचा पुढचा प्रवास सुरू झाला. समुद्राच्या त्या खोल पाण्यात अनेक आकाराचे, रंगांचे आणि विविध नक्षी असलेले मासे आणि इतर जलचर बघण्यात इशिका गुंगली होती. तिला ते अद्भुत सौंदर्य अगदी मंत्रमुग्ध करून टाकत होतं.

"किती छान छोटे छोटे मासे, मोती, गोटे आहेत." ती हळूच एका लहान माश्याला हलकेच बोटाने स्पर्श करत म्हणाली.

तोवर निलांबरीने तिच्यासाठी छान गळ्यातलं बनवून तिला दिलं.

"किती मस्त बनवलं आहेस! मला खूप आवडलं." ती म्हणाली लगेचच तिने ते गळ्यात घातलं.

आता समोर एक मोठा व्हेल मासा होता.

"इशू! चल लवकर. आता खरी गंमत येणार आहे." निलांबरी जवळ जवळ तिला ओढत व्हेल माश्याच्या पाठीवर घेऊन गेली.

काही क्षणात तो मासा वर जाऊ लागला आणि पाण्याच्या वर येताच त्याने श्वास सोडण्यासाठी हवा सोडली तसा एक पाण्याचा फवारा निघाला आणि दोघी त्या पाण्याच्या फवाऱ्यावर उडू लागल्या.

"येऽ किती भारी आहे सगळं." इशिका हसत म्हणाली.

सगळे मासे पाण्यात राहूनच श्वास घेतात, पाण्याच्या बाहेर येत नाहीत हे तिला माहीत होतं पण फक्त व्हेल मासा पाण्यात श्वास घेऊ शकत नाही आणि बाहेर येऊन श्वास घेतो हे तिने आज अनुभवलं. बराच वेळ अशी पाण्याच्या कारंज्यावर मजा करून दोघी पुन्हा समुद्रात गेल्या.

"चल आता आपण मोठ्या राजवाड्यात जाऊ. मला खूप भूक लागली आहे. खाऊ खाऊन मग आपण पुन्हा खेळू." निलांबरी म्हणाली.

"हो मला पण भूक लागली आहे. तुमच्या इथे काय काय असतं? इथली खासियत काय आहे?" इशिकाने विचारलं.

"ते तू बघशील." निलांबरी म्हणाली.

दोघी कासवाच्या पाठीवर बसूनच राजवाड्यात आल्या. राजकुमारीला येताना बघून तिथल्या सेवक जल पऱ्यांनी लगेच तिच्या आवडीचा खाऊ आणला.

"हे घे इशिका तुला आवडेल. खाऊन बघ." ती तिच्या समोर खाऊची प्लेट करत म्हणाली.

त्यात काहीतरी वळवळताना तिला दिसलं.

"हे काय आहे? मी असं काही खात नाही." इशिका म्हणाली.

"आम्ही हेच खातो! हे किडे आहेत. किड्यांचे नुडल्स मला खूप आवडतात. खाऊन बघ ना तू पण!" ती म्हणाली.

"ईऽ मला नको. आम्ही माणसं पोळी, भाजी, भात, वरण असं खातो." ती म्हणाली आणि तिथून पळून जाऊ लागली तर ऑक्टोपसने तिला एका हातात धरलं आणि दुसऱ्या हाताने तिला भरवण्यासाठी तिसऱ्या हातात खाऊची डिश घेतली. एवढ्यात तिथे निलांबरीचे आई - बाबा आले.

"सोड तिला!" त्यांनी आज्ञा दिली.

इशिका घाबरली होती.

"मला घरी जायचं आहे. मला आई - बाबांची आठवण येतेय." ती रडत रडत म्हणाली.

"हो तू जाऊ शकतेस पण तू इथे आलीस कशामुळे माहितेय?" त्यांनी विचारलं.

त्यांच्या या वाक्याने ती गोंधळून गेली आणि काहीच न बोलता खाली मान घालून उभी राहिली. राणीने तिला जवळ घेतलं.

"तू तुझ्या आईचं ऐकलं नाही आणि खोटं बोललीस ना म्हणून तू इथे आलीस. तू पुन्हा कधी खोटं बोलणार नाही आणि मोठ्यांचं सगळं ऐकशील असं वचन दे म्हणजे तू पुन्हा घरी जाऊ शकशील." राणीने तिच्या डोक्यावरून हात फिरवून सांगितलं.

इशिकाने फक्त राणीकडे बघितलं. राणी खरं बोलतेय हे तिला जाणवलं आणि निलांबरीने देखील तिला डोळ्यांनीच हो म्हणून खूण केली. तेव्हा घाबरत घाबरत इशिकाने वचन देण्यासाठी हात पुढे केला.

"हो. मी वचन देते मी पुन्हा अशी खोटं नाही बोलणार." ती घाबरून राणीच्या हातावर हात ठेवत म्हणाली त्या बरोबर ती त्या जगातून बाहेर पडली.

"तुला इथे येऊ नकोस सांगितलं होतं ना?" तिच्या आईने मागून येऊन तिला एक धपाटा दिला आणि ती भानावर आली.

बहुतेक आपण स्वप्न बघत होतो असं तिला वाटलं पण आई सोबत जाताना तिचं लक्ष गळ्याकडे गेलं आणि ती माळ तिला दिसली.

"आई! सॉरी. आता पुन्हा नाही करणार असं." ती म्हणाली.

तिच्या आईने तिला जवळ घेतलं आणि दोघी घरी आल्या. तो शिंपला आणि माळ इशिकाने निलांबरीची आठवण आणि आपली चूक लक्षात रहावी म्हणून जपून ठेवली.

समाप्त.