Feb 27, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

सच्ची मैत्री

Read Later
सच्ची मैत्री

कथेचे नाव:- अनोखी मैत्री

विषय:- नाते मैत्रीचे

स्वच्छ आणि नितळ पाण्यात पडणारे
प्रतिबिंब जेवढे स्वच्छ दिसते. तसेच मैत्रीचे बंध असतात. एक पवित्र आणि सोज्वळ नातं. हेवेदावे विसरून , मनात असणारे क्लेश दूर ठेवून मैत्रीचे नाते निभावणारे लोक या जगात फार कमी सापडतात.
अशीच एक मैत्री, दोन मुलींची. समता आणि गायत्रीची.
एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आली.
त्यामुळे ना गर्व होता, ना कशाचा तोरा. मैत्रीतही तसेच होते. अगदी पारदर्शक मैत्री. बोलका स्वभाव आणि प्रत्येक वेळी मदतीला धावून जाणारी अशी ही समता. दहावीनंतर समताने महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि सुरू झाली जीवघेणी स्पर्धा. पण, जीवनाची दिशा निश्चित करायची असेल तर या स्पर्धेत उतरावेच लागेल. त्यामुळे इतर मुलींप्रमाणे तिलाही हवा लागलीच. कपडे असो किंवा सॅनडल्स, बॅग असो किंवा आणखी काही. प्रत्येक वस्तू तिला हवी होती. सुरवातीला समाधानी असणारी समता आता एखादी गोष्ट मिळाली नाही. तर बैचेन व्हायची. तिचे आईवडील तिची प्रत्येक इच्छा पुर्ण करण्यासाठी धडपडत होते. पण, कधी कधी ते शक्य होत नसे.
अभ्यासापेक्षा तिला शान शौक करायला जास्त आवडू लागले. काही जुन्या मैत्रिणी तर काही नव्या मैत्रिणींशी ओळख झाली. पण, मैत्रिणींच्या घोळक्यात ती स्वतः हरवुन बसायची. त्यांचे राहणीमान बघून तिचे अभ्यासापेक्षा इतर गोष्टींमध्ये लक्ष वेधले जाऊ लागले आणि नेहमीप्रमाणे अभ्यासात हुशार असणारी समता अर्थातच मागे पडली.
दोन तीन महिन्यांतच अचानक तिच्या वर्गात एक नवीन ॲडमिशन झाली.
तिला बघताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. ती मुलगी आंधळी होती. त्यामुळे तिला दया म्हणून काही शिष्ट मुलींनी पहिल्या वेळी जागा दिली.
पण, तिच्या कडे बघण्याचा सगळ्यांचा वेगळाच दृष्टीकोन होता. एकतर ती आंधळी , शिवाय तिचे कपडे अगदीच साधारण. पण, समता तिच्या जवळ स्वतः गेली आणि स्वतःच बोलली.
"हाय, गायत्री."
"हॅलो"...
मी समता.
थोडी ओळख होताच दोघीजणी निघून गेल्या.
समता मात्र तिला भेटल्यापासून हरवल्यासारखी राहू लागली.
घरी आल्यावर, "आई, आमच्या वर्गात एक आंधळी मुलगी आली गं. पण,आई तिच्याकडे सर्व मुली सहानुभूतीने बघत असतात. कोणी बोलत पण नाही. पण, मी स्वतःहून तिच्या जवळ गेले आणि ओळख करून घेतली.
"अगं, छान केलं. तिलाही तेवढाच तिला एका चांगल्या मैत्रिणीचा आधार आणि सोबत."
आईचे बोलणे समताने चांगलेच लक्षात ठेवले.

हळूहळू हळूहळू समता आणि गायत्री रोजच बोलू लागल्या. दोघींचेही विषय सारखेच असल्यामुळे समता आणि गायत्री सोबतच राहू लागल्या. नकळत दोघी जणी एकमेकींच्या जवळ आल्या. अनोखी मैत्री त्यांच्यात झाली. संपूर्ण काॅलेजमध्ये त्या दोघींची मैत्री ओळखल्या जाऊ लागली. त्या एकमेकांच्या कधी जीवलग मैत्रिणी झाल्या. हे कळलेच नाही. समता हळूहळू तिच्यात गुरफटत गेली आणि चांगल्या, वाईट गोष्टींची जाण झाली.
तिला अभ्यासात मदत करू लागली. तिच्या साठी रात्रभर जागून स्वतः च्या आवाजातील अभ्यासाची नोट्स कॅसेट मध्ये रेकॉर्ड करून देऊ लागली. त्यावरून गायत्री अभ्यास करत होती. दोघीही अभ्यासात वर्गातून पहिल्या नंबरवर आल्या. त्यात गायत्रीचा आवाज खूपच सुंदर होता. तिचा स्वभाव वेगळा होता. सहनशीलता आणि धैर्य , सोशिकता आणि आत्मसन्मान कसा जपावा हे समता गायत्रीकडूनच शिकले. आतापर्यंतच्या भेटलेल्या सर्व मैत्रिणी पेक्षाही सर्वात कमी वेळात गायत्री समताच्या अधिक जवळची मैत्रीण ठरली.
समताला तिच्या बद्दल जास्त आकर्षण होते. तिचं अंदाज घेत चालणं, तिचं ब्रेल लिपीतील लिखाण, दुकानात जाऊन खरेदी करणे, तिचे गायन या सर्व गोष्टी ती डोळे नसुनही डोळसपणे करीत होती. सगळ्या गोष्टीत कशी समाधानी वाटत होती. अगदी \"साधी राहणी आणि उच्च विचारसरणी\" असे म्हटले तरी चालेल. गायत्री विषयी तिला अनेक प्रश्न पडत होते.
एकदा तिने हिंमत करून विचारलेच.
आपल्या मैत्रीच्या नात्यात एक वळण आले आहे. तेव्हा मला वाटतं आपण एकमेकींना काही गोष्टी शेअर करायला हरकत नाही.

तेव्हा "गायत्री एक विचारू?"

"अगं विचार ना!"...... गायत्री

तुला त्रास नाही ना होणार",..... समता

तू आंधळी कशी झालीस की जन्मतःच होती ? म्हणजे तुला सांगावेसे वाटत असेल तरच बोल.

"नाही मी तुझ्याशी मैत्री केली तर नक्कीच एकमेकीविषयी माहिती हवीच ना."......गायत्री

मी मुळची उत्तर प्रदेशातील. मला माझ्या गावाचे नाव आठवत नाही.
"म्हणजे? "

अगं, म्हणजे मी लहानपणीच महाराष्ट्रात आले होते.

"म्हणजे?"

अगं, तुला किती प्रश्न पडत आहे. मी सांगते सर्व.

"अगं, आमच्या घरची परिस्थिती खूपच बिकट. आई आणि वडील शेतीच्या एका तुकड्यात राब राब राबायचे. त्यात मला मोठ्या तीन बहिणी आणि दोन भाऊ. खायची फार आबाळ व्हायची आमची. आई वडील शिक्षणापासून वंचित होते. कसे बसे आम्ही शाळेत जात होतो. आमच्या शाळेवर शिकविणाऱ्या एक बाई मला खूप आवडायच्या. मी पण अभ्यासात हुशार होते. पण, दारिद्र्य आणि दुर्बलता आमची पाठ सोडत नव्हती."
एकदा मी आजारी पडले, थोडा ताप होता. पण, पैशांच्या अभावी डॉक्टरांना न बोलावता घरीच उपचार केले गेले. पण, ताप कमी होईना. तापामुळे आणि अशक्तपणामुळे माझी तब्येत जास्त खराब झाली आणि त्यात माझे डोळे गेले. नियतीने माझ्यावर असा वार केला की मी त्यातून सावरलेच नाही. हे सुंदर जग , हे रंग मी परत कधीही पाहू शकणार नव्हते आणि तेथूनच माझ्या आयुष्याची घरघर सुरू झाली. शिक्षण थांबले. प्रत्येक काम करतांना दुसऱ्यावर विसंबून राहावे लागत होते. अंधाऱ्या वाटेवर दुःखाचे अनेक काटे बोचत होते.
मी स्वतः ची कामे नीट करू शकत नव्हती. शेवटी माझ्या शाळेतील एका बाईंनी माझ्या घरी अंध मुलांच्या शाळेविषयी सांगितले. तिथेच राहणे , जेवण आणि शिक्षण मिळेल असे सांगितल्यावर माझे आईवडील लगेचच तयार झाले आणि मी नागपुरात आले.
मी नागपुरात आले तेही कायमचीच. मी जिवंत आहे का मेली. हे बघायला देखील माझे आईवडील कधीच आले नाहीत.
नंतर एका मॅडमनी दत्तक घेतले. त्यांनीच माझ्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलला. मी त्यांची नेहमीच ऋणी राहील.
"समता, ए समता कुठे हरवलीस?

समताचे डोळे भरून आले होते.
" काही नाही. तुझ्यासारखी मैत्रिण माझ्या आयुष्यात आली आणि आयुष्याचा खरा अर्थ समजला. आयुष्याचे खरे रंग मी बघायला शिकले आणि आई वडील असुनही तू निराधार असल्यासारखी राहतेस आणि मी .... माझे आईवडील माझे सर्व लाड पुरवूनही मी सारखी हट्ट करीत असते.
"अगं , आज जर तू माझ्या आयुष्यात आली नसती तर नक्कीच मी कुठेतरी वाईट प्रवाहात अडकले असते. पण, तू मैत्रीचा हात दिलास आणि माझ्या डोळ्यांवरची एक स्वार्थाची पट्टी उतरवलीस. आपल्या या मैत्रीचा सुगंध असाच दरवळत राहो.

दोघींचेही ग्रॅज्युएशन पूर्ण झाले आणि दोघी जणी थोड्याशा दुरावल्या. त्यावेळी फोन वगैरे काहीच नव्हते. पण, समताने स्वतः च्या लग्नाची पत्रिका गायत्रीला देण्याच्या निमित्ताने तिच्या दत्तक आई वडीलांचा पत्ता शोधत गेली. दुर्दैवाने समताची आणि गायत्रीची भेट झालीच नाही. आयुष्यात परत कधीही भेट होणार नाही. अशा ठिकाणी गायत्री निघून गेली होती. कदाचित त्यांची ही मैत्री इथपर्यंतच असेल. दुसऱ्यांच्या आयुष्याला सावरत स्वतः चे आयुष्य खर्ची घालवणारी एक सच्ची मैत्रीण. जणु त्यांच्या मैत्रिला नजरच लागली.
खरंतर ही एक सत्य घटना आहे. पण, गायत्री हे खरे नाव आणि (समता) नाव बदलले आहे.

©®आश्विनी सुहास मिश्रीकोटकरईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Ashwini Suhas Mishrikotkar

Housewife

Love Singing, Rangoli

//