स - सासूचा की सूनेचा??

सासू सुनेची छोटीशी स्टोरी


स - सासूचा की सूनेचा??







" अगं, अगं.., असं नाही. आधी नाव घे आणि मग आत पाऊल टाक. "


गृहप्रवेश करणाऱ्या नववधूला म्हणजे अर्पिताला गर्दीतून कोणीतरी बोलले.



"चमचमत्या चांदण्यातील मी इवलीशी चंद्रकोर,
माझ्या पुण्याईने मला लाभले सासू सासरे थोर.
दारात पडलंय प्रेमाचं कोवळं ऊन,
सुहासरावांचं नाव घेते राधिकांची सून!"


थोडी नजर खाली करून अर्पिताने लाजून नाव घेतले आणि ती आत आली.



"नवऱ्यासोबत सासूचेही नाव घेतले गं, सासूच्या डोक्यावर नक्कीच मिऱ्या वाटणार ही."

"राधिका सांभाळून रहा गं.."

" सासूचे नाव घ्यायला हिंमत असावी लागते, माझ्या सूनेकडे ती हिंमत आहे याचं कौतुक आहे मला. "

घ्या, हीच आत्तापासून सुनेला डोक्यावर चढवते तर आपण काय बोलायचं. "
त्यावर राधिका काही न बोलता केवळ हसली.



गर्दीतील ही कुजबुज अर्पिताच्या कानावर येत होती, तिने उखाण्यात सासूचे नाव घेऊन काय चुक केली तिला कळेना. पण राधिकाच्या उत्तराने मात्र तिला बरं वाटलं.



लग्नानंतर एक महिना सरत आला होता. पाहुण्यांची गर्दी, ती ओसरत नाही तोच सुहास अर्पिताचा आठ दिवसांचा हनिमून पॅकेज.

पाहुणे गेले, नवदाम्पत्यही परतले. घरात आता राधिका आणि विनायक व अर्पिता आणि सुहास ही चौकडी तेवढी उरली.दोन दिवसांनी सुहास कामावर रुजू झाला, अर्पिताची आठ दिवसांची सुट्टी अजून बाकीच होती. विनायक देखील आपल्या कामात गुंतले. राधिका मात्र घरातच होती. तिने लग्नाआधीपासून चांगल्या दोन महिन्यांच्या सुट्ट्या घेतल्या होत्या, त्यातल्या अजून पंधरा दिवसाच्या शिल्लक होत्या.



अर्पिता एका चांगल्या कंपनीत उच्च पदावर कार्यरत होती आणि राधिकासुद्धा कॉलेजमध्ये प्राध्यापिका होती. आपापल्या कामात दोघीही चोख, पण घरातील मेळ काही जमेना.


सुहास आणि विनायक कामाला गेले की घरी दोघीच उरायच्या. सासू म्हणजे सारख्या सूचना, म्हणून मग दिवसभर अर्पिता खोलीच्या बाहेर पडत नसे. आपलं आटोपले की तिचा पूर्ण दिवस खोलीतच. त्यात तिने उखाण्यात घेतलेले सासूचे नाव, त्यामुळे सासू दाखवत नसली तरी मनात रागावली असेल असं राहून राहून तिच्या मनात यायचं.


राधिका एक हाडाची प्राध्यापिका, अबोल सुनेला बोलतं करण्याचं चॅलेंजच घेतलंय जणू.



दोन दिवस उलटल्यावर तिसऱ्या दिवशी दुपारी कॉफी घेऊन ती अर्पिताच्या खोलीत गेली. कानात हेडफोन अडकवून अर्पिता बेडवर गाणे ऐकत बसली होती. सासूला बघून तिने कानातील हेडफोन पटकन बाजूला ठेवले.



"आई, अहो कशाला मला कॉफी आणलीत? मी घेतली असती ना." अवघडून ती म्हणाली.


"असू दे गं. तसं मलाही एकटीला कंटाळा आला होता, म्हणून म्हटलं जरा तुझ्याशी गप्पा माराव्यात."


तिला कॉफीचा मग देत राधिका म्हणाली.



`गप्पा.. तेही सासूशी? आता काय प्रश्न विचारणार ही बया? ´ मनातील विचारानेच अर्पिताला कापरं भरलं. तिने राधिकाकडे बघून स्मित केले.


"काय ऐकत होतीस? अरमान मलिक की अरिजित सिंग? " राधिका.


"छे हो, जगजीत सिंग!  काय सुरेख गातात ते, होशवालो को खबर क्या… किती मस्त गायलंय."
सासूने आवडीच्या विषयात हात घातला आणि ती मोकळी झाली.


"आणि गायिकांमध्ये कोण आवडतं? नेहा कक्कर?"    राधिका.


"हा, बरी गाते ती. श्रेया घोषाल जास्त आवडते, पण आई, लतादीदी आणि आशाजींच्या आवाजाला तोड नाही बघा कुणाची."   ती.

"अरे वाह! मला वाटलं नव्या पिढीची तू, नवेच गायक आवडत असतील पण तू तर जुन्यांना पण तेवढंच बांधून ठेवलंस." राधिका हसून म्हणाली.
 
"हो आई, जुनी गाणी अवीट आहेत बघा. मला आवडतात, पण तुम्हाला अरमान मलिक, अरिजित सिंग वगैरे चांगल्याने माहीत आहेत हो."   अर्पिता.

"हो अगं, जुन्याला तोड नाहीच, पण नवे काही चांगले मिळत असेल तर घ्यावं ह्या मताची आहे बघ मी. त्यामुळे ह्यांचेही गाणे ऐकते मी. आणि कधीकधी हनी सिंग, बादशाहचा रॅप देखील असतोच सोबतीला."   राधिका.

"ग्रेट हं! तुमचा हा पैलू मला माहितीच नव्हता."    ती.

" त्यासाठी एकमेकांत संवाद हवा. तू घाबरतेस का गं मला? " राधिकाने मूळ मुद्यात हात घातला.

" घाबरते असं नाही, पण जरा भीती वाटते. माझं काही तुम्हाला आवडलं नाही तर कशा रिऍक्ट व्हाल हे माहीत नाही ना, कदाचित म्हणून असेल. त्यात ते उखाण्यात तुमचं नाव घेतलं तर सगळे कसे बोलत होते ना, त्यामुळे माझं काही चुकत तर नाही ना हे दडपण मनावर असते. "

ती थोडं राधिकाकडे तर कधी खाली पाहुन बोलत होती.



"तेव्हाच अजून घेऊन बसलीस होय? मी तर त्या बायकांचे बोलणे केव्हाच विसरले. हं, उखाणा तेवढा आहे हं लक्षात आणि मला आवडलादेखील होता."

तिच्याकडे मिश्किल बघत राधिका.



"सॉरी आई, तुम्ही किती छान बोलता? मी उगाच घाबरत होते." ती छान स्वच्छ हसून म्हणाली. तिची भीती आता बऱ्यापैकी चेपली होती.


"एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला भीते, किती विचित्र नं?"    राधिका.

"हो ना, नाही तेव्हा दोन बायका भेटल्या तरी गप्पांचा नुसता पूर येतो, पण सासू सुनेमध्ये सहसा असं आढळून येत नाही." ती.
 
"अगं हे नातंच तसं आहे, नात्याची ओढ लागण्यापुर्वीच तिथे एक अढी निर्माण होते. मला काय वाटतं सांगू तुला? सासू सून म्हणून एकमेकींना बघण्यापेक्षा केवळ दोन स्त्रिया म्हणून एकत्र वावरलं तरी नात्यात सहजता येईल."

राधिका समजावत म्हणाली.



"पण असं होऊ शकत का हो? म्हणजे बघा, जर तुम्ही माझ्याशी बोलला नसतात तर तुमच्याविषयीचे माझे मत काहीसे वेगळे असते."   ती.


" बरोबर, तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुझ्या बोलण्यातच दडलंय बघ, मी बोलायला नसते आले तर तुझा माझ्याविषयीचा दृष्टिकोन वेगळा असता पण तुला स्वतःहून बोलून आपल्यातील नातं खुलवावं असं नाही वाटलं. हीच तर खरी गंमत आहे, मनात बोलायचं असतं पण इगो आड येतो.

`सासू म्हणजे सारख्या सूचना´ तर `सून म्हणजे सूचना नको´, एवढंच समीकरण होऊन बसलंय. पण `स´ म्हणजे सासूचा की सुनेचा हा प्रश्न नं पडता `स´ म्हणजे दोघींच्या समंजसपणाचा, `स´ म्हणजे त्या दोघींतील प्रेमाच्या सुवासाचा बनला तर किती छान होईल ना?"
प्राध्यापिकाबाई जणू एखादा अवघड धडा सुलभ करून शिकवावा त्याप्रमाणे सांगत होत्या.


" खरं तर आई, सासू या नावानेच कित्येकदा धडकी भरते बघा. मी माझ्या अवतीभावती, मैत्रिणीकडे बघितलंय. त्यांच्या सासवांचा तोरा काही औरच असतो. तोंड उघडायची काय बिशाद?

तुम्हाला म्हणून सांगते, माझ्या कित्येक मैत्रिणींनी मला सांगितलं, की सासू नावाच्या प्राण्याशी जेवढ्यास तेवढंच वागायचं. एखादे काम येत असेल तरी नाही येत म्हणून खुशाल सांगायचं, म्हणजे मग पुन्हा ते काम आपल्या वाट्याला येणार नाही. "   ती.


"तुला सांगू अर्पिता, माझ्या सासूबाई खूप चांगल्या होत्या. त्यांचं प्रेमही होतं माझ्यावर, पण त्यांना कधी दाखवता नाही आले. मी जेव्हा सुहासच्या वेळेस प्रेग्नेंट होते ना, उलट्यांचा फार त्रस झाला. अगदी काहीच पचायचं नाही, काही खायची वासनाच उरली नव्हती . सासूबाई आलेल्या गेलेल्याला सांगत, "घरात काही कमी नाहीये. तिला जें हवं ते करून खावं." मला कित्येकदा असं वाटायचं दुसऱ्यांना हे सांगण्यापेक्षा तू काय खाशील? म्हणून मला एकदा विचारून बघितलं असतं तर?


डिलिव्हरीची वेळ खूप क्रिटिकल होती, तेव्हा सासूबाई माझं ठीक व्हावं म्हणून पाण्यात देव टाकून बसल्या. खरं तर त्यावेळी मला प्रेम आणि विश्वासाचा एक स्पर्श हवा होता. देवघरातून बाहेर निघून प्रेमानं त्यांनी मला जवळ घ्यावं असं खूपदा मनात आलं, पण मी बोलू शकले नाही. कदाचित भीतीमुळे, कदाचित माझ्या इगोमुळे."

बोलता बोलता राधिकाच्या डोळ्यात पाणी झळकले.



"पहिल्या प्रेग्नसीच्या अनुभवाने मी सेकंड चान्स नाही घेतला पण मनात मात्र पक्की खूणगाठ बांधली, सुहासच्या लग्नानंतर घरात त्याची बायको म्हणून आलेल्या मुलीची आई किंवा चांगली सासू मला जरी बनता नाही आले तरी पहिले मात्र एक मैत्रीण बनण्याचा नक्की प्रयत्न करेन. त्यासाठी मग मला पहिलं पाऊल टाकावं तरी चालेल.

आणि मुळात, दुसऱ्याच्या आईला आपली आई किंवा दुसऱ्यांची मुलगी ती आपली मुलगी लगेच नाही होता येणार नं, नात्याला वेळ द्यायला हवा. पण मैत्रीचे नाते कुठेही फुलू शकते. तुला काय वाटते?"

तिच्याकडे पाहत राधिकाने चेंडू तिच्या कोर्टात भिरकावला.



"एक्झाक्टली आई, मला पटलं तुमचं म्हणणं. मैत्रीचे नाते हे एकच असे नाते आहे ज्यात वयाचे बंधन नसते बरं का."
ती हसून म्हणाली.



"परत एक सांगू? कधी माझ्या सासूबाईंनी चुकून चहा केला तरी माझ्यापेक्षा दहा वर्षांनी मोठया असलेल्या नणंदेच्या हातात त्या चहाचा कप द्यायच्या पण मला `चहा घे ´ म्हणून माझा कप ओट्यावरच ठेवायच्या.

म्हणून तुला आज मी हातात कॉफी आणून दिली, खरंच आपला इगो दुखावतो का ते बघण्यासाठी.पण तसं काही नाही झालं अगं.

दिलं एखाद्या वेळेस सुनेच्या हातात तर काय बिघडते?"

जुन्या आठवणीने राधिका हळवी झाली.



"आई तुम्ही मला कॉफी दिलीत ना? त्या बदल्यात मीही तुम्हाला आज स्पेशल ट्रीट देते, चला किचनमध्ये."

आनंदाने उठून अर्पिता म्हणाली.




संध्याकाळी सुहास आणि विनायक कामावरून परतले, तर दोघी सासूसूनेचा स्वयंपाकघरातून बोलता बोलता हसण्याचा आवाज ऐकू येत होता. काय चाललंय म्हणून दोघे आत डोकावले, तर स्वयंपाकाआधी त्या दोघींचेही मैत्रीच्या पाणीपुरीवर ताव मारणे सुरु होते..


समाप्त..

************
`स´ सासूचा की सूनेचा हा प्रत्येक घरातील नाजूक प्रश्न. त्या दोघींचे मैत्रीचे नाते? शक्यच नाही असे वाटते ना? पण ते अगदीच अशक्यप्रायदेखील नाहीये.

आताशा बऱ्याच घरात हे चित्र थोडंफार बदलतेय. गरज आहे दोघीनीही आपापल्या वरचष्म्यातून बाहेर निघून आपले एक पाऊल पुढे टाकण्याची.ते पाहिलं पाऊल कोण पुढे टाकेल या गुंत्यात न अडकता स्वतःपासूनच सुरुवात केली तर?

तुम्हाला काय वाटते? नक्की सांगा.

आणि ही कथा आवडली असेल तर कमेंट आणि एक लाईक नक्की करा.



साहित्यचोरी हा गुन्हा आहे, तेव्हा लेखकांच्या मर्जीशिवाय त्यांचे लेख कुठेही शेअर करू नयेत. धन्यवाद!