केसर

माझ्यातली मी आणि केसर खरेदी
कधीतरी, कोणत्यातरी, आपल्या हिंदी सिनेमात किंवा मालिकेत केसरचं दुध गर्भवती हिरोईनला तिची आई किंवा सासूबाई देतांना बघितलेलं आणि पहिल्यांदा केसर बद्दल ऐकलेलं. बाकी उभ्या आयुष्यात केसरशी आपला प्रत्यक्ष पाला काही पडलेला नाही. कारण केसर म्हणजे खुपच महागडं काहीतरी, जे आपल्या खिशाला अजिबात न परवडणारं, असाच आमचा समज.

गर्भवतीला दुधात केसर दिल्याने बाळ गुटगुटीत, गोरं गोमटं होतं असं ऐकून होते पण जेव्हा अथर्व बाळ पोटात होता तेव्हा पहिले पाच महिने होणाऱ्या उलट्यांनी इतकं हैराण करून सोडलं कि डोक्यात आलंच नाही केसर घ्यावं आणि नंतर पाणी पुरी, भेल पुरी, दही पुरी, खटाई, दाबेली, वडा पाव, वेगवेगळे मिल्कशेक, जलेबी, आईस क्रीम, रस गुल्ले अशा चमचमित पदार्था पुढे बाकी सगळं फिकं पडलं.

हे सर्व इथे सांगायचं तात्पर्य असं कि आतापर्यंत केसरला सोन्याच्या भावात समजणाऱ्या मला चार पाच दिवस आधीच समजलं कि एक ग्राम केसर 200 ते 250 रुपयात मिळतं आणि त्यात केसरच्या 100 ते 200 बारीक काड्या असतात. त्यातल्या दोन तीन काड्या एका माणसाच्या एक ग्लास दुधासाठी पुरे. (हे सर्व गुगल ज्ञान आहे. मी आधीच सांगितलं माझ्यासाठी केसर हा पदार्थ नवीन आहे.)

झालं असं कि मी आताच हिमालय वारीला गेलेली. शेवटच्या दिवशी मनालीत आम्ही शॉपिंग करायचं ठरवलं. वेळ कमी म्हणून सर्व आपापल्या शॉपिंगला लागलेले. अशातच मी आणि अथर्व आई साठी एका चांगल्या मोठ्या दुकानात साडी बघायला गेलो. साडी घेतली. बाजूलाच काचेत केसरच्या छोट्या छोट्या डब्या दिसल्या.

मी बाल बुद्धीने केसर कितीचं विचारलं. दुकानदाराने 1500 चं सांगितलं. पण तुमच्यासाठी 800 चं म्हणाला. मला वाटलं खूप महागडं असतं केसर. इथे आहोच तर घेऊन पाहावं. घेतलं आणि मग आपल्या इतर टूर मेंबर्सला जाऊन भेटली. सर्व कोणी काय घेतलं दाखवू लागलं. मी 800 रुपयाचं केसर दाखवलं आमचा टूर ऑपरेटर हसायला लागला कारण 800 रुपयात तीन ग्राम म्हणजे तीन डब्या यायला हव्या होत्या. तेव्हा मला आठवलं तो दुकानदार केसरच्या आणखी दोन डब्या घ्यायला वळला होता पण मी काहीच बोलत नाहीये हे बघून फक्त काहीतरी बडबडला होता,

"वैसेतो तीन ग्राम लेना चाहिये | लेकिन आपके लिये एक ओके है जी |"

तर तेव्हाच त्या दुकानात जाऊन मी दोन डब्या मागायला हवं होतं पण सोबत यायला कोणी तयार झालं नाही. कोणी येतोही म्हणालं नाही आणि माझं मनही खूप निराश झालेलं. अशाप्रकारे मी फसली. मग काय घरी येईपर्यंत गुगल आणि युट्युबची खाक छानली, "प्युर केसर कसं ओळखायचं?"
आणि घरी आल्या बरोबर दुधात टाकलं. देव पावला कि केसर अगदी ओरिजिनल निघालं ! अशी झाली आमची केसर खरीदी. म्हणून भगिनींनो लक्षात ठेवा, पर्यटन स्थळी खरेदी करतांना एकट्या भटकू नका. (माझ्या सारख्या भाव करता न येणाऱ्या आणि मार्केटचा अंदाज नसणाऱ्या) ज्या वस्तूच्या किमतीचा अंदाज नाही त्यांनी तर अजिबातच एकटं दुकानात शिरू नये. ?

धन्यवाद !

©®अर्चना सोनाग्रे वसतकार