सागराला ओढ किनाऱ्याची..!!(भाग ५)

एका मुलीच्या लेखी लग्नापेक्षाही जास्त शिक्षणाला असलेले महत्त्व तसेच कोणत्याही गोष्टीत अति घाई न करता विचारपूर्वक घेतलेला निर्णय पुढे जावून कसा फायदेशीर ठरतो याचे चित्रण या कथेत दर्शवले आहे.


शरयू आणि श्रीकांतचे नाते दिवसागणिक बहरत होते. एकमेकांना जाणून घेता घेता रोजच आता प्रेमाच्या गावी ते भेटत होते. प्रेम, आपुलकी, काळजी, ओढ, विश्वास सारं काही सामावलं होतं त्यांच्या नात्यात. पण आता स्वप्नातील सारे सुख सत्यात उतरु पाहत होते.

"अजून किती वेळ शरयू अशी ताटकळत ठेवणार आहेस ग मला? नाही सहन होत आता हा विरह. सांगून टाक ना माधव काकांना आता. करा म्हणावं लग्नाची पुढची बोलणी."

सागराला लागलेली किनाऱ्याची ओढ दिवसागणिक वाढतच होती.

"अरे थोडेच दिवसांत माझी बँकेची एक्झाम आहे रे. तेवढी का एकदा झाली की मग मी निश्चिंत होईल बघ."

"अगं पण आधीच्या तीन मध्ये तू बेस्ट दिलंच आहेस ना. त्यात एक तरी पेपर सुटणार याची खात्री असताना आता का पुन्हा परत एक्झाम?"

"हे बघ श्री, शेवटपर्यंत मनापासून प्रयत्न करणं हे माझ्या हातात आहे. बाकी सर्व काळजी त्या वरच्या परमेश्वरालाच."
"जे माझ्यासाठी योग्य आहे ते तो नक्कीच देईल मला. पण काहीही न करता आपोआप थोडीच न मिळणार आहे. त्यासाठीचे सारे प्रयत्न शेवटी मलाच करावे लागणार."

"शेवटी यश अपयश हे तर ठरलेलेच असते पण कोणताही डाव न खेळता हारण्यापेक्षा खेळून हरलेले कधीही योग्य. असे मला तरी वाटते."

"आणि नाहीच सुटले आधीचे पेपर तर पुन्हा पश्र्चाताप करत बसण्यापेक्षा आलेल्या संधीचे सोने करुयात म्हटलं."

"बरं बाई, तू म्हणतेस तसं. पण, कधी आहे एक्झाम?"

"होईल अरे वीस एक दिवसांत."
"ये पण तोपर्यंत आपल्याला आपल्या बोलण्यावर थोडा कंट्रोल ठेवायला हवा आ." शरयू म्हणाली.

"अरे ही शेवटची संधी म्हणून मी या परीक्षेकडे पाहत आहे. कारण आता लग्न झाल्यावर पुन्हा आयुष्याचा नवा अध्याय सुरु होणार. मग त्याही परीक्षेत यशस्वीरित्या वाटचाल करायला पुन्हा सज्ज तर व्हावंच लागणार ना."

"परीक्षा तुझी पण त्याचा त्रास मला होतोय बरं का."
"आता बोलायचं नाही हे काय मधेच काढलंस?"श्री म्हणाला.

"समजून घे ना रे श्री, तू नाही समजून घेणार मग कोण घेणार, सांग बरं."

" बरं मॅडम तू म्हणतेस तसं."

"ये पण एक्झाम साठी तू इकडे येणार असशील ना? म्हणजे माधव सरांच्या घरी?"

" हो रे मग दुसरं कुठे जाणार?"

" शरयू तूझ्या लक्षात येतंय का काही?"
" म्हणजे अगं आपण भेटू शकतो."

"वेडा आहेस का तू श्री? काहीही काय?"

"मला बाकी काही माहित नाही पण मला तुला भेटायचं म्हणजे भेटायचंय."

"हा काय हट्ट आहे श्री? कधी कधी तू ना अगदी लहान मुलासारखा वागतोस बरं का."

" हो का. आणि तू माझ्यासोबत जे वागतेस ते कितपत योग्य आहे?"
"आणि काय ग, अटी काय फक्त तूच घालायच्यास का?"

" नाही ग सहन होत आता. तुला भेटण्याची, पुन्हा एकदा डोळेभरून पाहण्याची खूप ओढ लागली आहे ग. आणि तू मुंबईला येवूनही मला न भेटता तशीच जाणार. माझ्या मनाचाही थोडा विचार कर ना जरा."

"बाकी मी आता तुझे काही एक ऐकणार नाही."
"आपण भेटतोय हे फायनल म्हणजे फायनल."
"काय? कसं? कधी? ते तेव्हाचं तेव्हा पाहू पण आपण भेटणार हे लक्षात असू दे."

"तू जर माझी ही अट मान्य केलीस तरच मी पुढचे काही दिवस तुझ्यासोबतचं बोलणं कंट्रोल मध्ये ठेवू शकेल."
"बघ हे मंजूर असेल तर सांग. नाहीतर तुला मी अभ्यास करु देत नसतो."

कधी कधी श्री चे हे लाडिक बोलणेदेखील शरयूच्या ह्रदयाला जावून भिडायचे.

" तू तर ब्लॅकमेलच करतोय बाबा मला."

"असू दे, दुसरा पर्यायच ठेवला नाहीस तू. मग मी तरी काय करु सांग??"

"बरं बाबा भेटुयात."
"आता तरी खुश का?"
(तसं शरयूलाही श्री ला भेटण्याची ओढ नव्हती असे नाही. पण मनातील भाव फक्त ओठांवर येण्याचे नाव काही घेईनात. एक स्री म्हणून मनातील भावनांना तिने स्वतःहुनच मर्यादा घालून घेतल्या होत्या.)

"म्हणजे काय प्रश्न आहे का.?" श्रीकांत लागलीच उत्तरला.

"आता तरी ठेवूयात का रे फोन?"
"खूपच उशीर झालाय रे श्री. बोलताना ना भानच राहत नाही आपल्याला. बरं तू झोप आता मी थोडा वेळ अभ्यास करते."

"अगं ही काय वेळ आहे का आता अभ्यासाची?? घड्याळात बघ वाजले किती ते?"
"मॅडम रात्रीचे दोन वाजतायेत. झोप बरं आता तू. उद्यापासून कर अभ्यास. मी नाही त्रास देणार तुला."

"हो रे झोपते. चल ठेवूयात मग?"

" बरं बाई तू म्हणतेस तसं."

शरयूला आता हसूच आवरेना.
"खरंच खूप वेडा आहेस तू श्री."

"बघ आ अजूनही वेळ गेलेली नाहीये. या वेड्या सोबत संसार करशील ना नक्की.?"

" गप रे, झोप बरं आता."

"चल बाय ठवते मी."

" Bye. Good night. Love u so much dear."
श्रीकांत अगदी सहजच बोलून गेला.

तशी शरयू च्या चेहऱ्यावर लाजेची कळी खुलली. श्रीकांतच्या तोंडून असं अनपेक्षिरीत्या \"लव्ह यू\" आले नि काही क्षण ती स्तब्धच झाली. काहीही प्रतिसाद न देता तिने तसाच फोन कट केला. स्री मनातील भावनांचा उडालेला गोंधळ श्रीकांतने अचूक हेरला.
लागलीच त्याने शरयूला msg केला.

"तुझ्याही तोंडून रिप्लाय ऐकायला नक्कीच आवडेल मला. वाट पाहील मी त्या दिवसाची."
"And thank u so much. तुझ्यामुळेच आजकाल माझा प्रत्येक दिवस खूपच आनंदात जातो आहे. माझ्या जगण्याचे नवे कारण मला तुझ्यामुळेच सापडले."

"फक्त आता लवकरात लवकर तुझ्या या वेड्या श्रीच्या आयुष्यात कायमची सोबती बनून ये आणि मनातील स्वप्नांना प्रितीच्या झुल्यावर मनसोक्त हिंदोळे घेवू दे."

श्रीचे हे सारे बोलणे शरयूच्या काळजाचा ठाव घेत होते. पण त्याच्या msg ला रिप्लाय देताना तिच्या मनातील शब्दांनी जणू दडीच मारली होती. काय बोलावे तिला काही सुचत नव्हते.
श्री चा चेहरा काही केल्या तिच्या समोरुन हटायलाच तयार होत नव्हता.

त्या रात्रीच्या काळोखातही तो तिच्या अवतीभवती असल्याचा भास तिच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर खुलवित होता.
मऊशार पिलोभोवतीची तिची ती प्रेमळ मिठी आणखीच घट्ट करत, स्वप्नांच्या दुनियेत हरवत श्रीच्या बाहुपाशात अलगद विसवल्याचे चित्र मनात रंगवत ती कधी निद्रेच्या अधीन झाली हे तिचे तिलाही समजले नाही.

तिकडे श्रीची देखील काही वेगळी अवस्था नव्हती. ती पहिली भेट ते आजपर्यंतचा सारा प्रवास; त्याच्या डोळ्यासमोर फेर धरुन नाचत होता.
बंद पापण्यांच्या पलिकडे शरयुचा दडलेला चेहरा आठवत तोही मग निद्रेच्या अधीन झाला.

पुढचे काही दिवस फक्त msg वर बोलायचे दोघेही. हा पण तेही ठराविक वेळेतच. त्यातही एकमेकांची काळजी, विचारपूस, प्रेम सारं काही ओसंडून वहायचं.
पण त्या काही मिनिटांच्या संभाषणातून देखील दोघांचेही मन आनंदी व्हायचे. आणि दोघांचाही संपूर्ण दिवस मग आनंदात जायचा.

दुराव्यामुळे तर दोघांनाही असलेली प्रेमाची ओढ मात्र दिवसागणिक आणखीच वाढत होती.
शरयू अभ्यासात व्यस्त होती पण श्रीकांत मात्र तिच्या भेटीची स्वप्न रंगवण्यात एक एक दिवस मोठ्या मुश्किलीने काढत होता.

"कधी एकदा हा कठीण काळ सरतो आणि शरयुला भेटतो" असे झाले होते त्याला.

बघता बघता पंधरा दिवस होत आले. शरयूची परीक्षा अवघ्या चार दिवसांवर येवून ठेपली. नेहमीप्रमाणे शरयूने तिच्या माधव काकांना फोन करुन पेपर विषयी कल्पना दिली.

श्रीला देखील ती येणार असल्याचे तिने सांगितले. तो दोन दिवसांचा काळ दोन वर्षाप्रमाणे भासत होता श्रीला. एक एक क्षण तो मोठ्या मुश्किलीने घालवत होता.

अखेर पेपरच्या आदल्या दिवशी शरयूला नानांनी गाडीत बसवून दिले. माधवरावांना तसे फोन करून सांगितले.

"नाना काही काळजी करु नकोस, मी जाईल वेळेत शरुला स्टेशनवर घ्यायला तू निश्चिंत राहा."

"आता इतकी संधी चालून आलीये तर मग शरयू आणि श्रीकांतची भेटही घडवून आणता येईल."

माधवरावांच्या मनात अचानक विचार आला.

"आता मलाच यात लक्ष घालायला हवे. दोघांशिही समोरासमोर बोलायला हवे. कुठपर्यंत आलीये त्यांची एकमेकांना जाणून घेण्याची प्रगती पाहायलाच हवे."

शरयू पोहोचायच्या आधी माधवरावांनी श्रीकांतला बोलवून घेतले स्टेशनवर.
"हा फक्त शरयूला यातलं काही एक सांगू नकोस" असेही बजावले त्यांनी श्रीकांतला."

आणि तसंही श्रीकांतलाही तेच हवं होतं म्हणा. क्षणाचाही विलंब न लावता श्रीकांत स्टेशनवर पोहोचला.
माधवराव देखील थोडे लवकरच पोहोचले तिकडे. रोजच्या कामाच्या गडबडीत अनेकदा भेट होवूनही त्यांना श्रीकांतसोबत या विषयावर बोलताच येत नव्हते.

"आज मात्र काहीही झाले तरी काय तो निर्णय घ्यायचाच" हे ठरवूनच माधवराव तिकडे आले होते.

शरयू येइपर्यंत माधवराव आणि श्रीकांत त्यांच्याच गाडीत बसून बराच वेळ बोलत होते.
"काय मग श्रीकांत कुठपर्यंत आली तुमची प्रगती?"

"म्हणजे सर? कशाबद्दल बोलताय तुम्ही?"

"उगीच वेड पांघरून पेडगावला जावू नकोस श्रीकांत."
"मला काय म्हणायचंय हे तुलाही चांगलेच ठावूक आहे."

"हो सर, म्हणजे शरयूची ही एक्झाम झाली की पुढची बोलणी करायला काहीच हरकत नाही आमची."

"अरे पण तिची तयारी आहे का?"

"हो सर, तिच बोलली असं मला."

"मग झालं तर येत्या चार पाच दिवसांत सगळंच फायनल करून टाकूयात. तुला काही प्रॉब्लेम तर नाही ना?"

"सर, आता मला काय प्रॉब्लेम असणार? मी आधीही तयार होतो आणि आताही तयारच आहे."

"म्हणजे तू तर गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच आहे म्हणायचं."

"काय हे, तुम्ही पण ना सर." श्रीला तर आता मेल्याहून मेल्यासारखे झाले होते.
माधव सर पण अशी गंमत करु शकतात. याचे नवलच वाटले क्षणभर श्रीला.

"बरं काय प्रेमाची गाडी कुठपर्यंत आली तुमची?" माधव सरांनी पुन्हा एकदा टोमणा मारला.

आता शब्दच सापडेना श्रीला, माधव सरांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर द्यायला. श्री चाचपडत असल्याचे दिसताच माधव सर म्हणाले,

"बरं राहू दे नको सांगू, तुझा चेहराच सगळं काही सांगून गेला."

बोलता बोलता श्री सारखा हातातील घड्याळाकडे पाहत होता. शरयूच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या श्रीला टोमणे मारण्याचा एक चांसही सोडला नाही माधव रावांनी.

"हो हो येईल रे ती. किती उतावीळ झालायेस शरुला भेटण्यासाठी समजत नाही का मला."
"थांब मी फोन करुन बघतो तिला."

"हॅलो शरयू, कुठपर्यंत आलीस बेटा??"

" काका पाचच मिनिटात पोहोचतिये."

"बरं उतरल्यावर आपल्या नेहमीच्या ठिकाणीच गाडी पार्क केलीये मी. डायरेक्ट तिकडेच ये तू."

" हो काका येते," म्हणत शरूने फोन ठेवला.

शरु येण्याची वेळ झाली तशी श्री च्या हृदयाची धडधड आणखीच वाढली.
"शरयू समोर आल्यावर, मला असं अचानक समोर पाहून कशी react होईल ती?" याची उत्सुकता लागली होती श्रीला.

अखेर तो क्षण आलाच. इतके दिवस भेटीसाठी आसुसलेला सागर आणि किनारा आज फायनली भेटणार होते.

शरयू आली. पण माधव काकांच्या आधी श्री समोर दिसताच तिची कळी खुलली.

"अरे श्री, तू इथे?"
आश्चर्याचा सुखद धक्काच होता तो शरयूसाठी.

"नाही म्हणजे तू बोलला नाहीस काही. तू येणार आहेस म्हणून."

"हो ग. मीच सांगितलं होतं त्याला, तुला काही सांगू नको म्हणून."

तिच्या पाठीमागे उभे असलेले माधव काका अचानक बोलले तशी शरयू लाजली नि माधव काकांच्या नजरेला नजर देण्याची आता तिची हिम्मतच होइना.

"काका तुम्ही..?" शरयू आश्चर्यकारकरित्या बोलली.
कारण क्षणभर तिला वाटलं माधव काकांची गाडी घेवून श्री एकटाच आला आहे तिला पिक अप करण्यासाठी.

"नाही म्हणजे तसंच ठरलं होतं ना आपलं? की तुमचं काही वेगळं प्लॅनिंग होतं??"
माधवराव अजूनही दोघांची पुरती खेचतच होते.

" अगं म्हणजे तुझा हा "श्रीकांत" पासून "श्री" पर्यंतचा प्रवास मला याची देहा याची डोळा कसा बघायला भेटला असता. मी नसतो आलो तर? आणि मी श्रीला जर इथे बोलावले नसते तर."

तितक्यात श्री म्हणाला, "बरं मी निघू का आता सर.? म्हणजे आईपण घरी वाट पाहत असेल."

"काय हे मी आताच आले आणि तू निघाला पण? It\"s not fare आ." नजरेच्या भाषेतूनच शरयू श्रीला म्हणाली.

"तितक्यात माधवराव श्रीला म्हणाले, बरं श्री माझं एक खूप महत्त्वाचं काम करशील उद्या.?"

"बोला की सर, तुम्ही सांगितलं आणि मी नाही ऐकलं असं झालंय का कधी?"

"अरे उद्या सकाळी माझी एक मीटिंग आहे अर्जंट तर तुला शरयूला सोडायला जमेल का एक्झाम सेंटरवर.?"
"म्हणजे तुझी काही हरकत नसेल तर..?

"मला काहीच प्रॉब्लेम नाही सर. सोडेल मी तिला. Don\"t worry."

"बरं चल भेटू सकाळी. वेळेत पिक कर पण तिला. कदाचित मी नसेल सकाळी. लवकरच जाईल शक्यतो. आणि नाही गेलो तरी तू मात्र वेळेत ये घरी."

"हो सर" म्हणत श्रीने शरयू कडे एक प्रेमभरा चोरटा कटाक्ष टाकला आणि हलकेच स्मित करत तो त्याच्या बाईककडे वळला. त्याची पाठमोरी आकृतीदेखील नजरेत सामावून घेण्याचा शरयूचा केविलवाणा प्रयत्न माधवरावांच्या नजरेतून सुटला नाही.

"मग काय बेटा, घेतले की नाही श्रीला तू तुझ्या नजरेतून जाणून. की अजून थोडा वेळ हवाय?"

"काय काका तुम्ही पण ना", लाजतच तिने खाली मान झुकवली.

"अगं एक नंबर मुलगा आहे श्री. सर्वांच्या आज्ञेत राहणारा, मनमिळावू, कामातही तितकाच हुशार. गेली सहा वर्षांपासून ओळखतो मी त्याला. पण खोट काढायला काहीच जागा नाही बघ त्याच्यात. तुझ्यासाठी एकदम परफेक्ट आहे मुलगा. अगदीच सुखात ठेवेल तुला तो.

काकांच्या तोंडून श्री चे कौतुक ऐकून शरयू भारावूनच गेली.

"खरंच श्री मला सुखात ठेवणार यात शंकाच नाही. खूप नशीबवान आहे मी, श्री सारख्या जोडीदाराची साथ मला माझ्या आयुष्यात मिळाली.

"पण एक गोष्ट बरी केलीस तू", काका म्हणाले.
तू तुझ्या नजरेतून श्रीला जाणून घेतलेस. लग्नाआधी तुमचे दोघांचे सुत जुळले हे छानच झाले."

आणि तसंही घाईत निर्णय घेण्यापेक्षा असा विचारपूर्वक निर्णय घेतला ते योग्यच आहे बघ. उलट तुझ्यासारखा सगळ्याच मुलींनी विचार करायला हवा. म्हणजे पुढे जावून होणारे अनर्थ टाळले जावू शकतात. आणि होणारी फसवणूक देखील रोखता येवू शकते."

एकमेकांची, त्यांच्या घरच्यांची अगोदरच माहिती असेल तर मुलीलाही पुढे अवघडल्यासारखे वाटणार नाही."

"मग काय आता तरी तयार ना पुढची बोलणी करायला.?" माधव रावांनी हक्काने शरयूला विचारले.

"हो काका",लाजतच मग शरयूने मान डोलावली. तिच्या चेहऱ्यावरील ओसंडून वाहणारा आनंद माधवरावांना समाधान देवून गेला. त्यांच्या प्रयत्नांना जवळपास यश मिळाल्यातच जमा होते.

श्री आणि शरयूच्या प्रेमाची गाडी आता योग्य दिशेने धावायला लागली होती. पण ती पोहोचेल का योग्य ठिकाणी.? त्यांच्या विवाहाला लागलेली लांबड थांबेल का आतातरी? जाणून घ्या पुढील भागात.

क्रमशः

©® कविता सुयोग वायकर

🎭 Series Post

View all