Aug 18, 2022
सामाजिक

सदा तुने ऐब देखा..

Read Later
सदा तुने ऐब देखा..

#सदा_तुने_ऐब_देखा..

दामलेंचा वात्सल्य वाडा,स्टेशनपासून हाकेच्या अंतरावरचा. आज त्याचा लिलाव सुरु होता. राधाताईंच्या किडनीच्या दुखण्याने वामनराव कर्जबाजारी झाले होते. पुर्वी त्यांचा छोटासा छापखाना होता. वर्षाआधी चालवायला झेपेना म्हणून भाड्याने दिला होता. राधाताई  शिक्षिका होत्या. मुत्रपिंडाच्या आजारामुळे त्यांनी पाच वर्षांपूर्वी नोकरीला राजिनामा दिला होता. 

पुर्वी छान चौकोनी कुटुंब होतं दामलेंच. मोठा चिन्मय व त्याच्या पाठीवर दोन वर्षांनी झालेला चेतन. जसजसे हे दोघं शाळेत जाऊ लागले तसं यांच्यावर केल्या जाणाऱ्या लाडात तफावत होऊ लागली. चिन्मय खूप हुशार,एकपाठी होता. त्याचा वर्गात पहिल्या तीनाच्या आत नंबर असायचा पालकसभेला दामले गेले की चिनमयच्या वर्गशिक्षिका चिन्मयचं तोंड भरुन कौतुक करायच्या तेव्हा सर्व पालकांमधे दामलेंची कॉलर अगदी ताठ व्हायची. 
चेतनच्या वर्गात गेलं की मात्र त्याच्या प्रगतिपुस्तकातले गुण पाहून वामनरावांना तिथेच चेतला खाऊ की गिळू असं होऊन जायचं. त्याच्या वर्गशिक्षिका चेतन फारच मस्ती करतो,त्याला शिस्त लावा असं सांगायच्या. निकालाच्या दिवशी वामनरावांचा बेल्ट व चेतनचा प्रुष्ठभाग यांचा मिलाफ ठरलेला असायचा. चेतनच्या आईच्या,आजीच्या डोळ्यात पाणी तरारायचं पण पुढे होऊन त्याला कवेत घेण्याची हिंमत त्या दोघींतही नसायची. निकालाच्या दिवशी चेतनला जेवण न वाढण्याचा त्याच्या वडिलांचा दंडक होता.

दहावी,बारावीत चिन्मय मेरीटमध्ये आला. काही अग्रगण्य वर्तमानपत्रांचे वार्ताहर त्याची मुलाखत घेण्यासाठी आले होते. वामनरावांनी गौरीशंकर मिठाईवाल्याकडून पखच किलो स्पेशल मलाई पेढे करवून घेतले होते. पुढे चिन्मय होस्टेलला रहायला गेला. उत्तम गुणांमुळे त्याला मेडीकलला प्रवेश मिळाला.

मध्यंतरी तापाचं निमित्त होऊन वामनरावांची आई निवर्तली. घरात फक्त चेतन व त्याचे आईबाबा. इनमिन तीन माणसं. चेतनला दहावीत अवघे पासष्ट टक्के मिळाल्याने चेतनचे वडील,वामनराव त्याला येताजाता टोमणे मारायचे. चेतनला सवय झाली होती त्यांच्या कुजकट बोलण्याची पण वाईट वाटायचं ते रेखाताईंना. बरं,त्या वामनरावांना काही बोलू गेल्या तर ते म्हणायचे की तुम्ही आयाच पोरांना पाठीशी घालता व त्यांच्या आयुष्याची होळी करता. चेतन एकटा असला की आईला सांगे की तू नको वाईट वाटून घेऊस. त्यांची सवयच आहे ती. स्वभावाला औषधं नसतं.

बारावी झाली तसं चेतन हॉटेल मेनेजमेंटला वळला. वामनरावांना ते अमान्य होतं. कसले भिकेचे डोहाळे लागलेत म्हणायचे पोराला पण रेखाताई चेतनच्या पाठीशी उभ्या राहिल्या. चेतनचा धाकटा मामा पुण्यात रहायचा. तिथल्या कॉलेजमध्ये त्याचं एडमिशन घेतलं. 

चिन्मयने एमबीबीएस झाल्यानंतर एमएस केलं तो सर्जन बनला. वामनरावांच्या चुलत आत्तेबहिणीच्या मुलीशी त्याचं लग्न झालं. दिव्या स्त्रीरोगतज्ज्ञ होती. दोघांनी मिळून इस्पितळ काढायचं ठरवलं. पैशाची कमतरता होती. वामनरावांनी आपली अर्ध्याहून अधिक सेविंग चिन्मय व दिव्याच्या हॉस्पिटल उभारणीसाठी दिली. चेतनचे सासूसासरे,आजूबाजूचे शेजारी,सर्वांनी वामनरावांच्या सढळ हाताचं कौतुक केलं. रेखाताईंनी त्यांना म्हंटलं,"अहो,चेतनसाठी काय?" त्यावर वामनराव त्यांच्या अंगावर खेकसले,"त्याला कशाला हवी मदत? तो थोडीच इस्पितळ बांधणार आहे? शेफ बनतोय तो कुठल्यातरी हॉटेलात लागेल कामाला." चिन्मयने गोड बोलूनबोलून वामनरावांच्या गाठीला होती तेवढी सेव्हिंग काढून घेतली तरी वामनरावांना रेखाताई सावध करायची,म्हणायची,"लेक असला म्हणून काय झालं? हात राखून पैसे द्यावेत त्याला" पण वामनरावांना फक्त चिन्मयची प्रसिद्धी दिसत होती. आणि एक दिवस गर्भलिंगनिदान केल्यामुळे दिव्याला पकडण्यात आलं. तपासाअंती चिन्मयचाही त्यात हात होता हे सिद्ध झालं.दोघांनाही अटक झाली. हा धक्का रेखाताईंना सहन झाला नाही. त्या तिथल्या तिथे कोसळल्या.त्यांना पक्षाघाताचा झटका आला. त्वरीत एडमिट केलं तरी एक बाजू लुळी पडली ती कायमची. चेतनला हे कळताच चेतन घरी आला. आठवडाभर रेखाताईंजवळ थांबला. वामनराव कोणाशीच बोलत नव्हते. 

चिन्मय व दिव्याला सोडवण्यासाठी कोर्टकचेरीकरता पैसा लगणार होता म्हणूनच त्यांनी बंगला विकायला काढला होता. चेतन जॉगिंगवरुन आला. बंगल्याजवळ काही माणसं खुर्च्यांवर बसली होती व बोली लावणं चालू होतं. चेतन वामनरावांकडे वळला तसं वामनरावांनी त्याला तू यात पडू नकोस म्हणून सांगितलं. रेखाताई गादीवर निजल्या होत्या. त्यांच्या उशीचा अभ्रा आसवांनी भिजला होता. चेतनने आईचे डोळे पुसले. तिला म्हणाला,"मी आहे नं,तू निश्चिंत रहा. 

चेतनने वात्सव्य बंगला स्वत: विकत घेतला.वामनरावांना काय बोलावं सुचतं नव्हतं. त्यांच्या डोळ्यातलं पाणी खळत नव्हतं. त्यांनी चेतनसमोर आपले थरथरते हात जोडले तसं चेतनने ते हात घट्ट पकडले. मी असताना तुम्हांला पैशाची काळजी करण्याची गरज नाही बाबा. तुमच्या आशिर्वादाने चांगल चाललय माझं. " मी आता स्वतःचं हॉटेल काढलय पुण्यात..शुद्ध शाकाहारी. तिथे थालिपीठ लोणी,मेतकुट भात,वरणफळं,पुरणपोळी,मिसळपाव,उकडीचे मोदक..सगळे पारंपारिक मेनू ठेवलेत. एकदम भारी चालतं हॉटेल माझं. मामाही बसतो गल्ल्यावर." लेकाची प्रगती ऐकून वामनरावांना त्यांनी त्याची पुर्वी केलेली हेटाळणी आठवली. 

तितक्यात चेतनचा मामाही तिथे आला. त्याने वामनरावांना चेतनच्या अविरत परिश्रमाचा,दोन वर्ष ट्रेनी शेफ राहिल्याचा न् आता हॉटेलमालक झाल्यापर्यंतचा प्रवास थोडक्यात सांगितला व म्हणाला भावोजी ते गाणं आठवतय तुम्हाला,"बनसी को लकडी सदा समझा किये तुम
पर उसके नगमोंकी धुन कहा सून सके तुम.."
अगदी तसं तुमचं झालं बघा चेतनच्या बाबतीत,तुमचं. तुम्ही दोन्ही लेकरांना मार्कांच्या तराजूत तोलतात. तुमच्या अतिलाडामुळे थोरला शेफारुन गेला. तुमचं घर धुवून खाल्लं त्याने. भ्रुणहत्येसारख्या पापात सहभागी झाला. त्याउलक चेतनला सत्तरच्या वर कधी टक्के मिळाले नाहीत म्हणून तुम्ही त्याला नेहमी घालूनपाडून बोललात. त्याच्या प्रत्येक क्रुतीला विरोध केलात पण मी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलो. मला देवाने मुल दिलं नाही पण माझी मुलाची कमी चेतनने भरून काढली. आज मी अभिमानाने सांगतो की अन्नपुर्णा हॉटेल माझ्या भाच्याचे आहे.

-----सौ.गीता गजानन गरुड.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now