खरं तर , आता त्याची प्रमोशनची वेळ , मॅनेजर होण्यासाठी तो तयार होता . अतिशय हुशार , कामसू आणि कर्तव्यनिष्ठ रवी , कम्पनीशी प्रामाणिक होता. पास झाल्या झाल्या त्याने ही ऑफर स्विकारली होती. गरीब घरातून वर आलेला रवी , त्याने आपल्या बाबांना एका अपघातात गमावलं होतं आणि अचानक मोठा झाला . पण माझे आई बाबा इतके चांगले आहेत तर देवाने हे का घडवून आणलं ह्या रागातून नास्तिकतेकडे झुकला होता. आता सर्व सुरळीत झाले होते आणि प्रमोशन झाल्यावर तर संसाराची घडी छान बसेल ह्या विचारात असतानाच कम्पनीने दुसरी कम्पनी सोडून आलेल्या त्याच्या एका मित्रालाच मॅनेजरची पोस्ट दिली . आता IT कंपन्यांमध्ये नोकरी switch करणे , प्रमोशन डावलणे ह्या गोष्टी नक्कीच नविन नाहीत पण त्याचा हा मित्र मुद्दाम रवीला त्रास देत होता . त्यामुळे रवीची परत चिडचिड होऊ लागली . ह्याचा परिणाम म्हणून त्याचा परफॉर्मन्स कमी होऊ लागला. डावलण्यात आलेलं प्रमोशन , बॉसची होणारी किरकिर ह्यात त्याचे targets कुठेतरी सुटत होते आणि हे कळत असूनही रवी भरकटत होता.....
असंच बॉसशी छोट्या कारणावरून वाद होऊन वैतागून तो घरी आला . तो घरात शिरताच आईच्या लक्षात आले की काहितरी बिनसलय पण तिने बोलणं टाळलं. चहा ठेवायला ती आत गेली , पाच मिनिटांनी तिच्या लक्षात आलं, अरे, आपण अभंग लावले होते, यु ट्यूबवर, ते तसेच चालू राहिले वाटतं.... आता रवी अजुन चिडणार कारण त्याला अजिबात देवाची गाणी आवडत नाहीत. किती समजावलं पण छे , देव , संत , अभंग , भक्ती हे सगळं मिथ्या आहे असंच त्याला वाटतं. आधी जाऊन तो मोबाईल हळूच बंद करून येते, नको त्याचा मूड जायला.
आई बाहेर आली तर रवीने संपलेला अभंग रिप्ले केला होता...
नको देवराया, अंत आता पाहू
प्राण हा सर्वथा, जाऊ पाहे
हरिणीचे पाडस , व्याघ्रे धरियेलें,
मजलगी जाहले तैसे देवा ।
मजलगी जाहले तैसे देवा ।
तुजविण ठाव न दिसे त्रिभुवनी,
धावे हो जननी विठाबाई ।
धावे हो जननी विठाबाई ।
मोकलुनी आस, जाहले उदास,
घेई कान्होपात्रेस हृदयास.....।
घेई कान्होपात्रेस हृदयास.....।
" आई , सुंदर रचना आहे गं. उत्तरं मिळाली मला खूप...." रवी
" अं ? " आई
" माझे targets किंवा ध्येय म्हणजे देव, विठोबा मानलं तर ते पूर्ण करतांना जणू माझा प्राण जातोय. मी हरिणीचे पाडस , मला व्याघ्रे म्हणजे उदाहरणार्थ बॉस ने धरले आणि म्हणून मी कासावीस झालोय, त्यातून सुटायचा प्रयत्न करतोय. तुजवीण ठाव न दिसे त्रिभुवनी, म्हणजे हे targets पूर्ण करणे हीच माझी विठाबाई, त्याशिवाय मला काही दिसत नाही, अगदी असंच आहे. पुढची ओळ खूप महत्वाची, मोकलुनी आस, जाहलो मी उदास तरच माझं ध्येय मला हृदयास घेईल म्हणजेच इतर बंधने किंवा आसक्ती, जसं की चिडचिड होणं , नाराज होणं , distract होणं हे सगळं सोडून त्या इतर गोष्टींबाबत मी उदासीनता दाखवत नाही तोवर मला माझा विठोबा म्हणजेच माझं ध्येय मला हृदयास कसं घेईल ? व्वा ! आई, सगळं विसरून स्थितप्रज्ञ राहिलं पाहिजे तरच माझी यशस्वी होण्याची आस पूर्ण होईल.... "
आजवर देवाचे नाव घेतले की चिडणारा रवी, अभंगाचे निरूपण करतोय हे बघून आई मात्र मनोमन खुश झाली.
" देव म्हणून नको बघूस , हे अभंग जीवनाचे सार सांगतात रे....अभंग आपल्याला माणसातलं देवत्व शोधायला भाग पाडतात...." आई म्हणाली.
आज यु ट्यूबच्या चंद्रभागेत डुबकी मारून अभंगाच्या गजरात समजुतदारपणाचा टिळा लावत रवीने प्रगल्भतेच्या विठोबाच्या पाऊलांशी लोळण घेतली होती आणि माऊली सगुण झाली होती....!