सागराला ओढ किनाऱ्याची!!(भाग २)

स्वतः च्या लग्नाचा निर्णय सर्वस्वी त्या मुलीला घेण्याचे स्वातंत्र्य कसे दिले एका वडिलांनी. आणि तिच्या विचारांना कसा पाठिंबा दिला हे या कथेतून चित्रित केले आहे.


श्रीकांतच्या आईने म्हणजेच मालतीताईंनी विचारलेला प्रश्न
(लग्न झाल्यावर जबाबदारी वाढणार. नोकरी मिळेलही तुला पण घरचं सगळं पाहून नोकरी करताना ओढाताण झाली तर तुझीच पुन्हा चिडचिड होणार आणि या सगळ्यांत घरचे वातावरण मात्र बिघडणार. मग अशावेळी कसं मॅनेज करशील तू?)
शरयूला कोड्यात पाडणारा जरी असला तरी उत्तर देणे भाग होते तिला. बँकेची परीक्षा एकवेळ सोप्पी पण आयुष्याचा हा पेपर क्षणभर खूपच कठीण वाटला तिला. तरीही घाबरून न जाता अगदी विचारपूर्वक तिनेही मग उत्तर दिले.

हृदयाने मनाचा ठाव घेतला नि तिच्या विचारांचा ताबा शब्दांनी घेतला. तत्क्षणी जे सुचले आणि तिच्या बुध्दीला जे योग्य वाटले ते तिच्या वाणीतून बरसू लागले.

"स्री नोकरी करणारी असो वा घर सांभाळणारी तिला सपोर्ट करणारे लोक अवतीभवती असतील तर तिच्यासाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही."
"माझ्या नानांनी आणि आईने मला प्रत्येक वेळी सपोर्ट केला आणि प्रत्येक आव्हान जिद्दीने पेलण्याचे बळ माझ्या पंखात भरले. म्हणूनच तर आज मी यशाच्या दिशेने उड्डाण घेण्यासाठी सज्ज आहे."
"आणि राहिला प्रश्न जबाबदारीचा तर परिस्थिती नुसार वेळेचं गणित जुळवता यायला हवं प्रत्येकाला, म्हणजे टाईम मॅनेमेंटमध्ये एकदा का जमलं की मग आयुष्याचं गणित देखील आपोआपच सुटत जातं आणि अंगावर पडलेल्या जबाबदाऱ्या देखील पार पाडायचं सामर्थ्य निर्माण होतं."

"व्वा. ये लगा सिक्सर."
आताच्या आता उठून नाचावेसे वाटत होते श्रीकांतला.

"खरंच टाईम मॅनेजमेंट जमलं राव हिला. अचूक नेम साधत आईच्या बॉलवर सिक्सर मारला राव पोरीने."

शरयू अजून त्याच्या आयुष्याचा भाग बनलीही नव्हती तरीदेखील बायको बनून तिनेच या सागराचा किनारा व्हावं असं मनोमन वाटत होतं त्याला. खरंच आत्तापासूनच या सागराला किनाऱ्याची इतकी ओढ लागली होती की कसं काय?? ते त्याचं त्यालाही समजेना.

शरयूच्या उत्तराने सगळेच जण आनंदी झाले. सुनीताताई भिंतीच्या आडूनच लेकीचा शब्दन शब्द कान देवून ऐकत होत्या. तिचे ते समजूतदारीचे बोल ऐकून त्याही मनोमन सुखावल्या. इवलसं माझं कोकरू आज इतकं मोठ्ठं कधी झालं हे त्यांनाही समजलं नाही.
नानादेखील शरयूच्या उत्तराने अगदी भारावून गेले. पोरगी नक्कीच नाव काढणार याची त्यांना आधीपासूनच असलेली खात्री आता पक्की झाली.

माधवरावांचीही कॉलर अगदी ताठ झाली शरयूच्या उत्तराने. श्रीकांतचे वडील तर आधीपासूनच शरयूवर इंप्रेस झाले होतेच. फक्त आता प्रश्न होता तो मालती ताईंचा. काय प्रतिसाद असेल त्यांचा??
शेवटी त्यांनी घेतलेला निर्णय हा फायनल असणार होता. आधीपासूनच श्रीकांतसाठी आपण शहरातील मुलगीच पाहुयात हा हट्ट होता त्यांचा. शहरातील मुलगी असेल तर मला तिच्याशी जुळवून घेणे सोपे जाईल, शहरातील रीतीभाती जास्त शिकवाव्या लागणार नाहीत तिला असा त्यांचा विचार होता.

पण फक्त श्रीकांत आणि त्याच्या वडिलांच्या आप्पांच्या शब्दाचा मान म्हणून त्यांनी शरयूला पाहण्यासाठी होकार दिला होता. तसंही त्या तिला नकार देण्याच्या हेतूनेच आल्या होत्या. म्हणूनच तर हा सगळा खटाटोप सुरू होता. पण सगळं उलटच होत चाललं होतं. कदाचित मालती ताईंमुळेच शरयूची एक एक बाजू, तिच्यातील गुण, तिचा आत्मविश्र्वास, धाडसीपणा, परखडपणा समोर येत गेला आणि प्रत्येकाच्या मनात शरयूबद्दल आदराची भावना निर्माण होत गेली. तीच्याबद्दलचा आपलेपणा अधिकच वाढत गेला.

"पुढे काही विचारावं की नाही शरयूला??" ह्या विचारात असतानाच आप्पा बोलले,
"अजून पेपर बाकी आहे का? विचारायचे असेल तर घ्या विचारुन पट्कन. नाही म्हणजे अजून श्रीकांतलाही काही बोलायचे असेलच, तुमचं झालं असेल तर त्यालाही बोलू द्या."

मालतीताईंनी एक जळजळीत कटाक्ष टाकला आप्पांवर. त्यांचा शरयूला असलेला होकार मालतीताईंना स्पष्ट जाणवला.

"पण गावची मुलगी असली तरी इतकीही वाईट नाही शरयू." मालतीताई मनातच बोलत होत्या.
"बोलण्या वागण्यात तरतरीत आहे पोरगी. प्रत्येक प्रश्नाचे अगदी समोरच्याला पटेल असेच उत्तर आहे तिच्याकडे. पण माझा श्रीकांत अगदी साधा भोळा. अगदी हिच्या विरुद्ध."

मालती ताईंचे विचारचक्र थांबायचे काही नाव घेईना.
सद्ध्या तरी मालती ताईंचा शरयू बद्दलचा आणि अनावधानाने गावच्या मुलीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला असावा असेच वाटत होते.

"श्री विचार तुला काही विचारायचे असेल तर शरयूला," मालती ताई श्रीकांतला म्हणाल्या.

"नाही आई, आता तू विचारलंच आहे सगळं बाकी आणखी काय विचारणार मी??" श्रीकांत नजर चोरतच हळू आवाजात बोलता झाला. बोलायचे तर खूप काही होते पण सगळ्यांसमोर काय बोलणार ना.

त्याचा आवाज पहिल्यांदा कानी पडला तशी शरयू हलकेच लाजली आणि आपसूकच मग तिच्या ओठांवर स्मित खुलले.

"खूपच नाजूक काम दिसतंय बाई इकडे."

मनातच तिने श्रीकांतच्या स्वभावाचा अंदाज बांधला.

"आमच्यासमोर नसेल बोलता येत तर थोडं बाजूला जावून बोललं तरी आमची काही हरकत नाही बरं का." माधव काकांनी श्रीकांत कडे पाहून टोमणा मारला.

"हो हो आमची काहीच हरकत नाही, जा बेटा श्रीकांत रावांना घेवून." नाना शरयूला म्हणाले.

तशी शरयू देखील उठली आणि मागोमाग श्रीकांत. चालताना पाय मात्र लटपटत होते श्रीकांतचे. तरीही शरयू सोबत बोलण्याची, तिला जवळून नजरेत सामावून घेण्याची त्याची ओढ त्याला आपोआपच तिच्या मागून जाण्यासाठी प्रवृत्त करत होती.
तिच्या पाठमोऱ्या आकृतीला न्याहाळतच श्रीकांत शरयू पाठोपाठ अंगणात पोहोचला.

छान थंडगार वारा दोघांच्याही चेहऱ्याला स्पर्शून गेला. शरयूच्या गालावरील केसांची बट तिच्या ओठांना हलकेच स्पर्श करत होती. आणि शरयू मात्र वारंवार ती खोडकर बट चेहऱ्यावरून हटविण्याचा केविलवाणा प्रयत्न करतच होती. पण का कोण जाणे तिचे ते सुंदर रुप किती डोळ्यांत साठवू नि किती नाही असे झाले होते श्रीकांतला.

"राहू द्या ना कशाला सारताय तिला बाजूला. तिच्यामुळेच तर तुमच्या सौंदर्याला चार चांद लागलेत."

ओठांवर आलेले वाक्य तसेच परत फिरवले श्रीकांतने. नजर मात्र खूप काही सांगत होती त्याची. पण त्या कातील नजरेचा सामना करण्याची हिम्मत मात्र शरयूमध्ये नव्हती.

"हा काळ काही काळासाठी इथेच थांबला तर, कित्ती बरं होईल ना."
श्रीकांत पुन्हा एकदा मनातील भावनांच्या अधिन झाला.

क्षणभर दोघांनाही काय बोलावे काहीच कळेना. श्रीकांत तर स्वप्नांच्या दुनियेतच जणू हरवला होता. त्याचे तिच्याकडे असे एकटक पाहणे, त्याच्या चेहऱ्यावरील ते स्मित, तो आनंद तिच्यातील स्रीमनाला लाजण्यासाठी प्रवृत्त करत होता.
त्याच्या एकटक पाहण्याने शरयूच्या काळजाचा ठोका मात्र चुकला होता. पोटात कालवाकालव सुरु होती. हृदयाच्या स्पंदनांनी आगगाडीचा वेग पकडला होता. त्याच्या नजरेला नजर देण्याची तिची हिम्मत मात्र काही केल्या होइना. पण त्याही परिस्थितीत तिला श्रीकांतचा सहवास हवाहवासा वाटत होता. खूप सुरक्षित वाटत होते श्रीकांतसोबत तिला.

डोळे बंद करुन त्याला घट्ट मिठी मारावी नि स्वतःला झोकून द्यावे त्याच्या बाहुपाशात नि एकरूप व्हावे त्याच्या अंतरंगात असेच क्षणभर वाटले तिला.
जणू किनाराही आता सागराच्या अधीन होवू पाहत होता. सागराला किनाऱ्याची असलेली ओढ तर स्पष्ट दिसत होतीच. पण त्यामुळे किनाराही बंधनांचे सारे पाश तोडू पाहत होता. नजरेच्या कप्प्यात किनाऱ्याचे सौंदर्य साठविण्यात श्रीकांत मात्र भावनांच्या लाटांमध्ये मनसोक्त डुंबत होता.

पण परिस्थितीचे भान ठेवून मनातील विचारांचा सुरू असलेला हलकल्लोळ भावनांच्या आहारी जावू न देता त्याची तंद्री लागलेली पाहून शरयूने त्याच्या चेहऱ्यासमोर जोरात चुटकी वाजवली तसा तो भानावर आला. नजर जमिनीच्या दिशेने झुकवत म्हणाला,

"सॉरी हा...ह्या गावच्या वातावरणात मी नेहमीच हरवतो. आवडतं मला हे असं वातावरण. इथे आलो नि मला माझ्या मामाच्या गावची आठवण झाली."

"हो का, ते न सांगताही समजलं मला" म्हणत शरयूदेखील नजर चोरत लाजतच उत्तरली.
"बरं विचारा तुम्हाला काही विचारायचं असेल तर. त्यासाठीच तर आलो ना आपण बाहेर."

"आता तुमच्याबद्दल तर सगळंच समजलं आहे मला. उलट तुम्हालाच काही विचारायचे असेल तर विचारा. हां पण पेपर थोडा सोप्पा काढा बरंका कारण तुमच्यासारखा अवघड पेपर ते पण असा ऑन द स्पॉट नाही बाबा सोडवता येणार मला. उगीच नापास व्हायचो मी."

श्रीकांतच्या या गमतीशीर बोलण्याने शरयूला हसूच आवरेना. "तसं तुमच्याबद्दल पण मला माधव काकांकडून सगळंच समजलं आहे बाकी आणखी काही विचारावं असं नाही वाटत."
"फक्त एक सांगा, लहानाचे मोठे तुम्ही शहरात झालात मग गावच्या मुलीसोबत लग्न करण्याचा हा निर्णय कसा? म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे शहरातील मुले शक्यतो शहरातील मुलींनाच पसंती दर्शवतात." न राहवून शरयूने विचारले.

"तसा काही विचार मी केलाच नाही. शेवटी घरातील मोठे जे म्हणतील तसं. त्यातच माधव सरांनी तुमच्याबद्दल इतकं काही सांगितलं की म्हटलं चला भेटूनच घेवूयात एकदा शरयू मॅडमला." श्रीकांत हसतच उत्तरला.
त्याचा हा गमतीशीर स्वभाव शरयूला मनापासून भावला होता.

"हो का." श्रीकांतवर एक चोरटा कटाक्ष टाकत शरयूदेखील हसतच बोलली. लाजेने मात्र तिचा चेहरा गोरामोरा झाला होता.

तिचे ते लाजणे डायरेक्ट श्रीकांतच्या काळजाला जावून भिडले. त्याचवेळी वाऱ्याची एक जोरदार झुळुक आली नि शरयूचा पदर श्रीकांतच्या चेहऱ्यावर हक्काने विराजमान झाला.

"सॉरी सॉरी" म्हणत शरयूने तो क्षणात सावरलाही पण श्रीकांत मात्र आता पुरता घायाळ झाला होता.

भावनांचा बांध तुटू पाहत होता. हक्काने तिला आपल्या बाहुपाशात सामावून घ्यावे नि शमवावे मनातील विचारांच्या वादळाला. असेच काहीसे वाटले त्याक्षणी त्याला.

खरंच ती पहिली भेट, भेटीतील तो प्रत्येक क्षण दोघेही भरभरून जगत होते. न बोलताही नजरेतूनच खूप काही बोलत होते. हृदयातून तर पसंती केव्हाच झाली होती. फक्त आता भावनांचा ताबा शब्दांनी घेणे गरजेचे होते.

"बरं चला झालं असेल बोलून तर जावूयात का आत?" तितक्यात शरयूने पुन्हा एकदा परिस्थितीचे भान राखत श्रीकांतला प्रश्न केला.

"नको ना थांबा ना थोडा वेळ आता कुठे सुरुवात झालिये बोलायला. आणि लगेच निघायचं? काय हे?"
ओठांवर आलेले शब्द तसेच गिळून घेत श्रीकांतने होकारार्थी मान हलवली.

"तुम्ही नाही समजू शकणार ह्या सागराला किनाऱ्याची किती ओढ लागली आहे ते. माझा होकार तर पक्का आहे हे तुम्हालाही चांगलंच ठावूक आहे."
मनाशीच बोलत तिच्या पोठमोऱ्या आकृतीला न्याहाळत क्षणभर श्रीकांत तिथेच थबकला. पण परिस्थितीचे भान ठेवून तोही लागलीच तिच्या मागोमाग आत आला.

त्यांचे चेहरे पाहून तर त्यांची एकमेकांना पसंती असल्याचे स्पष्ट जाणवले सर्वांना.
बाकी सर्व सोपस्कार पार पडले. शरयूने वाकून नमस्कार केला सर्वांना. मालती ताईंना हळदी कुंकू लावून त्यांनाही शरयूने नमस्कार केला.

"बरं नाना कळवतो आम्ही काय ते. म्हणत निरोप घेतला सर्वांनी.

निघताना तर श्रीकांतचे पाय अगदी जड झाले होते. चोरट्या नजरेने शरयूवर एक कटाक्ष टाकला त्याने.
पुन्हा एकदा तीच नजरभेट. नजरेतून हृदयापर्यंत पोहोचली होती थेट.
नजरेची भाषा जणू नजरेला कळली. न बोलताही एकमेकांची मने त्यांनी जाणली. एकाच भेटीत आयुष्यच जणू बदलून गेले होते दोघांचेही. आयुष्यभर लक्षात राहतील इतक्या आठवणी सोबत घेवून श्रीकांत गाडीत बसला.

माधव काका तेवढे मागे थांबले होते. "बरं नाना. कसा वाटला मग मुलगा?"

"सगळं काही ठीक आहे रे. तुझ्या म्हणण्याप्रमाणे सुखात नांदेल शरयू श्रीकांतच्या घरी. पण आता त्यांच्या उत्तराची वाट पाहूयात."

"तसं मला तरी त्यांचा होकारच वाटतोय पण तरीही पाहुयात काय होतंय ते. शरयू सोबत तेवढं बोलून घे नाना."
माधवराव म्हणाले आणि त्यांनीही मग निरोप घेतला सर्वांचा.

सगळे गेल्यानंतर नानांनी सुटकेचा निःश्वास टाकला. शरूच्या पाहण्याचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. आता नाना आणि सुनीताताई श्रीकांत आणि त्याच्या घरच्यांच्या उत्तराची तेवढी वाट पाहत होते.

रात्रीची जेवणं आटोपली. नाना आणि सुनीताताई नेहमीच्या सवयीप्रमाणे बाहेर ओट्यावर बसले गप्पा मारत. शरुच्या लग्नाचीच चर्चा सुरू होती. शरु तिच्या खोलीत अभ्यास करत बसली होती. इकडे नाना आणि सुनिताताई विचारचक्रात गुंतले होते. काय होईल? मुलाकडचे हो म्हणतील का शरुला?
एक ना अनेक प्रश्न सतावत होते त्यांना. तितक्यात नानांचा फोन वाजला.
माधवरावांचा फोन होता.

"नाना एक आनंदाची बातमी आहे रे. लाग आता लेकीच्या लग्नाच्या तयारीला. अरे, होकार आलाय मुलाकडून."
माधवरावांचे हे बोल कानी पडताच नानांचा आनंद गगनात मावेनासा झाला. सगळं कसं अगदी मनाप्रमाणे सुरु होतं.
"पुढची बोलणीही लवकरच करुयात. मी कळवतो तुला तसं." एवढे बोलून माधवरावांनी फोन ठेवला.

"अहो, शरुलाही सांगायला हवी ही आनंदाची बातमी." सुनीताताई नानांना म्हणाल्या.

"हो, अगं पण आपण शरुला विचारलेच नाही तिला श्रीकांत आवडला की नाही ते."

"आवडला असणार ओ, तिचा चेहराच सांगत होता तसं. तुम्हा पुरुषांपेक्षा आम्हा बायकांची नजर कधीच चुकीचा अंदाज नाही बांधायची."

" हो पण तरीही एकदा विचारुयात शरुला. थांब मी बोलवतो तिला."
"शरु..बाहेर ये बेटा." नानांनी मोठ्याने लेकीला आवाज दिला. तशी शरु दोन दालने ओलांडून धावतच बाहेर आली.

"ये बेटा. बस इथे." बाजूची खुर्ची पुढे सरकवत नानांनी लेकीला बसायला सांगितले.
शरयू देखील निसंकोचपणे नानांच्या बाजूला खुर्चीत येवून बसली.

"बोला ना नाना काही काम होतं का?" हसतच शरयू बोलली.
एकंदरीतच लेकीचा उजळलेला चेहरा पाहून नानांना तिच्या मनातील गुपित आधीच ठावूक झाले जणू. पण तरीही तिच्या तोंडून काही गोष्टी जाणून घेण्याची गरज वाटत होती त्यांना. बापाचेच काळीज ते. फुलासारखे जपले होते त्यांनी लेकीला.

"बेटा, कसा वाटला मग श्रीकांत.?" नानांनी अचानक प्रश्न केला तशी शरयू थोडी गोंधळलीच.

श्रीकांतचे नाव कानी पडताच शरयूचा चेहरा गोरामोरा झाला. पण काय बोलावे तिला काही सुचेना. "हो" म्हणण्याची हिम्मत होइना आणि "नाही" म्हणण्यासाठी जीभ रेटना. अशीच काहीशी अवस्था झाली शरयुची.

"मी काय बोलणार नाना?? शेवटी तुम्ही मोठी माणसे ठरवाल त्यात आनंदी असेल मी. तुमची पारखी नजर माझ्यापेक्षा जास्त अनुभवी. त्यामुळे एखादी गोष्ट मला पटण्यापेक्षा तुमच्या नजरेला ती योग्य वाटणे जास्त महत्त्वाचे नाही का??"
शरयुने अगदी प्रांजळपणे तिचे मत मांडले.

"सगळं पटतंय मला बेटा. पण, तरीही ज्याच्यासोबत तुला आयुष्य काढायचे आहे त्याचे बोलणे, वागणे, दिसणे या साऱ्या गोष्टी माझ्याआधी तुला पटणे मलातरी गरजेचे वाटते. तू माझ्या शब्दाबाहेर नाहीस हे मला माहीत आहे बाळा. पण तुझे मत विचारात घेणे हे एक बाप म्हणून माझे कर्तव्यच आहे ग. श्रीकांत नक्की पसंत आहे ना तुला??"

"नाना मला तरी नाही म्हणण्यासारखं काही कारण वाटत नाही ओ. पण...."

"पण, पण काय बेटा??"
शरुच्या एका "पण"ने नानांच्या चेहऱ्यावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहीले.

"खूप घाई होत नाही ना नाना??"

"म्हणजे तुला इतक्यात लग्न नाही करायचे का बेटा?"

"तसं नाही नाना, पण आजच पाहण्याचा कार्यक्रम झाला. त्यांचा होकारही आला आणि आपणही लगेच होकार द्यायचा.?"
"मान्य आहे सगळं काही व्यवस्थित आहे म्हटल्यावर नाही म्हणण्यात काही अर्थच नाहीये. तरीही नाना आपण दोन्ही कुटुंब ओळखतोच किती एकमेकांना?? आणि श्रीकांतलाही मी ओळखतेच किती अशी?"

"एकाच भेटीत असं संपूर्ण नाही वाचता येत ओ एखाद्याला. श्रीकांत तसे हुशार आहेत, बिझनेस मध्येही आता ते चांगलेच सेट झालेत. दिसायलाही रुबाबदार आहेत. एकत्र कुटुंबात वाढल्याने मला तरी संस्कारी वाटतात पण तरीही काही मैत्रिणींचे अनुभव पाहता मला अजून थोडा वेळ घावा वाटतोय नाना. फार नाही पण जास्तीत जास्त एखाद महिना तरी."

"मला माझ्या नजरेतून श्रीकांतला अजून थोडं जाणून घेण्याची मनापासून इच्छा आहे."
मनात सुरू असलेला विचारांचा गोंधळ शरुने बोलून व्यक्त केला.

"अगं शरु वेड लागलं की काय तुला?" इतका वेळ बाप लेकीचे सुरु असलेले संभाषण शांतपणे ऐकत असलेल्या सुनीताताई बोलत्या झाल्या. त्यांना शरूचे बोलणे काही पटले नाही.
" मुलीच्या जातीला हे असे स्वातंत्र्य नसते ग बाळा. समोरून होकार आलाय मग तरीही आपण ताणण्यात काय अर्थ आहे? आणि विशेष म्हणजे सगळ्या गोष्टी पटत असताना देखील."
"उद्या ते लोक तुझ्याबद्दल काय विचार करतील?? आपण जर विनाकारण उशीर लावला आणि नंतर समोरुनच नकार आला तर मग काय करायचे??"

"आई तुझी काळजी समजते ग मला. पण ज्या व्यक्तीसोबत मला आयुष्य काढायचे आहे त्याला निदान थोडे जाणून घ्यावेसे वाटते आहे ग. एका अनोळखी घरात प्रवेश करताना आपला जोडीदार नुसता शरीराने आपल्या सोबत असून उपयोग नाही तर मनानेही तो आपल्या सोबतच असायला हवा असं वाटतं ग."

"म्हणून थोडा वेळ द्या मला. बाकी तशी मी या लग्नाला तयारच आहे."

"नाना तुम्ही माधव काकांसोबत बोलून घ्या ना एकदा." शरयू म्हणाली.

शरूच्या बोलण्याने सुरुवातीला नाना थोडे नाराज झाले. पण शेवटी "आयुष्य हे तिचं आहे. काही निर्णय हे तिचे तिला घेवू देत." म्हणत नानांनी लेकीला पूर्ण पाठिंबा दर्शवला.

आता पुढे नक्की काय होणार? अखेर होणार का शरयू आणि श्रीकांतचे लग्न? सागराला लागलेली किनाऱ्याची ओढ पूर्ण होईल का? श्रीकांत आणि त्याच्या घरचे मान्य करतील का शरयूची अट? सुरु झालेली ही कहाणी नक्की कोणते वळण घेणार जाणून घेवूयात पुढील भागात.

क्रमशः

©® कविता सुयोग वायकर

🎭 Series Post

View all