जिथून पडल्या गाठी - 29

मनवा आणि ऋषींच्या प्रेम,विरह,त्याग आणि समर्पणाची भावस्पर्शी कथा


ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी -29
©®राधिका कुलकर्णी.


थोड्या वेळाने गायत्री, वैशू आणि तिसरी पार्टनर अस्मि रूमवर आल्या. रूममध्ये नेहमीप्रमाणे दिवा नाही. उदबत्तीचा सुवास नाही. मनवाही अभ्यास न करता चक्क एका कोपऱ्यात उदास बसलेली पाहून त्यांना जरा आश्चर्यच वाटले.
तिच्या जवळ जाऊन बघता तिचे रडून रडून सुजलेले डोळे, कोणीतरी मारल्यागत लाल झालेले गाल आणि उतरलेले तोंड बघून त्यांना धक्काच बसला.

" काय गंऽऽ, काय झाले ? अशी का अंधारात बसलीस आज ? आणि जेवण केले की नाही ? "

तिघींच्या प्रश्नावर मनवा अचानक गायत्रीला मिठी मारुन रडायला लागली.
कुणालाच काही समजत नव्हते. पण तिचा रडण्याचा भर ओसरल्यावर त्यांनी पुन्हा विचारणा केली तसे घडलेला सर्व प्रकार तिने सगळ्यांना सांगितला.
त्यावर सुस्कारा सोडत गायत्री आणि वैशू म्हणाल्या..

" म्हणजे तुही आलीस तर त्यांच्या रडारवर !! "

मग हळूच घाबरत अस्मि म्हणाली….

" काल तुम्ही विचारत होत्या ना क्लास सोडून तू कुठे गेली होतीस…..? तेव्हाऽऽ…. मी पण त्यांचे कपडे प्रेस करायला गेले होते.
त्यांनी वाटेतच अडवून मला त्यांच्या रूमवर नेले आणि हे एवढा मोठा कपड्यांचा ढीग इस्त्री करायला दिला.. वर  ”कुणाला सांगितलं तर बघ काय करू ? " अशी धमकी पण दिली म्हणून मी तुम्हाला काहीच सांगितले नाही काल.. "

" बापरेऽऽऽ ! भयानक आहे हे. ह्यावर वेळीच काहीतरी करायला हवं नाहीतर रोज कुणी ना कोणी त्यांच्या अत्याचाराचा शिकार बनेल. "

मनवा म्हणाली.

" अगं आजपर्यंत त्यांचं कोणीच काही वाकडे करू शकले नाहीये. मागल्या वर्षी असेच एक दोघींनी त्यांच्या विरोधात ऑफिस मध्ये तक्रार केली. रेक्टरने थोडी कानउघाडणी करत त्यांना सुचना देऊन सोडून दिले. त्याच रात्री त्यांनी त्या दोन्ही पोरींना त्यांच्याच रूममध्ये घुसून इतके फटकावले की बिचाऱ्या घाबरून होस्टेल सोडून कायमच्या निघून गेल्या. त्यानंतर मग कोणी त्यांच्या विरोधात उभे राहिला तयार होईनासे झाले. त्या सांगतील ते निमूटपणे ऐकून वेळ मारून नेतात झाले. "

गायत्रीने गौप्यस्फोट केला.

" बापऽरे. ! कितीऽ कठीणऽ आहे हेऽ ! आणि इतकं सगळं तुला माहित राहूनही तू ह्याबद्दल आम्हाला कल्पना का नाही दिलीस ? आमची मैत्रीण म्हणवते ना स्वतःला? "

मनवाने वैतागून विचारले. त्यावर गायत्री म्हणाली..

" अगं त्याबद्दल आधीच सांगितले असते तर घाबरून तुम्ही होस्टेलवर रहायलाच आल्या नसत्या आणि मी त्यांचीच बॅचमेट ह्या नात्याने त्यांना विनंती केली होती की ह्या तिघी माझ्या मैत्रिणी आहेत तर त्यांना प्लीज त्रास देऊ नका. मला वाटले की त्या तुम्हाला काही करणार नाहीत. असे काही तुमच्याबाबत घडेल असा मी विचारच केला नव्हता. त्यांनी तर मला पण फाट्यावर मारले. ह्यांची हिंमत वाढतच चाललीय दिवसेंदिवस. काहीतरी करायला हवे हे खरे. "

गायत्री खिन्नतेने बोलत मनवाच्या जवळ बसली.
त्याबरोबर मनवाने काहीतरी ठरवले आणि म्हणाली…

" तुमच्या सगळ्यांची साथ असेल तर माझ्या डोक्यात एक कल्पना आहे. आपण आता त्यांचाच डाव त्यांच्यावर उलटवूया. "

" अगं पण कसे ? त्या तिघी स्पोर्ट्सगर्ल्स आहेत.
दरवर्षी युनिव्हर्सिटीला विविध खेळांमधून गोल्ड नाहीतर सिल्व्हर मेडल मिळवून देतात त्यामुळे त्यांना कोणीच काही बोलत नाहीत. त्यातल्या एकीचे वडील तर पोलिटीकल बॅकग्राऊंडचे आहेत. त्याचीच धौस दाखवून त्या सगळ्यांना रॅग करत असतात. कोणी ऑफिशियल कम्प्लेंट पण करत नाही आणि केली तरी अपूऱ्या पुराव्याअभावी फक्त समज देऊन त्यांना सोडून दिले जाते. आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर तुच सांग कसा आपण त्यांचाच डाव त्यांच्यावर उलटवणार?? "

" तेच तर सांगते ना.. फक्त त्या आधी एक करा, सगळ्या ज्युनिअर्सना कळवा की वॉर्डनचा शेवटचा राऊंड झाला,दिवे बंद झाले की सगळ्यांनी आपल्या रूममध्ये गूपचूप जमायचे. बाकी सगळे मी पाहून घेईन.. "

इति मनवा.

मनवाच्या चेहऱ्यावरचा कमालीचा आत्मविश्वास बघता सगळ्यांनी तिला साथ देत तिच्या सांगण्यानुसार तो निरोप सर्व ज्युनिअर्समधे पोहोचवला.
रात्री नऊ साडेनऊ वाजता नेहमीप्रमाणे वॉर्डन सगळ्या रूममधील मुलींची संख्या काऊंट करून दिवे मालवून निघून गेली तसे वारूळातून मूंग्या बाहेर पडाव्यात तशा सगळ्या मुली मनवाच्या रुममध्ये गोळा झाल्या. ह्या मिटिंगचा नेमका अजेंडा काय आहे हे अजून कुणाच्याच लक्षात आले नव्हते त्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक अनामिक प्रश्नचिन्ह अवतरले होते.

सगळ्या जमल्याची खात्री पटताच खबरदारीने आपल्या रूमबाहेर कोणी नाही ना ह्याचा कानोसा घेत मनवाने दाराला कडी घातली आणि बोलायला सुरुवात केली. सर्व प्रथम आज तिच्यावर जो प्रसंग गुदरला तो कथन करत एकेकीला त्यांना पण काही अशाच प्रसंगांना सामोरे जावे लागले का हे जाणून घेतले. तर हळूहळू प्रत्येकीने आपापले किस्से ऐकवले. हे सगळेच इतके अविश्वसनीय होते की प्रत्येक जण ह्याच नरकातून जात असुनही घाबरून बोलत नव्हता हे स्पष्ट झाले.
म्हणजे सगळे एकाच नावेचे प्रवासी होते..
मग मनवाने सगळ्यांना हळू आवाजात आपला प्लॅन ऐकवला. आधी सगळ्या शांत होत्या पण मग एकेकीने आपला होकार भरत मनवाच्या योजनेत सहभाग दर्शवायला सुरवात केली.

" तू म्हणतेस ते सगळे ऐकायला खूपच भारी वाटतेय पण जर आपला प्लॅन फसला तर काय मनवा? "

कुणीतरी एकीने शंका उपस्थित केली. त्यावर मनवा जोशात म्हणाली..

“ मला सांगा तुम्ही सगळ्यांनी लहानपणी शाळेत त्या कबुतर आणि पारध्याची कथा ऐकलीय की नाही ?
त्या कथेचे मॉरल काय होते की " एकिचे बळ मिळते फळ " मग ह्या बोधकथा काय आपल्याला फक्त शिकून विसरून जायला शिकवल्या आहेत का, नाही नाऽऽ? जेव्हा प्रत्यक्ष आयुष्यात असे प्रसंग येतील तेव्हा त्यांच्याबरोबर कसे लढायचे हेच तर ह्या कथा शिकवतात ना. मग आताही आपली एकजूटच आपल्याला यश देणार आहे. आपल्या पुर्वजांनी फार अभ्यास करून आपल्या अनुभवातून ह्या म्हणी आणि बोधकथांची निर्मिती केलीय जेणेकरून त्याचे अनुसरण करून पुढल्या पिढीने आपले आयुष्य सुखी करावे.. आता आपल्यापूढे ह्याच वस्तूपाठाची शाहनिशा करण्याची संधी चालून आली आहे.. मग मनात संदेह कशाकरता? मला सांगा अजूनही कोणी आहे, ज्याला भीती वाटतेय ? ज्याला प्लॅन फेल जाण्याची भीती वाटते त्याने ताबडतोब आपल्या रूममध्ये जावे. ज्यांना माझ्यावर विश्वास आहे फक्त तेवढेच लोक इथे थांबा.. माझी कोणावरही जबरदस्ती नाही. पटकन काय ते ठरवा. "

पुर्ण खोलीत मिनिटभर शांतता पसरली. मग एक सूरात सर्वांनी मनवाच्या हातावर हात टेकवून आपली सहमती दर्शवली.
मनवाने सगळ्यांना अजून जवळ बोलवून अतिशय हळू आवाजात सगळा प्लॅन समजावून सांगितला.
प्लॅन प्रमाणे प्रत्येकीला तिचे काम वाटून दिले गेले. ह्या योजनेची गुप्तता राखून कोणालाही काहीही सुगावा न लागू देता काय काय करायचे हे मनवाने समजावून सांगितले. सगळ्यांना एखाद्या थरार मिशनमध्ये भाग घेतल्याचा फिल येत होता..
सगळ्या मिटिंग संपताच उत्साहात आपापल्या रूममध्ये गेल्या. पण आज खात्रीने उद्या काय थरार नाट्य घडणार ह्या कल्पनेनेच कोणालाही झोप लागणार नव्हती हे निश्चित होते..
मनवाने रात्रीच जागून पाच बीन नावाच्या तक्रार अर्जाचे ड्राफ्ट्स तयार केले.
सकाळ झाली तसे ते पाचही ड्राफ्ट्स अनुक्रमे स्वाती, भारती, मिनाक्षी, अस्मि आणि निशाला सुपूर्द केले.

आज दिवसाच्या वेगवेगळ्या प्रहरी त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात तेच ड्राफ्ट्स कॉपी करून रेक्टर ऑफिसमध्ये सबमिट करायचे असे ठरले.
इकडे गायत्री क्लासेसपासून त्यांच्यावर नजर ठेवून त्या दिवसभर कॅंम्पसमधे काय काय करतात ह्याची बित्तंबातमी प्रज्ञा आणि तनूला देणार. तनू, प्रज्ञा ती माहिती बबिताकडे देणार. बबिता ती मनवाला देणार असे ठरले.
कोणीही कुठलाच संशय येईल अशी हरकत न करता अतिशय शांततेत आपापली कामगिरी पार पाडायची हा मुख्य मुद्दा मनवाने प्रत्येकीला नीट समजावून सांगितला. गायत्री वर कुठलाही संशय येऊ नये म्हणून दिवसभर ती फक्त त्यांच्या नजरेत राहील अशाच जागी तिने जायचे आणि पुर्ण दिवसात एकाही रूममेट्स किंवा ज्युनिअर स्टुडंट्सला भेटायचे नाही असे ठरले कारण ह्या सगळ्यात रॅगर-गर्ल्सना शिक्षा झाली तरी किंवा प्लॅन उलटा पडला आणि काही कारणाने हे षडयंत्र त्यांच्या लक्षात आलेच तर गायत्री ह्यात सामील होती असा संशय त्यांना येऊ नये म्हणून मनवाने घेतलेली ही खबरदारी होती.
सगळ्या अतिशय उत्साहात आपल्याला दिलेले काम चोख बजावत होत्या. गायत्री त्यांच्यावर आणि प्रज्ञा, तनू आणि बबिता गायत्रीच्या मागावर होत्या. गायत्री त्यांचे अपडेट्स चिठ्ठीत लिहून जवळून जाता जाता ती जमिनीवर फेकत होती. प्रज्ञा, तनू ती माहिती बबिताला देत होत्या तर बबिता ती माहिती मनवाला पोहोचवण्याचे काम करत होती.

इकडे ठरल्याप्रमाणे एक एक करत पाचही जणींनी आपले तक्रार अर्ज ऑफीसात रेक्टरच्या टेबलवर सोडून निघून आल्या. रेक्टरच्या बुडाला घाम यायचाच बाकी राहीला. आज एक नाही दोन नाही पाच-पाच अर्ज त्या पोरींच्या विरोधात दाखल झाले म्हणल्यावर फक्त वॉर्निंग देऊन प्रकरण दाबणे शक्य होणार नव्हते आणि रेक्टरने काही ॲक्शन घेणे म्हणजे त्याची नोकरी घालवून बसण्यासारखे होते. रेक्टर सरांची अवस्था अडकित्त्यात सुपारी सारखी झाली होती.
त्यातल्या त्यात त्यांच्यासाठी जमेची बाजू ही होती की आलेले सर्व अर्ज निनावी होते त्यामुळे त्याचा विचार इतक्या गांभीर्याने करण्याची आत्ता तरी गरज नव्हती.

पण मनवाच्या म्यानातला आखरी बाण अजून सुटलेला नव्हता. आणि योग्य वेळ साधून ती आपला अचूक वेध घेणार होती.
काय होती मनवाची ती पुढची खेळी ……….?

---------------------------------------------------------
क्रमशः भाग-29
©® राधिका कुलकर्णी.

मनवाची पुढची योजना काय असेल?
तिला त्यात यश मिळेल का?
हे जाणून घ्यायला वाचत रहा "ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी"
कथा आवडत असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा.. आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा.
धन्यवाद.


🎭 Series Post

View all