जिथून पडल्या गाठी - 34

मनवा आणि ऋषीच्या प्रेम,त्याग,विरह आणि समर्पणाची भावस्पर्शी कथा.

ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी - 34
©®राधिका कुलकर्णी.



भोळे मॅडमच्या सांगण्यानुसार मनवा प्रिंसिपल केबिनमध्ये पोहोचली. अजून सर केबिनमध्ये आले नव्हते. तिने एक निःश्वास टाकला. थोड्याच वेळात सर आले तशी ती आत गेली.
तिचे लेटर आणि इतर कागदपत्रे त्यांच्या टेबलावर ठेवली आणि पुढील सूचनेची वाट पहात उभी राहिली.

साधारण पन्नास पंचावन्नच्या आसपास वय असलेले अगदी स्थूल शरीरयष्टी, परंतु चेहऱ्यावर बुद्धिमत्तेचे दिसणारे तेज आणि प्रसन्न मूद्रेचे प्राचार्य, त्यांना बघून मनवाला आपले वडील आठवले तशी ती मनातच हसली.
त्यांनी सगळ्या पेपरवर बारकाईने नजर टाकली आणि तिला म्हणाले,

“ मिस मनवा, आजच्या दिवस तुम्ही ऑफीस काऊंटरवरच्या रजिस्टरमध्ये तुमची साईन करा. उद्यापासून तुमचे नाव जसे मस्टरवर नोंदवले जाईल तसे मग तिकडे साईन करा. मायक्रोबायलॉजी विषय आम्ही मागच्या दोन तीन वर्षांपासूनच इकडे सुरू केलाय. त्यामुळे अजून म्हणावी अशी स्ट्रेंथ नाहीये विद्यार्थ्यांची. पण हळूहळू वाढेल. त्यात चांगले शिक्षकही मिळत नव्हते. पण तुमचे ॲकॅडेमिकल रेकॉर्ड्स बघून वाटतेय की तुम्ही छान शिकवाल. ऑल द बेस्ट मनवा.

“ सखाराम ह्यांना आपले टाईम टेबल आणि बाकी सगळे सिलॅबस चार्ट्स दे. "

चपराशी सखारामने दिलेल्या सर्व झेरॉक्स मनवाकडे सुपूर्द करत त्यांनी अभ्यासक्रमाचे साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक असे चार्ट्स देऊन समजावून सांगितले की कोणता अभ्यासक्रम कसा किती दिवसात पूर्ण केला पाहिजे.
ते सगळे माहित करून घेऊन तिची क्लासरूम कोणती हे सगळे सांगेपर्यंत दूपार झाली.
आज तिला लगेच शिकवायला जावे लागणार नव्हते त्यामुळे त्यांनी तिला आता आज तुम्ही घरी गेलात तरी चालेल असे सांगून जायची परवानगी दिली.
हुश्श करत मनवा केबिनच्याबाहेर आली.
‘आता जेवायला घरीच जाऊ’ असा विचार करत मनवा सायकल स्टॅण्डकडे जिथे तिची गाडी तिने सकाळी पार्क केली होती तिथे आली.
सप्टेंबर महीन्यात भर दूपारी ऊन मी म्हणत होते. मनवाने गाडीला किक मारली पण ती सुरुच होईना. एकदा दोनदा तीनदा, पायडल मारून मनवाचा चेहरा लाल झाला पण गाडी स्टार्टच होईना. काय करावे ? घामाघूम होत मनवा इकडे तिकडे कोणाची मदत मिळतेय का बघतच होती की समोरून एक सायकलस्वार जाताना दिसला. तिने जोराने ओरडून आवाज दिला,
“ ओ शूक् शूक्ऽ ! ”

त्याने पाय जमिनीवर टेकवून इकडे तिकडे बघितले पण कोण बोलवतेय न कळून तो पून्हा जायला निघणार तोच मनवाने पून्हा जोरात हाक मारली,

“ ओ सायकलवाले दादा. जरा थांबा ना. "


आत्ता त्याची नजर पडली आणि तो वळून माघारी आला. जरा जवळ येताच त्याच्या चेहऱ्याचे हावभाव बदलले. एव्हाना मनवाच्याही चेहऱ्याचे हावभाव बदलले. आज तिचे नशिबच फुटके म्हणून मिळून मिळून तोच तिच्या पुढ्यात आला होता पुन्हा.
पण मनवाला आता दुसरा पर्यायही नव्हता. कारण भर उन्हात तिकडे ह्याच्याखेरीज चिटपाखरूही दिसत नव्हते.
शब्दांत शक्य तितके मार्दव आणि गोडवा आणत मनवा त्याला म्हणाली,

“ प्लीज थोडी मदत करता का ? माझी गाडी स्टार्टच होत नाहीये. तुम्ही बघता का तूम्हाला जमतेय का?

सकाळी जे झाले त्या करता पुन्हा एकदा सॉरी, पण ते मी मुद्दाम केले नव्हते. चुकून झाले होते. ”

जरावेळ मनवाच्या घर्मबिंदू जमा झालेल्या, उन्हाने लाल झालेल्या चमकदार पण निरागस चेहऱ्याकडे बघून काही न बोलता त्याने सायकल बाजूला उभी करून तिच्या गाडीला खूप किक मारल्या, पण ती त्याच्याच्याने पण सुरू व्हायचे नाव घेईना. मग घामेघूम चेहऱ्याने त्याने विचारले

“ गाडीत पेट्रोल टाकलेय का ? ”

त्यावर तात्काळ उत्तर देत मनवा म्हणाली,

“ तर, तर. अहो काल रात्रीच टंकी फूल केली होती सकाळी अडचण नको म्हणून. "

त्यावर काही न बोलता तो म्हणाला,

“ चला, चहा घेऊ जरा. येता का कॅंटीनला ? ”

" इकडे गाडी स्टार्ट होत नाही. भर उन्हाची वेळ आणि हा चहा काय ऑफर करतोय? "

मनवा मनातल्या मनात हा विचार केली कारण त्याचे हे वागणे जरा विचित्रच वाटत होते तिला.

“ अहोऽ, एवढ्या उन्हात चहा कोण पितं ? आणि ते चहा वगैरे राहूदे. जरा गाडीचे बघा ना लवकर. ”

मनवा त्याला अजिजीने विनंती करत होती. मनातल्या मनात तिची चिडचिड होत होती तरीही आत्ता ह्याच्या शिवाय कोणीही मदत करू शकत नाही हे जाणून शक्यतो स्वतःला संयमित करत ती बोलत होती.
त्याला तिच्या बोलण्याचा रोख समजला. तसा तो पण खवळला,

“ ओऽ मी काय तुम्हाला मॅकॅनिक वाटून ऱ्हायलो का ? ह्या वेळी कोणी नाही म्हणून माणूसकीच्या नात्याने मदत करतोय तर तुम्ही पार हक्कच गाजवू लागल्या की.
काय नवीन शिकलाय का गाडी ? ”

मनवाने मानेनेच होकार दिला. तसा तो बोलला,

“ तरीच ! ”

“ म्हणजे? ”

मनवाला त्याच्या "तरीच" आणि त्यानंतरच्या छद्मी हास्याचा उलगडा झाला नाही.

" अहो बाईऽ ! ”

“ एऽ बाई काय बाईऽ, मी काय बाई दिसतेय का तुम्हाला ? ”

ते तुम्ही कोणीही असाल, तो मूद्दा महत्त्वाचा नाही. मूद्दा हा आहे की तुम्ही गाडीची टंकी एकदम फूल केली ना, त्यामूळे एअर बबल फॉर्म झालाय म्हणून ती स्टार्ट होत नाहीये. जरा वेळ जाऊद्या. आपोआप तो एअर गॅप व्हॅनिश होईल मग होईल सुरू गाडी. म्हणून म्हणलो चला चहा घेऊ, "तर ज्याचं करावं भलं ते म्हणतं……"


त्याने आपली म्हण अर्ध्यावर सोडून कॅंटीनकडे जाऊ लागला. मनवाही नाईलाजाने त्याच्या मागोमाग कॅंटीनमधे गेली.


कॉलेजला लागून असलेल्या त्या छोटेखानी हॉटेलमध्ये चहा, भजी, सामोसे, कचोरी असे तुरळकच खाद्यपदार्थ मिळायचे.
ते दोघे झाडाखाली सावलीतले एक टेबल बघून बसले.
त्याने दोन कटींग ऑर्डर करून खिशातल्या रूमालाने चेहऱ्यावरचा घाम टीपू लागला.
मनवाने आत्ता कुठे त्याला इतक्या जवळून निरखून बघितले.
अगदीच खेडवळ वळणाची त्याची भाषा, तसाच पेहराव, तरी डोळ्यात एक विलक्षण चमक होती हूशारीची. अंगावर शुभ्र पांढरा सदरा आणि तशीच पांढरी पॅन्ट. काळा सावळा रंग , तरतरीत नाक, बोलके पाणीदार डोळे आणि भव्य कपाळ अतिशय रांगडा गडी.

आपले तोंड पुसत रूमाल खिशात सारताना त्याचे लक्ष मनवावर गेले आणि ती त्याच्याकडेच बघतेय हे त्याच्या लक्षात येताच मनवाने गडबडीत नजर इकडे तिकडे फिरवली.


चहा येईपर्यंत काय बोलावे म्हणून त्यानेच विचारले,


“ आत्ता इकडे कुणीकडे ? तसं कॉलेज जरी सुरू झाले तरी कोणी येत नाही सेम डे ला. "

त्यावरून तिच्या लक्षात आले की तोही तिला स्टूडंटच समजलाय. तसे ती त्याला म्हणाली,

“ नाही नाही. मी स्टूडंट नाही. मी प्रोफेसर म्हणून रूजू झालेय आजपासून. आज माझा नोकरीचा पहिला
दिवस आहे. "

"आईच्या गावात !

आपण हे काय बोलून बसलो ! "


मनातल्या मनात तो चपापला आणि त्याने जीभ चावली.

तो तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटला हे तिला जाणवलं पण काही कळले नाही. पण जाऊदे म्हणून तो विचार तिकडेच सोडून तिने त्याला विचारले,


“ मग तुम्ही इकडे काय करताय ? ”

“ ते मी पण इंटरव्ह्यूसाठीच आलो होतो. आणि लायब्ररीत पण येत असतो अभ्यासाला. ”

“ अच्छा ! म्हणजे स्टूडंट आहेस तर तू ? कोणत्या वर्षाला आणि कोणत्या फॅकल्टीमध्ये शिकतोय ? ”

हा स्टूडंट आहे कळल्यावर लगेच मनवा हुश्श करत एकेरीत येऊन बोलू लागली.

“ नाही म्हणजे आयूष्यभर मनुष्य विद्यार्थीच असतोय. खरेतर मी इंटरव्ह्यूसाठीच आलो होतो. मग नंतर लायब्ररीत वाचत बसतो आलो की.”

“ मग झाला का ? कसा झाला ? सलेक्शन झाले का ? "

एका दमात मनवाने सारे प्रश्न विचारले. सकाळी ज्या उद्धटपणे तो तिच्याशी बोलला होता त्याचा वचपा काढायची तिलाही खुमखुमी आली होती.

“ अहोऽ, आर्ट्समधे इंग्रजी विषयासाठी इतके कॅंडिडेट आले होते. आता त्यातून कुणाची निवड होतेय काय माहीत, बघू देवाची मर्जी. इंटरव्ह्यू तर बरेच झालेत. बघू काय होतेय. तुम्ही चहा घ्या. नाव काय म्हणालात मॅडम तुमचं ? ”

“ मी मनवा. मनवा वैद्य. मायक्रोबायलॉजी करता निवड झालीय माझी. आणि तुम्ही ? ”

“ अरे वाहऽ !

कॉनग्रॅच्युलेशन्स मनवा मॅडम !

खूप अवघड विषय आहे हा. आपलं अन् सायन्सचं कधीच जुळलं न्हाय. कसंबसं दहावीपर्यंत गाडं धकवलं आणि मग सरळ आर्ट्स फॅकल्टी निवडली. त्यात इंग्रजी लिटरेचर मध्ये आवड होती म्हणून पूढे त्यातच पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. पण लय कॉम्पिटीशन हो तिकडं. एक दोन जागा. त्यासाठी पाचशे उमेदवार आलेले. लई भुस्कुट बगा डोक्याचं. ”


“ हम्म. खरंय. पण काळजी करू नका. होईल तुमचे सलेक्शन.. ऑल द बेस्ट ! काय नाव तुमचं ? "

“ मी ऋषिकेश. ऋषिकेश पाटील. मॅडम एक विनंती करायची होती, करू का ? ”

" हां. बोला. "

“ ते तुमच्या ओळखीने काही करता आलं तर बघा ना. ओळख असली तर लवकर काम होते असं ऐकून आहे मी. "
तो डोळे मिचकावत म्हणाला. तसं मनवाने लगेच तो विचार झटकत म्हणाली,

“ छे.. छे.. असे वशिल्याने इकडे नोकरी मिळत नाही बरं. ह्या भ्रमात राहू नका. तुमचे ॲकॅडेमिक्स उत्कृष्ट असेल तर सलेक्शन तसेच होऊन जाईल. माझेही सलेक्शन फक्त माझ्या ॲकेडेमिकल परफॉर्मन्सवरच झालेय. "

मनातल्या मनात तिला त्याच्या ह्या विचारसरणीची किळसच आली. पण आपल्याला कुठे ह्यांच्या बरोबर आयूष्य काढायचेय. जाऊदे. तेवढी गाडी सुरू झाली की तो त्याच्या वाटेला आणि मी माझ्या.
"देवा, इकडे भेटला .पुन्हा नको रे भेटवूस ह्याला."

असे मनातल्या मनात देवाशी संवाद साधत ती त्याचा चहा संपायची वाट पहात बसली. फूर्र फूर्र आवाज करत तो मस्त भर उन्हात अगदी मिटक्या मारत चहाचा आस्वाद घेत होता. अखेरीस चहा पिऊन झाला तसे त्याने स्वतःचे पैसे दिले आणि मनवाला म्हणाला,

“ चहा TTMM आहे बरं का? ”

“ म्हणजे ??? ते काय असते ? "

“ अहो, म्हणजे ‘तुमचं तुम्ही-माझं मी’ असं. मी माझं बिल दिलं तुम्ही तुमचं द्या. ”

मनवाने कप्पाळाला हात मारून घेतला. देवा हे सॅंम्पल तुला माझ्याच गाठीला घालायचे होते का रे ?
कटींग वन बाय टू चहाला सुद्धा तो चिंधीगीरी करत माझे बिल मला द्यायला सांगतोय. स्त्री दाक्षिण्य वगैरे संकल्पना हा कधी ऐकला की नाही ?
आणि त्यात नेमके माझ्याजवळ आज पैसे नाहीत. नाहीतर दोघांचे बिल मी त्याच्या तोंडावर मारले असते. देवा….! ”

मनातल्या मनात हा संवाद पूरा करत ती कसनूसं तोंड करून त्याला म्हणाली,

“ काय आहे ना आज माझ्या जवळ पैसे नाहीयेत. प्लीज माझे बिल तुम्ही द्याल का? मी उद्या तुम्हाला इथेच परत करेन. "

“ ठीक आहे. पण उद्या माझे पैसे मला परत करा नक्की. ”

म्हणतच मनवाचेही बिल पे करुन ते पुन्हा गाडीपाशी आले. एक किक मारताच गाडी चक्क स्टार्ट झाली की.
त्यावर विजयी मुद्रेने हसून कुठल्या लढाईत जिंकून आल्याच्या आविर्भावात तो म्हणाला,

" बघा म्हणलं नव्हतं का कार्बोरेटरमधे कचरा आसलं, तो साफ झाला की गाडी आपोआप सुरू होईल. झाली की नाही ! "

" हो, थॅंक्स हा ! "

“ बरं जाता जाता एक सल्ला ऐकून जा. नाही तुम्ही मगाशी बोलल्या की गाडी नवीनच शिकल्या म्हणून सांगतोय. गाडीमध्ये कधीपण गच्च काठोकाठ पेट्रोल भरायचं नाही. नाहीतर मग चालता चालता कधी कधी एअरबबल फॉर्म होऊन भर रस्त्यात गाडी बंद पडू शकते. आणि हमरस्त्यावर अचानक अशी गाडी बंद पडली तर ॲक्सिडेंट पण होऊ शकतो. तेव्हा इथून पुढे लक्षात ठेवा. नाहीतर त्यापेक्षा ही आमच्या सारखी दूचाकी घ्या. लई बेस्ट !
कधीच धोका देत नाही. शरीर तर सुदृढ ठेवतेच वर पेट्रोलच्या पैशांची पण बचत करते. ”

जाता जाताही त्याने आपल्या आगाऊपणाचा सबूत देत सल्ला दिलाच.
तो ऐकून मनवाच्या डोक्यात आगडोंब उसळला. कसा बसा आपल्या रागावर नियंत्रण ठेवत खोटे छापील हसू चेहऱ्यावर आणून त्याला कटवत मनवा तिकडून निमिषार्धात नाहीशी झाली.

" उद्या तेवढे पैसे द्या बरंका, विसरू नका. "

जाता जाताही मनवाला छेडायची संधी त्याने सोडली नाहीच.. मनवाने एक रागीट कटाक्ष टाकत तिथून पळ काढला.

उद्याचा दिवस काय नवीन अनुभव घेऊन येतो हे काळच ठरवणार होता……..!

-----------------------------------------------------------

क्रमशः -34
©®राधिका कुलकर्णी.

मनवाच्या नोकरीच्या पहिल्याच दिवशी तिला हे एक अजब पात्र भेटलेय.
वन बाय टू चा दहा रूपयाच्या चहाचे पण अर्धे पैसे तो परत मागतोय.

नाव वाचून काही क्लू लागला का मंडळी !!!

हम्म.. समजले असेल तर ठीक नाहीतर मग बाकी धमाल वाचायला उद्या परत भेटूच या..

कथा आवडत असेल तर कमेंट्सद्वारे नक्की अभिप्राय कळवा.
धन्यवाद.

🎭 Series Post

View all