'स' सासूचा की सूनेचा? भाग -एक

सासू सुनेच्या अलवार नात्याची कथा.


'स' सासूचा की सूनेचा?
भाग -एक.

"अगं, अगं.. असं नाही. आधी नाव घे आणि मग आत पाऊल टाक."
गृहप्रवेश करणाऱ्या नववधूला म्हणजे अर्पिताला गर्दीतून कोणीतरी बोलले.


"चमचमत्या चांदण्यातील मी इवलीशी चंद्रकोर,
माझ्या पुण्याईने मला लाभले सासू सासरे थोर.
दारात पडलंय प्रेमाचं कोवळं ऊन,
सुहासरावांचं नाव घेते राधिकांची सून!"

थोडी नजर खाली करून अर्पिताने लाजून नाव घेतले आणि ती आत आली.


"नवऱ्यासोबत सासूचेही नाव घेतले गं, सासूच्या डोक्यावर नक्कीच मिऱ्या वाटणार ही."

"राधिका सांभाळून रहा गं.."

"सासूचे नाव घ्यायला हिंमत असावी लागते, माझ्या सूनेकडे ती हिंमत आहे याचं कौतुक आहे मला."

घ्या, हीच आत्तापासून सुनेला डोक्यावर चढवते तर आपण काय बोलायचं. "
त्यावर राधिका काही न बोलता केवळ हसली.


गर्दीतील ही कुजबुज अर्पिताच्या कानावर येत होती, तिने उखाण्यात सासूचे नाव घेऊन काय चूक केली तिला कळेना. पण राधिकाच्या उत्तराने मात्र तिला बरे वाटले.

लग्नानंतर एक महिना सरत आला होता.
पाहुण्यांची गर्दी, ती ओसरत नाही तोच सुहास अर्पिताचा आठ दिवसांचा हनिमून पॅकेज. पाहुणे गेले, नवदाम्पत्यही परतले. घरात आता राधिका आणि विनायक व अर्पिता आणि सुहास ही चौकडी तेवढी उरली. दोन दिवसांनी सुहास कामावर रुजू झाला, अर्पिताची आठ दिवसांची सुट्टी अजून बाकीच होती. विनायक देखील आपल्या कामात गुंतले. राधिका मात्र घरातच होती. तिने लग्नाआधीपासून चांगल्या दोन महिन्यांच्या सुट्ट्या घेतल्या होत्या, त्यातल्या अजून पंधरा दिवसाच्या शिल्लक होत्या.


अर्पिता एका चांगल्या कंपनीत उच्च पदावर कार्यरत होती आणि राधिकासुद्धा कॉलेजमध्ये प्राध्यापिका होती. आपापल्या कामात दोघीही चोख, पण घरातील मेळ काही जमेना. सुहास आणि विनायक कामाला गेले की घरी दोघीच उरायच्या. सासू म्हणजे सारख्या सूचना, म्हणून मग दिवसभर अर्पिता खोलीच्या बाहेर पडत नसे. आपले आटोपले की तिचा पूर्ण दिवस खोलीतच. त्यात तिने उखाण्यात घेतलेले सासूचे नाव, त्यामुळे सासू दाखवत नसली तरी मनात रागावली असेल असे राहून राहून तिच्या मनात यायचे.
राधिका एक हाडाची प्राध्यापिका, अबोल सुनेला बोलतं करण्याचं चॅलेंजच घेतलंय जणू.


दोन दिवस उलटल्यावर तिसऱ्या दिवशी दुपारी कॉफी घेऊन ती अर्पिताच्या खोलीत गेली. कानात हेडफोन अडकवून अर्पिता बेडवर गाणे ऐकत बसली होती. सासूला बघून तिने कानातील हेडफोन पटकन बाजूला ठेवले.

"आई, अहो कशाला मला कॉफी आणलीत? मी घेतली असती ना." अवघडून ती म्हणाली.

"असू दे गं. तसं मलाही एकटीला कंटाळा आला होता, म्हणून म्हटलं जरा तुझ्याशी गप्पा माराव्यात."
तिला कॉफीचा मग देत राधिका म्हणाली.

\"गप्पा.. तेही सासूशी? आता काय प्रश्न विचारणार ही बया?\" मनातील विचारानेच अर्पिताला कापरं भरलं. तिने राधिकाकडे बघून स्मित केले.

"काय ऐकत होतीस? अरमान मलिक की अरजीत सिंग?" राधिका.

"छे हो, जगजीत सिंग! काय सुरेख गातात ते. होशवालो को खबर क्या… किती मस्त गायलंय."
सासूने आवडीच्या विषयात हात घातला आणि ती मोकळी झाली.

"आणि गायिकांमध्ये कोण आवडतं? नेहा कक्कर?" राधिका.

"हां, बरी गाते ती. श्रेया घोषाल जास्त आवडते, पण आई, लतादीदी आणि आशाजींच्या आवाजाला तोड नाही बघा कुणाची." ती.
:
क्रमश :
Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
दोघी एकमेकींशी बोलायला तर लागल्यात, पण खरंच खुलेल का त्यांच्यातील नातं? वाचा पुढील भागात.

🎭 Series Post

View all