सागराला ओढ किनाऱ्याची!!( भाग ८)

सागर आणि किनारा आज लग्नाच्या बेडीत अडकणार होते. लग्नाच्या त्या सुंदर नाजूक क्षणांचे वर्णन या भागात चित्रित केले आहे.
शरयूने फायनली लग्नासाठी होकार दिला. घाईत का होइना एंगेजमेंट देखील झाली दोघांची.

फायनली लवकरच त्यांचे लग्न होणार यावर आता शिक्कामोर्तब झाले. सागराला लागलेली किनाऱ्याची ओढ आता लग्न झाल्यावरच पूर्ण होणार असेच काहीसे वाटत होते. श्रीकांत आणि शरयू प्रेमाच्या त्या गुलाबी रंगात अगदी न्हावून निघाले होते.

दिवसागणिक दोघांमधील अंतर कमी होत होते. लग्न एक महिन्यावर असताना दरम्यानच्या काळात दोघांची भेट झाली. आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने सागर आणि किनारा एक झाले.

ती पहिली मिठी, मिठीतील तो आपलेपणा, हक्क, प्रेमाचा ओलावा दोघांनाही पुढील काही दिवस एकमेकांपासून दूर राहण्यासाठी ऊर्जा देवून गेला.

भावी आयुष्याची स्वप्न रंगवत, रात्र रात्र एकमेकांच्या आठवणीत जागत, हक्काने मग केव्हाही, कधीही फोनवर, तर कधी मॅसेज वर बोलत एक एक दिवस स्वप्नांच्या त्या गुलाबी दुनियेत दोघेही जगत होते.

बघता बघता दिवस कसे सरले ते समजलेच नाही. आणि लग्न अवघ्या चार दिवसांवर येवून ठेपले. दोन्ही घरी श्रीकांत आणि शरयूच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु होती.
तशी तयारी तर जवळपास झाल्यातच जमा होती. पण लग्न म्हटले की शेवटपर्यंत काही ना काही सुरुच असते.

पाहुणे, रावळे, नात्यातील सर्वच आता लग्नासाठी लग्न घरी जमले होते. आनंदाचा सोहळा दोन्ही घरी सजला होता.

आज शरयूचा मेहंदीचा कार्यक्रम. मैत्रिणींच्या घोळक्यात शरयू हरवून गेली होती.
मेहंदी, संगीत सारं काही जोशात सुरू होतं. लेकीच्या लग्नाची तयारी करण्यात नाना आणि सूनिताताई अजूनही व्यस्तच होत्या.

पाहुण्यांची यादी, मानपानाचे सामान, वर्हाडी मंडळींसाठी गाडीची व्यवस्था, दारासमोर मांडवडहाळे. सर्व तयारी अजूनही सुरुच होती.

नाना आणि सूनिताताई कामात जरी व्यस्त असले तरी अधूनमधून लाडक्या लेकीकडे दोघांचेही लक्ष जायचे.
नकळतपणे मग सारा भूतकाळ आठवून दोघांच्याही डोळ्यांत आसवांची दाटी व्हायची.
लेकीच्या जन्मापासून ते आतापर्यंतचा सारा प्रवास त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहायचा.

"कित्ती लवकर संपले नाही हे सारे क्षण." सुनिताताई नानांना म्हणाल्या.
"कधी शरु इतकी मोठी झाली ते समजेलच नाही."

"बघा ना, बघता बघता आपली लेक आता सासरी निघाली. घर खायला उठेल हो ती सासरी गेल्यावर."

"त्याला काही पर्याय आहे का आता.??"
"उगीच नाही म्हणत, लेक परक्याचे धन."
नाना अश्रूंना आवरण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते.

पण अश्रूंचा बांध तुटायच्या आत बोलणे अर्धवट सोडून तसेच पुन्हा ते त्यांच्या कामाला लागले.
सुनिता ताईंना एका बापाच्या मनाची घालमेल समजली.

"आपण बायका रडून, बोलून मोकळं होतो. पण पुरुषाला ह्या बाबतीत खूप मर्यादा पडतात."
आणि नाना देखील आज त्याच मर्यादेच्या बंधनात बंदिस्त होते.
अश्रूंना आवर घालत ते लेकीच्या लग्नाचा सोहळा सजवत होते.

शरयूला आनंदात पाहून नाना आणि सूनिताताई दोघेही मनातून आनंदी झाले होते. पण एकुलती एक लेक सासरी जाणार म्हटल्यावर आई बापाचा उर भरून तर येणारच.

तिकडे श्री मात्र दिवसभर शरयू सोबत बोलण्यासाठी, तिला पाहण्यासाठी आतुर झाला होता.
पण आज काही केल्या त्याला शरयूसोबत बोलताच येइना.

शरयू च्या दोन्ही हातांवर श्रीकांतच्या नावाची मेहंदी जी सजली होती.

श्रीकांतने खूप सारे मॅसेज केले होते शरयूला पण तिचा काहीच रिप्लाय न आल्याने न राहवून त्याने शेवटी फोनच केला.

"श्री कॉलिंग.." स्क्रीन वर दिसताच मैत्रिणी मात्र आता शरयूची खूपच खेचायला लागल्या.

शेवटी एका मैत्रिणीने फोन उचलला.

"हॅलो, शरयू आहे का??"
"तिच्याकडे द्या ना प्लीज." श्रीकांत म्हणाला.

"हॅलो मी शरयूच बोलतीये."

"नका हो माझी फिरकी घेवू. प्लीज द्या ना तिच्याकडे फोन."

"सॉरी पण ती नाही बोलू शकणार."

"आणि काय हो जिजाजी, आता फक्त दोनच दिवसांचा तर प्रश्न आहे. इतकी कसली हो घाई झालीये तुम्हाला??
घालवू द्या की आमच्या शरयूला आमच्यासोबत काही आनंदाचे क्षण."

"नंतर आम्ही तुम्हाला अजिबात डिस्टर्ब नाही करणार बरं का."

"बरं मग ठेवतो मी." म्हणत श्रीने फोन कट केला.

"काय राव ही शरयू पण ना. कशाला मैत्रिणीला उचलायला सांगितला माझा कॉल?"

श्रीकांतचा पूर्ण मुड ऑफ झाला होता.

"काय ग?? तुम्ही पण ना??"
"कशाला उगीच त्यांना त्रास दिलात??"

"थोड्या वेळात शरयूनेच थोडं बाजूला जावून श्रीला व्हिडिओ कॉल केला."
मैत्रिणींना मात्र आजूबाजूलाही फिरकू दिलं नाही तिने.
"उगीच श्रीला नाही आवडली कुणाची गंमत तर नाराज व्हायचा तो."

शरयूचा फोन आला तसा श्री थोडा बिचकलाच.
"आता पुन्हा कुणी मस्करी तर नसेल ना करत?" म्हणत त्याने घाबरतच मग कॉल घेतला.
समोर शरयूला पाहताच त्याचा चेहरा खुलला. तिचे ते सौंदर्य तिच्या हातावरील मेहंदीमुळे आणखीच खुलले होते.

शरयू मात्र श्रीच्या नजरेला नजर देतानाही अगदी शहारत होती. लाजेची लाली तिच्या गाली चढली होती.
नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा शब्दांनी दडी मारली होती.
नजरेतूनच साऱ्या भावना ओसंडून वाहत होत्या.

अखेर श्रीने मनातील भावनांना वाट मोकळी करुन दिली.

"खूप गोड दिसत आहेस शरयू."
माझीच दृष्ट लागायची तुला.

"गप रे काहीही काय?"
"आपल्या माणसांची कधी दृष्ट लागते का?"

"बरं श्री, मी जावू का रे. मैत्रिणी वाट पाहताहेत."
बोलणे अर्धवट सोडून मधेच शरयू म्हणाली.

"अगं तू तरी मस्त रमलियेस मैत्रिणींच्या घोळक्यात. मला तर इथे घड्याळच थांबल्यासारखे वाटत आहे."

"झालं रे दोनच दिवस. मग येतेच मी."
"आता ठेवू फोन. प्लीज समजून घे."

काहीही न बोलता. श्रीने फक्त मान डोलावली. आणि फोन कट केला.
त्याची शरयूबद्दलची ओढ त्याच्या नजरेत जाणवत होती. सागराला लागलेली किनाऱ्याची ओढ आता लवकरच पूर्ण होणार होती.

लग्नाच्या आदल्या दिवशी मग मुलीकडचे लोक, सर्व वर्हाडी मंडळी मुंबईला पोहोचले.
आप्पांनी सर्वांच्या राहण्याची उत्तम व्यवस्था केली होती. नात्यातील सर्वच जण "नाना मुलगा खुप छान शोधला आपल्या शरयूसाठी" म्हणत नानांचे कौतुक करत होते.
सर्वगुणसंपन्न असे कुटुंब मिळाले म्हणून सर्वजण आनंदी होते शरयूच्या बाबतीत.

आदल्या दिवशीच मग हळदीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. गावच्या लोकांना मुलाकडच्या लोकांची एक गोष्ट खूप आवडली ती म्हणजे, इतकी मोठी माणसे पण किती सहज गावच्या लोकांना आपलेसे करून घेतले ह्यांनी.
माणुसकी जपत मुलाची बाजू असतानाही मुलीच्या घरच्यांना मान देण्यात कुठेही कमी पडत नव्हते ते.

दुसऱ्या दिवशी मग काय तो विवाहसोहळ्याचा थाट. सर्वांनाच मनोमन सुखावून गेला. शरयू श्रीची जोडी लाखात एक शोभून दिसत होती.
एक एक विधी पूर्ण करत अखेर सप्तपदीची ती वेळ आली.

पाठवणीची वेळ जसजशी जवळ येत होती तसा शरयूच्या काळजाचा ठोका चुकत होता. नाना आणि आईचा रडवेला चेहरा शरयूला पाहवेना.
श्री जवळ होता तरी आता तिचे मन मात्र नाना आणि आईकडे सारखे धाव घेत होते.
शरयूचा रडवेला चेहरा पाहून श्रीच्या डोळ्यात पाणी तरळले. पण भावनांना आवर घालत नजरेतून शरयूची तो समजूत घालत होता.

"कित्ती अवघड असते हे सारे.?? ज्यांनी लहानाचे मोठे करायचे त्यांना असं एका क्षणात दूरही करायचे.??
खरंच सोप्पं नाही मुलीचे आई वडील होणं."
श्री मनातच विचार करत राहिला.

मंगलाष्टके सुरु झाली तसा नाना आणि सूनिताताईंच्या अश्रूंचा बांध तुटला. माधवराव आणि अनुराधा ताईंनी कसेबसे दोघांनाही सावरले.

अखेर सप्तपदीच्या पवित्र बंधनात श्री आणि शरयू दोघेही जन्मभरादाठी बंदिस्त झाले होते.
सागर आणि किनारा आता कुठे लीगली एक झाले होते.

हो नाही करता करता अखेर शरयू आणि श्रीचा विवाह सोहळा संपन्न झाला. आणि अखेर सागर आणि किनारा एक झालेच. पण तरीही ती ओढ अजून तशीच कायम होती.

नाना आणि सुनीताताईंनी जड अंत:करणाने लेकीचे कन्यादान केले. तिची पाठवणी करताना मात्र दोघांनाही अश्रू अनावर झाले.
शरयुचा देखील अश्रूंचा बांध तुटला.

आई वडिलांची मायेची ऊब असलेली मिठी सोडवताना शरयूचे प्राण अगदी कंठाशी आले होते.

"नाना मी समजू शकतो तुमच्या भावना. पण काळजी करू नका शरयू आमची सून नाही तर मुलगी म्हणून आमच्या घरी आम्ही नेत आहोत.
आप्पांचे हे वाक्य ऐकून नानांचा उर अगदी भरून आला.

पण तरीही मुलीच्या पाठवणीचे ते क्षण म्हणजे डोळ्यांत पाणी आणणारेच असतात.

मनातील स्वप्नांच्या महालात मोठ्या जल्लोषात शरयूच्या स्वागताची तिकडे तयारी करण्यात आली होती. आनंदाने नव्या नवरीचा तिच्या हक्काच्या घरी गृहप्रवेश होणार होता.

बंगल्याच्या बाहेर गाडी येताच. फटाके फोडण्यात आले. डीजेच्या तालावर सगळ्यांनी मग ठेका धरला.
अगदी थोडाच वेळ पण वरातीचा कार्यक्रमही छान झाला. आप्पांनी घाईतच मग उरकते घ्यायला सांगितले. उगीच ताटकळण्यात काही अर्थ नाही. सगळेच दमले असणार याची कल्पना होती आप्पांना.

तासाभरातच मग नव्या नवरीच्या गृहप्रवेशाची वेळ झाली.
पण त्याआधी नाव घेतल्याशिवाय दोघांनाही घरात प्रवेश नव्हता.

नणंदांनी दार जे अडवले होते.सर्वांच्या आग्रहास्तव मग शरयूने नाव घेतले.

"सागराला होती किनाऱ्याची ओढ
एकमेकांच्या भावनांना मिळाली प्रेमाची जोड
श्रीकांतरावांचे नाव घेवून करते संसाराची सुरुवात गोड..."

"क्या बात है. भारीच की. चल आता तुझी वाट मोकळी झाली "

"आता श्री तुझा नंबर. चल पटकन नाव घे."
म्हणत बहिणींचा आग्रह सुरु झाला.

मग श्री देखील मनात नावाची जुळवाजुळव करु लागला.
आणि फायनली त्याने एक छानसे नाव घेतले.

"सागर आणि किनारा एक झाले आज देवा ब्राम्हणांच्या साक्षीने..
जीवनाचा खरा प्रवास सुरु झाला आता शरयुच्या साथीने.."

सर्वांनी आता दोघांचीही खूप खेचायला सुरुवात केली.
"अरे वा. भारीच आहे बाबा तुमची ही सागर आणि किनार्याची कहाणी."

"पण एक सांग श्री, यातील सागर कोण आणि किनारा कोण रे?"
दोघांनी कसं अगदी ठरवून नाव घेतलं रे.

"गप ग ताई, बाकी सगळं सांगतो तुला नंतर.आधी घरात तर येवू देत आम्हाला."

थोड्याशा गमती जमती नंतर शरयूचा गृहप्रवेश झाला.
श्रीच्या घराची असलेली पद्धतशीर रचना शरयूला खूपच भावली.

श्रीला मात्र शरयूची खूप काळजी वाटत होती. नवीन घरात तिला थोडं अवघडल्यासारखे वाटणे स्वाभाविक होते. नजरेतूनच तो तिला धीर देत होता.
श्रीच्या बहिणींनी मात्र काही क्षणातच तिला आपलेसे करून घेतले. लहान लहान भाचे कंपनी शरयूला मामी मामी करत तिच्या अवतीभवती घुटमळत होते.

शरयूला तर या साऱ्याची खूपच गंमत वाटायची.
"कालपर्यंत किती वेगळं होतं नाही सगळं आणि आज एका क्षणात सारं काही बदललं. लग्नामुळे नवी ओळख, नवी नाती मिळाली. एक आनंदाचे स्वप्नातील हे घर मिळाले.
फक्त आणि फक्त श्री मुळेच हे शक्य झाले.

चार पाच दिवसाच्या दगदगीमुळे शरयूला खूपच थकल्यासारखे वाटत होते. डोळ्यांवर प्रचंड झोप येत होती. पण नवीन घरात, नवीन माणसांत थोडंसं अवघडल्यासारखंच झालं होतं तिला.

श्री ला सारे काही समजत होते. पण काय करावे काही सुचेना त्याला. तितक्यात त्याची ताई आली.

"अगं ताई शरयूला काही हवंय का? ते विचारुन बघ ना एकदा. खूप थकल्या सारखी दिसत आहे ग ती."

"ओहो, क्या बात है श्री. बायकोची आतापासूनच इतकी काळजी??"
"नशीबवान आहे बाबा शरयू, तीला तुझ्यासारखा काळजीवाहू नवरा मिळाला."

ताईने पुन्हा एकदा श्रीची खेचायला सुरुवात केली.

"काय ग ताई? तू पण ना. काळजी वाटते ग तिची. नवीन ठिकाणी ती थोडी बावरली असणारच ना ग."

"हो रे राजा, समजू शकते मी तुझ्या मनाची अवस्था."

"बरं थांब. आलेच मी." म्हणत ताई शरयूच्या रुमकडे वळली.

"शरयू, भूक लागली असेल ना ग? चल जेवण करून घे. तुम्हाला दोघांना वाढते मी."

पण, त्याआधी एक काम कर, तू चेंज करुन घे पट्कन आणि जेवून झोपून घे. खूप थकलियेस ना?
उद्या पुन्हा जागरण करावे लागणार आहे तुम्हाला. सत्यनारायण पूजा आहे उद्या. त्यामुळे आजच आराम करुन घे.

"आणि अजिबात अवघडून जायचे नाही नवीन घरात. सगळेच जण खूप फ्री माईंडेड आहेत इकडे. काही लागलं तर हक्काने सांगायचं. आता तुझेच घर आहे हे.
दोन चार दिवस थोडं वेगळं वाटेल तुला. मग नंतर काही प्रॉब्लेम नाही."

नणंदेच्या ह्या समजूतदारीच्या शब्दांनी शरयूला खूपच आधार मिळाला.

जेवण झाल्यावर शरयू लगेचच झोपली. जागा नवीन होती पण अगदी पडल्या पडल्या तिला झोप लागली.

आज दिवसभर सोबत असूनही शरयू सोबत नीट बोलताच आले नाही. म्हणून मग श्रीची पावले शरयूच्या रुमकडे वळली.
अलगद त्याने दार ढकलले. पण शरयू अगदी गाढ झोपली होती.

"झोपेत कित्ती गोड दिसते ही."

शरयूचे ते निरागस रूप पाहून श्रीचा तिथून पायच निघेना. पण तिला जाग यायला नको म्हणून तो लगेचच मागे फिरला.

आधी तिला पाहण्यासाठी, तिच्यासोबत बोलण्यासाठी आतुर झालेला श्री अचानक एक समजदार आणि जबाबदार नवरा झाल्याचे जाणवत होते.

दुसऱ्या दिवशी मग सत्यनाराणाच्या पूजेची तयारी झाली. पाहुण्यांच्या सोयीसाठी लगेचच पूजा ठेवण्यात आली होती.

शरयुचे जवळचे सर्वच नातेवाईक पूजेसाठी थांबले होते.
आनंदी आणि उत्साही वातावरणात पूजा संपन्न झाली.

लग्नानंतरचे सर्व सोपस्कार उत्तमरीत्या पार पडले.

दोनच दिवसांत शरयूला पहिल्या बोळवणीसाठी माहेरी पाठवण्यात आले.

तिचा क्षणभराचाही विरह आता श्रीला सहन होईना.
आता मात्र सागराला लागलेली किनाऱ्याची ओढ त्यांच्या मिलनासाठी आतुर झाली होती.

माहेरी गेलेल्या शरयूची श्री आतुरतेने वाट पाहत होता.
उद्या शरयू येणार हे समजताच नुसत्या विचारानेच त्याच्या चेहऱ्यावर हास्यकळी खुलली.

कितीतरी वेळ फोनवर बोलूनही, दोघांचेही पोट काही भरेना. त्या पहिल्या रात्रीची दोघेही आतुरतेने वाट पाहत होते. शरयूला देखील कधी एकदा श्रीच्या मिठीत विसावेल असेच झाले होते.

फायनली शरयू पुन्हा एकदा सासरी पोहोचली. आज खऱ्या अर्थाने तीच्या संसाराला सुरुवात झाली.
किचनमध्ये आज शरयूचा पहिलाच दिवस.

सासू नणंदा सगळ्याच स्वयंपाकात व्यस्त होत्या.

"ताई मी काय करु सांगा ना?" शरयू म्हणाली.

"अगं आज राहू दे. आजही प्रवास झाला आहे तुझा." उद्यापासून छान सुरुवात कर. मोठी नणंद आपलेपणाने उत्तरली.

पण शरयूच ती. बाकी सगळे काम करत असताना ती थोडीच ना शांत बसणार होती.

सर्वांसाठी तिने मग शेवयांची खीर बनवली. सर्वाँना ती प्रचंड आवडली देखील. नव्या सुनेची तारीफ मग सर्वांनीच केली.

चला एकंदरीतच शरयूची नवीन घरी सुरुवात तर छानच झाली होती.
तेवढ्यात शरयूच्या एका जवळच्या मैत्रिणीचा फोन आला.

"अगं शरयू आज बँक एकझामचा रिझल्ट लागला. पाहिला नाहीस का??"

"अरे मी तर विसरूनच गेले आज रिझल्ट आहे ते."
"लग्नाच्या ह्या गडबडीत खरंच अगं लक्षातच नाही राहिले."

"पण तुझा काय रिझल्ट आला.?"

"माझं काय? तुला तर माहीतच आहे. तुझ्याइतकी हुशार नाही ग बाई मी. तुझा नक्की सुटला असणार ह्यावेळी. बघ लवकर आणि सांग मला."

"थांब मी चेक करते आणि सांगते तुला."
पहिल्यांदा तिचे मन तिला म्हणत होते, "देवा ह्यावेळी नको सिलेक्शन व्हायला. पुढच्या एकझाम मध्ये होवू दे.

श्रीने मग त्याच्या laptop वरुन शरयूचा रिझल्ट पाहिला. शरयू उत्तम गुणांनी पास झाली होती.
स्टेट बँकेच्या शाखेत शरयूची मॅनेजर पदावर निवड झाली होती.

आता बायकोच्या यशाचा आनंद साजरा करावा की पुन्हा एकदा तिच्या विरहाचे दुःख. तेच समजेना श्रीला.

आयुष्य हे असेच असते. एक गोष्ट मिळाली तर दुसरी हातातून निसटून जाते की काय?? याची सतत भीती सतावत असते.

तसेच झाले होते श्रीचे. इतक्या दिवसाची ती ओढ, मनातील भावनांना घातलेला आवर, एकमेकांच्या मिठीत प्रेमाची नवी नवलाई अनुभवण्याची ती उत्कट इच्छा. या साऱ्याचे काय??

क्षणभर श्री विचारचक्रात गुंतला.
समोर शरयू आहे. हेही विसरला तो काही काळासाठी.

पुढच्या आठच दिवसांत शरयूला ट्रेनिंगसाठी हजर राहावे लागणार होते.

आता कुठे सागर आणि किनारा एक होवू पाहत होते. पण त्याआधीच पुन्हा एकदा दोघांनाही काही काळ तरी विरह सहन करावाच लागणार होता.

"श्री.." शरयूने आवाज दिला तेव्हा कुठे तो विचारचक्रातून बाहेर आला.

"खूप खूप अभिनंदन तुझे. फायनली तू अचिव्ह केलंस."
शरयुचे अभिनंदन तर केले श्रीने. बायकोच्या यशाचे खूप कौतुक वाटले त्याला.
पण मनातील भावनांचे काय? इच्छा असूनही शरयूच्या यशाचा आनंदसोहळा मनाप्रमाणे श्रीला साजरा करता येइना. पण तरीही फक्त शरयूसाठी आप्पांच्या सांगण्यावरून का होईना त्याने सारे बळ एकवटून शरयूच्या यशाचा आनंद साजरा केला.

शरयूला समजत होती श्रीच्या मनाची अवस्था. शरयूची देखील श्रीसारखीच अवस्था झाली होती. ज्या गोष्टीसाठी ती आत्तापर्यंत धडपडत होती, त्या दोन्ही आता तिच्या पुढ्यात होत्या.
दोन्हीही तितक्याच प्रिय. मग अशावेळी कोणा एकाची निवड करायची वेळ आलीच तर..??

दोघांचीही अवस्था सारखीच झाली होती. पण आता पुढे काय?? दोघांनाही समजेना.

आता खरंच पुढे शरयूचा काय निर्णय असणार.??

काय वाटते तुम्हाला??
शरयू तर आता पुरती पेचात सापडली होती. सध्यातरी पुढे काय?? या प्रश्नाचे उत्तर नव्हते तिच्याकडे. पण काहीतरी निर्णय हा घ्यावाच लागणार होता.

आता शरयूचा नेमका काय निर्णय असणार. श्रीसाठी, त्याच्या प्रेमासाठी आता शरयू नेमका काय निर्णय घेणार? हे पुढील भागात नक्की जाणून घ्या.

क्रमशः

©® कविता सुयोग वायकर

🎭 Series Post

View all