'स' सासूचा की सूनेचा? भाग - तीन (अंतिम )

सासू सुनेच्या अलवार नात्याची कथा.

स - सासूचा की सूनेचा?

भाग - तीन.


"तुम्हाला म्हणून सांगते, माझ्या कित्येक मैत्रिणींनी मला सांगितलं, की सासू नावाच्या प्राण्याशी जेवढ्यास तेवढंच वागायचं. एखादे काम येत असेल तरी नाही येत म्हणून खुशाल सांगायचं, म्हणजे मग पुन्हा ते काम आपल्या वाट्याला येणार नाही." ती.


"तुला सांगू अर्पिता, माझ्या सासूबाई खूप चांगल्या होत्या. त्यांचं प्रेमही होतं माझ्यावर, पण त्यांना कधी दाखवता नाही आले. मी जेव्हा सुहासच्या वेळेस प्रेग्नेंट होते ना, उलट्यांचा फार त्रस झाला. अगदी काहीच पचायचं नाही, काही खायची वासनाच उरली नव्हती . सासूबाई आलेल्या गेलेल्याला सांगत, 'घरात काही कमी नाहीये. तिला जें हवं ते करून खावं.' मला कित्येकदा असं वाटायचं दुसऱ्यांना हे सांगण्यापेक्षा तू काय खाशील? म्हणून मला एकदा विचारून बघितलं असतं तर?

डिलिव्हरीची वेळ खूप क्रिटिकल होती, तेव्हा सासूबाई माझं ठीक व्हावं म्हणून पाण्यात देव टाकून बसल्या. खरं तर त्यावेळी मला प्रेम आणि विश्वासाचा एक स्पर्श हवा होता. देवघरातून बाहेर निघून प्रेमानं त्यांनी मला जवळ घ्यावं असं खूपदा मनात आलं, पण मी बोलू शकले नाही. कदाचित भीतीमुळे, कदाचित माझ्या इगोमुळे." बोलता बोलता राधिकाच्या डोळ्यात पाणी झळकले.


"पहिल्या प्रेग्नसीच्या अनुभवाने मी सेकंड चान्स नाही घेतला पण मनात मात्र पक्की खूणगाठ बांधली, सुहासच्या लग्नानंतर घरात त्याची बायको म्हणून आलेल्या मुलीची आई किंवा चांगली सासू मला जरी बनता नाही आले तरी पहिले मात्र एक मैत्रीण बनण्याचा नक्की प्रयत्न करेन. त्यासाठी मग मला पहिलं पाऊल टाकावं तरी चालेल आणि मुळात, दुसऱ्याच्या आईला आपली आई किंवा दुसऱ्यांची मुलगी ती आपली मुलगी लगेच नाही होता येणार नं, नात्याला वेळ द्यायला हवा. पण मैत्रीचे नाते कुठेही फुलू शकते. तुला काय वाटते?" तिच्याकडे पाहत राधिकाने चेंडू तिच्या कोर्टात भिरकावला.


"एक्झाक्टली आई, मला पटलं तुमचं म्हणणं. मैत्रीचे नाते हे एकच असे नाते आहे ज्यात वयाचे बंधन नसते बरं का."

ती हसून म्हणाली.


"परत एक सांगू? कधी माझ्या सासूबाईंनी चुकून चहा केला तरी माझ्यापेक्षा दहा वर्षांनी मोठया असलेल्या नणंदेच्या हातात त्या चहाचा कप द्यायच्या पण मला चहा घे म्हणून माझा कप ओट्यावरच ठेवायच्या. म्हणून तुला आज मी हातात कॉफी आणून दिली, खरंच आपला इगो दुखावतो का हे बघण्यासाठी. पण तसं काही नाही झालं अगं. दिलं एखाद्यावेळेस सुनेच्या हातात तर काय बिघडते?"

जुन्या आठवणीने राधिका हळवी झाली.


"आई तुम्ही मला कॉफी दिलीत ना? त्या बदल्यात मीही तुम्हाला आज स्पेशल ट्रीट देते, चला किचनमध्ये." आनंदाने उठून अर्पिता म्हणाली.


संध्याकाळी सुहास आणि विनायक कामावरून परतले, तर दोघी सासूसूनेचा स्वयंपाकघरातून बोलता बोलता हसण्याचा आवाज ऐकू येत होता. काय चाललंय म्हणून दोघे आत डोकावले, तर स्वयंपाकाआधी त्या दोघींचेही मैत्रीच्या पाणीपुरीवर ताव मारणे सुरु होते.


समाप्त.

************

'स' सासूचा की सूनेचा हा प्रत्येक घरातील नाजूक प्रश्न. त्या दोघींचे मैत्रीचे नाते? शक्यच नाही असे वाटते ना? पण ते अगदीच अशक्यप्रायदेखील नाहीये. आताशा बऱ्याच घरात हे चित्र थोडंफार बदलतेय. गरज आहे दोघीनीही आपापल्या वरचष्म्यातून बाहेर निघून आपले एक पाऊल पुढे टाकण्याची. ते पाहिलं पाऊल कोण पुढे टाकेल या गुंत्यात न अडकता स्वतःपासूनच सुरुवात केली तर?

©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)

*साहित्यचोरी गुन्हा आहे.*


🎭 Series Post

View all