सगे सोयरे ( भाग एक )

वेळ आल्यावर आपल्या आसपास राहणारे लोक लवकर कामाला येतात की नातेवाईक. पण तरीही मनावरचा पडदा उघडत नाही...


सगे सोयरे ( भाग एक )

विषय: नातीगोती 


अण्णांना  मुंबईला आणून आपण काही चूक तर केली नाही ना असं आजकाल मुलाला वारंवार वाटायला लागलं होतं. त्याच्या बायकोच्या मते त्यांना गावीच राहू द्यायला हवे होते. कारण त्यांचं सगळ आयुष्य गावीच गेलेलं होतं त्यामूळे त्यांना हे मुंबईतल जीवन ॲडजेस्ट करायला कठीण जाईल असं तिचं म्हणणं होतं. पण या मागे त्यांची प्रायव्हसी नष्ट होईल हे छुप कारण आहे हे मुलगा चांगलच ओळखून होता. पण आईच्या जाण्यानंतर  अण्णांना  एकट गावी राहू देणं हे ही त्याला योग्य वाटे ना. त्यांच्या जेवण खाण्या पासून तब्येती पर्यंत सगळ्याच गोष्टींची त्याला काळजी लागली असती. यावर त्याच्या बायकोच म्हणणं असं होतं की एव्हढा मोठ्या वाड्यात एकट राहण्या पेक्षा दोन खोल्यात  अण्णांनी राहून बाकीचा वाडा भाड्याने द्यावा. त्या मुळे त्यांना अडीअडचणीला सोबतही होईल आणि थोडाफार आर्थिक फायदाही होईल. मुलगा आपल्या बायकोला चांगलाच ओळखून होता. त्यानें तिचं काही एक न ऐकता अण्णांना  घेवून तो मुंबईला आला होता.

सुन म्हणत होती त्या प्रमाणे अण्णांना  मुंबईला राहण खरोखरच अवघडल्यासारखं झालं. गावाकडचं मोकळं वातावरण आणि मुंबईचं अलिप्त मोकळं वातावरण यात जमीन अस्मानचा फरक होता. या आधीही ते मुंबईला मुलाकडे आले होते. पण अगदी थोडया काळासाठी, पाहुण्यांसारखे. शिवाय त्या वेळी सोबत जानकी होती. बायकोच्या आठवणीने ते व्याकूळ झाले. त्यांची काळजी घ्यायला जानकी होती. त्यांना कोणत्या वेळी काय लागत असे हे तिला बरोबर समजत असे. जेवणा खाण्या पासून अगदी गप्पा मारण्या पर्यंत त्यांच्या सगळ्या गरजा तिला बरोबर समजत असत. ती होती तोपर्यंत त्यांना कधी कोणाची जास्त गरजही पडली नव्हती. तिचं अस्तित्व त्यांनी कायमच गृहीत धरलेल होत. मध्यंतरी त्यांना अटॅक आल्या नंतर तिच्या आधी आपण वर जाणार असं त्यांना वाटलं होतं. पण त्यांची काळजी घेता घेता गणपती पाण्यात बुडवून रात्रंदिवस जप तप करणाऱ्या जानकीच्या तपश्चर्येेला फळ आल होतं. अण्णा  बरे झाले होते. पण त्या धावपळीत त्यांची पत्नीचं आजारी पडली. साध्या तापातून एकातून एक कॉम्पलीकेशंन वाढत गेली आणि त्यांना एकट सोडून त्यांची पत्नी निघून गेली.

अण्णा खरोखरच एकटे पडले. तरी ज्या ठिकाणी जानकीच्या आठवणी निगडित होत्या त्या ठिकाणापासून दूर जाणं त्यांना सहन होत नव्हतं. पण मुलाने खूप आग्रह करून त्यांना मुंबईला आणलं. ईथ काय नव्हतं. झाडलोट करायला नोकर चाकर, स्वयंपाक करायला बाई असं सगळ काही होतं. बोलायच्या आत त्यांच्या समोर नाश्ता,चहा,पाणी सगळ हजर असे पण त्यात काहीतरी कमी होतं. काय कमी होतं ते नेमक त्यांना समजत नव्हतं. रुजलेल्या झाडाला उपटून नवीन ठिकाणी आणलं जावं आणि ते नवीन ठिकाणी रुजूच नये अशी त्यांची अवस्था झाली होती.

ते सारखे अस्वस्थ असत. त्यांच्या खिडकीतून एक पटांगण दिसत असे. तिथं मुलं खेळत असतं.  बाहेर सगळे जण गडबड गोंधळात धावपळ करत असत. फक्त त्यांनाच काही काम नव्हतं. सगळ्या मुंबईतला एकमेव रिकामटेकडा माणूस. त्यांना स्वतःलाच त्या गोष्टीचं हसू आलं.

मुंबई झाली म्हणून काय झालं. ईथही माणसचं राहतात ना. आपण उद्या बाहेर पडू या. थोडं ईकडे तिकडे काय आहे. बघू तरी.

दुसऱ्या दिवशी सकाळी सून आणि मुलगा कामावर गेल्यानंतर ते नाश्ता करून बाहेर पडले. जवळच बस स्टॉप होता. तिथं ते जावून बसले. त्यांना कुठेही जायचं नव्हत. बस मधे चढणाऱ्यांची, उतरणाऱ्यांची गडबड ते बघत बसले. त्यात शाळेत जाणारी मुलं होती, कॉलेजमधे जाणाऱ्या मुली होत्या.

त्यांना मुंबईतल्या माणसांमधला फरक ठळकपणें समजला. मुंबईत दोन प्रकारची माणसं होती. एक अजिबात वेळ नसलेली, सतत धावत पळत असणारी आणि दुसरी त्यांच्या सारखी निवांत, एकाच जागी स्थीर असणारी.

मग त्यांनी स्थीर असणाऱ्या माणसांकडे रोख वळवला. अर्थात स्थीर असणारी माणसं कोणताच सामाजिक दर्जा नसलेली होती. त्यात रस्त्यावरचा मोची होता, किरकोळ भाजी विक्रेते, फळं विकणारे, वाचमन, पान टपरी वाले, गाणं म्हणणारा भिकारी, आपल्याच गाडीवर झोपून आराम करणारा हमाल होता. शिवाय ठरावीक वेळेत खेळणारी मुलं होती.

ते अलीप्त पणें रोज त्यांच्या हालचाली न्याहाळत बसत. त्या मुळे त्यांचा वेळ चांगला जायला लागला. हळुहळू ते लोक देखील त्यांची दखल घ्यायला लागले.
त्यांच्याशी बोलायला लागले.


( क्रमशः)
लेखक: दत्ता जोशी

🎭 Series Post

View all