कथेचे नाव - सा रे ग म
आज गहनाचे कशातच लक्ष नव्हते. सारखे तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. आज तिच्या आजीची पंचाहत्तरी होती. तिच्या आजीची खूप आधीपासूनच इच्छा होती की तिच्या पंचाहत्तरीला तीन पिढ्यांनी मिळून गाणे गायचे; पण गहनाशी आजी आणि आईने संबंध तोडल्यामुळे गहनाची इच्छा असूनही आजीच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकत नव्हती.
गहना आपल्या संसारात सुखी होती. गहनाचा नवरा नील तिची सर्वतोपरी काळजी घ्यायचा तरीदेखील तिला मधे मधे आईबाबा आणि आजीची आठवण तर यायचीच. गहनाच्या लग्नाला बारा वर्षे झाली तरी तिच्या आजीने आणि तिच्या आईबाबांनी गहनाला माफ केले नव्हते. आईबाबा आणि आजीच्या आठवणीत गहना साहजिकच भूतकाळात शिरली.
सौ. सारंगी रेगे ही गहनाची आजी. ख्यातनाम शास्त्रीय संगीत गायिका. श्री. पुष्कर रेगे हे गहनाचे आजोबा. ते देखील शास्त्रीय संगीतातील ख्यातनाम गायक होते. गहनाची आई लहान असतानाचं ते देवाघरी गेले. गहनाच्या आईला आजीने एकटीने वाढवले होते. सौ. रेशम भारद्वाज ही गहनाची आई आणि श्री. धीरज भारद्वाज हे गहनाचे वडील. हे दोघेही नामवंत सुगम संगीत गायक. गहनाला संगीताचे बाळकडू जन्मापासूनच मिळाले होते. गहनाला लहानपणापासूनचं पेटी, तबला, तंबोरा यांची ओळख झाली होती. त्यांच्या घरात लक्ष्मी, सरस्वती एकत्रितपणे वास करत होत्या.
गहना संगीताच्या सानिध्यात मोठी होत होती. गहना नुसतीच रूपाने देखणी नसून अतिशय बुद्धिमान होती. शाळा, कॉलेजमध्ये पहिला क्रमांक तिने कधीच सोडला नव्हता. गहनाच्या आईवडिलांच्या संगीत विद्यालयात नील शेलार नावाचा मुलगा संगीत शिकण्यास येत असे. नील अतिशय मेहनती, बुद्धिमान होता. त्याच्या घरची परिस्थिती बेताचीच होती; पण त्याची संगीतातील आवड लक्षात घेऊन गहनाच्या वडिलांनी नीलकडून एक पैशाचा मोबदला न घेता त्याला संगीत शिक्षणाचे धडे देण्यास सुरुवात केली होती.
गहना आणि नील संगीत शिक्षणाचे धडे गिरवताना कधी एकमेकांच्या प्रेमात पडले हे त्यांचे त्यांनाच समजले नाही. गहनाच्या प्रेमाबद्दल तिच्या आईवडिलांना समजताच त्यांनी गहनाच्या प्रेमाला कडाडून विरोध केला. एकतर नील जातीबाहेरचा आणि त्याच्या घरची गरीब परिस्थिती यामुळे त्यांच्या अब्रूला धक्का बसणार होता. गहना नीलच्या प्रेमात इतकी अखंड बुडालेली होती की नीलशिवाय ती दुसऱ्या कोणाचाच विचार करू शकणार नव्हती. आपले आईवडील आपल्या लग्नाला मान्यता देणार नाही ह्याची जाणीव गहनाला होती म्हणून तिने घरातून पळून जाऊन नीलशी लग्न केले.
खरंतर नीलच्या मनात अतिशय अपराधी भावना निर्माण झाली होती. नीलला गहनाशी पळून लग्न करायचे नव्हते. ज्या गुरूंनी आपल्याला एक पैशांचा मोबदला न घेता संगीत शिकवले त्याच गुरूंच्या मुलीशी पळून जाऊन लग्न करणे त्याला मान्य नव्हते; पण गहनाच्या हट्टापुढे त्याचे काहीच चालले नाही. रजिस्टर लग्नासाठी एक महिनाआधी नोटीस दिली असल्यामुळे नीलने लग्नाच्या दिवशी गहनाला तिच्या घरी आपण लग्न करतो आहोत असे फोनवर सांगायला सांगितले. त्याप्रमाणे गहनाने तिच्या घरी फोन केला. फोन रेशम ताईंनी उचलला.
"हॅलो आई! तुम्ही लोकं माझ्या प्रेमाच्या विरोधात आहेत म्हणून मी आणि नील आज रजिस्टर लग्न करतो आहोत. असे लग्न करण्याचा निर्णय माझ्या एकटीचा आहे. नीलला असे लग्न करणे अजिबात पसंत नाही; पण त्याचाही नाईलाज आहे." गहना म्हणाली.
"गहना, तू लग्न करण्याचा निर्णय घेतला आहेस तर माझाही निर्णय ऐक. आजपासून तुला आमच्या घराचे दरवाजे कायमचे बंद होतील. तुझ्याशी आमचे कोणतेही संबंध नसतील." रेशमताई कठोर होऊन म्हणाल्या. वास्तविक पाहता गहनाच्या निर्णयामुळे त्या दुखावल्या गेल्या होत्या. गहनाला माफ करणे त्यांच्या तत्वात बसतच नव्हते.
नील परिस्थितीने गरीब असला तरी तो मेहनती होता. गहनाने त्याच्या घरी पाऊल ठेवल्यापासूनच त्याची भरभराट होत गेली. दोघांनी मिळून संगीत विद्यालय सुरू केले होते. जी मुले गरीब आहेत पण त्यांना संगीत शिक्षणात अभिरुची आहे अशा विद्यार्थ्यांना ते मोफत शिक्षण देत असत. गहना आणि नीलच्या संसारात महंतरुपी प्रेमाचे फुल उमलले होते. महंत आता दहा वर्षांचा झाला होता. महंतला देखील लहानपणापासूनचं संगीतामध्ये गोडी होती. आपल्या आईवडिलांच्या तालमीत तो तयार होत होता.
गहनाचे आज चित्त थाऱ्यावर नाही हे नीलला जाणवले होते. त्याने एक योजना आखली होती आणि त्यात महंतला सामील करून घेतले होते.
"आई ए आई! आज आमच्या शाळेतल्या बाईंच्या घरी प्रोग्रॅम आहे तू विसरलीस का? बाईंनी मला छान गाणे म्हणायला सांगितले आहे. तू आणि बाबा माझ्याबरोबर गाणे म्हणाल ना?" महंतने गहनाला हाक मारली तशी गहना भूतकाळातून बाहेर आली.
"अरे हो रे. मी खरंच विसरून गेले होते. आपण जाऊया हा बाईंच्या कार्यक्रमाला." गहना म्हणाली.
संध्याकाळी नीलने हट्टाने गहनाला तिची निळ्या रंगाची कांजीवरम साडी नेसायला सांगितली. गहनाला केसांमध्ये माळायला त्याने मोगऱ्याचे गजरे आणले होते. गहना छान तयार होऊन आली. नील आणि महंतने देखील स्वच्छ पांढऱ्या रंगाचे सदरे घातले होते. गहना गाडीत बसली तरी तिचे आजूबाजूला कुठेच लक्ष नव्हते. ती आपल्याच विचारांमध्ये गढलेली होती. नीलने ड्रायव्हरला आधीच सांगून ठेवले असल्याने ड्रायव्हरने गाडी गहनाच्या आजीच्या बंगल्यापाशी आणली. आजीच्या बंगल्यापाशी गाडी येताच मात्र गहना तिच्या विचारातून बाहेर आली.
"नील! इथे कुठे आलो आपण? आपल्याला इथे बोलावले नाही तरीदेखील इथे का आणलंस मला? चल आपण पुन्हा आपल्या घरी जाऊ. माझं एकवेळ ठीक आहे पण इथे तुझा अपमान मी सहन करू शकणार नाही." गहना उत्कटतेने म्हणाली.
"तू पहिली शांत हो पाहू. पाहशीलच तू आपला काही अपमान बिपमान होणार नाही." नील म्हणाला आणि त्याने महंतला खूण केली. महंत थेट बंगल्यात शिरला. गहनाच्या आजीच्या पंचाहत्तरीसाठी अनेक नामवंत मंडळी जमली होती. अचानक सगळ्यांना सुरेल सूर ऐकू आले. 'कहां से आए बदरा' महंत गाणे म्हणत होता तशी सगळ्या उपस्थितांची नजर महंतकडे गेली. त्याच्या आवाजाने सगळे मंत्रमुग्ध झाले होते. महंतने त्या गाण्याचे एक कडवे म्हटले. त्याचे गाणे संपल्यावर उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्याची स्तुती केली. इतका लहान मुलगा एवढे कठीण गाणे गातो आहे याचे नवल सगळ्यांना वाटले.
"कोण आहेस तू? तुझं नाव काय आहे? कुठून आला आहेस तू? तुझे आईबाबा कोण आहेत?" रेशमताईंनी महंतला जवळ घेत विचारले.
"आजी! माझं नाव महंत आहे आणि मी तुझा नातू आहे." महंतने एका झटक्यात उत्तर दिले.
महंतने त्याची ओळख सांगितल्यावर पहिल्यांदा रेशमताईंच्या लक्षात आले नाही पण दुसऱ्याच क्षणाला त्यांना उलगडा झाला म्हणजे हा गहनाचा मुलगा आहे.
"तुझ्या आईचं नाव गहना आहे? कुठे आहे ती? इथे आली आहे का?" रेशमताई महंतला विचारत असताना त्यांची नजर गहनाला शोधत होती.
"हो आजी. माझ्या आईचे नाव गहना आहे. माझे आई आणि बाबा बाहेर उभे आहेत." महंत म्हणाला.
गहना आणि नील बाहेर उभे आहेत असे समजल्यावर गहनाचे आईबाबा आणि आजी धावतच गहनाजवळ आल्या.
"गहना, नील! आज तुमच्या लेकाने आम्हाला आमच्या लेकीची भेट घडवून आणली. इतके दिवस आम्ही खोट्या प्रतिष्ठेसाठी मुलीला आमच्यापासून लांब ठेवले. नील सारख्या हिऱ्याची पारख आम्हाला करता आली नाही. आज ह्या माझ्या छोट्या नातवामुळे मला पाझर फुटला. चला घरात तुम्ही. आपली माणसे अशी दारात थांबतात का?" रेशमताई म्हणाल्या. त्यांनी गहना आणि नीलला मोठ्या मानाने घरात आणले. सगळ्या निमंत्रितांना लेकीची, जावयाची आणि नातवाची ओळख करून दिली.
"आई! आज आपण तीन पिढ्या नाही तर चार पिढ्या एकत्र गाणार आहोत." रेशमताई प्रफुल्लित होऊन म्हणाल्या.
"हो तर. आपल्या चौघांचे सा रे ग म स्वर एकत्र आलेचं पाहिजेत. रेशम, गहना आपण तिघी इतके दिवस सा रे ग होतो आणि आता महंतमुळे आपल्या चार पिढ्यांची सा रे ग म ची पूर्तता झाली." गहनाची आजी सारंगीताई म्हणाल्या. आजीच्या बुद्धीचातुर्याचे सगळ्यांना कौतुक वाटले.
चार पिढ्या आसू आणि हासू मिश्रित एकत्रितपणे गाणे गाऊ लागले, 'कहां से आए बदरा, घुलता जाए कजरा.'
( समाप्त )
सौ. नेहा उजाळे
ठाणे
ठाणे
neha.ujale@gmail.com
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा