साधुनी संवाद... मिळवू आनंद

About Communication


साधुनी संवाद.. मिळवू आनंद!


"हो, हो.. समजले मला ..काय म्हणायचे आहे तुम्हांला."

कमलताई आपल्या नवऱ्याला म्हणत होत्या.

शामराव आजारी होते आणि बोलताना त्रास व्हायचा म्हणून ते हातवारे करून सांगत होते.आपली नात अंजली व तिची मुलगी रूही ,आपल्याला भेटायला आल्या हे पाहून त्यांना खूप आनंद झाला होता आणि तो आनंद शब्दांत व्यक्त करण्याचा ते प्रयत्न करत होते. पण त्यांच्याकडून बोललेही जात नव्हते. म्हणून आपल्याला झालेला आनंद ते चेहऱ्यावरील हावभाव व हातांनी व्यक्त करत होते.ते काय म्हणत आहेत किंवा त्यांना काय म्हणायचे आहे,हे कमलताईंना समजत होते.
आजोबांना, आजीला भेटून अंजलीला खूप बरे वाटत होते.

आजोबा - आजी यांच्यातील होणारा असा संवाद तिचे लक्ष वेधून घेत होता.

फक्त बोलणे म्हणजेच संवाद नाही , एकमेकांच्या भावना समजून घेणे म्हणजे संवाद होय !

आजोबा बोलू शकत नव्हते पण त्यांच्या मनातले आजीला कळत होते.

एकमेकांच्या मनातील भावभावना समजणे म्हणजे एका मनाचा दुसऱ्या मनाशी झालेला संवादच !


आजोबांना भेटायला अंजली ची आई व तिच्या दोन्ही मावशीही आजोळी आलेल्या होत्या.
आजी- आजोबा, मामा- मामी, मावशी व त्यांची मुले या सर्वांना भेटून अंजलीला खूप आनंद झाला होता.

लहानपणी आजोळी नेहमी येणे व्हायचे पण पुढे अभ्यास, शिक्षण,करियर या सर्व गोष्टींमुळे येणे शक्य होत नव्हते.आणि लग्न झाल्यानंतर तर ती पहिल्यांदाच आजोळी आली होती.

आज या सर्वांना भेटून पुन्हा लहाणपणीचे दिवस तिला आठवत होते.
सुट्टीत केलेली धमाल, आजोबा- आजीचे प्रेम व त्यांच्याशी होणाऱ्या गप्पागोष्टी.
माहेरपणासाठी आलेल्या आई व मावशी यांच्या रंगणाऱ्या गप्पांतून , बोलण्यातून एकमेकांबद्दलची काळजी,प्रेम व्यक्त व्हायचे.आणि आपल्या घरी परततांना निरोपाच्या वेळी बोलण्यापेक्षा त्यांचा डोळ्यांनीच जास्त संवाद व्हायचा.


आई - मुलगी ,बहीणी-बहीणी, नणंद- भावजय, आजी- नात,भाऊ-बहीण
या प्रत्येक नात्यातील संवाद आज अंजली पाहत होती. प्रत्येक संवादात बोलणे तर होतेच पण चेहऱ्यावरील आनंद, समाधान खूप काही सांगत होते.

बोलताना ,संवाद करताना आपल्या चेहऱ्यावरील हावभाव, हालचाली याचाही बोलण्यावर,संवादावर परिणाम होत असतो.
आनंदाचे संवाद असतात तेव्हा चेहऱ्यावर प्रसन्नता असते. राग ,दुःख असेल तेव्हा चेहऱ्यावर वेगळेच भाव असतात.
संवाद करताना आपली भाषा, विचार,ज्ञान,संस्कार,स्वभाव हे सर्व समजत असते.

ज्या लोकांचे संवाद कौशल्य
चांगले असते,प्रभावी असते.ते इतरांचे मतपरिवर्तन लवकर करू शकतात. अशक्य वाटणारे काम शक्य करू शकतात.
पत्नी आपल्या गोड बोलण्याने पतीचे मन जिंकून घेते .
आईच्या प्रेमळ शब्दांनी मुलांचे मन आनंदीत होऊन जाते.
प्रेमाच्या नात्यातील संवाद आनंद देतो,जगण्याची स्फूर्ती देतो.

हा सर्व प्रेमाचा संवाद अंजलीला आज दिसत होता.
या सर्वांबरोबर गप्पा मारण्यात आज मोबाईल कडे तर तिचे लक्षच गेले नव्हते.

मोबाईलवरून आपण मित्रमैत्रिणीं,नातेवाईक या सर्वांशी बोलतो ,सुखदुःखाच्या गोष्टींची विचारपूस करतो. प्रत्यक्ष भेटत नसलो तरी बोलून,आवाज ऐकून भेटल्याचा आनंद घेत असतो.
फोन,मोबाईल मुळे दूर राहणाऱ्या लोकांशी आपण संवाद साधतो.

विज्ञानाचा हा चमत्कार आपल्यासाठी वरदानच ठरला.

पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतोच.

मोबाईल, इंटरनेट ही संवादाची साधने योग्य पद्धतीने व गरजेपुरती वापरली तर वरदान आहेत आणि अयोग्य पद्धतीने व त्यांचा अतिरेक वापर केला तर शापही ठरू शकतात.

प्रत्येक गोष्ट गरज म्हणून वापरली तर चांगली राहते पण त्या गोष्टीची सवय ,व्यसन लागले तर वाईट ठरते.
म्हणजे गोष्ट वाईट नसते तर ती कशी वापरावी हे वापरणाऱ्याच्या हातात असते.
त्या गोष्टीला दोष देण्यापेक्षा आपल्या मनावर ,बुद्धीवर संयम ठेवला पाहिजे..

याच गोष्टीवरून राहुलशी वाद होऊन अंजली रागाने माहेरी आलेली होती.


राहुलची व तिची ओळख कॉलेजात झाली. पहिल्याच भेटीत दोघांच्या नजरेचा एकमेकांशी संवाद झाला, आणि पुढे शब्दांच्या संवादातून मैत्री व त्यानंतर प्रेमीयुगलांचा संवाद सुरू झाला.

संवादातून एकमेकांचे विचार, भावना जुळत गेल्या. आणि दोघे लग्नाच्या बंधनात बांधले गेले.

प्रियकराचा पती झाला व प्रेमिकाची पत्नी झाली.
एकमेकांशी फोनवर तासन् तास बोलणारे आता समोरासमोर एकमेकांशी मनसोक्त बोलणार होते.
अंजलीचे सासरे गावी नोकरीला होते, त्यामुळे सासूसासरे गावी राहत होते.
शहरात राहुल व अंजली दोघेही नोकरी करत होते व त्यामुळे त्याच शहरात राजाराणीचा संसार सुरू झाला होता. दोघेही आपल्या नवीन संसाराचा आनंद घेत होते.
काही वर्षातच राजाराणीच्या संसारात राजकुमारी रूहीचा जन्म झाला. व त्यांच्या आनंदाला अजून उधाण आले..

आपली नोकरी सोडून अंजली रूहीसाठी एक चांगली आई होण्याचा प्रयत्न करत होती.

घराचा हप्ता, गाडीचा हप्ता, घरखर्च, हौसमौज, रूहीच्या भविष्यासाठी तजवीज ...अशा अनेक गोष्टींसाठी पैसा गरजेचा होता आणि त्यासाठी पती व वडील या नात्याने राहुल कष्ट करत होता. कामाचेही टेंशन असायचे आणि त्यात अंजलीचेही नाराजीचे सूर असायचे.

\"आमच्यासाठी वेळच नाही, नेहमी काम ..काम ..
घरी आले तरी लॅपटॉप,मोबाईल सोबतीला.
आमच्याशी बोलतही नाही.
लग्नाच्या अगोदर छान छान बोलणारा राहुल इतका बदलून जाईल असे वाटले नव्हते मला.\"

\"तुटतो संवाद... घडतो वाद.\"
याप्रमाणे,
संवाद कमी झाल्यामुळे त्यांच्यामध्ये वाद होऊ लागले. अंजलीचे रागातील बोलणे ,तिची किरकिर हे राहुलला नकोसे वाटायला लागले.
संवाद तुटला वाद सुरू झाला व नंतर अबोलाच!

राहुलला अंजलीचा राग,तिचे बोलणे समजत होते. पण त्याचा जॉबच तसा होता.
कामांचे बदलत जाणारे स्वरूप, नोकरी टिकवून ठेवण्यासाठीची स्पर्धा, वाढत जाणारी महागाई यामुळे कामाला महत्त्व देता देता घराकडे कधी दुर्लक्ष होऊन जाते .हे कळतच नाही.
या स्पर्धेच्या ,धकाधकीच्या युगात माणसाचा नात्यांशी व आपल्या स्वतःशीही संवाद तुटत चालला आहे.
गर्दीत असूनही माणूस एकलकोंडा होत चालला आहे.
संवादाची प्रगत साधने असूनही,
मनातले बोलण्यास कोणी जवळचे भेटत नाही. म्हणून डिप्रेशनमध्ये आत्महत्येचं पाऊल उचलणारेही आहेत.
शारीरिक आजाराबरोबर मानसिक आजार ही वाढत आहेत.हे सर्व त्याला कळत होते.

\"संवाद हा एकच धर्म असावा माणसांचा आणि निसर्गाचाही .
जीवनाच्या प्रत्येक दालनात संवाद हवा.
जगायचं म्हणजे जेवण हवं, मग त्याला उदरभरण म्हणा किंवा यज्ञकर्म. पण तरीही त्या पूर्णब्रम्हाशी संवाद जुळला नाही तर जेवण नकोसे वाटते.
जेवण करणाऱ्याची चूक नसते.आपलाच संवाद हरवलेला असतो.
पाकसिद्धी आणि भोजनप्रबंध करणारी गृहीणी \"आज काय कमी आहे\" असं जेव्हा विचारते तेव्हा संवादच संपलेल्या आपल्या वाणीला समर्पक शब्दही आठवत नाही.तेव्हा वाणीही आणि रसनाही रूसते.

खरं वार्धक्य हेचं असावं..संवाद संपणं किंवा संवाद करण्याची इच्छा न उरणं.

गप्पा म्हणजे संवाद नव्हे ,संवादाचं नात विचारांशी.

संवादाची भूक ही जिंवतपणाची साक्ष आहे.

माणूस आणि जनावर ह्यात हाच फरक आहे. शब्दांचा शोध हा तेवढ्यासाठीच अणूच्या शोधापेक्षा महान असतो.

संवाद - खूप काही जोडण्याची आणि त्याहूनही जास्त तोडण्याची ताकद असणारा शब्द. \"


वपुंनी संवादाविषयी खूप छान लिहिले आहे .
संवादाला आपल्या जीवनात किती महत्त्व आहे ,हे पटवून दिले आहे.


अंजलीच्या रोजच्या नाराजीच्या बोलण्याने राहुल दुःखी व्हायचा,त्याची चिडचिड ही व्हायची. अंजलीला माहेरी जाऊन दोनचं दिवस झाले होते तरी त्याला करमत नव्हते. अंजलीची,रूहीची आठवण येत होती. तिचे राग करणेही बरोबर आहे. हे त्याने मान्य करून, आपण आपले काम सांभाळून रोज थोडा वेळ तरी अंजलीसाठी व रूहीसाठी देवू या. असे त्याने ठरविले.
आणि तो सुट्टीच्या दिवशी स्वतः त्यांना घ्यायलाही गेला.
आपल्या संसारातील हरवत चाललेला संवाद हा पुन्हा सुरू करण्यासाठी त्याने स्वतः पुढाकार घेतला होता.

अंजलीलाही त्याची आठवण येत होती. त्याच्यावर राग करून ती माहेरी आली होती आणि आजोबांना भेटायला गेल्यावर ,आजी- आजोबांचे प्रेम पाहून,त्यांच्यातील संवाद पाहून तिला राहुलची आठवण येत होती.
राहुलच्या व तिच्या भावना एकमेकांनी ओळखलेल्या होत्या ,एकमेकांचं मन समजून घेतल होतं, फक्त कामाचा व्याप व अपेक्षा यामुळे चिडचिड होत होती.
अंजलीने राहुलवरचा आपला राग शांत करत ,आपल्या घरी जाण्याचे ठरविले होते
आणि जेव्हा राहुल त्यांना घ्यायला स्वतः आला ,ते पाहून तिला खूपचं आनंद झाला.

दोघांनी एकमेकांची माफी मागितली व आपल्या घरी येऊन पुन्हा सुखाने राहू लागले. आणि
\"साधुनी संवाद ...मिळवू आनंद ! \" या उक्तीचा जीवनात उपयोग करू लागले.


नलिनी बहाळकर