जिथून पडल्या गाठी - 36

मनवा आणि ऋषीच्या प्रेम,त्याग,विरह आणि समर्पणाची भावस्पर्शी कथा.

ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी - 36
©®राधिका कुलकर्णी.


मनवाच्या हाती तिचाच कागद परत करत छोटू जाऊ लागला तसे मनवानेही त्याला थॅंक्यू म्हणत चिठ्ठी उघडली. त्यावर त्याने लिहिलेला मजकूर वाचून मनवाची पुन्हा सटकली.
त्याने तिच्या पत्राला खालील उत्तर लिहून पाठवले होते.

“ आदरणीय मायक्रोबॉयलॉजी प्राध्यापिका जी,

आपल्या दोघांत याचक तुम्ही आहात, तेव्हा पैसे घ्यायला मी नाही, तुम्ही माझ्याकडे येणे अपेक्षित आहे, बरोबर ना ?
खरंच मनापासून पैसे परत करायची इच्छा असेल तर संध्याकाळी लायब्ररीत या. धन्यवाद. ”


पत्र वाचून कुणाचीही शीर तडतडली असती. पण आज काय तो एकदाचा हा मॅटर क्लोज करूनच टाकू, नकोच ती त्याची फालतूची बडबड ऐकणे, हा विचार करून स्वतःच्या रागाला संयमीत करत मनवा गाडी स्टॅंडला लावून लायब्ररीत गेली. एव्हाना रोज नवनवीन बूक्स रेफर करून त्याचा अभ्यास करण्याने लायब्रेरीयन तिला चांगला ओळखायला लागला होता. तिकडे जाताच तिने विचारले

“ मिस्टर ऋषिकेश पाटील आलेत का लायब्ररीत ? ”

त्यावर अदबीने लायब्रेरीयनने आपल्या ड्रॉवरमधून एक कागद काढून तिच्या हाती देत म्हणाला,

“ हो, इतक्या वेळ इथेच होते ते. जाताना तुमच्यासाठी हा निरोप देऊन गेलेत. ”

‘अजून एक चिठ्ठी ??’

मनवाचे तर टाळकेच सरकले.

‘हा माणूस माझ्याशी मुद्दाम खेळ तर नाही खेळत आहे ना?
हा नेमका आहे तरी कोण?
स्वतःला कोण टाटा बिर्ला समजतो काय माहीत ?’

वैतागून मनवाने चिठ्ठी उघडली. त्यात "इंग्रजी लिटरेचर डिपार्टमेंट" इतकेच लिहीले होते.

‘ आता ह्याचा अर्थ काय घ्यायचा?’

विचार करतच लायब्रेरीयनला इंग्रजी विभागाकडे जाण्याचा मार्ग विचारून ती बाहेर पडली.

एस बी कॉलेजचे कॅम्पस बरेच विस्तीर्ण पसरलेले असल्याने सगळ्या फॅकल्टीजचे कॅंम्पस वेगवेगळे आणि अंतरावर होते. तिने गाडी काढली आणि कला विभागाच्या कॅम्पसकडे गाडी वळवली. मोठ्या गेटमधून आत जाताच समोरच कला शाखेच्या विविध विषयांप्रमाणे वर्गवारीत वेगवेगळे चेम्बर्स दिसत होते.
त्यातल्या इंग्रजी लिटरेचरच्या चेंबरमध्ये तिने प्रवेश केला.
दरवाजातून अगदी त्यांच्या सायन्स विभागात जसे विविध कप्पे खाने असलेली कपाटे होती तशीच रचना इथेही होती. प्रत्येक एकेका कप्प्यावर त्या त्या लेक्चररच्या नावाची लेबले डकवलेली दिसत होती. त्यातल्याच एका कपाटावरील पाटीवर तिची नजर स्थिरावली आणि ती तिथेच थंड गार पडली.

हो, बरोबर, तुमचा अंदाज अगदी बरोबर आहे. मनवाच्या कल्पनेपलिकडचा होता हा विचार कारण तिथल्या एका कपाटावर *ऋषिकेश पाटील* ह्या नावाची पाटी झळकत होती. पण म्हणजे त्याने पहिल्या दिवसापासून तिची खेचली होती हे साफ दिसत होते. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळवायचीच हे ठरवून तिने दारावर टकटक केले.
मान वरही न करता आतून एक भरीव आवाज आला.

“ मिस मनवा द मायक्रोबायलॉजीस्ट, कम इन ! ”

" ह्याला कसे कळले मीच आलेय? "

थरथरत्या पावलाने मनवा आत गेली. तो खाली मान घालून काही तरी लिहीत होता. त्याला बघून मनवा स्तिमित झाली. त्या दिवशीचा गावंढळ, खेडवळ आणि अतिशय सुमार राहणी असलेला तो युवक आज एकदम चकाचक कपड्यात पायात बूट अगदी साहेबाच्या तोऱ्यात दिसत होता.

माणसाच्या बाह्य रूपावरून त्याची योग्यता ठरवायची तीच चूक, जी तिच्याबाबतीत कोणे एके काळी तिच्या सहपाठ्यांनी केली, तीच आज मनवानेही केली होती.

‘ह्याच्या वागण्या-बोलण्या आणि राहणीमानावरून आपण ह्याला फालतू, चिंधीचोर, कंजूस, अन् काय काय समजलो. असोऽऽ. ’

मनातल्या मनात स्वतःशी संवाद साधत मनवा आत गेली.
आपले काम करता करताच खाल मानेनेच अस्खलित इंग्रजीत तो म्हणाला,

“ प्लीज हॅव अ सीट यंग लेडी. आय विल फिनिश माय वर्क ॲंड विल जॉईन यू शॉर्टली ! ”

आता तर मुर्च्छीत व्हायची पाळी मनवाची होती. एकावर एक आश्चर्यकारक झटके देत मनवाच्या मनात निर्माण झालेल्या त्याच्या पूर्वग्रहदुषित प्रतिमेला सुरूंग लावत मनवाला पुरते नामोहरम करत होता तो.

एव्हाना मनवाचा सगळा राग, संताप गळून पडून त्याची जागा आता आश्चर्याने घेतली होती.

तरीही काही प्रश्न मनात तसेच घर करून बसलेले होते.
त्यातला पहिला प्रश्न….

‘इतकी चांगली नोकरी असतानाही ह्याने आपल्याला नोकरीसाठी शब्द टाकून वशिला लावायची गळ का घातली ????? ’

“ हॅलोऽऽऽ यंग लेडी ! ”

त्याने आपले काम संपवून अगदी काही न झाल्यागत वागत स्मित वदनाने तिला ग्रीट केले.
त्याच्या ह्या वागण्याने मनवा अचंबित झाली.

“ हा काय आपल्याला इंम्प्रेस करू पाहतोय का ? ”

“ नाही नाहीऽ, अजिबात नाही. तुम्ही समजताय तसे अजिबात नाही मिस मनवा. ”

‘ आऽऽ ! पण मी तर ह्याला काहीच बोलले नाही. मग ह्याला कसे कळले मी मनात काय बोलले ते ? "

पुन्हा मनवाचे स्वतःशीच स्वगत सुरू झाले. पण मनात आलेल्या प्रश्नांना तो मात्र लगेच उत्तर देत होता.

“ मिस मनवा, तुम्ही नेहमीच इतके बोलता का हो ? "

“ कोणऽ मी ? पण मी कुठे काय बोलले ? ”

“ हो मग ? आल्यापासून बघतोय, किती सारे प्रश्न पडलेत तुम्हाला, तेही माझ्याबाबतीत. ”

“ बापरे !! हा काय जादूगार आहे की मनकवडा !
माझ्या मनातले प्रश्न ह्याला बरे कळले ?
मनवाऽ आता बोलणे थांबव, त्याला सगळं कळतंय तुझ्या मनातलं !
बापरे ! पण म्हणजे त्या दिवशी मी ह्याला मनातल्या मनात जे बोलले तेही कळले असेल का ह्याला?
नाही नाही, ते कळून नाही चालणार. आधीच हा सरकेल खोपडी, त्यात मी दिलेली मुक्ताफळे ह्याला कळली तर काय होईल देवच जाणे !
स्टॉप मनवा स्टॉप ! स्टॉप टॉकींग इन माईंड ! ’

“ हॅलो, कुठे हरवलाय ? हे पाणी घ्या. यू लूक स्ट्रेस्ड. प्या म्हणजे बरे वाटेल. ”

ऋषिकेशने त्याच्या टेबलवरचा ग्लास सरकवत तिला म्हणाला.
तिची नजर कावरीबावरी झाली होती. ती घाईघाईने म्हणाली,

“ न….. नको, मी ठीक आहे. मी ज्यासाठी आले ते काम करून निघते मी. ”

वाक्य बोलता बोलताच मनवाने आपल्या पर्समध्ये हात घालून दहा रूपयांची नोट काढून त्याच्याकडे सरकवत म्हणाली,

“ हे घ्या तुमचे पैसे. आणि थॅंक्यु त्या दिवशी मला एवढी मदत केली त्यासाठी. ”

“ अहो, राहू द्या हो. पैसे कुठे पळून चाललेत. आता आलाच आहात तर, एक कॉफी ? आमच्या इथे कॉफी खूप छान मिळते. ”

‘कशालाऽऽ ? आत्ता देशील आणि पुन्हा ह्याचेही बिल मागशील, काय तर म्हणे *टीटीएमएम*, नकोच ते.’

पुन्हा मनातल्या मनात बोलत मनवाने जीभ चावली.
त्याबरोबर तो लगेच म्हणाला,

“ घाबरू नका, ही कॉफी माझ्याकडून ट्रीट आहे. ह्याचे बिल नाही मागणार मी तुम्हाला ? ”

आता मात्र मनवाचे पेशन्स संपले. तिने न राहवून आश्चर्य मिश्रित रागात विचारले,

“ तुम्हाला काय माहीत मी हेच बोलले ते ? तुम्ही काय एखादे मशीन फीट केलेय का इकडे लोकांच्या मनातले ओळखायचे ? ”

हे बोलली आणि तिने परत जीभ चावली. (कारण हे बोलून तिने स्वतःच कबूलीनामा दिला होता की त्याने तिच्या मनात काय चाललेय हे बरोब्बर ओळखलेय.)

त्यावर चेहऱ्यावरचे स्मित जराही न ढळू देता तो म्हणाला,

“ मिस मनवा तुम्हाला वाटतेय तुम्ही बोलत नाही आहात पण तुमचा चेहरा आणि डोळे सगळं स्वच्छ सांगून टाकतात नाऽऽ, की तुम्ही मनातल्या मनात काय काय विचार करताय !
त्यामुळे मला ते वाचणे अजिबात अवघड नाही जात आहे.
मिस मनवा, प्रथमतः खूप खूप सॉरी. त्या दिवशी मी जरा जास्तच चेष्टा केली तुमची. रादर खूपच उद्धटपणे वागलो, मान्यय मला. तुम्हाला त्रास द्यायचा मुळीच हेतू नव्हता पण………! ”

“ पण काय ? ”

मनवाने लगेच विचारले.

त्यावर जरा दम खाऊन तो म्हणाला,

“ वेल. कॉफी घेता घेता बोलूयात का ? आलीच आहे कॉफी. ”

तेवढ्यात चपराशाने कॉफी आणली.
दोघांपूढे दोन मग्ज ठेवून तो गेला तसे ऋषिकेशने घसा खाकरून बोलण्याची पूर्वतयारी करत एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला,

“ मिस मनवा, ज्या दिवशी तुमचा इंटरव्ह्यू होता त्याच दिवशी माझ्या ओळखीतला एक जण पण तिकडे इंटरव्ह्यूसाठी आला होता. मी त्याला "ऑल द बेस्ट" विश करायला तिकडे आलो तेंव्हा त्याचा नंबर तुमच्या एक नंबर आधी होता. त्यावेळी माझी नजर तुमच्यावर पडली आणि नंतर तो गाडीचा किस्सा. तेव्हा मला तो प्रसंग आठवला. आणि त्याच दिवशी दूपारी पुन्हा आपली योगायोगाने भेट झाली.

मला तुमच्याशी हे सगळे निवांत शेअर करायचे होते पण आपली तर ओळख नव्हती त्यात मी इंटरव्ह्यूला आलोय म्हणल्यावर तुम्हाला वाटले की मी स्टूडंट आहे आणि मग तुम्ही माझ्याशी एकदम "अरेतूरे" त बोलायला लागल्या. नाहीऽ नाहीऽ, मला ते खूप आवडले, तुमचे एकेरीत बोलणे.
पण मग तुमचा गैरसमज झालाच आहे तर त्याचा फायदा घेत मलाही जरा तुमची मस्करी करायची हुक्की आली.
मी इंग्रजीचा प्राध्यापक आहे हे कळले असते तर तुम्ही माझ्याशी तशा भाषेत बोललाच नसतात, नाही का!
म्हणून मी तुमचा गैरसमज तसाच ठेवून मुद्दाम नोकरी नाही आणि वशिला लावा वगैरे बोललो. ते पैसे पण मूद्दाम परत करण्यासाठी आवर्जून सांगितले. कारण त्यावेळी तसे बोललो नसतो तर आपल्याला एकमेकांना पुन्हा भेटण्याची ही संधी कशी मिळाली असती !
आणि त्यामुळेच तुमच्या मनात काय काय प्रश्न येऊ शकतात ह्याचा अंदाज घेत मी ठामपणे बोलत होतो. सॉरी जरा जास्तच चेष्टा केली मी.

फ्रेंड्स ? ”

सगळे बोलून लगेच ऋषिकेशने मैत्रीचा हात पुढे केला.

“ अजून एका धक्क्यातून सावरत नाही तोवर हा दुसरा धक्का देतोय. आणि आता लगेच मैत्री पण. भलताच फास्ट आहे की गडी ! ”

“ नाही नाही. घाई नाही. विचार करायला हवा तेवढा वेळ घ्या. ”
मनवा पुन्हा अवाक.

“कमाल आहे, ह्याला कसे कळले !!! ”

“ परत तेच. अहोऽऽ, तुम्ही जे मनात बोलता ना ते सरळ सरळ तुमच्या चेहऱ्यावर छापलं जातं. तुमच्या हावभावावरून कळतं नाऽ मला मग. ”

त्याने पुन्हा मिश्किल हसत तिच्या मनातल्या प्रश्नांवर उत्तर देऊन टाकले.

मग थोडा भावूक होत पुढे म्हणाला,

“ माझ्या आयुष्यात फार कमी लोकांशी मी स्वतःहून मैत्री केलीय. नात्यांच्या बाबतीत तसा मी जरा कमनशिबीच!
पण गेल्या दोन भेटीतच काय झाले माहित नाही पण कुठेतरी वाटून गेले की तुमच्या सारख्या हुशार आणि मनाने साफ व्यक्तीशी मैत्री व्हायला हवी. म्हणून मुद्दाम ती चिठ्ठी जरा उद्धट भाषेत लिहीली.
आय होप माझ्या विषयी तुमच्या मनात असलेल्या सर्व शंका दूर झाल्या असतील.
जेव्हा कधी वाटेल की ही मैत्री स्वीकारावी तेव्हा आवाज द्या. हा मित्र कायम सोबत असेल. ”

मनवा येताना तर त्याला भरपूर सुनावून त्याचे पैसे तोंडावर मारायच्या पूर्ण तयारीत अगदी तावातावात आली होती. पण इकडे आल्यावर त्याच्या एका मागोमाग एक गूगली,चौकार आणि षटकारांनी मनवा तर त्याला काय ऐकवायचे होते हेही विसरून गेली. त्याच्यातल्या एका साफ, प्रामाणिक तितक्याच निर्मळ मनाचे वेगळेच दर्शन मनवाला आत्ता झाले होते. इतक्या जूजबी ओळखीत ह्याने माझ्या मनातल्या प्रत्येक सूक्ष्मातिसूक्ष्म बदलांना हेरले इतकेच नव्हे तर त्या सगळ्या शंकांचे निरसन करण्यासाठी अगदी प्रामाणिकपणे जे खरे होते ते कुठलाही आडपडदा न ठेवता सगळे उघड उघड कबूल केले. अशा साफ मनाच्या व्यक्तीची मैत्री ही तर देवाने दिलेली अमूल्य भेट समजायला हवी, नाही का!

पण नाही. भावूक होऊन चालणार नाही. असे घाईघाईत निर्णय घेता उपयोगी नाही. त्याने मला आजमावले ना, आता माझी टर्न आहे. बघू माझ्या कसोटीवर हा किती खरा उतरतोय. माझ्या परीक्षेत पास झालास तर ही मैत्री डन!’

मनात हे सगळे विचार चालू असताना वरकरणी संयम राखत गंभीर आणि निर्विकार चेहऱ्याने मनवा म्हणाली,

“ चला येते मी. उशीर होतोय. ”

ती जायला निघणार तोच त्याने पुन्हा आवाज दिला.

“ मिस मनवा, हे घेऊन जा. ”

‘आता काय विसरले मी!’

असा विचार करतच ती मागे वळली तसे त्याने तिने टेबलवर ठेवलेली नोट परत करत तिला म्हणाला,

“ अजूनही शंका आहे का माझ्या इराद्यांविषयी तुला… आपलं ते तुम्हाला ? ”

त्याने लगेच आपली चूक सुधारली.

“ आपली भेट होण्याची संधी म्हणून फक्त ते "टीटीएमएम" चे नाटक होते. प्लीज हे पैसे परत घ..घे…आय मीन घ्या. ”

काही न बोलता मनवाने पैसे पर्समध्ये कोंबले आणि तिकडून सटकली.

“ अहो मॅडम, निर्णय जरा लवकर कळवा, नाहीतर मला पुन्हा अशी काहीतरी नाटकं करायला लागतील भेट घेण्याची.. आणि हो गाडीत पेट्रोल चेक केले का..? कार्बोरेटरमधला कचरा साफ करा बरंका लवकर, नाहीतर गाडी रस्त्यात बंद पडायची. ”

तो सांकेतिक भाषेत काय सुचवतोय हे समजून मनवा मनोमन हसली आणि एक रागीट कटाक्ष टाकत तिकडून निघाली.

खरंच मनवाच्या मनरूपी कार्बोरेटरमधला कचरा कधी साफ होणार???

हे विधात्याने घातलेले कोडेच तर नव्हते ना….. !!!

--------------------------------------------------------

ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी
(पर्व एक - समाप्त)

नमस्कार मंडळी,

आज ‘ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी’ कथेचे एक पर्व संपले.
मनवाच्या जीवनाचा खडतर प्रवास संपून आता एका सुंदर हळूवार वळणावर मनवाच्या आयुष्याची गाडी येऊन थांबलीय. अतिशय विचित्र परिस्थितीत एका वेगळ्याच पद्धतीने ऋषीची म्हणजेच आपल्या हिरोची एन्ट्री झालीय. आपला हिरो दिसतो तितका साधा सरळ अजिबात नाहीये हं. आल्यापासून बघताय ना किती छळवाद मांडलाय त्याने मनवाचा. पण हीच मैत्रीतली हलकीफुलकी नोकझोक पूढे कशी प्रेमात परीवर्तीत होतेय ही कथा वाचायला तुम्हाला जराशी वाट पहावी लागणार आहे.
ह्याचे पुढील भाग घेऊन मी लवकरच तुमच्या समोर हजर होईन.
तोपर्यंत मनवा आणि ऋषीला मुळीच विसरू नका हं.
लवकरच भेटू,
“ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी पर्व-2” मध्ये.

कथेच्या शिर्षकाप्रमाणे ऋणानुबंधाच्या गाठी जुळण्याची सुरवात तर झाली. आता पुढे ह्या गाठी कशा दृढ होताहेत, हे सगळे जाणून घ्यायला स्टे ट्यून्ड विथ मी,
मनवा & ऋषी उर्फ ऋषिकेश.
आजचा भाग कसा वाटला ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा..
आजपर्यंत मला जे भरभरून प्रेम दिले ते तसेच पुढेही ठेवाल ही अपेक्षा करत तुमची तात्पुरती रजा घेतेय..

धन्यवाद मंडळी.

@राधिका.



🎭 Series Post

View all