'स' सासूचा की सूनेचा? भाग -दोन.

सासू सुनेच्या अलवार नात्याची कथा.
'स' सासूचा की सूनेचा?
भाग -दोन.

"अरे वाह! मला वाटलं नव्या पिढीची तू, नवेच गायक आवडत असतील पण तू तर जुन्यांना पण तेवढंच बांधून ठेवलंस." राधिका हसून म्हणाली.

"हो आई, जुनी गाणी अवीट आहेत बघा. मला आवडतात, पण तुम्हाला अरमान मलिक, अरजीत सिंग वगैरे चांगल्याने माहीत आहेत हो." अर्पिता.

"हो अगं, जुन्याला तोड नाहीच, पण नवे काही चांगले मिळत असेल तर घ्यावं ह्या मताची आहे बघ मी. त्यामुळे ह्यांचेही गाणे ऐकते मी. आणि कधीकधी हनी सिंग, बादशाहचा रॅप देखील असतोच सोबतीला." राधिका.

"ग्रेट हं! तुमचा हा पैलू मला माहितीच नव्हता." ती.

"त्यासाठी एकमेकांत संवाद हवा. तू घाबरतेस का गं मला?" राधिकाने मूळ मुद्यात हात घातला.

"घाबरते असं नाही, पण जरा भीती वाटते. माझं काही तुम्हाला आवडलं नाही तर कशा रिऍक्ट व्हाल हे माहीत नाही ना, कदाचित म्हणून असेल. त्यात ते उखाण्यात तुमचं नाव घेतलं तर सगळे कसे बोलत होते ना, त्यामुळे माझं काही चुकत तर नाही ना हे दडपण मनावर असते."
 ती थोडे राधिकाकडे तर कधी खाली पाहून बोलत होती.

"तेव्हाचं अजून घेऊन बसलीस होय? मी तर त्या बायकांचे बोलणे केव्हाच विसरले. हं, उखाणा तेवढा आहे हं लक्षात आणि मला आवडलादेखील होता." तिच्याकडे मिश्किल बघत राधिका.

"सॉरी आई, तुम्ही किती छान बोलता? मी उगाच घाबरत होते." ती छान स्वच्छ हसून म्हणाली. तिची भीती आता बऱ्यापैकी चेपली होती.

"एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला भीते, किती विचित्र नं?" राधिका.

"हो ना, नाही तेव्हा दोन बायका भेटल्या तरी गप्पांचा नुसता पूर येतो, पण सासू सुनेमध्ये सहसा असं आढळून येत नाही." ती.

"अगं हे नातंच तसं आहे, नात्याची ओढ लागण्यापुर्वीच तिथे एक अढी निर्माण होते. मला काय वाटतं सांगू तुला? सासू सून म्हणून एकमेकींना बघण्यापेक्षा केवळ दोन स्त्रिया म्हणून एकत्र वावरलं तरी नात्यात सहजता येईल." राधिका समजावत म्हणाली.


"पण असं होऊ शकत का हो? म्हणजे बघा, जर तुम्ही माझ्याशी बोलला नसतात तर तुमच्याविषयीचे माझे मत काहीसे वेगळे असते." ती.

"बरोबर, तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुझ्या बोलण्यातच दडलंय बघ, मी बोलायला नसते आले तर तुझा माझ्याविषयीचा दृष्टिकोन वेगळा असता पण तुला स्वतःहून बोलून आपल्यातील नातं खुलवावं असं नाही वाटलं. हीच तर खरी गंमत आहे, मनात बोलायचं असतं पण इगो आड येतो. 'सासू म्हणजे सारख्या सूचना' तर 'सून म्हणजे सूचना नको', एवढंच समीकरण होऊन बसलंय. पण 'स' म्हणजे सासूचा की सुनेचा हा प्रश्न नं पडता 'स' म्हणजे दोघींच्या समंजसपणाचा, 'स' म्हणजे त्या दोघींतील प्रेमाच्या सुवासाचा बनला तर किती छान होईल ना?"
प्राध्यापिकाबाई जणू एखादा अवघड धडा सुलभ करून शिकवावा त्याप्रमाणे सांगत होत्या.

"खरं तर आई, सासू या नावानेच कित्येकदा धडकी भरते बघा. मी माझ्या अवतीभावती, मैत्रिणीकडे बघितलंय. त्यांच्या सासवांचा तोरा काही औरच असतो. तोंड उघडायची काय बिशाद? तुम्हाला म्हणून सांगते, माझ्या कित्येक मैत्रिणींनी मला सांगितलं, की सासू नावाच्या प्राण्याशी जेवढ्यास तेवढंच वागायचं. एखादे काम येत असेल तरी नाही येत म्हणून खुशाल सांगायचं, म्हणजे मग पुन्हा ते काम आपल्या वाट्याला येणार नाही." ती.
:
क्रमश:
Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
प्राध्यापिकाबाईंनी अवघड विषयात हात तर घातला, पण त्यांची ही विद्यार्थिनी त्यांना साथ देईल का? वाचा पुढच्या अंतिम भागात.


🎭 Series Post

View all